पुरुषप्रजनन संस्था

प्रॉस्टेट ग्रंथीची वाढ

खूप लोकाना उतारवयात प्रॉस्टेट ग्रंथीची वाढ होते, ती बहुधा संधि म्हणजे कर्करोग-नसलेली वाढ असते. खूप जणांना साठीच्या आसपास हा त्रास सुरू होतो. व्यायाम नसणे, स्थूलता, मधुमेह, आनुवंशिकता, धूम्रपान हीही पूरक करणे असू शकतात.  शरीरातल्या पुरुष-स्त्री संप्रेरकांचे प्रमाण कमीजास्त झाल्याने प्रोस्टेट ग्रंथी वाढल्याने लंघवीस अडथळा होतो, मूत्राशय पूर्ण रिकामे न होता त्यात मूत्र शिल्लक राहते.

प्रॉस्टेट ग्रंथीची वाढ झाल्याचे मुख्य लक्षण म्हणजे वारंवार लघवीचा त्रास. रात्री लघवीसाठी वारंवार उठावे लागणे, कुंथावे लागणे, लघवी थेंब थेंब पडणे, क्वचित लघवीतून रक्तस्राव होणे, लंघवीची घाई होणे, लघविस वेळ लागणे, दुर्गंध येणे, मूत्रमार्गाचा जंतुदोष, संभोगानंतर काही वेळ दुखणे इत्यादी अनेक प्रकारचा त्रास होतो. गुदद्वारातून बोट घालून तपासले असता प्रॉस्टेट ग्रंथींची वाढ आणि निबर-घट्टपणा जाणवतो.

तज्ञानी यासाठी एक प्रश्नपत्रिका केली आहे, यात खालील आठ प्रश्न असतात त्याची उत्तरे देण्यासाठी पर्याय दिलेले असतात: खालील तक्ता chat gpt वापरुन केलेल्या आहे

प्रोस्टेट ग्रंथी वाढ (Prostate Enlargement / Benign Prostatic Hyperplasia – BPH) यासाठी वापरले जाणारे लक्षण गुणांकन (Symptom Score) म्हणजेच IPSS – International Prostate Symptom Score. खाली मराठी भाषेत त्याचे स्वरूप आणि गुणांकन दिले आहे.

आंतरराष्ट्रीय प्रोस्टेट लक्षण गुणांकन (IPSS) – मराठी आवृत्ती

सूचना: खालील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मागील एका महिन्यातील सरासरी स्थितीप्रमाणे द्या.

प्रत्येक प्रश्नासाठी गुण खालीलप्रमाणे आहेत:
0 = कधीच नाही
1 = एकदाच
2 = एकदाच- दोनदाच
3 = अर्ध्या वेळा
4 = जास्त वेळा
5 = जवळजवळ प्रत्येक वेळी

प्रश्नावली
  • लघवी सुरू करण्यासाठी प्रयत्न करावा लागतो का?
    (मूत्र विसर्जनास सुरुवात करताना ताण द्यावा लागतो का?)
  • लघवी सुरू केल्यावर थांबत थांबत जाते का?
    (धार सतत येत नाही का?)
  • लघवी करताना धार कमी, पातळ किंवा मंद येते का?
  • लघवी संपल्यावर पुन्हा थोडी वेळाने थेंबथेंब लघवी होते का?
  • लघवी केल्यानंतरही मूत्राशय रिकामा झाल्यासारखा वाटत नाही का?
  • दिवसा लघवी करण्याची वारंवारता जास्त आहे का?
  • रात्री झोपेतून उठून लघवीसाठी किती वेळा जावे लागते?
    0 = नाही
    1 = 1 वेळा
    2 = 2 वेळा
    3 = 3 वेळा
    4 = 4 वेळा
    5 = 5 किंवा अधिक वेळा
गुणांकन व अर्थ

एकूण गुण = सर्व प्रश्नांचे गुण एकत्र करा.
(किमान 0 ते कमाल 35 गुण)

एकूण गुणलक्षणांची तीव्रताअर्थ
0 – 7सौम्य (Mild)विशेष उपचाराची गरज नाही, निरीक्षण पुरेसे
8 – 19मध्यम (Moderate)औषधोपचार आवश्यक असू शकतो
20 – 35तीव्र (Severe)वैद्यकीय किंवा शस्त्रक्रियात्मक उपचार आवश्यक

तसेच, रुग्णास पुढील प्रश्न विचारला जातो:

तुम्हाला सध्याच्या मूत्रविकाराबाबत किती त्रास होतो?”
0 = अजिबात नाही, 6 = अतिशय जास्त

प्रोस्टेट वाढीच्या निदानासाठी तपासण्या
  • सोनोग्राफीने नक्की निदान होते आणि आजाराची अवस्था कळते. यात ग्रंथीची वाढ, प्रकार, मूत्राशयातील शिल्लक क्षमता. इत्यादि बाबी समजतात. यासाठी लघवी न करता , पाणी पिऊन जास्तीत जास्त फुगलेले मूत्राशय आधी तपासतात आणि त्यानंतर लघवी करून शिल्लक क्षमता तपासतात. सहसा 150 मिली च्या खाली क्षमता घटल्यास शस्त्रक्रिया करायचं सल्ला दिला जातो.
  • याचसाठी आवश्यक वाटल्यास सिटी स्कॅन , एमराय इत्यादि करायला सांगतात
  • मूत्रपिंडावर काही परिणाम होतोय का यास्तही रक्ताच्या काही चाचण्या करतात  (क्रिएटिनिन)
  • प्रोस्टेट कर्करोगासाठी पीएसए तपासणी.
  • युरो-फ्लो मीटर : लघविचा वेग सेकंदस 10 मिलि पेक्षा कमी असल्यास शस्त्रक्रिया लागू शकते
उपचार

प्रोस्टेट वाढीवर वेळीच उपचार करावेत, म्हणजे मूत्रपिंडाचे नुकसान टळते.  तसेच लंघवीसंबंधी त्रास कमी होतो.

प्रथमोपचार : यातला लघवी अडकण्याचा त्रास तात्पुरता कमी करता येतो. गरम-कोमट पाण्याच्या टोपलीत बसून शेक दिल्यास लघवी मोकळी व्हायला तात्पुरती मदत होते. पण कायमचा उपाय शस्त्रक्रियेचाच. लघवी लागते तेंव्हा करून टाकावी, म्हणजे ती तुंबत नाही , मूत्राशय हलके राहते

  • फीनास्टेराईड आदि काही औषधे उपलब्ध आहेत, यांनी प्रोस्टेट वाढीचा वेग कमी होतो. काही औषधे कुंथणे कमी होण्यासाठी उपयुक्त आहेत.
  • लघवी अडकली असल्यास मूत्रमार्गाने नळी (कथेटर) घालून लघवी मोकळी केली जाते.  

शस्त्रक्रिया : पोटातून शस्त्रक्रिया करण्याऐवजी मूत्रमार्गातून नळीद्वारे हत्यार वापरून ग्रंथी काप काढून कमी केली जाते. याचे काही दुष्परिणाम देखील होऊ शकतात याची आधी माहिती घ्यावी. ( शस्त्रक्रियेनंतर एकूण 5-10 टक्के व्यक्तीना  लघवी-अनियंत्रित होणे, वीर्य-पतन मूत्राशयात म्हणजे उलटे होणे, लैंगिक इच्छा कमी होणे, इत्यादि)

  • दुर्बिणीतून शस्त्रक्रिया हा साध्या सर्वमान्य उपचार आहे. यात स्थानिक भूल देऊन प्रोस्टेट ग्रंथी यातून खरवडून काढतात व मार्ग मोठा केला जातो.
  • याग लेझर उपचाराने प्रोस्टेट ग्रंथी जाळून कमी केली  जाते. या तंत्राने रक्तस्त्राव आणि मूत्र-मार्ग संकोच टाळता येतात, रुग्णालयातले वास्तव्य देखील 3 दिवस इतके कमी होते. या मुळे लेझर शस्त्रक्रिया मोठे प्रमाणात केली जाते आहे.  
  • स्टेन्ट म्हणजे मूत्रमार्गात प्लॅस्टिक आणि धातूची छोटी नळी बसवणे. (हृदयाप्रमाणे)   
  • रेझुम उपचार म्हणजे मूत्रमार्गातून नळी खालून गरम पाण्याच्या वाफेचा सूक्ष्म फवारा वापरुन प्रोस्टेट ग्रंथी भाजली जाते, ती लहान होते आणि त्रास मिटतो. हे उपचार आताच सुरू झाले आहेत   

प्रॉस्टेट ग्रंथीला कर्करोगही होऊ शकतो व हा रोग आजूबाजूला लवकर पसरतो.

प्रॉस्टेट ग्रंथीचा कर्करोग 

प्रोस्टेट ग्रंथीचा कर्करोग हा उतार वयात सामान्यपणे 65 वर्षानंतर होतो.  यात लक्षणे फार नसतात आणि लक्षणे असल्यास रोगनिदानाला उशीर झालेला असतो असे समजायचे.  या रोगामध्ये खालील प्रमुख लक्षणे आहेत:  

  • हाडांमध्ये वेदना होतात (याचा अर्थ हा कर्करोग हाडांमध्ये पसरला आहे) 
  • लघवीला अडथळा कधी कधी रक्तस्त्राव होतो
  • कधीकधी साध्या प्रोस्टेट वाढीची शस्त्रक्रिया करतात तेव्हा नमुना तपासल्यास कर्करोग आढळू शकतो

प्रोस्टेट ग्रंथीचा कर्करोग सामान्यपणे जागच्याजागी पसरतो. दूसरा मार्ग म्हणजे रसग्रंथी म्हणजे लिंफ मार्फत पसरतो आणि त्याच्या गाठी (अवधाण) होतात.  तिसरा मार्ग म्हणजे शरीरात रक्तावाटे पसरतो, यात हाडे म्हणजे कवटी, मांडीचे हाड, बरगड्या यात पसरण्याचे जास्ती प्रमाण आढळते. याचबरोबर इतर अवयवांमध्ये देखील हा आजार पसरू शकतो.

  • हा कर्करोग पुरुष संप्रेरकांवर अवलंबून आहे आणि त्यामुळे त्याची वाढ होते  

या आजाराला लवकर लक्षणे नसल्यामुळे 50 वर्षे वयानंतर दर सहा महिन्यांनी यासाठी  तपासणी केलेली बरी.

तपासणी
  • गुदद्वारातून करायच्या तपासणीमध्ये (म्हणजे बोट घालून तपासणी करतात) कर्करोगग्रस्त  ग्रंथी दगडाप्रमाणे कठीण लागते.
  • रक्त तपासणी मध्ये पीएसए म्हणजे प्रोस्टेट कर्करोगाचा मार्कर तपासतात याचे प्रमाण 10 यूनिट (nmol) पेक्षा जास्त असेल तर कर्करोगाचे सुचक असते. मात्र यासाठी सकाळी उपाशीपोटी रक्त नमुना घ्यावा लागतो आणि आधी एक दिवस तेल तूप खाणे टाळावे लागते.  अन्यथा चुकीचे रिजल्ट्स येऊ शकतात
  • प्रोस्टेट ग्रंथीचे सोनोग्राफी करतात त्यातून चित्रविचित्र वाढ सापडल्यास कर्करोगाच्या संशय घेता येतो
  • हाडांचा सिटीस्कॅन केला जातो यामुळे हा कर्करोग हाडांमध्ये पसरला आहे की नाही हे कळते यासाठी ठराविक जागांवर स्कॅन केला जातो.  
  • एमआरआय देखील उपयुक्त तपासणी आहे.
  • गॅलियम पेट स्कॅन ही आणखी एक चांगली तपासणी
  • साधी प्रोस्टेट ग्रंथी काढल्यानंतर त्याची नमुना तपासणी करतात
  • शस्त्रक्रिया प्रस्तुत नसताना फक्त बायोप्सी नमुना तपासून कर्करोगाचे निदान होऊ शकते.
प्रोस्टेट ग्रंथीचा कर्करोगावरचे उपचार

हा आजार स्थानिक म्हणजे जागच्या जागी आहे, की पसरलेला आहे यावर उपचार अवलंबून असतात.

  • हार्मोन संप्रेरक उपचार म्हणजे इस्ट्रोजेन्स हा एक उपचार प्रभावी आहे
  • याचाच एक भाग म्हणजे बीजांडे काढून टाकतात म्हणजे पुरुष संप्रेरकांचा पुरवठा थांबतो.  त्याने  प्रोस्टेट ग्रंथीचा कर्करोग वाढायचा थांबतो
  • रासायनिक उपचार: याची सहा सत्रे असतात यासाठी डोकझाटेल हे औषध वापरतात
  • किरणोपचार: मुख्यत: हाडात पसरलेल्या आजारासाठी किरणोपचार  वापरतात

उपचार झाले तरी काही वेळा हा कर्करोग आधीच शरीरात पसरलेला असू शकतो.  तो काही दिवसांनी वाढीला लागतो. तथापि हा आजार हळूहळू वाढणारा आहे.   

वीर्यकोश-प्रॉस्टेट ग्रंथीचा जंतुदोष
  • लिंगसांसर्गिक आजारातील ‘गोनोरिया’ (परमा) व इतर काही ‘पू’ निर्माण करणा-या जंतूंपासून वीर्यकोश व प्रॉस्टेट ग्रंथींचा जंतुदोष होतो. हा आजार अचानक उद्भवला असल्यास खूप वेदना, लघवी गढूळ होणे, ताप, लघवी वारंवार होणे, इत्यादी त्रास संभवतो.
  • भरपूर पाणी पिणे व जंतुविरोधी औषधांनी आराम पडतो. पण उपचार डॉक्टरकडूनच व्हावेत.
  • काही वेळा ही सूज क्षयरोगाचीही असू शकते आणि त्यासाठी क्षयरोगावर उपचार करावे लागतात.
  • लघवीतून ‘धातू’ जाणे अशी तक्रार केली जाते तेव्हा बहुधा असा वीर्यकोशाचा आजार असू शकतो. या आजारामुळे लघवीच्या सुरुवातीला पू, गढूळ भाग बाहेर पडतो व नंतर स्वच्छ लघवी येते. अशी तक्रार आढळली तर तज्ज्ञाकडे पाठवावे.