ही पुस्तिका लिहिताना मी महाराष्ट्रातल्या काही कार्यकर्त्यांना भेटून त्यांचे काम समजून घेतले. डॉक्टर नसलेले हे कार्यकर्ते इतके चांगले काम करू शकतात यावर अन्यथा विश्वास बसला नसता. मानसिक आरोग्याचे काम हे केवळ डॉक्टरांनी निभणारच नाही तर अशा कार्यकर्त्यांची त्यासाठी नक्कीच गरज आहे. या काही कथांवरून ही पुस्तिका नेमकी कुणासाठी उपयोगी पडणार आहे ते आता समजेल.
ही जव्हारमधल्या प्रतिभाची खरी कथा आहे. एका सामाजिक संस्थेबरोबर गेली २ वर्षे ती काम करत आहे. तिच्याच शब्दात –जेव्हा मला संस्थेने मनोविकारग्रस्त लोकांसाठी काम करण्याबद्दल विचारले तेव्हा मला खरे म्हणजे धक्काच बसला. माझी मनाची तयारीच नव्हती. ते काम फार अवघड आहे असंच मला वाटायचं आणि मनोरुग्णांची तर मला लहानपणापासून भीतीच होती. माझ्या आजूबाजूला असे काही लोक मी पाहिले होते. पण माझा नकार संस्थेतल्या इतर सहकार्यांनी बाजूला ठेवून माझी समजूतच घातली. मी कशीबशी प्रशिक्षणासाठी गेले. या सात दिवसांच्या प्रशिक्षणात मला इतरही काही कार्यकर्ते भेटले. मनोविकारांबद्दल माहिती तर मिळालीच पण काही क्षेत्रभेटी पण झाल्या. काही डॉक्टर आणि समुपदेशक यांनाही आम्ही भेटलो. जेव्हा मी प्रत्यक्ष पाहिले की मनोरुग्ण उपचाराने बरे झाले आहेत आणि सामान्य जीवन जगू शकताहेत तेव्हाच मला खरा धीर आला. जव्हारला परत आल्यानंतर मी महिला गटांच्या सोबत मानसिक आरोग्याच्या जागृतीचे काही छोटे छोटे कार्यक्रम घेतले. यासाठी एक पोस्टरही मी तयार केले होते. यातून मला काही अशा घरांची माहिती पण कळली. हळूहळू मी सहकार्यांबरोबर गृहभेटी करायला लागले. यातले अनेक लोक वैद्यकीय उपचार घेताहेत आणि बरेचसे बरेही झाले. माझ्या सर्व गावांची माहिती गोळा केल्यावर माझ्याकडे अशा गरजू लोकांची एक लांब यादीच तयार झाली आहे.‘‘
प्रतिभाबरोबर आम्ही त्या दिवशी मथुरा या मनोरुग्णाच्या घरी गेलो. मथुराला गेली काही वर्षे वेडाचे झटके येत होते आणि तिचे घरचे लोक खरोखर हैराण झाले होते. भगत तर अनेक झाले. शेवटी तिला ते घरात बांधून घालायचे आणि कामावर जायचे. गेले सहा महिने मथुरा उपचार घेत आहे आणि बरीच सुधारली आहे. आत्ता तर ती शेतात कामे पण करायला लागली आहे. अशा अनेक गोष्टी आहेत आणि काही अपयशी गोष्टीही आहेत. दुपारी आम्ही ग्रामीण रुग्णालयाच्या मनोविकार तज्ज्ञांना भेटायला गेलो. हे डॉक्टर आता निवृत्त झालेत पण आठवड्यातून एकदा ओ.पी.डी. ला येतात. असे समजूतदार डॉक्टर नसते तर प्रतिभा हे काम फारसे करूच शकली नसती. हॉस्पिटलमधले इतर कर्मचारीही प्रतिभाला चांगलेच ओळखतात आणि मदत पण करतात. प्रतिभाच्या डायरीत या सगळ्या कामांच्या नोंदी आहेत, त्या वाचल्यावर हे काम आणखी चांगले समजते. प्रतिभा काही मनोविकारतज्ज्ञ नाही पण थोड्या प्रशिक्षणातून तिने शेकडो मनोरुग्णांना नवा रस्ता दाखवला. जव्हारसारख्या मागास तालुक्यात, डोंगराळ वस्तीत आणि आदिवासी समाजात हे काम काही सोपे नव्हते, भगतांचा प्रभाव फारच होता, रोज अनेक पायपीटी करून प्रतिभाने दोन वर्षांत ही परिस्थिती चांगलीच बदलली आहे. प्रतिभा जे करू शकली ते काम साहायक परिचारिका आणि पुरुष आरोग्य कर्मचारीही सहजपणे करू शकतील असेच मला वाटले.
सतिष हा धुळे जिल्ह्यातला कार्यकर्ता आहे. सतीषने पण गेली दोन वर्षेच हे काम सुरू केले आहे. त्याच्या परिसरात आतापर्यंत त्याने सुमारे १०० मनोरुग्णांवर उपचार घडवून आणले आहेत. त्याच्या मते प्रशिक्षण शिबीर फारच छान झाले होते आणि आपल्याला काय करायचे आहे हे त्याला तिथेच नीट समजले. आपले मुख्य काम म्हणजे लोकांना माहिती सांगून जागृती करणे, मनोरुग्ण शोधणे आणि ते डॉक्टरपर्यंत आणणे. नंतर त्याचा पाठपुरावा आणि लागेल ते साहाय्य करणे हेच आहे हे सतीष आणि त्याच्या सहकार्यांना माहीत आहे. इथल्या शासकीय रुग्णालयात मनोविकार तज्ज्ञ नेहमीच असतात असे नाही ही तर त्यांची मुख्य अडचण आहे. दुसरी अडचण म्हणजे आपला मनोरुग्ण जिल्ह्यापर्यंत नेणे हे अनेक कुटुंबांना परवडतच नाही. यावर सतीषने काही खाजगी जीप चालकांशी ठरवून महिन्याला एकदा धुळे ट्रीपची सोय केली. अशा गाड्या निरनिराळ्या भागांतून केल्या आहेत. मी सतीषला भेटलो त्या दिवशी तिथे ४-५ मनोरुग्ण आणि त्यांच्या घरातली मंडळी बसलेली होती. अशीच एक मनोरुग्ण स्त्री आपल्या आईबापाकडे कायमची राहायला आली होती. सोबत तिची ४ मुले पण होती. बाप गरीब असला तरी त्याने तिला आणि तिच्या पोराबाळांना सांभाळले आहे. भले त्यासाठी काहीही त्रास होवो. हा मनाचा मोठेपणा दुर्मीळ आहे. त्या बाईला नवर्याने सोडलय आणि दुसरं लग्न पण केलंय. तिला औषधोपचार देण्याचे काम तिचा बापच करतो आणि एकूण बरीच सुधारणा आहे असे त्याने सांगितले. खरे म्हणजे त्या त्या वैद्यकीय उपचारांचा भाग त्या मानाने सोपा व सामाजिक गुंता सोडवणे फारच कठीण दिसतंय. नर्मदा- हे तिचे नाव सांगत होती की ती लोकांना कसा कसा त्रास द्यायची, दिवसभर गात बसायची आणि कुठेपण निघून जायची आणि तिला हे सगळे समजतच नव्हते. आत्ता तिच्यामध्ये बरीच सुधारणा झाली आहे असे ती स्वत:च सांगते. बापाचा आधार नसता तर काय झाले असते? हे सांगता येत नाही. यानंतर आम्ही एका जवानाची जीवनकथा ऐकली. मानसिक आजार झाल्यावर त्याची बायको दुसर्याचा हात धरून पळून गेली ती परत आलीच नाही. घरात आई नाही पण म्हातारा बाप असतो. घरची २-३ एकर शेती. त्यात एखादे पीक येते. यावरच वर्षभर गुजराण करावी लागते. खरं म्हणजे त्यातून काहीच भागत नाही. दुसरे म्हणजे मूळात गावात मजुरी फार नाही आणि आजार माहीत असल्यामुळे त्याला बाकीचे लोक काम पण फारसे देत नाहीत. काही सामाजिक किंवा सरकारी निधी मिळतो का हे त्याला फारसे माहीत नाही. या गरिबीवर आणि त्याच्या या परिस्थितीवर काय बोलावे हे आम्हालाही सुचत नव्हते. पण एक मात्र खरे की उपचाराने खूपच सुधारणा झालेली आहे.
दुसर्या दिवशी सतीष बरोबर आम्ही २० कि.मी. वरच्या उनापाणी या गावात गेलो. तिथे एक छोटीशी नदी आणि देऊळ आहे, जंगल खात्याचे एक लहान उद्यान पण आहे. गरम पाण्याची कुंड असल्याने तिथे बरेच लोक स्नान करायला येतात. त्यामुळे कातडीचे आजार बरे होतात असा समज आहे. अकरा वाजेपर्यंत हळूहळू ७-८ कुटुंबातली मंडळी आली. सोबत मनोरुग्णही होते. ही बैठक मुद्दामच ठेवलेली आहे. कारण काही मनोरुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या एकत्रित गप्पागोष्टी व्हाव्यात आणि त्यातून हा कार्यक्रम पुढे जाईल अशी अपेक्षा असते. अशा बैठकांमुळे कुटुंबांना धीर येतो, इतरांचे अनुभव कळतात आणि पेशंट बरा होण्याची आशा निर्माण होते. या मोठ्याच गोष्टी आहेत. शिवाय अनेक अडचणीही कळतात आणि त्यावर कुणीकुणी काय काय रस्ते शोधले आहेत हे देखील कळते. उपचारासाठी येण्याजाण्याचा खर्च, हॉस्पिटलमध्ये डॉक्टर असतील किंवा नसतील, औषधांचा कधीकधी पत्ता नसतो तर कधी रुग्ण यायला तयार नसतो अशा एक ना एक अडचणी. एका बाबांनी तर विचारले की संस्थेचे हे काम संपले तर पुढे आमचे काय होणार? दुसरा एक तरतरीत माणूस बहुते राजकीय कार्यकर्ता आहे. त्याची अनेक ठिकाणी ओळख आहे. त्याने सुचवले की बहुतेक आमदार फंडातून या कामाला पुढे काही मदत होऊ शकेल. निदान येण्याजाण्याचा खर्च तरी मिळत राहील. औषधांचा प्रश्न निघाला तेव्हा मी सुचवले की त्या हॉस्पिटलच्या रुग्ण कल्याण समितीकडे असलेला निधी यासाठी वापरता येऊ शकतो. कल्याण समितीची यादी बोर्डावर लावलेली असते. त्यातल्या काही लोकांना आपण भेटायला पाहिजे. अशी बैठकीत बरीच चर्चा झाली. सतीषने येतानाच सगळ्यांसाठी वडापाव आणला होता. असे वनभोजन करून दुपारी पांगापांग झाली. अशा मिटिंगमुळे कुटुंबांना माहिती तर मिळतेच पण अशा अवघड आजारांना तोंड द्यायची शक्ती पण मिळते. हे काम डॉक्टर नाही पण कार्यकर्ते करू शकतात हे मात्र निश्चित
नाशिकमध्ये भाऊ हा कार्यकर्ता मालेगाव आणि इगतपुरी, त्र्यंबक तालुक्यात नाशिक तालुक्याचा प्रकल्प चालवतोय. या २-३ तालुक्यांमधून त्याच्याकडे सुमारे ७०० गंभीर मनोरुग्णांची यादी आहे. यातले अनेक उपचार घेऊन बरे होण्याच्या मार्गावर आहेत. भाऊने जागृतीसाठी आणि रोगनिदानासाठी सुरुवातीस रोगनिदान शिबीरे घेतली. सुरुवातीला प्रतिसाद नव्हता पण चांगले डॉक्टर यायला लागल्यापासून ही शिबीरे चांगली होत आहेत. भाऊचे म्हणणे असे पडले की सरकारी डॉक्टर हेच आपले तारण हार आहेत. खाजगी रुग्णालये आणि खाजगी तज्ज्ञ हे न परवडण्यासारखे. खाजगी डॉक्टर्स रुग्णांना वेळ देत नाहीत आणि पैसे जास्त घेतात हा अनुभव आहे. मुख्य अडचण औषधे विकत घेण्याची असते. हे सर्व करण्यापेक्षा सरकारी डॉक्टरकडे जाणे केव्हाही चांगले आणि हक्काचे असते.
भाऊ हा स्वत: काही रोगनिदान करत नाही पण ते सोडून बाकी सर्व कामात तो वाकबगार आहे. खरे म्हणजे भाऊ आता निवृत्त होतोय आणि त्याच्या ठिकाणी नवीन कार्यकर्ता येण्याची फार गरज आहे.