खालील बाबतींत तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
जन्मल्यानंतर स्वतंत्र श्वसनक्रिया सुरू होणे ही बाळासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. श्वसनाचा मार्ग साफ होऊन मूल जन्मल्यावर प्रथम रडते. तेव्हा श्वसन स्वतंत्रपणे सुरू होते.
बाळ प्रथम शी (विष्ठा) करते ती हिरवट-काळसर रंगाची असते. पहिले दोन ते तीन दिवस हा रंग टिकतो. प्रथम शी करण्याची वेळ जन्मल्यावर 48 तासांपर्यंत कधीही असू शकते. 4 ते 5 दिवसात काळा रंग जाऊन पिवळी शी होऊ लागते. याबद्दल बाळा-बाळात पुष्कळ फरक असतो. काही बाळे दिवसातून 12-15 वेळा शी करतात. याउलट काही बाळे 4 ते 7 दिवसात एकदा शी करु लागतात. पिवळी व सैलसर शी असेल तर किती वेळा होते त्याबद्दल चिंता करण्याचे कारण नसते.
मुलगा असेल तर लघवीची धार लांब पडते की नाही हे आईस विचारावे. जर लघवीची धार व्यवस्थित असेल तर (लघवीच्या पिशवीपासून ते लघवीच्या जागेपर्यंत) मूत्रमार्गात अडथळा नाही असे समजावे. पहिल्या 24 तासांत लघवी झाली नाही तर तज्ज्ञाकडे पाठवावे.
पूर्ण दिवस भरून जन्मलेल्या बाळाच्या डोक्याचा आकार बाकी शरीराच्या मानाने मोठा असतो.
जन्मताना डोक्यावर आलेल्या दाबामुळे डोक्याच्या वरच्या भागावर फुगल्यासारखे दिसते. हा फुगीर भाग 24 ते 48 तासांत नाहीसा होऊन डोक्याला सारखेपणा येतो.
डोक्याचा घेर 32-36 से.मी. (सर्वसाधारण 35 से.मी.) असतो.
डोक्याची हाडे पूर्ण जुळलेली नसतात. त्यामुळे पुढे शंकरपाळयाच्या आकारात तर पाठीमागे त्रिकोणी आकारात टाळू असते. पुढील टाळू 1 वर्षात व मागील टाळू 1 महिन्यात भरते
नवजात बाळाचे हात-पाय दुमडलेल्या अवस्थेत असतात व मुठी मिटलेल्या असतात.
जन्मताना बाळाच्या अंगावर बहुधा पांढ-या चिकट पदार्थाचे आवरण असते. जन्मानंतर खूप घासून हा चिकटा काढू नये . त्यामुळे नाजूक त्वचेला इजा होउ शकते. हा चिकटा हळूहळू आंघोळी सोबत 2-3 दिवसात जातो.
आपल्या देशात नवजात बाळाचे वजन 2 किलो ते 3 किलो (सर्वसाधारणपणे 2.5 किलो) असते
आईच्या शरीरातील स्त्रीसंप्रेरकांमुळे (हार्मोन्स) कधीकधी, सुरुवातीला काही दिवस बाळाचे स्तन मोठे व सुजल्यासारखे दिसतात. त्यातून कधीकधी दूधही पाझरते. ते पिळून काढू नये.
मुलगी असेल तर याच कारणाने (स्त्रीसंप्रेरकांमुळे) योनिमार्गातून एक-दोन दिवस रक्तस्रावही होऊ शकतो.
थोडया दिवसांत हे परिणाम आपोआप थांबतात.
सर्वसाधारणपणे निरोगी बाळ जन्मल्यावर लगेच अंगावरचे दूध ओढू शकते. कमी वजनाचे/दिवसाचे मूल दूध ओढायला दमते.
जन्मानंतर बाळ रडते आणि त्याचा श्वासोच्छवास सुरू होतो. काही कारणाने बाळाचे श्वसन कमी झाले किंवा सुरू नाही झाले तर खूप मोठा धोका उद्भवतो. बाळंतपण करणाऱ्या डॉक्टर -परिचरिकेने-प्रसूती सहायकाने यावर लक्ष ठेवून वेळीच उपचार करावे लागतात. चांगल्या श्वसनाच्या खाणाखुणा म्हणजे बालकाचा त्वचेचा रंग गुलाबी असणे, हृदय-नाडीचा वेग मिनीतस मिनिटास 100 पेक्षा जास्त असणे, बाळ जोरकस रडणे. प्रतिक्षिप्त क्रिया चांगल्या असणे, आणि बाळाच्या हातापायात स्नायूंचा पुरेसा जोर जाणवणे, यापैकी काही कमी असले तरी तत्काल म्हणजे एक मिनिटाच्या आत सहाय-उपचार सुरू करणे आवश्यक आहे. यासाठी बाळ उबदार कपड्यात ठेऊन श्वसनमार्ग चिकटा साफ करणे, बॅग व मास्क वापरुन कृत्रिम श्वसन देणे, हे किमान उपचार करावे लागतात, याचे प्रशिक्षण प्रसूतिसेविकाना दिलेले असते. दर पाच मिनिटांना तपासणी करणे अपेक्षित आहे. यात दिरंगाई झाली तर बाळाचा मेंदू व इतर इंद्रियात कायमचा दोष निर्माण होतो.

बाळंतपण व त्यानंतर 6 आठवडे आई आणि बाळाच्या दृष्टीने फार महत्त्वाचे असतात. जन्मलेल्या बाळाची काळजी नीट न घेतल्याने अनेक अर्भकमृत्यू होतात. आपल्या देशात मातामृत्यूही खूप होतात. दर हजार गरोदर-बाळंतपणात एक स्त्री दगावते. इतर अनेक देशांत हे प्रमाण ह्याच्या दशांश आहे. प्रकरणात आपण नवजात बाळाची काळजी हा महत्त्वाचा विषय शिकणार आहोत.

पुढील सूचना परिचारिका /दाई, किंवा बाळाच्या जन्माचेवेळी मदत करणाऱ्या प्रत्येक व्यक्ती साठी उपयुक्त आहेत.
बाळाचे डोके बाहेर आल्यावर पूर्ण बाहेर येण्याची वाट न पहाता बाळाचा श्वसनमार्ग साफ करावा.

