
जननसंस्थेत ठिकठिकाणी मांसल गाठी तयार होऊ शकतात. योनिद्वार, योनिमार्ग, गर्भाशय, बीजनलिका, बीजांडे यापैकी कोठेही या गाठी होऊ शकतात. सर्व गाठींची तपासणी ‘आतूनच’ करावी लागते. सामान्यपणे तीन-चार प्रकार नेहमी आढळणारे आणि महत्त्वाचे आहेत : (1) गर्भाशयाच्या तोंडाचा कर्करोग (2) गर्भाशयाच्या साध्या व कर्करोगाच्या गाठी (3) बीजांडाच्या साध्या गाठी (4) बीजांडाचे कर्करोग. (5) गर्भाशयाच्या आतील अस्तराचा कर्करोग
भारतातील स्त्रियांच्या कर्करोगांत प्रमुख कर्करोग हा गर्भाशयाचा आहे. सहसा हा आजार जननक्षम आणि तरुण-मध्यम वयात येतो. सतत बाळंतपणे, लिंगसांसर्गिक आजार, अस्वच्छता, अनेक पुरुषांशी लैंगिक संबंध या काही बाबी गर्भाशय मुखाच्या कर्करोगाशी जास्त निगडित आहेत. म्हणजेच अशा स्त्रियांना या कर्करोगाचा धोका जास्त असतो.
पाळीच्या चक्रात अचानक झालेला बदल, अंगावर पांढरे/लाल किंवा दुर्गंधीयुक्त स्राव जाणे, लैंगिक संबंधांनंतर लाल अंगावर जाणे, लघवी किंवा संडासच्या भावनेत झालेले बदल, मासिक पाळी बंद झाल्यानंतर पुन्हा रक्तस्राव सुरु होणे यासारखी लक्षणे गर्भाशयाच्या कर्करोगात दिसतात.
कर्करोग झालेल्या सुमारे 70% स्त्रियांमध्ये ह्यूमन पॅपिलेमा व्हायरस या विषाणूची लागण झालेली सापडते. हा विषाणू लैंगिक संबंधातून पसरतो. जितक्या जास्त व्यक्तींबरोबर लैंगिक संबंध असतील तितकी याची शक्यता वाढते.
स्त्रियांच्या बाबतीत हा अत्यंत महत्त्वाचा आजार आहे. हा वेगाने वाढतो व लवकर हाताबाहेर जातो. सुरुवातीस गर्भाशयाच्या तोंडाला खरबरीतपणा येतो. नंतर फ्लॉवरच्या आकाराची गाठ होते. त्यानंतर गाठीची झपाटयाने वाढ व प्रसार होतो.
शिलर चाचणी (Schiller Test) ही गर्भाशयाच्या मुखाच्या (Cervix) तपासणीसाठी केली जाणारी एक साधी व स्वस्त चाचणी आहे. हिला आयोडीन चाचणी असेही म्हटले जाते.
प्राथमिक पातळीवर स्क्रीनिंगसाठी उपयुक्त. या चाचणीत लुगोल्स आयोडीन (Lugol’s Iodine) गर्भाशयाच्या मुखावर लावले जाते.
सामान्य, निरोगी स्क्वॅमस एपिथेलियममध्ये ग्लायकोजेन भरपूर प्रमाणात असतो. तो आयोडीन लावल्यावर गडद तपकिरी रंग घेतो. परंतु असामान्य पेशी (precancerous किंवा cancerous changes) असतील तर त्यामध्ये ग्लायकोजेन कमी किंवा नसतो. त्यामुळे कर्करोग-प्रवण भागावर रंग लागत नाही किंवा फिकट पिवळसर दिसतो.
गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग लवकर टप्प्यात ओळखण्यासाठी व्हिज्युअल इन्स्पेक्शन विथ अॅसिटिक अॅसिड (VIA) किंवा पॅप स्मिअर सोबत ही चाचणी केली जाते. कमी खर्चात, निगेटिव्ह शिलर चाचणी (Normal) – सर्व भाग गडद तपकिरी रंगाचे दिसतात. पॉझिटिव्ह शिलर चाचणी (Abnormal) – काही भाग रंग न घेता फिकट किंवा पिवळसर दिसतात → त्या ठिकाणी कर्करोग पेशींचा संशय असतो.
ही टेस्ट १००% अचूक नाही. गर्भाशयमुखाच्या सूज, जळजळ किंवा संसर्गामुळे खोटे पॉझिटिव्ह परिणाम येऊ शकतात. पॅप स्मिअर व बायोप्सीची जागा घेऊ शकत नाही, पण प्राथमिक तपासणीसाठी महत्वाची आहे.
याची प्रमुख लक्षणे म्हणजे चाळीशीनंतर पाळीशी संबंधित नसलेला अवेळी रक्तस्राव. लैंगिक संबंधानंतर रक्तस्राव हे देखील लक्षण असू शकते.
भरपूर भाज्या व फळे यांचा आहारात समावेश असणे व पपई, लिंबू यांचा वापर, जीवनसत्त्व अ, ब (फोलिक ऍसिड) क, माशाचे तेल हे गर्भाशयाचा कर्करोग टाळण्यासाठी मदत करतात.
एच.पी.व्ही वॅक्सीन मिळते. सर्व मुलींमध्ये 6 वर्ष वयानंतर ते लैंगिक संबंध सुरु होण्याआधीच्या वयापर्यंत ही लस टोचणी केल्यास एच.पी.व्ही संसर्ग व कर्करोग टाळता येऊ शकेल.
पॅप टेस्ट निदानात कर्करोगाची सूचना असल्यास छोटया शस्त्रक्रियेने काम होऊ शकते. यासाठी अनेक प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत. गर्भाशय मुखाच्या संशयित सदोष भागाचा नमुना तपासल्यानंतर त्यातील प्रकार आणि पायरी यावर पुढील उपचार अवलंबून असतात
क्रायोसर्जरी, लेझरने दहन, साधी शस्त्रक्रिया यापैकी उपलब्ध असेल त्या उपचाराने पुढचा सर्व त्रास टाळता येतो. काही स्त्रियांच्या बाबतीत गर्भपिशवी काढून टाकण्याचा विचार केला जातो. विशेषत: उतारवयात हा पर्याय वापरला जातो.
एकदा निदान झाल्यावर उपचार गुंतागुंतीचे आहेत. आजार किती लवकर लक्षात आला/निदान झाले यावर उपचार ठरतात. यात गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया, किरणोपचार (रेडियेशन) व औषध (किमोथेरपी) यांचा समावेश असतो. लवकर निदान झाल्यावर संपूर्ण उपचार घेतल्यावर जीव वाचू शकतो..
गर्भाशय मुखाच्या कर्करोगावर किरण उपचार (रेडिओ थेरपी )हा देखील एक चांगला उपचार आहे. त्या सदोष भागापुरता किरण उपचार करणे याला ब्रॅके थेरपी असे म्हणतात

एचपीव्ही म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. हा एक सामान्य विषाणू असून तो प्रामुख्याने यौनसंबंधांद्वारे (sexual contact) पसरणारा आहे. या विषाणूच्या काही प्रजातींमुळे गर्भाशय मुखाचा कर्करोग (Cervical Cancer) तसेच गळा, गुदद्वार, लिंग यांचे कर्करोग होऊ शकतात.
एचपीव्ही लस (HPV Vaccine) शरीराला या विषाणूविरुद्ध संरक्षण देते आणि कर्करोग टाळण्यास मदत करते.
लसीचे प्रकार: भारतात सध्या उपलब्ध लसी: गार्डासिल (Gardasil), सर्वारिक्स (Cervarix)
नवीन भारतीय लस – सर्वावेरी (Cervavac) (भारत बायोटेक कंपनीने विकसित केलेली, तुलनेने कमी किमतीत उपलब्ध).
बहुतेक वेळा लस सुरक्षित असते. काही किरकोळ त्रास दिसू शकतात:
क्वचित : इंजेक्शनच्या ठिकाणी वेदना/सूज, सौम्य ताप, थकवा
हे त्रास तात्पुरते असतात आणि आपोआप बरे होतात. गंभीर दुष्परिणाम अत्यंत क्वचित होतात.
इतर महत्त्वाच्या सूचना