श्वसनसंस्थेचे आजार

प्रौढ वयातील फुफ्फुस क्षयरोग

आपल्या देशात जवळजवळ 99 टक्के लोकांचा वयाच्या विशीपर्यंत क्षयरोगाच्या जंतूंशी संबंध येऊन गेलेला असतो. त्यामुळे प्रत्येकाला कमीअधिक प्रमाणात प्रतिकारशक्ती असते. ज्यांना चांगली प्रतिकारशक्ती आलेली असते त्यांना सहसा क्षयरोग होत नाही. पण अर्धवट प्रतिकारशक्ती असल्यास क्षयरोगाच्या जंतूंशी परत संबंध आला तर नव्याने क्षयरोग होऊ शकतो. फुप्फुसात रोगजंतूंचा प्रवेश श्वासावाटे होऊन रोगाचे तिथे ‘घर’ तयार होते. बहुधा स्वत:च्या शरीरातले सुप्त जंतूच परत जागे होऊन रोग सुरु करतात. अर्धवट प्रतिकारशक्तीमुळे फुप्फुसातच रोग हळूहळू पसरतो. पण तिथेच मर्यादित राहतो.

  • फुप्फुसात एकदा रोग सुरू झाला, की सुरुवातीला नुसती सूज येते. मग पू होतो. नंतर पू बाहेर पडून पोकळी निर्माण होते. यापुढे फुप्फुसातच इतर जागी रोग पसरत जातो.
  • कधीकधी आजार फुप्फुसाच्या दुपदरी आवरणापर्यंत पोचून तिथे सूज येते. यामुळे दुपदरी आवरणात पाणी-पू होतो. छातीत पाणी होणे म्हणजे या दुपदरी आवरणात पाणी-पू साठणे होय.

क्षयरोगाच्या फुप्फुसातल्या घरातून कधीकधी पू, रक्त, बेडक्याबरोबर बाहेर पडते. रोगाच्या ठिकाणी छातीत दुखते. फुप्फुसाचा जास्त भाग निकामी झाला असेल तर दम लागतो. याबरोबरच खोकला येतो. हा खोकला इतर कोणत्याही औषधाला दाद देत नाही. बारीक ताप (विशेष करून संध्याकाळी) वजन घटणे, थकवा, भूक न लागणे, इत्यादी लक्षणेही दिसतात. रोग लवकर आटोक्यात नाही आला तर मृत्यू ओढवू शकतो.

लक्षणे
  • इतर जंतुविरोधी औषधांनी न थांबणारा खोकला 3 आठवडयांपेक्षा जास्त दिवस टिकून राहिल्यास क्षयरोगाची शंका घ्यावी.
  • बेडक्यात रक्त किंवा हिरवट-पिवळसर पू पडणे, छातीत दुखत राहून खोकला येणे,
  • भूक कमी होणे, वजन घटणे,
  • रोज संध्याकाळी बारीक ताप येत राहणे.
रोगनिदान
  • क्षयरोग हा तज्ज्ञांनीच निदान करायचा रोग आहे. शारीरिक तपासणी मुख्यतः छातीची (फुप्फुसांची) केली जाते. फुप्फुसांना नुसती सूज असेल त्या जागी श्वसनाचे आवाज कमी होतात.
  • वरीलपैकी लक्षणे असणा-या व्यक्तीची शारीरिक तपासणी, बेडक्याची सूक्ष्मदर्शक तपासणी, छातीचे क्ष-किरणचित्र यांपैकी कोणत्याही तपासणीत क्षयरोगाच्या खाणाखुणा आढळल्याशिवाय क्षयरोगाचे निदान करता येणार नाही. 
  • जिल्हा रुग्णालयात सीबीनॅट ही तपासणी केली जाते, यातून जंतूचे जैवरासायनिक पद्धतीने नक्की निदान होते आणि हे जंतु रिफंम्पीसीन औषधाला दाद देणार की नाही याचा निर्णय होतो.
बेडका तपासणी (थुंकी तपासणी)
  • बेडक्याची तपासणी करण्यासाठी निदान 24 तासांतले बेडके जमा करून त्यांतला हिरवट, पिवळट, तांबूस असा रोगट भाग निवडतात.
  • राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण योजनेत सुरुवातीला तीन नमुने घेतात (भेटल्यावर पहिल्यांदा लगेच, त्यानंतर रात्रभराचा जमा केलेला व त्यानंतरच्या दिवशी तिसरा.) पुनर्तपासणीच्यावेळी दोन नमुने घेतात.
  • बेडक्यातील थोडा भाग काचपट्टीवर पसरून विशिष्ट रासायनिक रंग वापरून सूक्ष्मदर्शक यंत्राखाली पाहतात. यात क्षयरोगाचे जंतू तांबडे आणि लहान रेघांसारखे दिसतात.
  • बेडक्याची (खाकरा) तपासणी ही अत्यंत खात्रीशीर तपासणी आहे. त्यात जंतू आढळले तर क्षयरोग आहे अशी खात्री देता येते.
  • पण बेडक्यात जंतू न दिसल्यास आजार नाही असे म्हणता येत नाही. कारण ब-याच वेळा बेडक्यात जंतू दिसत नाहीत, पण फुप्फुसात रोग असतो.
  • शक्य झाल्यास बेडका व क्ष-किरण चित्र या दोन्ही तपासण्या करणे आवश्यक आहे. हा निर्णय डॉक्टरच घेतील.
क्ष-किरण तपासणी

क्षयरोग असेल तर छातीच्या फोटोत बहुधा दिसतो. पण क्ष-किरण तपासणीत काही वेळा इतर काही आजार ओळखता येत नाहीत. म्हणून क्ष-किरण चित्रावरून पक्के रोगनिदान होऊ शकत नाही. बेडका तपासणी हीच प्रमुख आणि पहिली आहे.

क्षयरोगासाठी छातीच्या एक्स-रेत रोग असल्यास फुप्फुसाची सूज, पोकळी, छातीत पाणी यांपैकी जे असेल ते दिसते.

उपचार

रुग्णास वेगळे ठेवायची गरज नाही

राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रमातून सर्वत्र आधुनिक उपचार मोफत उपलब्ध आहेत. यासाठी नजीकचे प्राथमिक आरोग्य केंद्र सर्व मदत करेल, आणि आशा देखील घरी येऊन रुग्णाबरोबर  संपर्क करतील.

  • बेडक्याच्या तपासणीत जंतू आढळल्यास त्या व्यक्तीकडून रोगप्रसार होत असतो असे धरावे. मात्र रुग्णाला वेगळे रहायला लावणे योग्य नाही. योग्य औषधोपचाराने काही दिवसांतच असा रुग्ण असांसर्गिक होतो. विशेष म्हणजे रोग ओळखण्याची अवस्था येईपर्यंत बहुधा आधीच रोगप्रसार होऊन गेलेला असतो. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याच्या खर्चीक व गैरसोयीच्या निर्णयापेक्षा घरी ठेवून नियमित उपचार करणे शहाणपणाचे ठरते. मात्र रुग्णाची अवस्था गंभीर असल्यास रुग्णालयात दाखल करणे चांगले. परिणामकारक घरगुती उपचार शक्य झाल्यामुळे आता क्षयरोगासाठी रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही.
  • क्षयरोगाची औषधे योग्य प्रमाणात व नियमित घेणे आवश्यक असते. मध्येच उपचार सोडल्यास रोग उलटणे, रोगजंतू औषधांना दाद न देणे, इत्यादी प्रश्न पडतात. क्षयरोगाविरुध्द लोकशिक्षण महत्त्वाचे आहे. यातून नियमित व पुरेसा काळ औषधोपचार करण्याचे तत्त्व पटवणे सर्वात महत्त्वाचे आहे.
  • या औषधांबरोबरच पुरेसा सकस आहार घेणे आवश्यक आहे.
प्रतिबंधक उपाय

क्षयरोगाविरुध्दचा महत्त्वाचा उपाय म्हणजे राहणीमान सुधारणे.

दुसरी पायरी म्हणजे प्रत्येक बाळाला बीसीजी लस टोचून घेणे. पण बीसीजी लस ही क्षयरोगाचा पूर्ण प्रतिबंध करू शकत नाही. बीसीजी लस देऊनही क्षयरोग होऊ शकतो. पण बीसीजी लस दिली असल्यास नंतर फक्त फुप्फुसाचा ‘उशिराचा’ आजार येऊ शकतो. या आजार प्रकारात उपचार करणे त्यामानाने सोपे आणि कमी धोक्याचे असते. बीसीजी लसीच्या प्रसारामुळे क्षयरोगाचे एकूण प्रमाण कमी झाले नाही तरी मेंदू, मणके, सांधे, हृदय, इत्यादी अवयवांच्या क्षयरोगांचे प्रमाण कमी झाले आहे. या इतर अवयवांच्या आजारांच्या मानाने फुप्फुसाचा क्षयरोग एका परीने बरा.

क्षयरोग लवकरात लवकर शोधून त्यावर पूर्ण उपचार करणे. हा आता आपल्या हातात असलेला सगळयांत परिणामकारक उपाय आहे. यासाठी आपले मन त्या दृष्टीने ‘शंकेखोर’ ठेवणे आवश्यक आहे.

थोडक्यात : भारतातील क्षयरोग उपचार कार्यक्रम (TB Treatment Program in India)

(Marathi Note – संक्षिप्त व उपयुक्त): खालील 9 बिंदु लक्षात ठेवा

1. कार्यक्रमाचे नाव

भारतामध्ये क्षयरोग नियंत्रणासाठी राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम (National TB Elimination Program – NTEP) राबविला जातो. याअंतर्गत सर्व TB रुग्णांची तपासणी, निदान, उपचार, फॉलो-अप आणि मोफत औषधोपचार दिले जातात. यासाठी बहु-औषध-उपचार केले जातात, मात्र रोजची गोळी एकच असते, त्यातच सर्व औषधे असतात. आपले उदिष्ट टीबी संपवण्याचे आहे.

2. TB चे प्रकार ठरवून उपचार
  • ड्रग-सेंसिटिव्ह TB (DS-TB) म्हणजे औषध-अनुकूल प्रकार
  • ड्रग-रेझिस्टंट TB (DR-TB) – उदा. MDR-TB, XDR-TB-औषध-प्रतिकूल प्रकार
3. निदान (Diagnosis)
  • बेडक्याचा नमूना जंतुसाठी तपासणे-स्मिअर मायक्रोस्कोपी-
  • सीबीनॅट CBNAAT / TrueNat चाचणी – वेगवान निदान व Rifampicin resistance तपासणी
  • कल्चर व DST (Drug Susceptibility Testing)-औषद-अनुकूलता तपासणी
  • छातीचा एक्स-रे
  • लाइन प्रोब अॅस्से (LPA) – औषध प्रतिकार तपासणी
4. उपचार पद्धत (Treatment Regimen) एकूण कालावधी: 6 महिने रोज

A) ड्रग-सेंसिटिव्ह TB (DS-TB) म्हणजे औषध-अनुकूल टीबीसाठी  

NTEP अंतर्गत 1) चौहेरी सघन उपचार Intensive phase (IP) व 2) दुहेरी औषधयोजना Continuation phase (CP) अशा दोन टप्प्यात उपचार दिला जातो.

1. चौहेरी सघन उपचार Intensive Phase – 2 महिने

Rifampicin (R), Isoniazid (H),Pyrazinamide (Z), Ethambutol (E)

2. दुहेरी औषधयोजना Continuation Phase – 4 महिने

Rifampicin (R), Isoniazid (H)

औषधे Fixed Dose Combination (FDC) स्वरूपात रुग्णाच्या वजनाप्रमाणे दिली जातात.

दररोज (Daily Regimen) औषधे घेतली जातात.

B) ड्रग-रेझिस्टंट TB (DR-TB) 

यासाठी तज्ञ ठरवतील,

MDR-TB, RR-TB, XDR-TB प्रकरणांसाठी वेगवेगळे रेझिमेन

Shorter MDR-TB regimen (9–11 months) – पात्र रुग्णांसाठी

Longer MDR-TB regimen (18–24 months) – क्लिनिकल गरजेनुसार

पुढीलपैकी औषधे योजली जातात.

  • Bedaquiline, Linezolid, Levofloxacin/Moxifloxacin,Clofazimine, Cycloserine
  • इतर second-line औषधे

उपचार खास DR-TB केंद्रांमार्फतच दिला जातो.

5. थेट औषध सेवन पद्धती (Treatment Support)
  • पूर्वी DOTS पद्धत होती; आता रुग्ण-केन्द्रित पद्धत वापरली जाते:
  • जवळच्या आरोग्यकेंद्रातून औषध उपलब्ध
  • डिजिटल adherence तंत्र (99DOTS, कॉलिंग, व्हिडिओ-DOT)
  • ASHA/आरोग्यसेवकांकडून फॉलो-अप
6. पोषण सहाय्य – Ni-kshay Poshan Yojana

प्रत्येक TB रुग्णाला उपचार कालावधीदरम्यान ₹500 प्रति महिना पोषणभत्ता DBT (Direct Benefit Transfer) पद्धतीने दिला जातो.

7. उपचाराचे फॉलो-अप (Monitoring)
  • प्रथम 2 महिने संपल्यावर , मग  4 महिने, मग  6 महिन्याशेवटी  तपासण्या बेडका-तपासणी करतात
  • लक्षणांवर लक्ष, वजन तपासणी, औषधांचे दुष्परिणाम तपासणी (यकृत-कार्य , हातापायला मुंग्या येणे , पोटात जळजळ इ. यावर लक्ष ठेवतात )
8. टीबी प्रतिबंध (Prevention)
  • रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची  तपासणी आणि प्रतिबंध
  • आजार टाळण्यासाठी बालकांसाठी Isoniazid Preventive Therapy (IPT) किंवा 3HP regimen
  • BCG लस नवजात बाळकणा दिली जाते
  • सामाजिक पोषण सुधारणा
  • हवेशीर घरे व कार्यस्थळ
9.टीबी रजिस्ट्रेशन व रिपोर्टिंग
  • प्रत्येक टीबी  रुग्णाची नोंद नि:क्षय  Ni-kshay Portal वर केली जाते. खाजगी डॉक्टरने देखील नोंद केली पाहिजे असे बंधन आहे, अन्यथा दंड होऊ शकतो.
  • उद्दिष्ट: भारत TB-मुक्त करणे (TB elimination by 2025 – राष्ट्रीय ध्येय).