वंध्यत्व आणि उपाय
सरोगसी (Surrogacy) –उसने मातृत्व
काही जोडप्यांमध्ये गर्भाशयाच्या दोषामुळे गर्भधारणा शक्य नसते. मात्र स्त्रीबीज निर्माण होत असते. अशा बाबतीत हे स्त्रीबीज घेऊन, जोडप्यातील पुरुषाकडून कृत्रिम फलन करून अन्य स्त्रीच्या गर्भाशयात रोपण करता येते. भारतात अशी सोय सुरू झाली आहे. मात्र यात अनेक भावनिक, सामाजिक व कायदेशीर प्रश्न निर्माण होतात. दुसऱ्या स्त्रीच्या गर्भाशयात वाढलेला गर्भ जरी जैविकदृष्टया त्या जोडप्याचा असला तरी मातृत्व मात्र परक्या स्त्रीचे असते. म्हणजेच ही परस्त्री हीच त्या बालकाची शारीरिक व भावनिक माता असते. बाळंतपणानंतर असे मूल परत द्यायला ती स्त्री नकार देऊ शकते अशाही घटना घडलेल्या आहेत.
फायदे
- नैसर्गिकरीत्या अपत्य न होणाऱ्या जोडप्यांना पालकत्वाची संधी
- वैद्यकीयदृष्ट्या अनेक अडथळे पार करण्यास मदत
मर्यादा व आव्हाने
- खर्चिक उपचार
- शारीरिक, मानसिक व सामाजिक ताण
- नैतिक व कायदेशीर प्रश्न
शुक्रपेशी बँक
काही जोडप्यांमध्ये पुरुष शुक्रपेशी निर्माण करू शकत नसल्याने वंध्यत्व येते. अशा वेळी शुक्रबीज दान घेऊन कृत्रिम फलन करता येते. यासाठी आता शुक्रपेशी पेढीची सोय आहे. (स्पर्म बँक). या ठिकाणी वीर्याचे नमुने शीत कपाटात सुरक्षित ठेवलेले असतात. अर्थातच पुरुषाचे नाव त्या जोडप्याला कळू शकत नाही.
मुल दत्तक घेणे
सुमारे 20% जोडप्यांना प्रयत्न करूनही समस्येवर मात करता येत नाही. आशा निराशेच्या खेळामध्ये बरीच भावनिक दमणूक होते, खर्च सोसावा लागतो. काही जोडपी लवकरच दत्तक घेण्याचा विचार करतात तर काही सर्व निराशा झाल्यावर हा निर्णय घेतात. दत्तक घेणे हा देखील एक मोठा निर्णय आहे आणि भावनिक दृष्ट्या आणि कायदेशीर दृष्ट्या त्यात बरीच गुंतागुंत असते. यासाठी दत्तक विधान कायदा पण आहे.
दत्तक म्हणजे काय?
दत्तक घेणे म्हणजे जैविक पालकांऐवजी इतर व्यक्तीने त्या मुलाला आपल्या कुटुंबातील सदस्य म्हणून स्वीकारणे. दत्तक घेतल्यानंतर त्या मुलाचे सर्व कायदेशीर, सामाजिक आणि भावनिक हक्क दत्तक पालकांकडे हस्तांतरित होतात.
दत्तक घेण्याची कारणे
- नि:संतान दांपत्याला पालकत्त्वाचा अनुभव देणे
- अनाथ किंवा पालकविहीन मुलांना आधार देणे
- समाजात मानवतावादी कर्तव्य पार पाडणे
दत्तक घेण्यासाठीची प्रक्रिया (भारतामध्ये)
- अर्ज करणे – दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी अधिकृत प्राधिकरणाकडे (CARA – Central Adoption Resource Authority किंवा मान्यताप्राप्त संस्था) अर्ज करावा.
- होम स्टडी रिपोर्ट – सामाजिक कार्यकर्ते दांपत्याची/व्यक्तीची आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य व कौटुंबिक पार्श्वभूमी तपासतात.
- मुलाची निवड – प्राधिकरण उपलब्ध मुलांची माहिती पालकांना देते.
- जुळवणी (Matching) – पालक व मुलामध्ये अनुकूलता तपासली जाते.
- कायदेशीर प्रक्रिया – न्यायालयाच्या आदेशाने मुलाला कायदेशीररीत्या दत्तक घेतले जाते.
- फॉलो-अप – ठराविक काळासाठी संस्था पालक व मुलाचे समायोजन तपासते.
कोण दत्तक घेऊ शकतो?
- विवाहित दांपत्य (निश्चित वैवाहिक स्थैर्य आवश्यक)
- अविवाहित महिला कोणतेही मूल दत्तक घेऊ शकते
- अविवाहित पुरुष फक्त मुलगा दत्तक घेऊ शकतो
- ठराविक वयोमर्यादा व पालक आणि मुलामध्ये आवश्यक वयातील फरक बंधनकारक असतो
कायदेशीर आधार
- हिंदू दत्तक विधान कायदा, 1956 (HAMA) – हिंदू, बौद्ध, जैन व शीख समुदायासाठी
- किशोर न्याय (बालकांची काळजी व संरक्षण) अधिनियम, 2015– सर्व धर्मांसाठी लागू: भारतामध्ये बालकांचे अधिकार संरक्षित करण्यासाठी आणि बालकांच्या हितासाठी “Juvenile Justice (Care and Protection of Children) Act, 2015” म्हणजेच “किशोर न्याय (बालकांची काळजी व संरक्षण) अधिनियम, 2015” लागू करण्यात आला.
दत्तक घेण्याचे फायदे
- नि:संतान दांपत्याला पालकत्त्व मिळते
- मुलाला सुरक्षित घर व कुटुंब मिळते
- समाजात अनाथ व वंचित मुलांची संख्या कमी होते