नेहमीच्या रक्तपांढरीवर लोहपुरवठा करणे हा मुख्य उपाय आहे. प्राथमिक आरोग्यकेंद्रातर्फे मोफत मिळणा-या फेरस गोळया (लोह गोळया) या मुळात अगदी स्वस्त असतात. त्या मानाने आयुर्वेदिक उपचार महागच पडतात. नवायस चूर्ण किंवा गैरिक तूप यातून लोह पुरवठा होऊ शकतो. नवायस चूर्ण जास्त महाग आहे. नवायस कल्प तयार मिळतो. याची अर्धा ते दीड ग्रॅम मात्रा दिवसातून दोन वेळा याप्रमाणे दीड ते तीन महिने द्यावी. याऐवजी गैरिक द्यायचे असल्यास ते तेलावर किंवा तुपावर परतून भरून ठेवावे व त्याची मुगाएवढी गोळी रोज द्यावी. धात्री लोहाची गोळी त्यामानाने स्वस्त पडते. या गोळीबरोबर मध व त्रिफळाचूर्ण प्रत्येकी अर्धा चमचा द्यावे, म्हणजे शौचास साफ व्हायला मदत होते.
या लोहपुरवठयाबरोबर (मग ते फेरस असो की आयुर्वेदिक नवायस गैरिक असो) स्नेहन करणे आयुर्वेदाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. स्नेहनासाठी 15-20 मि.ली. तूप (गाईचे किंवा म्हशीचे) किंवा 25-30 मि.ली खाद्य तेल (शेंगदाणा, तीळ, खोबरे यांपैकी कोणतेही) जेवणानंतर घेण्यास सांगावे. यानंतर गरम पाणी किंवा चहा घेतल्यास तेलकटपणाची चव निघून जाते. याप्रमाणे सात दिवस करावे. नंतर आठवडा वगळून परत सात दिवस सेवन करावे.

हा आजार आनुवंशिक आहे. भारतातील व महाराष्ट्रात आदिवासी पट्टयामध्ये हा आजार आढळतो.
या आजारात लाल रक्तपेशींमधील हिमोग्लोबिन सदोष असते. त्याला हिमोग्लोबिन एस म्हणतात. यात रक्तपेशी कडक बनून वाकडया तिकडया होतात. त्यामुळे त्यांच्या गुठळया बनून त्या रक्तवाहिन्यांमध्ये अडकतात व या कडक झालेल्या रक्तपेशी ऑक्सिजन वहनाचे कामही नीट करु शकत नाहीत. त्यामुळे सिकलसेल ऍनिमिया असलेल्या व्यक्तींमध्ये रक्ताभिसरणाच्या अडचणी तयार होतात.
याची लक्षणे रक्तप्रवाह अडखळल्यामुळे येतात. वेगवेगळया अवयवात वेदना, रक्तपांढरी, हातपाय आखडणे, पोट, छाती आवळल्याप्रमाणे वाटणे, सांध्याजवळ वेदना होणे ही साधारण लक्षणे असतात.
पांथरीसूज हे चिन्ह असते. 1 ते 10 वयोगटात सुमारे 10% मुले या आजाराने मरण पावतात. प्रतिकारशक्ती कमी झाल्याने वारंवार संसर्ग – ताप येतात. न्यूमोनिया होण्याची शक्यता वाढते.
या रक्तदोषाचा दुष्परिणाम शरीरातल्या सर्व अवयव संस्थांवर होतो. रक्तपांढरीच्या सर्व लक्षणांबरोबरच सिकल ऍनिमियाची काही विशेष तीव्र लक्षणे अचानक येऊ शकतात. उदा. तीव्र पोटदुखी, वारंवार पाणथरी सुजणे व दुखणे, पाणथरीचे काम बंद पडल्याने जंतुदोष होणे, इ.
सिकल अॅनिमिया असलेल्या व्यक्ती कमी म्हणजे 40 ते 50 वर्षापर्यंत जगतात. बालमृत्यू व मातामृत्यूंचे प्रमाण यात जास्त आहे. सिकल अॅनिमिया असणा-या व्यक्तींना सहसा मलेरिया होत नाही.
हा आजार दुरुस्त होत नाही; पण औषधांवर संशोधन सुरु आहे. वेदनाशामक औषधे, जंतु संसर्गावर उपचार आणि रक्त भरणे हे उपचाराचे तीन प्रमुख घटक आहेत. याचबरोबर वेळोवेळी द्रवपदार्थांची कमतरता भरून काढावी लागते. संभाव्य संसर्गासाठी वेळीच लसीकरण करणे हाही एक महत्त्वाचा प्रतिबंधक उपाय आहे. डॉ सुदाम काटे यांनी केलेल्या संशोधनानुसार आयुर्वेदिक उपचार (SC3 आणि AYUSH-RP) स्वीकारण्यात आले आहेत.

हा आनुवंशिक आजार आहे. यात हिमोग्लोबिन तयार होण्याचे प्रमाण खूपच संथ होते. तीव्र रक्तपांढरी बरोबरच पाणथरी सुजते व मोठी होते. हा आजार बरा होत नाही. उपचार म्हणजे वारंवार रक्त भरण्याची गरज लागते.
थॅलॅसिमिया मेजर, मिडियम व मायनर असे तीन उपप्रकार आहेत. हा आजार रक्तद्रव्यातल्या एका जनुकीय दोषांमुळे होतो.थॅलॅसिमिया असलेले मूल जन्मल्यानंतर दोन महिन्यांतच अगदी आजारी दिसते. त्याच्या शरीरात रक्तद्रव्य कमी असते. यामुळे बाळाची वाढ होत नाही, बाळाला भूक लागत नाही, मधून मधून ताप, संसर्ग होत राहतात. चेहरा थोडासा कपाळाला फुगीर दिसतो. मुलाची पांथरी आणि यकृत वाढल्यामुळे पोट पुढे येते. पण तरीही मूल जगते आणि मोठे होते. शरीरात लोहाचा साठा वाढत असतो (कारण रक्तपेशी सतत मोडल्या जातात) या व्यक्तींना इतर अनेक आजार होत राहतात.
या आजाराचे निदान रक्ततपासणीनेच होऊ शकते.
या व्यक्तींना रक्त भरावे लागते. याचबरोबर आणखी काही औषधे द्यावी लागतात. स्वयंसेवी संस्थातर्फे शहरांमध्ये अशा रुग्ण-व्यक्तींचे संघ केलेले असतात आणि सेवा देणे त्यामुळे शक्य होते.
हा आजार आनुवंशिक असतो आणि म्हणूनच विवाह-संतती याबद्दल सल्लामसलत लागते. असा आजार असलेले मूल होऊ नये म्हणून काही लग्ने टाळावी लागतात.

हा आनुवंशिक आजार आहे. या आजारात रक्त गोठवण्यासाठी आवश्यक असलेला फॅक्टर 8 (आठ) घटक नसतो. या आजाराच्या स्त्रिया वाहक आहेत. पण आजार मात्र पुरुषांमध्येच निर्माण होतो. यातला मुख्य दोष म्हणजे रक्त न गोठल्यामुळे रक्तस्रावाची प्रवृत्ती तयार होते, यामुळे छोटया जखमेतूनही खूप काळ रक्तस्त्राव सुरु रहातो. तसेच आतल्या आतही रक्तस्त्राव होऊन सांध्यात, पोटात रक्त साकळते.
आता फॅक्टर 8 इंजेक्शनच्या स्वरुपात मिळतो. ते वेळोवेळी देत रहावे लागते. हा आजार कायमचा बरा होत नाही. प्रत्येक मोठ्या शहरात हिमोफिलिया सोसायटी असते, त्यांच्याकडे नोंद केल्यास रक्त-भरण्याची योग्य सोय होऊ शकते.