पुरुषप्रजनन संस्था

शिश्न-आजार 

शिश्नदाह
  • पुरुष जननेंद्रियाच्या (शिश्न) पुढच्या बोंडावरची त्वचा मागेपुढे होऊ शकते. ही त्वचा मागे सारल्यावर दिसणा-या बोंडावर व त्वचेखाली कधी कधी दाह होतो. बहुधा हा दाह सूक्ष्मजंतूंमुळे किंवा बुरशीमुळे होतो. लालसरपणा आग व खाज, चिकट द्राव, इत्यादी लक्षणे दिसतात.
    निरनिराळया लिंगसांसर्गिक रोगांमध्येही अशी सूज दिसते; पण बहुधा त्याबरोबर व्रणही दिसतो.
  • लिंगसांसर्गिक आजार नाही अशी खात्री केल्यावर साध्या उपचारांनी शिश्नदाह बरा होऊ शकतो. यासाठी थंड पाणी व साबणाने संबंधित भाग दिवसातून दोन-तीन वेळा धुऊन जंतुनाशक मलम लावण्यास सांगावे. बुरशीजन्य दाह (दह्यासारखा पदार्थ) असेल तर जेंशन व्हायोलेट हे औषध वापरावे. याने दोन-तीन दिवसांत पूर्ण आराम पडतो. मात्र आराम न पडल्यास किंवा इतर लिंगसांसर्गिक आजाराची शक्यता वाटत असल्यास तज्ज्ञाकडे पाठवावे.
  • कधीकधी मुंगी, किडा चावल्याने शिश्नावर दाह होतो व सूज येते. ही सूज एक-दोन दिवसांनी आपोआप उतरते. सीपीएम गोळयांचा वापर केल्यास खाज व सूज लवकर कमी होते. साध्या चिकणमातीचा ओला लेप लावल्यावरही गांध कमी होते. कारण ही सूज वावडयाची असते.
  • पुन्हापुन्हा शिश्नदाह होत असेल तर मधुमेहासाठी लघवी तपासणी करून घेतली पाहिजे. लघवीत साखर (मधुमेह) असेल तर असा दोष वारंवार संभवतो.
शिश्न-कर्करोग

शिस्न-कर्करोग कर्करोग मुख्यत: शिश्नाच्या  बोंडावर होतो.  हा आजार मुस्लिम किंवा ज्यू समाजांमध्ये होत नाही कारण सुंता करताना वरची त्वचा काढून टाकलेली असते त्यामुळे त्याच्याखाली चिकटा जमत नाही.  चिकटा जमतो ते मुख्यतः त्वचेच्या खाली त्यामुळे हिंदू, ख्रिश्चन समाजांमध्ये हा आजार होऊ शकतो 

 प्रत्यक्ष कर्करोग होण्याच्या आधी काही खाणाखुणा दिसून येतात यात  तीन प्रकार आहेत,  त्याबद्दल सावध असणे आवश्यक आहे.  (अ) छोटे फ्लावर सारखे गड्डे शिश्नाच्या बोंडावर येतात नंतर ते कर्करोगात रूपांतर होतात (ब) शिश्नावर म्हणजे बोंडावर कायमचा लालसर न दुखणारा चट्टा असू शकतो (क)  वेगळा न वाटणारा  ठिपका किंवा चट्टा बोंडावर दिसतो. हे सर्व  कर्करोगात रूपांतरित होऊ शकतो 

  • सामान्यपणे शिश्नाचा कर्करोग साठी नंतर येऊ शकतो,  
  • यातून घाणेरडा वास असणारा स्त्राव निघतो
  • शिश्नाची त्वचा जर बोंडाला चिकटून राहण्याचा प्रकार आढळून आला तर कर्करोगाची संभाव्यता लक्षात घ्यायला हरकत नाही
  • लघवी करताना त्यातून रक्त जाणे आणि वेदना होणे हेही निदर्शक असू शकते

तपासणी केल्यावर शिश्नाच्या बोंडावर व्रण किंवा विचित्र चट्टा दिसतो आणि याच्या बुडाशी बोटाने तपासले तर जाड घट्ट लागते.  म्हणूनच पूर्ण शिश्नाचे बोंड आणि शिश्न पद्धतशीरपणे तपासावे लागते.  हा कर्करोग एकतर पूर्ण शिश्नावर वाढू शकतो आणि तसेच जांघेमधील रसग्रंथींमध्ये पर्यंत पोहोचतो आणि तिथे गाठी येतात 

निदान व उपचार

सर्जनकडे साधी तपासणी आणि निरनिराळ्या प्रगत तपासण्यांमधून कर्करोगाची  पायरी निश्चित केली  जाते आणि त्याप्रमाणे उपचार केले जातात. सामान्यपणे कर्करोग अजून स्थानिक म्हणजे मर्यादित असेल तर अंशतः किंवा पूर्णपणे शिश्न काढून टाकावे लागते आणि लघवीसाठी मार्गाची व्यवस्था करावी लागते. पुढील अवस्थांमध्ये शिश्नाची शस्त्रक्रिया आणि बरोबर जांघेतील रसग्रंथीचा भाग  देखील काढून टाकावा लागतो. यापेक्षा अधिक वाढ व प्रसार झाला असल्यास किरणोपचार करावे लागतात .

 आपल्यासाठी मुख्य लक्षात ठेवायच्या गोष्टी म्हणजे शिश्नावर विचित्र काही दिसत असल्यास ताबडतोब तज्ञाला दाखवून घ्यावे.  विशेषत: उतारवयात असा प्रकार होण्याची शक्यता असते.  जेवढ्या लवकर निदान उपचार होईल तेवढ्या लवकर आणि तेवढ्या प्रमाणात यश मिळते.

मूत्रमार्ग संकोच 

मूत्रमार्गाची नळी साधारण पेन्सिल इतकी रुंद असते. मात्र काही आजाराने ती अरूंद होते, यामुळे मूत्र-विसर्जन करताना अडचण व वेदना होते. सिफिलीस , गोनोरिया  व इतर जंतुदोष याला कारणीभूत ठरतात तसेच अपघात जखम झाल्यास असे होऊ शकते. यासाठी वेळीच मूत्र-मार्ग तज्ज्ञाकडून मार्ग रूंद करून घ्यावा, यासाठी शस्त्रक्रिया हाच एक पर्याय असतो.