सरकारी मनोविकार सेवा सक्षम नसल्यामुळे खाजगी क्षेत्रात मनोविकार सेवा घेण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. साधारणपणे गरीब रुग्णांना या खाजगी सेवा परवडत नाहीत. त्याचबरोबर मानसोपचार तज्ज्ञ किंवा समुपदेशन करणारे आरोग्यसेवकही असतात. साधारणपणे ते एकतर डॉक्टरांच्या बरोबर किंवा स्वतंत्रपणे काम करतात. समुपदेशनाच्या क्षेत्रात निरनिराळ्या उपशाखा आहेत. उदा. बालक-पालक आणि बालविकसनाचे क्षेत्र, वैवाहिक समुपदेशन, एडस् आजारासाठी समुपदेशन, क्रिडा विषयक, विशिष्ट आजार विषयक इ. समुपदेशनासाठी वैद्यकीय सोयी लागत नाहीत. समुपदेशन हे औषधोपचारावर अवलंबून नसते. त्यात मुख्यत: त्या त्या व्यक्तीला नीट समजून घेऊन स्वत:च्या समस्यांची जाणीव निर्माण करून स्वत:च उपचार शोधायला मदत करण्याची असते. यासाठी पुरेसा वेळ त्यावा लागतो, कधीकधी तासभर देखील. बहुतेक वेळा समुपदेशन हे वारंवार करायला लागते. समुपदेशकाचे व्यक्तिमत्व,जाणीव, माहिती, संवाद कौशल्य आणि सहानुभूती या सर्व गुणांचा समुपदेशनात महत्त्वाचा भाग असतो. याचबरोबर त्या त्या समस्येची सांगोपांग माहिती आणि अनुभवही त्याच्याकडे असायला लागतो.
मनोविकारांपैकी काही प्रकारात औषधोपचारांचा जास्त उपयोग होतो. विशेषत: गंभीर मनोविकारांमध्ये. याउलट सामान्य मनोविकारात समुपदेशनाचे महत्त्व जास्त असते. दोन्ही प्रकारात हे दोन्हीही घटक कमीअधिक प्रमाणात लागू शकतात आणि हे डॉक्टरच ठरवतील.
पूर्वी समुपदेशनाचे काम घरातील-गावातील ज्ञानी व्यक्ती करीत असे. मात्र आता त्यातले शास्त्र व विज्ञान खूप विकसित झाले आहे. याचे स्वतंत्र अभ्यासक्रम असतात व काही अनुभवानंतरच समुपदेशक परिपक्व होतो. अपुर्या तयारीचा किंवा उतावीळ समुपदेशक प्रत्यक्षात नुकसानही करू शकतो.
मनोविकारांवरची औषधे ही डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळू शकत नाहीत. सुरक्षितता म्हणून ही गोष्ट चांगलीच आहे. परंतु आपल्या देशात तज्ज्ञ सेवांची एकूणच कमतरता असल्याने प्रशिक्षित कार्यकर्त्यांना काही औषधे वापरू द्यायला हवीत; त्यासाठी काही ठोकताळे आणि दूरध्वनीवरून किंवा संगणक संपर्कातून तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन झाले तर मनोविकार सेवांचा विस्तार होऊ शकतो. अन्यथा ही महत्त्वाची वैज्ञानिक प्रगती गरजू लोकांपासून लांबच राहील. या पुस्तिकेत पुढे एका स्वतंत्र प्रकरणात निवडक औषधांची माहिती दिली आहे.