बालकांचे आरोग्य

किशोरवय आणि आरोग्य

किशोरवयीन मुलांना अनेक समस्या असतात त्या ओळखून त्याप्रमाणे त्यांना मदत किंवा  उपाययोजना करावी लागते. त्यांचे आरोग्याचे प्रश्नात कुपोषण, मानसिक समस्या,  झोपेच्या समस्या, काही संसर्ग आणि लैंगिकतेच्या समस्या असू शकतात. आजकाल  जीवनशैलीचे आजार विशेषतः स्थूलता आणि मधुमेह किंवा अतिरक्तदाब देखील किशोरवयीन मुलांमध्ये दिसून येत आहे.  तंबाखू दारू आणि इतर अमली पदार्थ याचे प्रमाण लक्षणीय आहे किशोरवयीन मुले हिंसा, लैंगिक शोषण, क्वचित गरोदरपण अशा समस्यांमध्ये अडकू शकतात. ग्रामीण ते शहरी किंवा शहरातून शहरात स्थलांतर ही पण त्यांच्या दृष्टीने एक समस्या होऊ शकते हे समजून घ्यायला हवे.  तसेच माध्यम प्रदूषण (सोशल मीडिया) इतर मुला-मुलींच्या कडून  दबाव, सामाजिक निरक्षरता, शैक्षणिक ताणतणाव,  अकाली विवाहाचा आग्रह आणि सामाजिक संघर्ष  या सगळ्यांचा त्यांच्या मनावर आणि जीवनावर परिणाम होऊ शकतो हे लक्षात घेतले पाहिजे 

साधारण 12 ते 18 या वयात मुले मानसिक आणि शारीरिक दृष्टया नाजूक काळातून जात असतात. अठरा वर्षांनंतर कायद्याने त्यांना सज्ञान मानले जाते. या वयात त्यांच्यामध्ये लैंगिकदृष्टया बरेच बदल होत असतात. हीच मुले उद्याचे पालक आणि आपल्या देशाचे भावी नागरिक होणार. सामाजिक परिस्थिती, शारीरिक बदलांमुळे तीव्र शारीरिक आकर्षण,पण ते तोलून पार करण्यासाठी लागणारी भावनिक व बौद्धिक परिपक़्वता या वयात मुलामुलींकडे असतेच असे नाही. धोका पत्करण्याची नैसर्गिक उर्मी व तीव्र कुतूहल हे या वयाचे लक्षणच म्हणता येईल. पण शारीरिक आकर्षण, योग्य साधनांचा वापर न करता केलेले शरीर संबंध, या बाबतीत नकार देण्यासाठी लागणारा ठामपण , धैर्य आणि सामाजिक आधार उपलब्ध नसतो. याबाबतीत बोलण्यासाठी कुटुंबात मोकळा संवाद बरेचदा नसतो. योग्य शास्त्रीय माहितीची उपलब्धी  व वैद्यकीय मदत याचा अनेकदा अभावच असतो.   किशोरवयीन गर्भारपण आणि गर्भपात ही एक कठीण समस्या आहे.

लैंगिक वाढीचे टप्पे

किशोरवयीन मुलांना लैंगिक वाढीबद्दल योग्य माहिती देणे आवश्यक आहे.  मुलगा असो वा मुलगी त्यांना सामान्यपणे पाच पायऱ्यांमधून लैंगिकता विकसित होते हे योग्य वेळी सांगायला हवे.  मुलींचे बाबतीत सुरुवातीस स्तनांचे ठिपके वाढायला लागणे व तिथे फुगवटा येणे, त्यानंतर स्तन फुगणे आणि बोंड मोठे होणे तसेच योनिद्वारावर केस यायला सुरुवात होणे, हळूहळू ते दाट व मोठे होणे अशा अवस्था १० ते १४-१५ वर्षापर्यंत क्रमशः होतात.  मुलांमध्ये शिश्न व अंडकोष हळूहळू मोठे व लाल होतात, शिश्न लांबट व्हायला लागते, नंतर विरळ केस येतात आणि नंतर ते केस वाढतात,  शिश्न मोठे व जाड होते आणि इंद्रिय उत्थापन होण्याची  सुरुवात होते. या सगळ्या अवस्था १२ ते १६ वर्षात म्हणजे चार-पाच वर्षात हळूहळू विकसित होतात .

किशोरवयीन पोषण

वाढत्या वयात शरीराला जास्त अन्नाची गरज असते. योग्य पोषण मिळाले तर मुलामुलींची योग्य वाढ होऊन अपेक्षित उंची- वजन आणि स्नायूंची शक्ती प्राप्त होते. अनुकूलता मिळाली तर एका पिढीत हा फरक दिसून येतो. हल्ली पालकांपेक्षा त्यांची मुले जास्त उंच आणि वजनदार होतात. याचे कारण पूर्वीपेक्षा हल्ली जास्त पोषक अन्न मिळते. स्त्रियांना समाजात असलेल्या दुय्यम स्थानामुळे मुलींना कुपोषणाचा धोका जास्त असतो. त्यांना कमी आणि हलक्या दर्जाचे  अन्न दिले जाते. त्याच्याकडून काम मात्र जास्त करून घेतले जाते. त्यात दर महिन्याला पाळीच्या रक्तस्रावामुळे त्यांना रक्तपांढरी होण्याची शक्यता असते. (तसेच मुलांनादेखील रक्तपांढरी होऊ शकते.) वजन, उंची आणि आरोग्याचे तेज ही चांगल्या आरोग्याची लक्षणे आहेत. या वयात सकस अन्न मिळणे, जरूर पडल्यास लोहाच्या पूरक गोळया देणे महत्त्वाचे आहे.

खाण्यापिण्याच्या लाडांमुळे या वयात ब-याचदा बाजारातील निकृष्ट जिन्नस खाण्याची सवय काही मुलांना लागते.अयोग्य पण झटपट मिळणारे असे पदार्थ (उदा. मैद्याचे पदार्थ, तळलेले पदार्थ, खूप साखर असलेले पदार्थ व शीतपेये ) यांची चटक लागते आणि व्यायामाचा अभाव यामुळे मुलांमध्ये स्थूलपणा आणि त्यापाठी येणारे अनुषांगिक धोकादायक आजार यांचेही  प्रमाण हल्ली मुलामध्ये वाढताना दिसते आहे. (विशेषत: शहरी सुखवस्तू कुटुंबांमध्ये )  त्यामुळे आपल्या समाजात आता अपुऱ्या आहारासोबत अति आहाराचेही कुपोषण दिसते . लहान मुलांइतकेच या वयातही सकस अन्नाला महत्त्व आहे.

किशोरवयीन मुलांना अधिक अन्न लागते कारण या काळात वाढीचा वेग जास्त असतो.  यात पुरेशी प्रथिने -किलोग्राम शरीर-वजनामागे दीड ग्राम प्रथिने-असणे आवश्यक असते तसेच लोह कॅल्शियम आणि विटामिन डी यांची पण भरपाई व्हायला हवी उंची आणि स्नायूची वाढ या काळात विशेष करून होतात.  त्यासाठी अधिक आहार लागतो परंतु स्थूलता किंवा अतिवजन या समस्या देखील उद्भवू शकतात.  म्हणूनच आहार आणि व्यायाम खेळ व काम यांचा समतोल त्यांना समजावून सांगावा लागतो, कशावर लक्ष ठेवायचे हे सांगावे लागते.

खेळ आणि व्यायाम

या वयातल्या मुलांचा रोजचा खेळ आणि व्यायाम असला पाहिजे. यामुळे त्यांची वाढ व्यवस्थित होते आणि शारीरिक मानसिक आरोग्य सुधारते. मैदानी खेळ आणि मुख्य म्हणजे गटाने खेळण्याचे खेळ महत्त्वाचे आहेत. मुले खेळ लवकर शिकतात आणि त्यामध्ये प्रावीण्यही मिळवतात. योगासनांचादेखील पुढच्या आयुष्यावर चांगलाच परिणाम होतो. खेळ आणि व्यायामामुळे त्यांना पुढील आयुष्यातले ताणतणाव सहन करण्याची ताकद येते.हारजीत समजते. आनंद वाढतो.

किशोर वयातील आरोग्य समस्या

कुपोषण व रक्तपांढरी : कुपोषण आणि जास्त काम यांमुळे मुलींमध्ये रक्तपांढरी आढळते.

अपु-या माहितीमुळे एच.आय.व्ही. आणि एड्सची लागण होण्याचा धोका या गटाला अधिक आहे. किशोरवयीन मुलांनादेखील लिंग सांसर्गिक रोगांची लागण होऊ शकते.

लहान वयात लग्न झाल्यामुळे आई आणि मूल दोघांच्याही आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम होतो. आई अधिक अशक्त होते, रक्तपांढरीचा त्रास सुरु होतो आणि लहान वयात लैंगिक संबंध आल्यामुळे, लैंगिक आजार होण्याचा धोकाही वाढतो. बाळालाही रक्तपांढरी होते, ते कमी वजनाचे होते आणि बालमृत्यूचे प्रमाणही वाढते.

लहान वयातल्या लग्नामुळे मुलीला मानसिक आणि सामाजिक त्रासही सोसावा लागतो.

लिंगसांसर्गिक आजार

आपल्या लैंगिकतेचा शोध घेण्याची इच्छा या वयात जास्त असते. मात्र समाजात किशोरवयीन मुलांना लैंगिकतेबद्दल बोलणेदेखील अवघड होते. हे बदलले पाहिजे. कारण एका बाजूने लहान वयात लग्न करायचे दडपण मुलींवर आणले जाते. पण मुलींनी लैंगिकतेविषयी थोडी जरी उत्सुकता दाखविली तर मात्र ते अतिशय लाजिरवाणे आणि वाईट समजले जाते.

पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की स्वतःच्या लैंगिकतेचा शोध घेण्याचे काही मार्ग धोकादायक ठरू शकतात. उदाहरणार्थ, वेश्येबरोबर लैंगिक संबंध, तेही निरोध न वापरता ठेवणे धोकादायक असते. मुलींनी प्रौढ माणसाबरोबर लैंगिक संबंध ठेवले तर संसर्ग होण्याची आणि गरोदर राहण्याची जास्त भीती असते. ही भीती मुलांबरोबर संबंध ठेवले तरी काही प्रमाणात असतेच. असुरक्षित लैंगिक संबंधामुळे होणारे आजार ओळखायला शिकले पाहिजे-यात जनेंद्रियातून पू-सारखे स्त्राव, वरण, गाठ, पुरळ इत्यादि लक्षणे ,अहत्वाची असतात.  निरोधचा योग्य वापर केल्यास हे आजार टाळता येतात.

लहान वयात लग्न आणि गर्भारपण

आपल्या समाजात, गावांमध्ये अजूनही कमी वयात विवाहाची रीत आहे. मुलीचे संरक्षण करण्यासाठी आणि कुटुंबाचे नाव वाईट होऊ नये म्हणून पूर्वी समाजाने ही पध्दत मान्य केली होती. पण बालविवाह हे या समस्यांचे उत्तर नाही. या पध्दतीमुळे मुलींचे बालपण हिरावून घेतले जाते. त्यांच्यावर न झेपणा-या वैवाहिक जबाबदा-या पडतात, गरोदरपण, शारीरिक इजा व इतर घातक अनुभवांना सामोरे जावे लागते. तिची पुरेशी शारीरिक, मानसिक तयारी नसतानाच तिला बाई म्हणून कामाला लावतात.

शिक्षण, विकास, गर्भप्रतिबंधक साधने व सुरक्षित गर्भपात या सर्वांमुळे बालविवाह पूर्णपणे गैरलागू झाले आहेत. ही घातक सामाजिक कुप्रथा तत्काळ थांबवली पाहिजे.

किशोरवयातील लैंगिक अत्याचार

मुलींवर (आणि कधीकधी मुलांवरही) लैंगिक अत्याचार होत असतात. अत्याचार करणारी व्यक्ती कधी कुटुंबातली असते तर कधी बाहेरची असते. चिडवण्यापासून ते बलात्कार व खून अशा लैंगिक अत्याचारांच्या अनेक पातळया आहेत. लैंगिक शोषण हा एक गुन्हा आहे आणि आपण याविरुध्द आवाज उठवला पाहिजे.

हा अत्याचार वैयक्तिक आणि सामाजिक मानसिकतेला हानीकारक असतो. त्यामुळे पुढच्या आयुष्यातील लैंगिक जीवनावर दुष्परिणाम होतो, चुकीचा दृष्टिकोन तयार होतो आणि समाजातदेखील हिंसकता वाढते.या अत्याचारांच्या भीती मुळे बरेचदा मुली त्यांच्या शैक्षणिक क्षमता पूर्णपणे वापरू शकत नाहीत.

कोणत्याही स्त्रीच्या मनाविरुध्द लैंगिक जबरदस्ती करणे गुन्हा आहे. अगदी ती लग्नाची बायको असली तरी हा मुद्दा लागू पडतो. तसेच अठरा वर्षांखालील कोणत्याही स्त्रीशी, तिची संमती असली तरी, लैंगिक संबंध ठेवणे हा एक गुन्हा आहे. पण हा कायदा क्वचितच वापरला जातो.

मुलांशी योग्यवेळी बोलून त्यांना याची माहिती देणे, याच्या विरुध्द जागृती करणे आणि धीटपणे न्याय मागणे हे आपण त्यांना शिकवू शकतो. यात महिला गट आणि तरुणांच्या गटांनी सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. यासंबंधी मुलामुलींना फोनवर मदत मागण्यासाठी प्रत्येक शहरात (Child helpline) काही फोन नंबर्स उपलब्ध आहेत.

मानसिक आरोग्य आणि दृष्टिकोन

या वयात जे काही बरे-वाईट अनुभव येतात त्यामुळे मुलांचे वय व व्यक्तिमत्त्व घडत असते. म्हणून या वेळेला कुटुंब, शाळा आणि समाज यांनी मुलांमधील चांगल्या गुणांना प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यांना मदत केली पाहिजे. एखादी छोटीशी मदतदेखील बरेच काही साध्य करू शकते.

उदाहरणार्थ, एका मंडळाने एका गावात मुलींसाठी दोन सायकली दिल्या. त्यांनी आळीपाळीने या वापरायच्या होत्या. प्रत्येक गावातल्या मुली दोन महिने सायकल चालवायला शिकायच्या आणि मग त्या दुस-या गावात पाठवून द्यायच्या. या एवढयाशा मदतीने त्या गावातल्या पुष्कळ मुली सायकल चालवायला तर शिकल्याच पण त्याचबरोबर त्यांचा आत्मविश्वासही वाढला. त्या एकेकटया फिरायला शिकल्या. मग त्यांनी गट करुन पैसे जमवून एक सायकल घ्यायची ठरवली. काही मुलींनी जवळच्या गावी मोठया शाळेत पुढच्या शिक्षणाला जाण्याचे ठरवले. एवढया एका गोष्टीने त्यांच्या जीवनात किती फरक पडू शकतो हे बघायलाच पाहिजे.

POCSO कायदा (लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा, २०१२) 

हा मुलांवरील लैंगिक अत्याचार, छळ आणि पोर्नोग्राफीपासून संरक्षण करण्यासाठी आहे, ज्यामध्ये जलदगती न्यायालयांमार्फत कठोर शिक्षेची तरतूद आहे, जामीन मिळणे कठीण आहे आणि बालकांच्या हिताला प्राधान्य दिले जाते. यात बालकांचा विनयभंग, लैंगिक कृत्य, अश्लीलता यांसारख्या गुन्ह्यांसाठी शिक्षेची तरतूद आहे, ज्यात शिक्षा जन्मठेपेपर्यंत किंवा फाशीची असू शकते आणि लैंगिक गुन्ह्यांसाठी १६ वर्षांखालील मुलांची संमती गृहीत धरली जात नाही. 

पॉक्सो कायद्याची उद्दिष्ट्ये आणि तरतुदी:
  • संरक्षण: बालकांना लैंगिक शोषण, लैंगिक छळ, बाल लैंगिक शोषण आणि पोर्नोग्राफीपासून वाचवणे.
  • कठोर शिक्षा: गुन्हेगारांना कठोर शिक्षेची तरतूद, ज्यात काही गंभीर गुन्ह्यांसाठी मृत्युदंडाचाही समावेश आहे.
  • बाल-केंद्रित प्रक्रिया: तक्रार नोंदवणे, पुराव्यांची नोंद घेणे आणि खटला चालवणे हे बालकासाठी सोयीस्कर आणि सुरक्षित वातावरणात (उदा. विशेष न्यायालय, महिला पोलीस अधिकारी) केले जाते.
  • बालकम्हणजे १८ वर्षांखालील व्यक्ती: हा कायदा लिंग-तटस्थ असून मुले आणि मुली दोघांनाही लागू होतो.
  • गुन्ह्यांची व्याप्ती: विनयभंग, लैंगिक कृत्य, पोर्नोग्राफी पाहणे/जवळ बाळगणे, बाल लैंगिक शोषण यामध्ये सामील असणे हे सर्व गुन्हे आहेत.
  • बाल-प्रथमतत्त्व: पीडित बालकाच्या हिताला आणि कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते.
  • जामीन मिळणे कठीण: गंभीर गुन्ह्यांमध्ये जामीन मिळणे सोपे नसते, कारण न्यायालय गुन्ह्याची गंभीरता विचारात घेतात. 
महत्त्वाचे मुद्दे
  • विशेष न्यायालये: जलद गतीने खटले चालवण्यासाठी विशेष न्यायालये स्थापन केली जातात.
  • तक्रार नोंदवणे: पीडित बालकाची तक्रार महिला पोलीस अधिकाऱ्यामार्फत नोंदवली जाते आणि नाव गुप्त ठेवले जाते.
  • पुरावे: पुराव्यांसाठी वैद्यकीय तपासणी, रक्ताचे नमुने आणि वयाचा दाखला महत्त्वाचा असतो.