रक्त-संस्था

रक्तस्रावाची प्रवृत्ती

रक्तस्राव झाल्यास तो थांबावा म्हणून शरीरातून तीन प्रकारचे प्रयत्न होतात.

  • रक्तस्रावाच्या भागातील रक्तवाहिन्या लगेच आकसून रक्तस्रावाचे प्रमाण कमी होते.
  • केशवाहिन्यांच्या जाळयातून रक्तस्राव असेल तर सूक्ष्म रक्तपेशी व रक्तकणिका जमून केशवाहिन्यांचे जाळे बंद होते. या प्रक्रियेने बहुधा केशवाहिन्यांमधला रक्तस्राव पूर्ण थांबतो. यासाठी सुमारे 1 मिनिट पुरते.
  • रक्तवाहिनीतून होणारा रक्तस्राव थांबण्यासाठी रक्त गोठावे लागते. यानुसार 5 ते 13 मिनिटे लागतात, कारण रक्त गोठण्याच्या प्रक्रियेला एवढा वेळ लागतोच.रक्त गोठण्याची प्रक्रिया होते म्हणजेच रक्तातील विशिष्ट प्रथिने गोठून त्याची गाठ होऊन रक्तस्रावाचा मार्ग बंद होतो.

रक्त गोठण्यासाठी एक विशिष्ट प्रथिन, जीवनसत्त्व के, कॅल्शियम (चुना) व इतर काही घटक लागतात. दूध नासल्यावर चोथापाणी जसे वेगळे होते तशीच काही प्रक्रिया यात होते. एखाद्या काचेवर किंवा बाटलीत रक्त ठेवल्यावर 5 ते 13 मिनिटांत रक्ताची गाठ जमते व पिवळसर पाणी वेगळे होते.

रक्तस्रावाचा वेळ याहून जास्त लांबत असेल तर त्याचे रोगनिदान होणे आवश्यक आहे. अशी रक्तस्रावाची प्रवृत्ती असेल तर हिरडया, नाक, लघवी, इत्यादी मार्गानीही रक्तस्राव होतो. एखाद्या ठिकाणी जखम झाली असेल तर त्यातूनही जास्त रक्त जाते. त्वचेखाली लालसर रक्ताचे ठिपके उमटतात, कारण केशवाहिन्यांतून त्वचेखाली रक्तस्राव होत राहतो. डेंगू तापात काही जणांना असा त्रास होतो.

रक्तस्रावाची कारणे

रक्तस्राव थांबत नसला तर त्याची अनेक कारणे असू शकतात.

  • डेंग्यू ताप व जंतुदोष
  • मेंदूसूज, विषमज्वर
  • सर्पदंश- विशेषतः फुरसे, घोणस, इ.
  • रक्ताचा कर्करोग
  • आनुवंशिकतेचे आजार (हिमोफेलिया)
  • ‘क’ जीवनसत्त्व आणि इतर घटकांचा अभाव
  • यकृताचा आजार
  • काही औषधांचा दुष्परिणाम (उदा ऍस्पिरिन)
  • गुंतागुंतीच्या बाळंतपणात घातक रक्तस्राव होऊ शकतो.

रक्तस्रावाची प्रवृत्ती आढळल्यास वैद्यकीय तज्ज्ञाकडून निदान व उपचार आवश्यक आहे.

रक्ताचा कर्करोग

या आजाराचे आणखी मुख्य दोन प्रकार असतात. अल्प मुदतीचा तीव्र प्रकार आणि दीर्घ मुदतीचा कर्करोग.

रक्तातील पांढ-या पेशींची निर्मिती करणा-या मूळ पेशींना कधीकधी कर्करोग होतो. या आजारात मूळ पेशींची संख्या अमर्याद वाढते. ब-याच वेळा रक्तातल्या पांढ-या पेशींची संख्याही अमर्याद वाढते. पांढ-या पेशींचे नेहमीचे काम म्हणजे शरीराचे रोगजंतूंपासून संरक्षण. या पेशींचे काम बिघडल्यामुळे रोगजंतूंची वारंवार बाधा होऊ लागते, रक्तपांढरी होते आणि अधूनमधून रक्तस्राव होतो. उपचार न केल्यास या आजाराने मृत्यू येतो. यात दोन उपप्रकार असतात. मायलॉईड आणि लिम्फॉईट

या आजाराचे नेमके कारण अद्याप कळलेले नाही. मात्र रक्ताच्या कर्करोगाचा थोडा संबंध किरणोत्सर्जन (अणूंपासून निघालेले किरण, क्ष-किरणांचा जास्त वापर) काही प्रकारचे विषाणू व काही औषधे यांच्याशी आहे. पण ब-याच रुग्णांमध्ये असे कोणतेही कारण दिसून येत नाही. याचा एक प्रकार विशेष करून लहान मुलांना होतो. दुस-या प्रकारचा रक्ताचा कर्करोग उशिराच्या वयात येतो.

रोगनिदान – आकस्मिक
  • मधून मधून जंतुदोष होतो – यामुळे फ्लू, घसादुखी, खोकला ताप, इत्यादी आजार होतात.
  • दाताच्या हिरडयांतून, नाकातून मधून मधून रक्तस्राव होतो.
  • शरीरात जागोजागी अवधाणाच्या कठीण व घट्ट गाठी येतात. या दुखत नाहीत.
  • रक्तपांढरी – याबरोबर थकवा येतो आणि दम लागतो., इत्यादी.
  • पांथरी वाढ : पोटात डाव्या बरगडीखाली असणारी पांथरी वाढून कधीकधी पोट दुखते. ही पांथरी वाढून कधीकधी बेंबीपर्यंत किंवा त्याखालपर्यंत येते.
  • मुलांमध्ये वजन न वाढणे, वाढ कमी होणे हे दोष आढळू शकतात.

यांपैकी काही लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरकडे पाठवावे. वेळीच रोगनिदान व उपचार झाल्यास रुग्ण बार होण्याची शक्यता असते. रोगनिदानासाठी रक्तनमुना आणि अस्थिमज्जेचा भाग (म्हणजे हाडाच्या पोकळीतला रस) तपासावा लागतो. या तपासणीत पांढ-या पेशींची संख्या वाढणे व कर्करोगाच्या पेशी दिसणे यावरून रोगनिदान होते.

रक्ताच्या कर्करोगाचा उपचार

पेशींच्या वाढीला मर्यादा घालण्यासाठी पेशीवाढीविरुध्द विशिष्ट औषधे किंवा किरणोत्सर्ग वापरला जातो. ज्या ठिकाणी पांढ-या पेशी तयार होतात (विशेषतः छातीच्या मधोमध असणारे हाड) त्या ठिकाणी किरणोत्सर्गाचा मारा करून कर्करोगाच्या पेशींचा नाश करता येतो. मात्र याचे इतरही दुष्परिणाम होतात. कर्करोगाचा प्रकार, पायरी याप्रमाणे उपचार ठरवावे लागतात.

आधुनिक विज्ञानाने गेल्या काही वर्षात या रोगाच्या उपचारात मोठे यश मिळवले आहे. या उपचारांमुळे अनेक रुग्ण पूर्ण बरे होऊ शकतात. या उपचारांचे स्वरुप कर्करोगाच्या पेशींच्या प्रकारावर अवलंबून असते. अर्थातच यासाठी प्रगत तंत्रज्ञान लागते आणि कर्करोग विशेषज्ञच अशा रुग्णांचे उपचार करू शकतात. या उपचारांची मूलतत्त्वे माहितीसाठी खाली दिली आहेत.

  • आजाराच्या मुख्य प्रकारानुसार कर्करोगविरोधी औषधे निवडली जातात. 2-3 औषधांची एकत्रित उपाययोजना केली जाते. यासाठी ठरावीक दिवसांचे वेळापत्रक असते. हे प्रारंभिक उपचार दोन महिने केल्यावर बहुतेक (90%) रुग्णांचा आजार मोठया प्रमाणावर कमी होतो. पेशींची संख्या कमी होते व लक्षणे सुधारतात.
  • तरीही काही कर्करोग पेशी अजून शिल्लक राहतातच यासाठी नंतर दीड दोन वर्षे वेळापत्रकानुसार उपचार केले जातात.
  • या औषधांचे बरेच दुष्परिणाम असतात. यातली बरीच औषधे पेशीपातळीवर घातक परिणाम करतात, पण हे दुष्परिणाम कालांतराने बरे होतात. मात्र उपचाराच्या काळात रुग्णाला अनेक प्रकारे वैद्यकीय साहाय्य लागते. रक्त भरणे, रक्तपेशी भरणे, जंतुविरोधी उपचार, सलाईन व द्रवपदार्थ, स्टेरॉईड औषधे या सर्वांचा समतोल आणि काटेकोर कार्यक्रम असतो.
  • आधुनिक उपचाराने आकस्मिक लिम्फॅटिक कर्करोगाचे बरे होण्याचे प्रमाण 90% पर्यंत आहे. मात्र आकस्मिक मायलॉईड कर्करोगात हे प्रमाण 30% पर्यंतच आहे. काही रुग्णांना अस्थिमज्जारोपण करावे लागते. यासाठी अस्थिमज्जा दान करू शकेल असा रक्ताचा नातेवाईक लागतो.

या रुग्णांमध्ये आजार उलटण्याचा धोका असतोच.