
मेंदूसूज म्हणजे मेंदूचे आवरण किंवा अस्तर सुजणे किंवा मेंदूतच सूज येणे, असा अर्थ इथे सोयीसाठी घेतलेला आहे. हे दोन्ही आजार वेगळे असले तरी परिणाम जवळजवळ सारखेच दिसतात त्यामुळे मेंदूसूज या एकाच नावाखाली दोन्हींचे वर्णन करता येईल.
मेंदूसुजेच्या या दोन्ही प्रकारांपैकी मेंदूच्या आवरणाच्या सुजेचे प्रमाण जास्त आहे. विशेषतः लहान मुलांमध्ये हा आजार जास्त आढळतो.
मेंदूच्या आवरणाची किंवा मेंदूतली सूज, जीवाणू किंवा विषाणूंमुळे होते. जीवाणूंपैकी ‘पू’ निर्माण करणारे जीवाणू किंवा क्षयरोगाचे जीवाणू याला कारणीभूत होऊ शकतात. मेंदूचा हिवताप पण याच गटात येतो.
लहान मुलांना ब-याच प्रकारचे जंतुदोष होतात. हे विकार वेळीच आटोक्यात आले नाही तर कधीकधी ते मेंदूपर्यंत पोहोचतात. कान फुटणे, घसासूज, टॉन्सिलसूज, दातात पू होणे, चेह-यावर गळू, पू, फोड, डोक्यास जखम, श्वसनसंस्थेचे जंतुदोष, प्राथमिक क्षयरोग, इत्यादी आजारानंतर मेंदूच्या आवरणाचा किंवा मेंदूचा जंतुदोष होऊ शकतो.
काही प्रकारची मेंदूसूज स्वतंत्रपणे येऊ शकते. उदा. साथीचा मेंदूज्वर. साथीच्या विषाणूंमुळे येणारा मेंदूज्वर एका विशिष्ट डासामार्फत (क्युलेक्स) पसरतो. हा फार घातक आजार आहे.
क्षयरोगामुळे होणारी मेंदूसूज हळूहळू वाढणारी, सौम्य लक्षणांची असते. याउलट इतर जीवाणू व विषाणूंमुळे येणारी मेंदूसूज तीव्र लक्षणांची व वेगाने (2-3 दिवसांत) वाढणारी असते.
मेंदूसूजेमध्ये खूप ताप, डोकेदुखी, उलटया, झटके, अतिझोप, चिडचिडेपणा, वागण्या-बोलण्यात फरक व पुढे बेशुध्दी अशी लक्षणे दिसतात. बाळास मेंदूसूज असल्यास ते न थांबता सतत रडते.
क्षयरोगाच्या मेंदूसूजेच्या प्रकारात ही लक्षणे सौम्य असतात. ताप त्या मानाने कमी असतो. यात डोकेदुखी, उलटया कमी प्रमाणात असतात व वागण्या-बोलण्यातला फरक एक-दोन आठवडयांत दिसायला लागतो.

अशा लक्षणांवरून मेंदूसुजेची शंका घेऊन रुग्णालयात लवकरात लवकर पाठवणे आवश्यक आहे. एक-दोन दिवसांत योग्य उपचार सुरू झाला तर जीवाणूंमुळे येणारी मेंदूसूज पूर्ण बरी होऊ शकते. त्यासाठी शारीरिक तपासणीबरोबर मेंदूजलपरीक्षा आवश्यक असते. जीवाणू ज्या प्रकारचे (पू तयार करणारे किंवा क्षयरोगाचे) असतील त्यावरून औषधयोजना ठरते. विषाणूंवर औषध नसल्याने विषाणूंची मेंदूसूज एक तर आपोआप थांबते किंवा रोगी दगावतो.पण रुग्णालयात supporting treatment खूप गरजेची असते.
मेंदूसूज हा अगदी गंभीर आजार आहे. वेळेवर उपचार न झाल्यास रोगी दगावू शकतो. किंवा मेंदूवर कायमचे दुष्ट परिणाम राहतात. जंतुविरोधी औषधांमुळे मेंदूसुजेवर काही प्रमाणात तरी नियंत्रण शक्य झाले आहे. म्हणून लवकर रोगनिदान व योग्य उपचार होणे आवश्यक आहे. क्षयरोगामुळे होणारा मेंदूचा विकार आता खूप कमी झाला आहे.
या रुग्णांना रुग्णालयात दाखल करणे आवश्यक असते. जंतुविरोधी औषधांची इंजेक्शने रोज दिवसातून 3-4 वेळा द्यावी लागतात. क्षयरोगाची मेंदूसूज असेल तर बरे व्हायला कित्येक आठवडे लागू शकतात.
मुख्य म्हणजे लहान मुलांच्या जंतुदोषांवर वेळीच उपाय करून जंतुदोष आटोक्यात आणणे आवश्यक असते. विशेषतः कान फुटल्यानंतर मेंदूसुजेची शक्यता जास्त असते. साथीचा मेंदूज्वर सोडल्यास इतर प्रकारची मेंदूसूज संसर्गजन्य नसते. (म्हणजे घरात एका मुलाकडून दुस-याला लागत नाही.)
साथीचा विषाणुमेंदूज्वर बहुधा डासांमुळे पसरतो. त्यासाठी सार्वत्रिक पातळीवर उपाययोजना करावी लागते. डासांची संख्या कमी करणे हेच अशा वेळी प्रमुख सूत्र असते. हे डास माणूस व डुकरांमध्ये विषाणूंचा प्रसार करतात.

पोलिओ (Polio) हा Poliomyelitis नावाचा अत्यंत संसर्गजन्य विषाणूजन्य आजार आहे, जो प्रामुख्याने ५ वर्षांखालील मुलांना प्रभावित करतो. हा आजार पोलिओ विषाणूमुळे होतो आणि दूषित पाणी, अन्न किंवा अस्वच्छ हातांद्वारे शरीरात प्रवेश करतो. स्वच्छतेचा अभाव, उघड्यावर शौच, आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्याची कमतरता ही याची मुख्य कारणे आहेत.
पोलिओचे सूक्ष्म विषाणू असतात. ते अन्न पाण्यामार्फत तोंडावाटे शरीरात येतात. दूषित पाणी हेच त्यांचे मुख्य वाहन आहे. यात हे विषाणू 6 महिनेपर्यंत जिवंत राहू शकतात. विष्ठेमार्फत हे विषाणू पाणी, जमीन वगैरेमध्ये पसरतात.
तोंडातून हे विषाणू प्रथम पचनसंस्थेत येतात. तिथे संख्या वाढून तात्पुरता आजार निर्माण होतो (ताप, जुलाब, उलटया). बहुतेक वेळा हा आजार आपोआप बरा होतो.
चेतारज्जूच्या पातळीवर ज्या चेतातंतूंवर हे विषाणू आघात करतात त्यांच्याशी संबंधित स्नायू लुळे पडतात. . बहुतेक वेळा हा आजार एका पायावर होतो उदा. पायाच्या चेतातंतूंवर परिणाम झाल्यास तो पाय लुळा पडतो
पोलिओचा विषाणू शरीरात गेल्यानंतर आतड्यांमध्ये वाढतो आणि काही वेळा रक्ताद्वारे मज्जासंस्थेत पोहोचतो. बहुतेक रुग्णांमध्ये लक्षणे सौम्य असतात—ताप, घसा दुखणे, उलट्या, अंगदुखी, थकवा इत्यादी. मात्र काही प्रकरणांमध्ये हा विषाणू मज्जातंतूंवर परिणाम करून स्नायूंना नियंत्रित करणाऱ्या चेतापेशींना हानी पोहोचवतो. त्यामुळे अचानक हात किंवा पायात कमजोरी येते आणि लुळेपणा (paralysis) निर्माण होतो. हा लकवा बहुतेक वेळा कायमस्वरूपी असतो आणि रुग्णाच्या आयुष्यभर परिणाम करतो.
काही गंभीर रुग्णांमध्ये श्वसन नियंत्रित करणारे स्नायूही प्रभावित होऊ शकतात, ज्यामुळे श्वास घेण्यास अडचण येते आणि जीवाला धोका निर्माण होतो. त्यामुळे पोलिओ हा केवळ अपंगत्वच नव्हे तर जीवघेणा आजारही ठरू शकतो.
पोलिओसाठी विशिष्ट उपचार उपलब्ध नाहीत, म्हणून प्रतिबंध हा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे. लसीकरण (immunization) हे याविरुद्धचे सर्वात प्रभावी शस्त्र आहे. भारतात Pulse Polio Programme अंतर्गत मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहिमा राबवण्यात आल्या आणि त्यामुळे भारत २०१४ साली पोलिओमुक्त घोषित झाला. तरीही, धोका पूर्णपणे टळलेला नसल्यामुळे लसीकरण सुरू ठेवणे आवश्यक आहे.
५ वर्षांखालील प्रत्येक मुलाला नियमित लसीकरण कार्यक्रमानुसार पोलिओची लस (OPV/IPV) देणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच स्वच्छ पाणी पिणे, हात धुण्याची सवय लावणे, आणि स्वच्छता राखणे यामुळे संसर्ग टाळता येतो.
आरोग्य कार्यकर्त्यांची भूमिका या संदर्भात अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांनी घराघरात जाऊन मुलांना लस देणे, पालकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि लसीकरणाबद्दलच्या गैरसमज दूर करणे आवश्यक आहे. योग्य लसीकरण, स्वच्छता आणि सातत्यपूर्ण जनजागृती यांच्या मदतीने पोलिओसारख्या आजारावर पूर्णपणे नियंत्रण मिळवता येते.

पोलिओसारख्या प्रत्येक आजाराची नोंद व सर्वेक्षण करून त्याचे जुलाबाचे आणि रक्तनमुने तपासणीसाठी घेतले जातात. या बालकांना रुग्णालयात दाखल करून उपचार केले जातात. यातील काही बालकांना इतर आजार असू शकतो. या बालकांची पुनर्तपासणी करून लुळेपणाची शहानिशा केली जाते.
जिथे पोलिओ रुग्ण आढळले तिथे नियंत्रणासाठी उपाययोजना करणे हे एक महत्त्वाचे कलम आहे. इथून आजार इतरत्र पसरु नये यासाठी हे महत्त्वाचे आहे. आता एक रुग्ण जरी आढळला तरी ती संभाव्य साथ म्हणून उपाययोजना केली जाते.
पोलिओसारखा आजार झालेल्या सर्व बालकांची संगतवार यादी केली जाते. यामुळे नेमकी माहिती मिळते आणि पाठपुरावा करता येतो.
पोलिओ लस थंड ठेवणे आवश्यक आहे. लस निर्मितीपासून बालकाच्या तोंडात पडेपर्यंत ती सतत शीतसाखळीत पाहिजे.तरच लस कार्यक्षम राहते. शीतसाखळी बिघडून लसीचे तपमान वाढले तर ते कळावे म्हणून ही उपाययोजना केलेली आहे. यात प्रत्येक कुपीवर निळे वर्तुळ असते. त्याच्या आत पांढरा रंग असतो. तपमान बिघडले तर आतला पांढरा रंग आपोआप निळा होतो. अशी लस टाकून द्यावी लागते.