बालकांचे आरोग्य

बालकांमधील काही असांसर्गिक आजार-समस्या

दात येण्याचा त्रास

लहान मुलांना दुधाचे पहिले दात येत असताना थोडाफार त्रास होतो. सगळयाच मुलांना हा त्रास होतो असे नाही, तसेच सर्वांनाच प्रत्येक दात येताना हा त्रास होईलच असेही  नाही. लहान मुलांचे दात येण्याचा क्रम व अंदाजे महिना यांचे वेळापत्रक असते. काही मुलांमध्ये दात यायला थोडा उशीर होतो. काही वेळा ‘ड’ जीवनसत्त्वाचा अभाव हे याचे कारण असते.

दात येताना होणारा त्रास अपचन, उलटी, जुलाब, खूप रडणे, इत्यादी स्वरूपांचा असतो. बहुधा हा त्रास एक-दोन दिवसांपुरताच असतो. आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार मुलाच्या हिरडया शिवशिवल्यामुळे ते मिळेल ती वस्तू तोंडात घालते; त्यामुळे पोटात घाण जाऊन जुलाब होतात. तसेच दात येण्याची सुरुवात होतानाच्या वयातच आपण बाळाचा आहार बदलत असतो, पूरक आहाराची सुरवात त्याच वयात करायची असते. त्यामुळे देखील जुलाब होतात असा अनुभव आहे.

उपचार

यावर आधुनिक उपचार पद्धतीत काही सुनिश्चित उपचार नाही, लक्षणाप्रमाणे औषध देतात.

आयुर्वेदाने यावर औषधोपचार सुचवले आहेत. यासाठी डिकेमाली चूर्ण (एक राळेसारखा पदार्थ) पाव चमचा मधात मिसळून थोडा थोडा  हिरडयांना चोळावा व नंतर पोटात जाऊ द्यावा. यामुळे पोटदुखी, जुलाब यांपासून आराम मिळतो. एका वर्षावरील मुलांना हे चूर्ण अर्धा चमचा वापरावे. दोन वर्षावरील मुलांना पूर्ण चमचा वापरावे. याबरोबर वर्षाच्या आतल्या बाळांना बाळगुटी देत राहावी. फक्त त्यातली मुरुडशेंग थोडी जास्त उगाळावी.

लहान मुलांच्या उलट्या (तक्ता (Table) पहा)

ऑटीझम

हा एक गुंतागुंतीचा आजार समजला जातो. 150 मुलांमध्ये एक इतके प्रमाण किंवा हजारात 6 मुलांमध्ये तो आढळतो. ऑटो म्हणजे ‘आत्म’. ही मुले आत्ममग्न  असतात. म्हणून  या आजाराला स्वमग्नता किंवा आत्ममग्न असे म्हणतात. या आजाराच्या अनेक छटा असतात.

विशेष लक्षणे
  • डोळयात डोळा घालून न बघणे, लक्ष न देणे.
  • परत परत त्याच हालचाली करतात. अधिक हालचाल, मागे पुढे डोलत राहणे सामान्यपणे या मुलांमध्ये दिसते.
  • गरगर फिरणे, त्याकडे बघणे
  • पाण्याचे आकर्षण
  • कधीकधी हिंसक, ‘शिस्त’ नसणे
  • ‘भाषा’ न येणे/उशिरा येणे
  • भान नसणे (बधिरता), सामाजिक जाणीव कमी/नसते.
  • प्रश्नांना उत्तर न देता–परत  तसेच प्रश्न विचारतात.
  • जरतर ची भाषा त्यांना फार जड जाते-कळतच नाही. मेंदूमध्ये संदेशवहनात अडथळे नसल्याने हा आजार होतो. मेंदूच्या आत ‘कनेक्टीव्हीटी’ च्या अडचणी असतात.

याबद्दल एक गैरसमज होता. – या आजाराचा सगळा दोष आई नीट वाढवत नाही म्हणून, आईचे नीटलक्ष नाही म्हणून झाला असे समजले जात होते.. पण मुळात हा एक मेंदूतील दोष असतो.. या मुलांच्या मेंदूतील जोडण्या ठीक नसतात. मेंदू थोडा वेगळाच असतो.

ब-याच मुलांना हा आजार ‘जन्मजात’ असतो.  काही जणांना नंतर दोन अडीच वर्षात होतो. पालकांना हे समजायला/स्वीकारायला थोडा उशीर लागतो. त्यावेळी त्यांना धक्का बसतो. काही केसेस थोडया सौम्य असतात. त्यात थोडी सुधारणा होते. या मुलांना एकास एक असा शिक्षक लागतो. व्यक्तिगत शिक्षक लागतो. पण आपल्या समाजात हे अवघडच असते.

निदान

ऑटिस्टिक मुले इतर मुलांप्रमाणेच प्रमाणेच दिसतात, मतिमंद दिसत नाहीत. मात्र एकदम काहीतरी विचित्र क्रिया करायला लागतात.

  • मूल कडेवर घेताना देखील ‘निर्जीव’ वाटते. प्रतिसाद नसतो.
  • यासाठी मनोविकारतज्ज्ञ किंवा बालरोग तज्ज्ञाचा सल्ला घ्यायला पाहिजे.
उपचार
  • अशा मुलांना शिकवणे खूप चिकाटीचे काम असते.
  • चित्रांच्या साहाय्याने शब्द उच्चारायला शिकवावे लागते.
  • माणूस-आणि कोणीही मुलगा सामान्यपणे एकाचेवळी अनेक इंद्रियांनी ‘एकत्र’ शिकत असतो. या सर्व साधनांची या बालकासाठी शिक्षणात मदत घ्यावी लागते.
  • मुलांना इतरत्र मिसळू द्यावे, पण लक्ष द्यावेच लागते.
  • पालकांनी स्वत: आनंदी राहणे आवश्यक आहे.
  • अशा मुलांना विशेष शिक्षक लागतात. तसेच व्यावसायिक उपचार पध्दतीने त्यांना मानसिक, सामाजिक दृष्ट्या स्वतंत्र जगण्यास मदत होते.