चेतासंस्था

Page Under Maintenance

मेंदूजल विकार (हैड्रोकेफॅलस)

मेंदूजल

मेंदू व चेतारज्जू भोवतीच्या विशिष्ट पोकळयांत एक द्रवपदार्थ (मेंदूजल) भरलेला असतो. या द्रवपदार्थात काही क्षार, साखर, प्राणवायू, इत्यादी पोषक पदार्थाचे ठरावीक प्रमाण असते. मेंदू व चेतारज्जू च्या आतील भागांना या पदार्थाचा पुरवठा होण्यासाठी या द्रवाचा उपयोग असतो. आजूबाजूचे रक्तवाहिन्यांचे जाळे व हे मेंदूजल यांमध्ये पदार्थाची सतत देवाणघेवाण चालू असते. मेंदूचे कामकाज सुरळीत चालू ठेवण्यासाठी ही व्यवस्था आवश्यक असते. काही आजारांत पाठीच्या कण्यातून तपासणीसाठी पाणी काढून घेतात ते हेच मेंदूजल असते.

मेंदूजलविकार

काही जन्मजात दोषांमुळे मेंदूजलाचे प्रमाण व त्याचा दाब वाढतो. अशा बाळाचे डोके मोठे दिसते. टाळूही मोठी व फुगलेली आढळते. नुकत्याच जन्मलेल्या काही बाळांमध्ये पाठीच्या कण्यावर कोठेही पातळ त्वचा असलेला (किंवा त्वचा नसलेला) फुगा दिसतो. हा देखील मेंदूजलाचा फुगा असतो. सौम्य प्रमाणात असतील तर हे दोन्ही विकार शस्त्रक्रियेने बरे होण्यासारखे असतात. आता सोनोग्राफी तंत्राने या दोन्ही विकारांचे गर्भावस्थेतच निदानही करता येते.

तात्पुरता मेंदू-आघात

रक्तवाहिनीत तात्पुरता अडथळा होऊन मेंदूचा काही भाग तात्पुरता बधिर होतो, आणि संबंधित शरीर -भाग दुर्बल किंवा निकामी होतो. असा आघात सहसा एक तासापेक्षा जास्त टिकतो, पण 24 तासात बरा होतो. काही असे आघात मिनिटभर पण येऊन जातात. डोळा, हात, पाय,  यापैकी एखाद्या भागात तात्पुरता  निर्जीवपणा किंवा संवेदना-बधिरता  येऊ शकतात.

ABCD2 या सूत्राप्रमाणे age/वय 60 पेक्षा जास्त), >140/90 पेक्षा जास्त बीपी, प्रत्यक्ष तपासणीत शरीराचा अर्धा भाग बाधित होणे, सोबतीने डायबेटीस-मधुमेह, मेंदू-बधिर होण्याचा कालावधी 60 मिनिटापेक्षा जास्ती असणे,यामुळे एकूण धोका वाढतो. 

एमारआय तंत्राने याचे निदान होऊ शकते. अशा व्यक्तीने तज्ञ डॉक्टरकडून कडून तपासणी करून पुढील उपाययोजना योजना आखली पाहिजे.

मेंदूचा झटका/मेंदूघात  (मेंदूतील रक्तवाहिन्यांचे आजार)

मेंदूचा रक्तपुरवठा निसर्गाने फार चांगला ठेवलेला आहे. यात अनेक पर्यायी मार्ग असतात. मेंदू व चेतासंस्था ही अत्यंत नाजूक संस्था आहे. रक्तप्रवाहात दोन-तीन मिनिटे खंड पडला तरी मेंदूचा संबंधित भाग कायमचा बिघडू शकतो. ही घातक देखील असू शकते.

हृदयविकाराच्या झटक्यात दोन-तीन मिनिटांत परत हृदयक्रिया चालू झाली नाही तर पुन्हा हृदयक्रिया चालू होऊनही उपयोग नसतो; कारण मेंदूतल्या पेशी तेवढया काळात मरण पावतात.

हृदयविकारात जसा रक्तप्रवाह खंडित होतो, तसाच मेंदूचा झटका असतो. यातही रक्तप्रवाह खंडित होतो. याची तीन प्रकारची कारणे असू शकतात.

कारणे

भारतामध्ये मेंदू-आघात/अर्धांगवायूचे प्रमाण सुमारे हजार लोकसंख्येमागे २ इतके आढळते. हा आजार प्रामुख्याने उतारवयीन व्यक्तींमध्ये दिसतो आणि वाढत्या वयासोबत त्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. अर्धांगवायू (Hemiplegia) म्हणजे शरीराच्या एका बाजूचा लकवा होणे. याचे मुख्य कारण म्हणजे मेंदूतील रक्तपुरवठा अचानक बंद होणे (रक्तवाहिनीत गुठळी अडकणे: इस्केमिक स्ट्रोक) किंवा रक्तस्राव होणे (हॅमरेजिक स्ट्रोक). याशिवाय डोक्याला दुखापत, मेंदूतील गाठ, मेंदूज्वर किंवा इतर संसर्गांमुळेही हा विकार होऊ शकतो. काही वेळा Cerebral palsy मुळे लहान मुलांमध्येही अशी लक्षणे दिसतात.

उच्च रक्तदाब हे या आजाराचे महत्त्वाचे कारण आहे. रक्तदाब वाढल्यामुळे रक्तवाहिन्या कडक होऊन फुटण्याचा धोका वाढतो. मधुमेह, धूम्रपान, लठ्ठपणा आणि रक्तातील मेद वाढणे यांमुळे रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साचून त्या अरुंद होतात (अॅथेरोस्क्लेरोसिस), ज्यामुळे गुठळ्या तयार होण्याची शक्यता वाढते. अशा गुठळीमुळे रक्तप्रवाह अडल्यास मेंदूचा संबंधित भाग निकामी होतो. कधी कधी रक्तदाब खूप कमी झाल्यासही मेंदूला पुरेसा रक्तपुरवठा होत नाही.

मेंदूच्या विशिष्ट भागांद्वारे शरीराच्या हालचाली आणि संवेदना नियंत्रित केल्या जातात. त्या भागात दाब, इजा, संसर्ग किंवा रक्तपुरवठा कमी झाल्यास संबंधित अवयवात कमजोरी किंवा लकवा येतो. वेळेवर उपचार आणि जोखीम घटकांचे नियंत्रण केल्यास या आजाराचे दुष्परिणाम कमी करता येतात.

अर्धांगवायू याप्रमाणे येतो
  • उभ्या शरीराचा अर्धा भाग (एक हात व पाय), चेह-याचा अर्धा भाग किंवा
  • कमरेखाली दोन्ही पाय, मेंदूच्या एका (डाव्या किंवा उजव्या) भागात बिघाड झाला तर डोक्याखालच्या भागातील शरीराची विरुध्द बाजू बिघडते.
तात्पुरता किंवा कायमचा अर्धांगवायू

अर्धांगवायू कधीकधी तात्पुरता असतो, तर कधीकधी कायमचा. अर्धांगवायूचा झटका आल्यावर पहिल्या दोन-तीन दिवसांत शरीराचा कोणकोणता भाग लुळा पडणार हे ठरून जाते. उपचार केल्यावर दोन-तीन महिन्यांनंतर जास्तीतजास्त  सुधारणा दिसून येण्याची शक्यता असते. मात्र काही जणांच्या बाबतीत सुधारणा होत नाही. मानसिक, शारीरिकदृष्टया खचल्याने बरेच रुग्ण या आजारात दगावतात.

मेंदू आघाताचे वेळीच निदान करण्यासाठी खालील खुणा महत्त्वाच्या आहेत. यातले एकही चिन्ह असल्यास सावध व्हावे; आणि त्वरित वैद्यकीय मदत मिळवावी.

  • चेह-याचे स्नायू सैलावणे, लुळे पडणे
  • ओठाची एक बाजू खाली तर दुसरी वर दिसणे. 
  • हात सैल व अशक्त होणे.
  • बोलण्यात बदल -अवघडलेपण
  • रुग्ण बोलू शकत नाही किंवा बोलणे अस्पष्ट होते.
  • रक्तदाब वाढलेला असू शकतो. किंवा अगदी कमीही असू शकतो.
  • त्वचेवर बधिरता – संवेदना कमी होणे.
  • विचित्र वास, चव, ध्वनि किंवा दृष्टीभ्रम होणे.
  • डोळयांच्या पापण्या जडावणे, अर्ध-मिटल्या होणे.
  • गिळण्याची क्रिया अवघड जाणे
  • एका डोळयाची बाहुली विस्फारणे किंवा प्रकाशाला लहान न होणे.
  • तोल जाणे
  • श्वसन अनियमित होणे.
  • चक्कर येणे.
लक्षणे
  • रक्तप्रवाहातला खंड तात्पुरता असेल तर नुसती चक्कर येते किंवा शरीराचा संबंधित भाग तात्पुरता बिघडतो. यात झटका येतो किंवा शक्ती जाते.
  • रक्तप्रवाह दीर्घकाळ बंद पडला तर संबंधित भागातली शक्ती, हालचाल जाऊन लुळेपणा येतो.
  • बिघाडाचे प्रमाण फार मोठे असेल तर शरीरात व्यापक बिघाड होतो. यामुळे इतर अंतर्गत संस्था बंद पडणे किंवा बिघडणे, बेशुध्दी, श्वसन किंवा हृदयक्रिया बंद पडणे, इत्यादी गंभीर परिणाम संभवतात.
  • अशा लुळेपणालाच आपण ‘अर्धांगवायू’ किंवा ‘अंगावरून वारे जाणे असे म्हणतो.
  • यामुळे मृत्यूही येऊ शकतो.

आपल्या गळ्यात दोन्ही बाजूला कॅरोटिड  धमनी असते, त्यापैकी एकीचा प्रवाह कमी असला तर फरक जाणवू शकतो. एखाद्या व्यक्तीस यामुळे एका डोळ्यात काही कालावधीसाठी अचानक कमी दिसायला लागते, गळयातील धमनी-प्रवाह कमी आहे की योग्य ही हाताने थोडेसे समजते पण आधुनिक इमेजिंग तंत्राने अचूक कळते. अशा व्यक्तीस अर्धांगवायुचा धोका जास्त असतो.

उपचार – प्रथमोपचार
  • रुग्णाला प्रथम धीर द्यावा.
  • रुग्णाला आडवे ठेवावे, शक्यतो कुशीवर ठेवावे म्हणजे श्वसन सोपे जाते.
  • तात्पुरत्या मेंदू आघाता असेल (म्हणजे काही मिनिटे परिणाम टिकून परत नीट झाले असल्यास) ऍस्पिरिनची 75 mg गोळी द्यावी, यामुळे रक्तप्रवाह पातळ होऊन मेंदूमध्ये रक्त सर्वत्र पोचते. यामुळे पुढील धोका टळतो.
रुग्णालयातले उपचार

रुग्णालयात नेणे आवश्यक आहे, त्याशिवाय रक्तवाहिनीत अडथळा आहे की रक्तस्त्राव ही महत्वाचे निदान होऊ शकत नाही. यासाठी एमआरायनिदान करावे लागते. याचबरोबर रक्ताच्या लॅब तपासण्या, कार्डिओग्राम, छातीचा एक्स रे आदि तपासण्या आवश्यक आहेत. योग्य निदान झाल्यावर पुढील उपचार करता येतात.तातडीकउपचार लागतात, कारण श्वसन, हृदयक्रिया बन्द पडू नये याची काळजी घायवि लागते. रक्तवाहिनीत अडथळा असल्यास काढण्यासाठी औषधे किंवा अंजीओग्राफी आदि लागू शकते. अतिरक्तदाब, मधुमेह असल्यास त्यासाठी उपचार लागतातच. त्यामुळे वेळ न दवडता योग्य हॉस्पिटल मध्ये दाखल करायला पाहिजे.

लक्षणे दिसल्यानंतरची पहिली ६० मिनिटे उपचारासाठी आदर्श असतात. त्वरित उपचारामुळे नुकसान टळण्याची सर्वाधिक शक्यता असते.रक्ताच्या गुठळ्या विरघळवणारे इंजेकशन पहिल्या 4.5 तासात दिले तर सर्वात प्रभावी ठरते. मोठी रक्तवाहिनी तुंबली असल्यास २४ तासाच्याआत ओपेरेशन करून ती मोकळी करणे सर्वात फायद्याचे.  यामुळे मेंदूचे नुकसान कमी होते, अपंगत्व टाळता येते आणि जीव वाचण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते.   

घरी करायची शुश्रूषा

अर्धांगवायूच्या रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडल्यानंतर पुष्कळ काळजी घ्यावी लागते. असा रुग्ण दीर्घकाळ सांभाळावा लागतो. त्याची शारीरिक आणि मानसिक स्थिती चांगली नसते. अचानक आलेला अर्धांगवायूसारखा गंभीर आघात, अंथरुणाला खिळून राहावे लागणे, म्हातारपण, परावलंबित्व ह्या सर्वांचा एकत्रित परिणाम होतो. खालील समस्या निवारण कराव्या लागतात.

  • दैनंदिन व्यवहार पार पाडण्यासाठी येणा-या अडचणी – यात जेवण, लघवी, मलविसर्जन, झोप, हालचाल करण्याची गरज या सर्व बाबी येतात.
  • अंथरुणात पडून राहण्यामुळे पाठ, कंबर, ढुंगण यावर जखमा होतात. या टाळण्यासाठी बरीच काळजी घ्यावी लागते. यात वारंवार कूस बदलणे,शेक देणे, मऊ-हवाशीर अंथरुण, दबाव-बिंदूकडे लक्ष देणे या सर्व महत्त्वाच्या बाबी आहेत.
  • पडून राहिल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते. यामुळे न्यूमोनिया व इतर आजार लवकर होतात.
  • स्नायू दुर्बल होतात. यासाठी व्यायामोपचार करावे लागतात.
  • बरे व्हायला अनेक आठवडे-महिने जातात. काही जण यानंतरही बरे होत नाहीत.
  • अनेक शहरात यासाठी प्रशिक्षित सेवक दिवस-रात्र पाळी करण्यासाठी उपलब्ध आहे. घरात सक्षम नातेवाईक असल्यास त्यांना प्रशिक्षण घेत येते.
आयुर्वेद व योगोपचार

रक्तवाहिन्यांच्या आजारांमुळे रक्तपुरवठयात अडथळा येऊन मेंदूत बिघाड होतो. अशा आजाराला रक्तचंदन चूर्ण व जेष्ठमध चूर्ण समभाग एकत्र मिसळलेले तीन ते सहा ग्रॅम (एक-दोन चमचे) रोज याप्रमाणे एक दोन महिने घ्यावे. यामुळे रक्तप्रवाह नियमित राहण्यास मदत होते पण अर्थातच प्रारंभिक तीव्र अवस्थेत तज्ज्ञाकडे पाठवणे आवश्यक आहे. रुग्ण रुग्णालयातून घरी आल्यानंतरच वरील उपचार करावेत. अर्धांगवायू झालेल्या रुग्णांना आधी रुग्णालयात दाखल करावे लागते. घरी आणल्यानंतर नस्य, बस्ती, अभ्यंग, वाफा-याचे शेक, आसने व काही औषधे यांच्या मदतीने सुधारणा होऊ शकते. एकदा आजाराची पहिली तीव्रता ओसरली, मलमूत्र विसर्जनाची पूर्वसूचना देणे शक्य झाले की खाटेवर पडल्यापडल्या पवनमुक्तासन करावयास मदत करावी. प्रेम आणि सहानुभूतीने रुग्णास धीर द्यावा.

या बरोबरच महायोगराज गुग्गुळ एक ग्रॅम गोळी तीन वेळा आणि एकांगवीर 500 मि.ग्रॅ. गोळी तीन वेळा ही औषधे सुधारणा होईपर्यंत पोटातून द्यावीत.

हळूहळू इतर आसने शिकवता येतील. शक्याशक्यता पाहून वज्रासन, पद्मासन, भुजंगासन, इत्यादी शिकवता येईल. काही रुग्णांना आसने करताना अवयवांच्या कडकपणामुळे वेदना जाणवते. अशा रुग्णांचे श्वसन तपासावे. फक्त डावी नाकपुडी मोकळी आहे, उजवी बंद अशी स्थिती असल्यास डाव्या नाकपुडीत सुगंधी कापसाचा बोळा ठेऊन ती बंद करावी. या उपायाने उजवी नाकपुडी मोकळी होते. एकदा उजव्या बाजूने श्वसन सुरू झाले, की 15 मिनिटे बोळा तसाच ठेवून, नंतर काही तास बोळा काढावा व नंतर परत बसवून अर्धा तास जाऊ द्यावा. याप्रमाणे हळूहळू दोन्ही नाकपुडयांतून श्वसन एकसारखे चालू होईल अशी काळजी घ्यावी. यामुळे अवयवांचा कडकपणा कमी होतो.

याउलट अवयवांना अगदी शिथिलपणा असेल तर उजवी नाकपुडीच चालू असण्याचा संभव असतो. या परिस्थितीत डावी नाकपुडी चालू करण्याचा प्रयत्न करावा.

आसने करताना एकदम योग्य आसन व्हावे अशी इच्छा अवास्तव आहे. हळूहळू प्रगती होत जाते. हे सर्व करायला खूप सहनशीलता आणि चिकाटी लागते.

हे उपचार यौगिक परंपरेनुसार सांगितले आहेत. आपण स्वतःही या क्षणी कोणत्या नाकपुडीने आपला श्वास चालू आहे हे तपासू शकतो. सर्वसाधारणपणे कोणती तरी एकच नाकपुडी चालू असते हे अनुभवास येईल. दिवस-रात्र, आजारपण, इत्यादींप्रमाणे विशिष्ट बाजूने श्वसन चालू राहते असा अनुभव आहे.