श्वसनसंस्थेचे आजार

झोपेत श्वसन अवरोध

सुमारे दोन ते पाच टक्के एवढे व्यक्तींना झोपेत श्वसन अडखळण्याचा त्रास होतो. बऱ्याच वेळा हा त्रास त्या व्यक्तीला न समजता बाजूला झोपलेल्या व्यक्तीला समजून येतो. अशा व्यक्ती रात्री घोरतात आणि त्यांचे शासन अडखळते व झोपेतून जाग येते असा प्रकार तासाभराच्या झोपेत दहा-पंधरा वेळा होऊ शकतो किंवा जास्त वेळ होऊ शकतो हा त्रास जास्त असेल आणि आधीच हृदयविकार अतिरक्तदाब वगैरे असेल तर हृदय वेगळा झटका येऊन मृत्यू पण येऊ शकतो परंतु याची या आजारची जाणीव लोकांमध्ये फारशी नाही. यासाठी ही माहिती महत्त्वाची आहे  

या आजाराची कारणे विविध प्रकारची  आहेत.  मुख्य म्हणजे वाढती स्थूलता किंवा चरबीचे प्रमाण, वाढते सरासरी वय, जास्त मद्यसेवन आणि धूम्रपान, व्यायामाचा अभाव ही करणे आहेत.  काही अनुवंशिक कारणे असू शकतात, उदा:  जबडा मोठा असणे. स्थूलतेमुळे मान जाडजूड (गलेलठ्ठ) असेल तरीदेखील हा त्रास अनेक लोकांना होतो.

या आजारामध्ये झोपेमध्ये, विशेषत: उताणे झोपले असेल अशावेळी स्वरयंत्राच्या वरच्या श्वसन मार्गामध्ये स्नायू सैल झाल्याने घशावर दबाव येऊन श्वसनमार्ग अरुंद होतो आणि क्वचित बंद होतो. त्यामुळे हवा जाताना घोरण्याचे विचित्र आवाज येतात.  श्वसन-रोध जास्त प्रमाणात झाला तर श्वसन बंद पडते आणि मेंदूला संदेश जाऊन मेंदू परत श्वसनासाठी चालना देतो आणि श्वसन चालू होते.  असे झोपेत बरेच वेळा होऊ शकते रक्तातील प्राणवायूची पातळी कमी झाली की मेंदू पुढील आदेश देऊन श्वसन चालू करण्याचा प्रयत्न. करतो. प्रत्येक तासात असे किती वेळ घडते यावर या आजाराची तीव्रता ठरते.

याचे मुख्य लक्षण म्हणजे झोपेत घोरण्याचा त्रास असणे.  याची खरी माहिती जोडीदाराकडून मिळते कारण स्वत: त्या माणसाला रात्रीला घोरण्याची आठवण दिवसा राहत नाही.

रोगनिदान करण्यासाठी माहिती घेण्याबरोबर यांत्रिक उपकरणे वापरुन झोपेत याचे रेकॉर्ड करता येते. याला पॉलीसोम्नोग्राफी म्हणजे झोपेचे रेकॉर्डिंग असे म्हणतात.  यात स्नायू, मेंदू, हृदय आणि डोळ्याची हालचाल याचे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डिंग केले जाते. यावरून कुठल्या वेळेला किती त्रास झाला आहे हे आपल्याला समजून येते. सहसा ही तपासणी रुग्णालयात करतात. परंतु घरी तपासणी करण्यासाठी साधी उपकरणे मिळतात, त्यात मोजण्या कमी असतात पण तरी आपले काम होऊ शकते.

उपचार करण्यासाठी तज्ञ डॉक्टरांची मदत आवश्यक आहे. सामान्यपणे खालील प्रमाणे सल्ला दिला जातो

धूम्रपान दारू स्थूलता यापैकी कारणे असल्यास ती कमी करण्याचा प्रयत्न करणे  झोपताना उताणी झोपण्याची ऐवजी कुशीवर झोपण्याचा अवलंब करणे हे साधे उपाय आहेत. यांनी उपयोग नाही झाला तर श्वसनामध्ये दाबाने हवा देणारे यंत्र वापरावे लागते.  याचे अनेक प्रकार आहेत सततचा दाब देणारे एक मशीन असते.  दुसरे मशीन कमी-जास्त दाब देणारे असते. श्वसन कमी झाले तर चालना मिळून यंत्र परत चालू होते, म्हणजे श्वसनाच्या स्थितीप्रमाणे गतीप्रमाणे उपकरण कार्यक्षम होते. 

असे यंत्र वापरायला सोपे असले तरी अनेक लोकांना आवडत नाही व लोक सुरुवातीला काही दिवस हे वापरून सोडून देतात. अशा लोकांसाठी जबडा पुढे ढकलणारे एक उपकरण मिळते ते झोपेत तोंडामध्ये ठेवून द्यावे लागते.

काही लोकांना या उपायांचा उपयोग न झाल्यास घशावर शस्त्रक्रिया करण्याचा मार्ग उपलब्ध असतो. अर्थात हे सर्व निर्णय डॉक्टरांच्या मदतीने घ्यायचे असतात. मुख्य म्हणजे या आजाराकडे दुर्लक्ष न करता वेळेस उपचार आणि उपाययोजना करायला पाहिजे.  कारण झोपेत हृदयविकाराने झटका येणे आणि पेशंट दगावणे असे प्रकार घडू शकतात.

शेतकरी व कामगारांचा खोकला

  • निरनिराळया व्यावसायिक कामगारांना त्या त्या वातावरणात प्रदूषण खोकले होऊ शकतात. आपल्या देशात खालील काही स्पष्ट आजार दिसून येतात.
  • धान्य गोडाऊन मधले कामगार, ओल्या-कुबट वातावरणात काम करणारे शेतकरी, पक्षी हाताळणारे यांना ऍस्पर नावाच्या बुरशीमुळे खोकला येतो व पुढे फुप्फुसांचा दाह होतो.
  • गिरणी कामगार – निरनिराळे प्रदूषण वायू, धूर, रासायनिक वाफा, निकेल धातू, ऍसबेस्टॉस तंतू, गादी कामगार, कापड कामगार, खाण कामगार, लाकूड मिल, दगड-खडी कामगार, पिठ गिरण्या, मसाला-तिखट दळणारे, तंबाखू-धुळीत काम करणारे कामगार, इ.
  • या सर्वांना कमी अधिक प्रमाणात साधारणपणे सामान्य लक्षणे दिसतात. खोकला हा अर्थातच प्रमुख लक्षण असतो. छाती दाटून येणे, दम लागणे हे दोन त्रास जाणवतात.

प्रदूषणात काम केल्यावर लगेच हा त्रास सुरु होतो. असा त्रास पूर्वी झालेला नसणे हे रोगनिदानात महत्त्वाचे आहे. काही वेळा प्रदूषण संबंधांनंतर 24 तासांच्या आत त्रास सुरु होतो, आणि कमी-अधिक प्रमाणात टिकून राहतो. कधीकधी 3 महिन्यांपर्यंत त्रास सुरुच राहतो. मात्र काही धुळींच्या बाबतीत आजार काही महिन्यांनंतर येऊ शकतो. (उदा. सिलिकॉसिस)

उपचार म्हणजे प्रदूषणापासून अलग होणे. यासाठी व्यावसायिक आजारांच्या प्रकरणात जास्त माहिती वाचायला मिळेल.

दमा -आयुर्वेद

दमा हा अगदी चिवट आजार आहे. दम्याचा जोर कशामुळे कमीजास्त होतो याची माहिती आवश्यक आहे.

जेवण झाल्यावर लगेच सुरू होणारा दमा कफ दोषामुळे असतो. या दम्यास श्वासकुठार गोळी, वमन या उपायांनी चांगला उतार पडतो. थंड हवा, पेरू, थंड पाण्याची आंघोळ, यांमुळे हा दमा वाढतो.

याउलट जेवणानंतर दोन तासांनी सुरू होणारा आणि सुमारे पाच तास टिकणारा दमा पित्तदोषामुळे येतो. अशा रुग्णांना गार पाणी, पंख्याचा वारा, इत्यादी गोष्टी आवडतात असे आढळते. श्वासकुठार गोळी या दम्यावर लागू पडत नाही. यासाठी 200 ग्रॅम ज्येष्ठमध पुडीवर उकळलेले एक लिटर पाणी ओतून, अर्धातास ठेवून ज्येष्ठमध्यजल तयार करावे. हे कोमट-गरम पाणी थोडयाथोडया वेळाने 100 मिली. दिल्याने अशा रुग्णांना आराम पडतो. (याबरोबरच पित्त कमी होण्यासाठी सूतशेखर गोळी (100मि.ग्रॅ) तीन वेळा दिल्याने चांगला उपयोग होतो.)

संध्याकाळी किंवा पहाटे सुरू होणारा दमा वातप्रकोपाचा असतो. या रुग्णांना श्वासकुठार व कण्टकारी (किंवा वासावलेह) दोन चमचे दोन वेळा तीन-चार दिवसांपर्यंत चालू ठेवावे. याचबरोबर 100 मि.ली गरम दुधात 10-15 मि.ली नारायण तेल मिसळून द्यावे. असे तीन चार वेळा औषध दिल्यास धाप कमी पडते.

दम्यावर योगोपचारांचा चांगला परिणाम होतो. वमन, जलनेति, भस्त्रिका व काही आसने (पश्चिमोत्तासन, सर्वांगासन, हलासन) प्राणायाम यांच्या नियमित आचरणामुळे दमा कमी पडतो.

जंतखोकला

श्वासनलिका-दाहाबरोबर जंतखोकल्याचा उल्लेख आलेला आहे. पण हा एक महत्त्वाचा आजार असल्याने याची थोडी तपशीलवार माहिती इथे दिली आहे.

कारणे

अनेक प्रकारच्या जंतांच्या जीवनचक्रात सूक्ष्म अळयांच्या अवस्थेत हे जीव रक्तामार्फत फुप्फुसात येतात. गोलजंत, आकडीजंत, हत्तीरोगाचे जंत, इत्यादी प्रकारच्या जंतांच्या सूक्ष्म अवस्थेत फुप्फुसांना वावडयाची सूज येते. यात दम लागणे, बारीक ताप राहणे, कोरडा खोकला येत राहणे, इत्यादी त्रास होतो.

सर्वसाधारणपणे डॉक्टर खोकल्याच्या रुग्णांना जंतुविरोधी औषध (उदा. कॉट्रिमोक्षझोल ) व एखादी खोकल्याची बाटली देतात. पण या जंतुविरोधी औषधांनी जंतखोकला थांबत नाही. कारण कॉट्रिमोक्षझोल , इत्यादी औषधांचा जंतांवर काहीही परिणाम होत नाही. मुलांना होणा-या खोकल्याचे जंतखोकला हे एक कारण असू शकते.

उपचार

बेंडेझोल गोळया देऊन पहा. याने खोकला 7 दिवसांत न थांबल्यास तज्ज्ञाकडे पाठवा.