श्वसनसंस्थेचे आजार

दीर्घकालीन श्वसनमार्ग अवरोधक विकार

(Chronic Obstructive Pulmonary Disease-COPD)

COPD म्हणजे फुफ्फुसांचा असा दीर्घकालीन आजार ज्यात श्वसननलिका (airways) आणि फुफ्फुसातील वायुकोष (alveoli) नुकसानग्रस्त होतात. या विकारामुळे श्वसनमार्ग कायमचे अरुंद होतात व श्वास घेणे-सोडणे अवघड होते. हा आजार हळूहळू वाढणारा आणि पूर्णपणे बरा न होणारा असला तरी योग्य उपचारांनी रुग्णाचे आयुष्य आणि जीवनमान सुधारता येते. खूप धूम्रपान करणारे, तसेच चुलीच्या धूरात काम करणाऱ्या स्त्रियांना आणि जास्त हवा-प्रदूषणात राहणाऱ्या शहरी किंवा खाण कामागाराना  हा विकार होतो. COPD मध्ये दोन प्रमुख प्रकार येतात:

क्रॉनिक ब्रॉंकीटिस (Chronic Bronchitis)

यात श्वसननलिकांमध्ये सूज व जास्त कफ तयार होतो. दिवसातून किमान 3 महिने, सलग 2 वर्षे खोकला व कफ असेल तर हा प्रकार आहे असे समजावे.

इम्फिसीमा (Emphysema)

या प्रकारात फुफ्फुसातील सूक्ष्म सूक्ष्म वायुकोष  (alveoli) फाटतात आणि त्यांची लवचिकता कमी होते.

त्यामुळे श्वसनाचा कार्यक्षम भाग कमी होतो.

मुख्य कारणे
  • धूम्रपान प्रमुख कारण; दीर्घकाळ धूर श्वासावाटे गेल्याने फुफ्फुसाचे नुकसान होते.
  • प्रदूषण व धूर औद्योगिक धूर, धूळ, धान्य/लाकूड/गोवऱ्यांचा धूर.
  • घरगुती इंधनाचा धूर ग्रामीण भागातील स्वयंपाकाच्या धुरामुळे स्त्रियांमध्ये जास्त प्रमाण.
  • अनुवंशिकता (Genetic) क्वचित, उदा. α-1 antitrypsin deficiency.
  • वारंवार श्वसन संक्रमण बालपणातील किंवा प्रौढ वयातील पुनःपुन्हा होणारे संक्रमण.
लक्षणे
  • सतत खोकला, विशेषतः सकाळी
  • पांढरा किंवा पिवळसर कफ
  • श्वास घेण्यास त्रास (सुरुवातीला श्रमानंतर, नंतर विश्रांतीतही)
  • छातीत आवाज, घरघर (wheezing)
  • थकवा, वजन कमी होणे
  • वारंवार छातीत संसर्ग
रोग निदान (Diagnosis)
  • रुग्णाची माहिती पूर्वेतीहास व शारीरिक तपासणी
  • स्पायरोमेट्री (Spirometry) — श्वसनक्षमता तपासण्यासाठी महत्त्वाची चाचणी. FEV₁/FVC < 0.7 म्हणजे COPD सूचित करते.
  • छातीचा एक्स-रे / सीटी स्कॅन — फुफ्फुसांतील बदल पाहण्यासाठी.
  • ऑक्सिजन संतृप्ती (SpO₂) — कमी झाल्यास गंभीरता कळते.
उपचार
  • धूम्रपान पूर्णपणे बंद करणे (Smoking cessation) हा सर्वात प्रभावी आणि आवश्यक उपाय. इतर करणे असतील तर त्याचे निराकरण करणे आवश्यक आहे (उदा: चुली ऐवजी गॅस वर स्वयंपाक, हवा-प्रदूषण कमी करणे)
औषधोपचार (Medications)

दमा विकाराची औषधे यात उपयोगी आहेत.

औषध प्रकारउदाहरणेउपयोग
Bronchodilators (श्वसननलिका सेल मोकळी करणारी औषधे)Salbutamol, Formoterol, Tiotropiumश्वास घेणे सोपे करतात
Inhaled Corticosteroids (सूज कमी करणारी औषधे)Budesonide, Fluticasoneसूज कमी करतात
Combination Inhalers (वरील दोन्ही संयुक्त)Formoterol + Budesonideदीर्घकालीन नियंत्रणासाठी
Mucolytics (कफ पातळ  करणारी)Ambroxol, cetylcysteineकफ पातळ करतात
Antibiotics संसर्ग झाल्यास दिली जातात
औषध देण्याची साधने
  • दम्यासाठी जी साधन एवपरतात तीच यात उपयोगी असतात.
  • याशिवाय  रक्तातील ऑक्सिजन कमी असल्यास दीर्घकाळ ऑक्सिजन दिला जातो. घरगुती ऑक्सिजन (home oxygen concentrator) काही रुग्णांना आवश्यक असतो.
  • श्वसन व्यायाम (Breathing exercises)
    1. पोटावर हात ठेवून खोल श्वास घेणे.
    2. हळू श्वास घेऊन ओठांमधून सोडणे.

हे व्यायाम श्वसन सुधारतात व दम कमी करतात.

लसीकरण (Vaccination)
  • फ्लू लस (Influenza vaccine)
  • न्यूमोकॉक्कल लस (Pneumococcal vaccine)

या लसी संसर्ग टाळण्यासाठी महत्त्वाच्या आहेत.

गुंतागुंत (Complications)
  • वारंवार फुफ्फुसांचे संक्रमण
  • श्वसन अपयश (Respiratory failure)
  • फुफ्फुस उच्चदाब (Pulmonary hypertension)
  • उजव्या हृदयावर ताण (Cor pulmonale)
प्रतिबंध (Prevention)
  • धूम्रपान पूर्णतः टाळा
  • धूर, धूळ, प्रदूषणापासून संरक्षण
  • स्वच्छ स्वयंपाक इंधन वापरा
  • नियमित व्यायाम व संतुलित आहार
  • लसीकरण वेळेवर घ्या
सारांश

COPD हा हळूहळू वाढणारा परंतु नियंत्रित ठेवता येणारा आजार आहे.

वेळेवर निदान, योग्य इनहेलर वापर, धूम्रपान बंद करणे आणि नियमित तपासणी यांमुळे रुग्णाचे आयुष्य व जीवनमान दोन्ही सुधारते.