आर-एच रक्तगटाचे एक विशेष महत्त्व आहे. बाळाची आई आर एच (-) आणि पिता आर.एच (+ve) असेल तर २०% बाळे ही आईच्या गटाची असतील व ८०% बाळांचा गट हा वडिलांसारखा असेल.
आई व बाळाचा गट एक असेल तर बाळाला धोका नसतो. पण जर आई व बाळाचा रक्तगट विरुध्द असतील म्हणजे बाळ आर.एच (+ve) असेल तर पहिल्या बाळंतपणात सूक्ष्म प्रमाणात आई व बाळाचे रक्त एकमेकांत मिसळते. यामुळे आईच्या रक्तात आर एच घटका विरुध्द प्रतिघटके तयार होतात.
पुढच्या बाळंतपणातही जर बाळ विरुध्द गटाचे असेल तर ही प्रतिघटके बाळाला गर्भातच त्रास देतात. हा गर्भ पोटातच मरुन जाण्याची शक्यता असते. पूर्ण वाढ होऊन जन्म झाला तर पहिल्या काही तासांत गंभीर कावीळ होऊ शकते. तसेच बाळाचा रक्तनाश होण्याचाही धोका असतो. म्हणून गर्भारपणात आईचा रक्तगट तपासणे महत्त्वाचे असते. जर आई आर एच (-) असेल तर बाळाच्या जन्मानंतर लगेच बाळाचा रक्तगट तपासणी करतात. जर बाळ आर.एच (+ve) असेल तर पुढील बाळाला त्रास होऊ नये म्हणून पहिल्या 24 तासात आईला ‘ऍन्टी डी’ चे इंजेक्शन द्यावे लागते. पण जर आईच्या रक्तात आर एच रक्ताविरुध्द प्रतिज्घटके तयार झाली तर प्रत्येक आर.एच (+ve) बाळाला गंभीर धोका होऊ शकतो.
रक्ततपासणी हा शब्द आपण ब-याच वेळा ऐकला असेल. हल्ली रक्ततपासणी शिवाय उपचार केले जात नाहीत. (मात्र प्रत्येक रुग्णाच्या बाबतीत रक्ततपासणीची गरज नसते.)