शौचाला पातळ होणे हे लहानपणापासून सर्वांच्या अनुभवाचे असते. मात्र यात खालीलप्रमाणे काही प्रकार असतात.
हगवणीचा आजार लहान आतडयात असेल तर त्यातले अन्न व पाणी शोषले न जाता बहुतेक सर्व अन्न-पाणी तसेच बाहेर पडते. त्यामुळे पातळ, पाण्यासारखे जुलाब होतात. पोटात अन्न नसले तरी लहान आतडयात पाणी, रस पाझरून त्याचेच जुलाब होतात.
हगवणीचा आजार जर मोठया आतडयात असेल तर जुलाब फार पातळ होत नाहीत. यात बहुधा चिकट पदार्थ (शेंब) व कधीकधी रक्त पडते. बहुतेक वेळा पोटात कळ येते आणि दुखत राहते. या प्रकाराला आमांश (आव) म्हणण्याचीही पध्दत आहे.
मुलांच्या अतिसारासाठी मुलांच्या आजारांच्या प्रकरणात माहिती दिली आहे. या प्रकरणात फक्त 6 वर्षानंतरची मुले, तरुण, प्रौढ यांच्यासाठी सूचना आहेत.
हगवण-जुलाबाची अनेक कारणे असतात. अपचन, वावडे ही कारणेही असतात. मात्र हगवणीला जिवाणू, अमिबा, विषाणू ही महत्त्वाची कारणे आहेत. जुलाबाचे कारण शोधून योग्य तो इलाज करावा लागतो. अमिबा किंवा जंतुदोषाचे जुलाब असल्यास विशिष्ट औषधे वापरावी लागतात. मात्र ब-याच वेळा जुलाब ‘विषाणूं’मुळे होतात आणि यांत औषधे उपयोगी पडत नाहीत, उलट प्रतिजैविक औषधे मात्र निकामी होण्याचा धोका वाढतो.
जुलाबाचे मुख्य कारण म्हणजे दूषित अन्न-पाणी. पाणी स्वच्छ आणि पुरेसे पाहिजे. राहणीमान सुधारण्याने स्वच्छता वाढते व रोग कमी होतो. ज्या लोकांना अपुरे, अशुध्द पाणी मिळते त्यांना या प्रकारचे आजार सतत होतात. लहान मुलांमध्ये तर जुलाब, अतिसार प्रमाण फार आहे. शहरातल्या झोपडपट्टयांतही याचे प्रमाण पुष्कळ आहे. नदी, उघडे झरे, उघडया विहिरी यांच्या पाण्यात सहसा हे जंतू आढळतात. मुख्य म्हणजे मानवी किंवा प्राण्यांची विष्ठा व पिण्याचे पाणी यांचा संबंध आला तर हे आजार उद्भवतात. कूपनलिकांमुळे मात्र या आजारांचे प्रमाण घटले आहे.
हे सर्व रोग सूक्ष्मजंतूंमुळे (जिवाणू, अमिबा, विषाणू) होतात. हे सूक्ष्मजंतू हगवण-आजा-याच्या विष्ठेतून येतात. हे जंतू हाताने, अन्नावाटे; पाण्यावाटे, अन्नातून किंवा माशीच्या संपर्काने पसरतात. यासाठी हातांची, भांडयांची स्वच्छता, नखे कापणे, अन्न झाकून व सुरक्षित ठेवणे, इत्यादी काळजी घेणे आवश्यक आहे. जिवाणू-हगवण ही बहुधा साथीमध्ये येऊ शकते. पावसाळयात सुरुवातीला दोन्ही प्रकारची हगवण जास्त दिसते.
जुलाबाच्या तक्त्यात पाहिल्यानंतर जुलाबांची निरनिराळी कारणे ध्यानात येतील.
अनेकदा ही दोन्ही प्रकारची (जिवाणू, अमिबा) हगवण एकत्र येते. पैकी कोणत्याही एकासाठी औषध दिले तरी मग ती चालूच राहते. दोन्ही आजारांच्या खाणाखुणांमध्ये थोडा फरक आहे.
मानवी विष्ठा व्यवस्थापन, हात धुणे, पिण्याचे शुद्ध पाणी, अन्न-सुरक्षित असणे ही यासाठी महत्वाचे आहे. सार्वजनिक पातळीवर स्वच्छ भारत योजना यासाठी महत्वाची आहे.
जंतुविरोधी औषधे
हगवण निरनिराळया प्रकारची असल्यामुळे कारण निश्चित करणे आवश्यक आहे. (रोगनिदान तक्ता पाहा).
हगवण : शौचास ब-याच वेळा होणे, मोठे जुलाब होणे इत्यादींमुळे शरीरातले पाणी कमी पडून शोष पडतो. शोष टाळण्यासाठी किंवा आधीच शोष झाला असेल तर उपचार म्हणून मीठ-साखर पाणी (जलसंजीवनी) चालू करा. (तपशील मुलांच्या आजारात पाहा.) यामुळे शरीरातील क्षार व पाण्याची भरपाई होते. नारळाचे पाणी, चहा, कॉफी, पेज, सरबत, इ. द्रवपदार्थही चांगले असतात.
शरीरातून गेलेल्या पाण्याची भरपाई करताना ते थोडयाथोडया प्रमाणात द्यावे. दर पाच-दहा मिनिटांनी तीन -चार चमचे असे दिल्यास पचनसंस्थेत शोषले जाते. एकदम जास्त दिल्यास जुलाब किंवा उलटी होण्याची शक्यता असते.
जुलाबाची कारणे अनेक आहेत. कारणांप्रमाणे विशिष्ट उपचार करावे लागतात. या विशिष्ट उपायांव्यतिरिक्त पचनक्रिया सुधारण्यासाठी काही पाचक औषधे आयुर्वेदात सांगितली आहेत.
एक उपाय म्हणजे त्रिकटू चूर्ण (सुंठ, मिरे, पिंपळी) एक-दोन ग्रॅम मात्रेत दिवसातून दोन-तीन वेळा द्यावे. जुलाब थांबल्यावर पाचक औषधे दोन-तीन दिवसांपर्यंत चालूच ठेवावीत.
अपचनाचे जुलाब असतील तर त्या दिवसापुरते द्रव पदार्थ देत राहावेत. यासाठी तांदूळ किंवा कणीक पाण्यात उकळून वरचे पाणी मीठ साखर व आले किंवा सुंठ, मिरपूड टाकून द्यावे. यामुळे लवकर आराम वाटेल. (आले किंवा सुंठ, मिरपूड, इत्यादी पाणी उकळतानाच टाकावे)