हृदय व रक्ताभिसरण संस्था

हृदय-दुर्बलता, हृदयविकार (हार्ट फेल्युअर)

हृदय अपयश (Heart Failure) ही अशी अवस्था आहे ज्यामध्ये हृदय शरीराच्या गरजेनुसार पुरेसे रक्त प्रभावीपणे पंप करू शकत नाही. परिणामी शरीरातील अवयवांना आवश्यक ऑक्सिजन व पोषक द्रव्यांचा पुरवठा कमी होतो. ही स्थिती अचानक किंवा हळूहळू विकसित होऊ शकते. उच्च रक्तदाब, कोरोनरी धमनी रोग, हृदयविकाराचा झटका, हृदयातील झडपांचे विकार, मधुमेह आणि दीर्घकालीन मद्यपान ही याची प्रमुख कारणे आहेत.

हृदय अपयशाची लक्षणे (Symptoms) विविध प्रकारची असतात. सर्वात सामान्य लक्षण म्हणजे श्वास घेण्यास त्रास होणे (श्वास लागणे), जो चालताना, जिने चढताना किंवा झोपल्यावर वाढू शकतो. रात्री झोपेत अचानक श्वास लागणे (Paroxysmal nocturnal dyspnea) हेही महत्त्वाचे लक्षण आहे. पाय, घोटे व पोटावर सूज येणे (एडेमा), वजन झपाट्याने वाढणे (द्रव साचल्यामुळे), सतत थकवा व अशक्तपणा, छातीत जडपणा, भूक कमी होणे, मळमळ आणि एकाग्रतेत घट ही लक्षणे दिसू शकतात. काही रुग्णांमध्ये हृदयाचे ठोके अनियमित होणे किंवा वेगाने धडधडणेही जाणवते.

निदानासाठी ईसीजी, इकोकार्डिओग्राफी, छातीचा एक्स-रे, रक्त तपासण्या आणि काही वेळा स्ट्रेस टेस्ट केल्या जातात. उपचारांमध्ये डाययुरेटिक्स, ACE inhibitors, ARBs, बीटा-ब्लॉकर्स यांसारखी औषधे दिली जातात. यासोबतच मीठ कमी असलेला आहार, द्रव सेवनावर नियंत्रण, नियमित हलका व्यायाम, वजन नियंत्रण आणि धूम्रपान व मद्यपान टाळणे आवश्यक असते. गंभीर अवस्थेत पेसमेकर, ICD किंवा शस्त्रक्रियेची गरज भासू शकते. योग्य वेळी उपचार व जीवनशैलीतील बदल केल्यास रुग्णाचे जीवनमान लक्षणीयरीत्या सुधारू शकते.

हृदयाला रक्तपुरवठा कमी पडल्यामुळे होणारे आजार (Ischaemic heart disease-IHD)

हृदयाला होणारा रक्तपुरवठा कमी होणे हा एक अत्यंत महत्त्वाचा आजार प्रकार आहे. हा आजार प्रकार वाढत चालला आहे. याचे विविध वाईट परिणाम दिसून येतात.  त्यात तात्पुरती हृदय वेदना आणि निश्चित हृदय वेदना किंवा पुढे हृदयविकाराचा झटका हे मुख्य प्रकार आहेत. 

क्रॉनिक कोरोनरी सिंड्रोम व अ‍ॅक्युट कोरोनरी सिंड्रोम यांतील फरक

करोनरी म्हणजे हृदयातील रक्तवाहिन्या. छ्रोंनीक म्हणजे दीर्घकालीन आणि अ‍ॅक्युट म्हणजे तात्कालिक/तातडीक. सिंड्रोम म्हणजे लक्षण-चिन्हांचा गट. खाली यातला फरक दिला आहे.

घटकक्रॉनिक कोरोनरी सिंड्रोम (CCS)अ‍ॅक्युट कोरोनरी सिंड्रोम (ACS)
स्वरूपदीर्घकालीन, स्थिर आजारअचानक व तीव्र स्थिती
कारणहळूहळू वाढणारा ब्लॉकेजप्लाक फुटणे व अचानक रक्तपुरवठा बंद
लक्षणेश्रमाने छातीत दुखणे (stable angina)विश्रांतीतही तीव्र छातीत दुखणे
कालावधीदीर्घकाळ चालणारीअचानक सुरू होणारी
तीव्रतातुलनेने कमीजास्त, जीवघेणी असू शकते
ECG बदलसाधारणतः स्थिर किंवा कमी बदलST elevation / depression, T-wave बदल
बायोमार्कर्ससहसा सामान्यTroponin वाढलेला (MI मध्ये)
धोकातुलनेने कमीजास्त – हार्ट अटॅकचा धोका
उपचारऔषधे व जीवनशैली सुधारणातातडीचे उपचार (अँजिओप्लास्टी/थ्रोम्बोलिसिस)
निष्कर्ष

CCS हा नियंत्रित व दीर्घकालीन आजार आहे, तर ACS ही तातडीची व गंभीर स्थिती असून त्वरित उपचारांची आवश्यकता असते.

हृदय वेदना (अंजायना) : दोन प्रकार

छातीत दुखण्याची अनेक कारणे आहेत. – उदा. स्नायू किंवा बरगड्यांना इजा, जठरातील आम्लता, न्यूमोनिया आणि हृदयविकार. हृदयविकाराची वेदना साध्या दुखण्यापासून तीव्र कळेपर्यंत कोणत्याही स्वरूपाची असू शकते. हृदयवेदना म्हणजे खरे तर हृदयविकाराचा पहिला टप्पा असतो. हृदयवेदनेचे दोन प्रकार आहेत. (अ)  विशिष्ट श्रमाने निश्चितपणे जाणवणारी म्हणजे सश्रम हृदयवेदना. ही वेदना नायट्रोग्लिसरीन गोळी  जिभेखाली धरून आणि विश्रांतीने थांबते. (आ)  विश्रांतीतही होणारी म्हणजे विनाश्रम हृदयवेदना, याची जागा ठरलेली असते आणि कळ डाव्या हाताकडे जाणे, नायट्रेट गोळी जिभेखाली धरली तर ही वेदना शमणे हे वैशिष्ट्य असते. हा दुसरा प्रकार हृदयविकाराची म्हणजे पुढची पायरी असते.  

हृदयवेदनेची कारणे

हृदय-रक्तवाहिन्यात चरबी साठून दाह होणे, त्यात चुना जमून चुन्यामुळे काठिन्य, आणि यामुळे आतला मार्ग अरुंद होणे (स्टेनोसिस), रक्तप्रवाह कमी होणे हे हृदयवेदणेचे मूळ कारण असते. रक्तवाहिनी-मार्ग 50% पेक्षा जास्त अरुंद झाल्यास धोका संभवतो, 70% पुढे तो घातक ठरू शकतो. विश्रांतीत हे चालून जाते पण श्रमाने वेदना जाणवते. आधीच अरुंद झालेल्या रक्तवाहिन्यात रक्ताची गाठ-गुठळी, भीती-क्रोध-मानसिक धक्का यामुळे आणखी संकोच होऊ शकतो. आशा व्यक्तीने जास्त जोरकस व्यायाम केला किंवा फार थंडीत व्यायाम केला तर वेदना आणि हृदय-झटका येऊ शकतो. शास्त्रीयदृष्ट्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांच्या आजारांच्या 6 पायऱ्या आहेत. सश्रम हृदयवेदना ही त्यातली पहिली आहे.

रोगनिदान

विशिष्ट श्रम किंवा भावनिक ताण, अतिथंडी, जास्त जेवण किंवा धूम्रपानानंतर सश्रम हृदयवेदना जाणवू शकते. ही वेदना अर्धा ते 5 मिनिटे टिकते. याची जागा छातीच्या डाव्या बाजूस असते. ही वेदना त्या बाजूचा खांदा, हात, मानेचा भाग, जबडा तसेच पाठीकडे आणि बेंबीकडे घुसल्यासारखे वाटते. पण ही वेदना वरती जबडा किंवा खाली बेंबी यांच्या पलीकडे जात नाही. ही वेदना विश्रांतीने आणि नायट्रोगिलसरीन औषधाने थांबते हे महत्त्वाचे.

प्राथमिक उपचार

ताबडतोब विश्रांती आणि नायट्रोग्लिसरीन यामुळे वेदना थांबते. धीराने घेणे महत्वाचे असते.

यासाठी नायट्रोग्लिसरीन गोळी किंवा फवारा जिभेखाली द्यावा. यामुळे 2-5 मिनिटांत वेदना थांबते. या औषधाने रक्तवाहिन्या विस्फारून रक्तप्रवाह सुधारतो. अशा रुग्णाने हे औषध कायम बरोबर बाळगावे. या औषधाची चिकटपट्टीपण मिळते.

कपभर पाण्यात विरघळणारी ऍस्पिरीन गोळी सोडून ते पाणी प्यावे. यामुळे रक्त पातळ आणि प्रवाही राहते.

वैद्यकीय उपचार

हृदयवेदना ही हृदयविकाराचीच प्राथमिक पायरी आहे. म्हणून आपल्या डॉक्टरांना वेळीच कळवले पाहिजे. आवश्यक वाटल्यास रुग्णालयात दाखल व्हा. वैद्यकीय सल्ल्यानुसार कार्डिओग्राम, स्ट्रेस टेस्ट, इको टेस्ट किंवा एन्जिओग्राफी करावी लागेल. रक्तवाहिनीत अडथळा मोठा असेल तर एन्जिओप्लास्टी किंवा हृदयाची बायपास शस्त्रक्रिया देखील करावी लागेल.

विशेष सूचना

कोणतीही हृदयवेदना असली तरी धावपळ न करता आणि घाबरून न जाता एका जागी शांत राहावे. यामुळे हृदयाला आहे त्या रक्तप्रवाहाचा नीट उपयोग करता येईल.

आपली प्रथमोपचाराची औषधे नेहमी बरोबर ठेवा. आपला रक्तदाब आणि रक्तातील साखर यावरलक्ष ठेवा.हे दोन्ही घटक योग्य मापात राखण्याने हृदय विकाराचा धोका कमी होतो.