दिवसातून एकदा नियमित पोट साफ होणे हा निसर्गनियम आहे. अन्नाचा पोटातला मुक्काम एवढाच असतो. एवढया वेळात अन्न पचून त्याचा चोथा टाकायला तयार होतो. पोटात हा मळ जास्त काळ राहिला तर त्याला दुर्गंध येतो. रोज पोट पूर्ण साफ होणे हे चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे. तथापि दिवसातून एक-दोनदा होणे किंवा दोन दिवसात एकदा असेही सामान्यपणे होऊ शकते. मल-विष्ठा सहज होणे, सेल किंवा खडे न होणे हे मात्र आवश्यक आहे. संपूर्ण विष्ठा घट्ट आकाराची, एक दोन भागात पडणे, त्याला घाण वास नसणे, पोटात काही न राहिल्याची भावना ही चांगल्या पचन-व्यवस्थेचे निदर्शक आहे. मलविसर्जन पचनाच्या आवश्यक काळापेक्षा लवकर झाल्यास, विष्ठा सेल होते, आणि याउलट उशिरा होत असेल तर पाणी शोषले जाऊन कडक किंवा खडे होतात. खडे बाहेर पडायला त्रास होतो, आणि याने बद्धकोष्ठ होऊ शकते. शौचास नेहमी साफ होत नसेल, आठवड्यातून दोन-दोन दिवस होत नसल्यास बद्धकोष्ठ म्हणावे, कारण काही वेळा तात्पुरता त्रास असू शकतो.
पोट साफ होण्यासाठी त्यात पालेभाज्या,फळभाज्या , कोंडा यांचे प्रमाण चांगले पाहिजे. काही पदार्थ जात्याच रुक्ष असतात, मैदायुक्त पदार्थ, मिठाई, बेसन, इ. पदार्थांनी पोट लवकर साफ होत नाही.
आपल्या शरीराला लावलेली सवय व दिनचर्या पोट साफ होणे-न होण्याला कारणीभूत ठरते. म्हणूनच ही पचन-मेंदू संबंध बिघडल्याचा प्रकार समजला जातो. पण याला इतरही करणे असतात.
पोट पातळ असल्यास पोटाच्या डाव्या बाजूला हाताने दाबून आपल्याला भरलेल्या मोठया आतडयाचा भरीव घट्ट-पणा जाणवतो.

लहान मुलांना बध्दकोष्ठ असेल तर एक सोपा उपाय करा.
एक-दोन चमचे तेलकट किंवा बुळबुळीत पदार्थ (उदा. गोडेतेल) गुदद्वारात भरल्यास आतले मळाचे खडे 10-15 मिनिटांत बाहेर पडतात व दुखत नाही. यासाठी एरंडेल तेल, पॅराफिन (एक प्रकारचे पातळ मेण) किंवा साबणाचे पाणी वापरतात. हे फक्त एक-दोन चमचेच वापरायचे असल्याने हा एनिमा नाही. (एनिमामध्ये पावशेर, अर्धा लिटर साबणाचे पाणी वापरतात.) मुलांना एनिमा देऊ नये.
ग्लिसरीनच्या लांबट गोळया मिळतात. वेष्टन काढून ही गोळी गुदद्वारात सारली की थोडया वेळाने विष्ठा सैल होऊन सरकते.
बध्दकोष्ठाचा त्रास अनेक जणांना होतो. उपायही अनेक आहेत.

होमिओपथी निवड
ब्रायोनिया, सीना, फेरम फॉस, लायकोपोडियम, मर्क्युरी सॉल, नेट्रम मूर, नक्स व्होमिका, पल्सेटिला, सिलिशिया