न्यायवैद्यक

The web page is being updating

मृत्यू : कारणे, चौकशी, तपासणी 

मृत्यू : जीवशास्त्रीय प्रक्रिया

वैद्यकीय शास्त्रानुसार मृत्यू म्हणजे हृदयक्रिया, श्वसनक्रिया व मेंदूचे कामकाज या तीन क्रिया बंद पडणे. यांपैकी एखादी आधी तर इतर दोन क्रिया लगेच नंतर बंद पडतात. हृदयक्रिया व श्वसनक्रिया या फार परस्परावलंबी असतात. त्यामुळे एक बंद झाली की लगोलग दुसरीही बंद पडते. यानंतर दोन-तीन मिनिटांत मेंदूही निष्क्रिय होतो. इथेच जीवन संपते.

हृदयक्रिया तपासण्याचे सर्वात सोपे तंत्र म्हणजे नाडी तपासणे. अशा वेळी नाडी मनगटाऐवजी गळयामध्ये तपासावी म्हणजे निश्चित कळते. छातीवर हृदयाच्या जागी हात ठेवूनही धडधड कळू शकते. Stethoscope /आवाजनळी असल्यास जास्त सोपे जाते.

छातीची हालचाल एक-दोन मिनिटे पाहिल्यावर श्वसन चालू आहे की नाही हे कळते. पूर्वी नाकाशी सूत धरायची पध्दत होती (सुताची हवेच्या आतबाहेर येण्यामुळे हालचाल होते, श्वसन थांबल्यावर सूत हालायचे थांबते). आवाजनळीनेही श्वसनाचे आवाज तपासता येतात.
मेंदू मृत झाल्याची सर्वात महत्त्वाची खूण म्हणजे दोन्ही डोळयांच्या बाहुल्या मोठया होणे (विस्फारणे) . टॉर्चचा प्रकाश टाकूनही या बाहुल्या नेहमीप्रमाणे लहान होत नाहीत. मृत्यूची ही अंतिम खूण आहे.

या तीन महत्त्वाच्या घटनांपाठोपाठ नंतर हळूहळू इतर अनेक गोष्टी घडतात. स्नायू शिथिल होणे/ निर्जीव होणे, तपमान थंडावत जाणे, शरीर कडक होणे-ताठरणे इ.पण या सर्व मृत्यूनिदानाच्या दृष्टीने फारच उशिरा घडतात.

सहानुभूतीने वागणे आवश्यक

वैद्यकीय दृष्टीने मृत्यू हा केवळ एका शरीराचा शेवट; पण मृत्यूला सामोरी जाणारी व्यक्ती, नातेवाईक, मित्र या सर्वांच्या दृष्टीने तो एका जीवनाचा शेवट असतो. मृत्यूभोवती मानवता, धर्म व संस्कृती यांची गुंफण आहे. सहानुभूतीने वागणे हे सगळयात महत्त्वाचे आहे. केवळ रुग्णाच्या दृष्टीने नाही तर आपले मन मोठे व्हावे म्हणूनही सहानुभूती महत्त्वाची असते.

वैद्यकीय प्रगती झाल्यामुळे मृत्यू लांबवणे शक्य झाल्याने बहुतेक वेळा काही ना काही उपचार केले जातातच. रुग्णवाहिका सेवा आता सर्वत्र उपलब्ध आहे. मृत्यू झालेला आहे की नाही ते कसे ठरवायचे हे पुढे दिले आहे.

मृत्यू अद्याप झालेला नसला तर रुग्णाचे प्राण वाचवण्याचे प्रथमोपचार करायला पाहिजेत. मात्र रुग्णालयात न्यायची व्यवस्था बरोबरीने करावी लागेल.  डॉक्टरांना बोलवायची पध्दत असली तरी बहुधा घरी त्यांना फारसे उपचार करता येत नाहीत. त्यापेक्षा रुग्णालयात हलवलेले चांगले. याबद्दल जे शक्य आणि लवकर होईल ते करावे. वैद्यकीय दृष्टया मृत्यू अटळ असेल तर त्या माणसाला सुखाने जाऊ देणे हे योग्य आहे, त्यासाठी उपलब्ध डॉक्टरांचे सहाय्य घ्यावे. 

मृत्यूची चिन्हे

सामान्य लोक बहुधा श्वासोच्छ्वास थांबणे, हालचाल न होणे, आवाज दिल्यावर किंवा हलविल्यावर प्रतिसाद न देणे आणि वेदना दिल्यावरही कोणतीही प्रतिक्रिया न होणे यावरून मृत्यूचा अंदाज घेतात. छातीची हालचाल दिसत नाही आणि नाडी जाणवत नाही. डोळे स्थिर राहतात व त्वचा थंड व फिकट पडू लागते.

आरोग्य कर्मचारी मृत्यूची अधिक शास्त्रीय चिन्हे तपासतात. यात हृदयाचे ठोके पूर्णपणे बंद होणे, रक्तदाब न मिळणे, श्वासोच्छ्वास नसणे, pupils स्थिर व प्रकाशास प्रतिसाद न देणे, तसेच जोरदार चिमटा घेऊन प्रतिक्रिया न मिळणे यांचा समावेश होतो.

रुग्णाची चेतना मोजण्यासाठी Glasgow Coma Scale (GCS) वापरली जाते. डोळे उघडणे, बोलणे आणि हालचाल यांचे मूल्यमापन करून गुण दिले जातात. GCS स्कोअर 3/15 असणे हे अत्यंत गंभीर स्थितीचे लक्षण मानले जाते. ECG/ कार्डियोग्राम वर वरखाली ऐवजी आडवी रेषा दिसणे हेही महत्त्वाचे चिन्ह आहे.

काही वेळानंतर शवातील वैशिष्ट्यपूर्ण बदल दिसू लागतात. यामध्ये postmortem lividity (रक्त साचल्याने त्वचेवर जांभळट डाग), rigor mortis (स्नायू कडक होणे), शरीराचे तापमान कमी होणे आणि decomposition म्हणजे विघटन यांचा समावेश होतो.

मृत्यू निश्चित करण्यासाठी प्रशिक्षित वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणन आवश्यक असते. विशेषतः बेशुद्धावस्था, अति-शीत वातावरण, विषबाधा किंवा औषधांच्या परिणामामुळे मृत्यूसारखी स्थिती निर्माण होऊ शकते, त्यामुळे काळजीपूर्वक तपासणी करणे महत्त्वाचे असते.

मृत्यूची चिन्हे-कालावधीनुसार
प्रकारमृत्यूची चिन्हेसाधारण वेळ
तात्काळ चिन्हे (Immediate Signs of Death)श्वासोच्छ्वास बंद होणे, हृदयाचे ठोके व नाडी न मिळणे, रक्तदाब नसणे, चेतना पूर्णपणे नाहीशी होणे, जोरदार चिमटा दिल्यावर  त्याला प्रतिसाद न मिळणे, डोळ्यातील बाहुलीचा आकार  स्थिर व प्रकाशास प्रतिसाद नसणे, Glasgow Coma Scale 3/15 असणेमृत्यूनंतर लगेच ते काही मिनिटांत
लवकर दिसणारी चिन्हे (Early Signs of Death)शरीर थंड होणे (Algor mortis), शरीराच्या जमिनीवर टेकलेल्या भागाकडे रक्त साचल्याने तिथे त्वचेवर जांभळट डाग दिसणे (Postmortem lividity / Livor mortis), स्नायू कडक होणे (Rigor mortis), डोळ्यांचा कोरडेपणा, corneal opacityसाधारण अर्ध्या तासानंतर ते २४ तासांच्या आत
उशिराने दिसणारी चिन्हे (Late Signs of Death)शरीराचे विघटन (Decomposition / Putrefaction), हिरवट रंग बदल, दुर्गंधी, त्वचेवर फोड येणे, त्वचा निघणे, वायू तयार होऊन शरीर फुगणे, कीटकांची वाढ (maggots), सांगाडा तयार होणे (Skeletonization), adipocere किंवा mummification सारखे बदलसाधारण २४ तासांनंतर ते अनेक दिवस, आठवडे किंवा महिने
मृत्यूचे तीन प्रमुख कारण-प्रकार

मृत्यूचे तीन प्रमुख प्रकार किंवा modes of death पुढीलप्रमाणे वर्णन केले जातात :

  • कोमा (Coma)-मेंदूघात  – मेंदूच्या कार्यात गंभीर बिघाड झाल्यामुळे व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत जाते. रुग्णाला आवाज, स्पर्श किंवा वेदनांना प्रतिसाद मिळत नाही. डोक्याला इजा, मेंदूतील रक्तस्राव, विषबाधा, मधुमेही कोमा किंवा संसर्ग यांमुळे कोमा येऊ शकतो. श्वासोच्छ्वास व हृदयक्रिया काही काळ सुरू राहू शकतात, परंतु मेंदूचे कार्य अत्यंत कमी होते.  पुढे मेंदू मृत होतो.
  • हृदयाघात  सिंकोपी (Syncope) हृदयक्रिया अचानक बंद पडल्यामुळे किंवा रक्ताभिसरण अचानक थांबल्यामुळे होणारा मृत्यू. यात मेंदूकडे रक्तपुरवठा थांबतो आणि व्यक्ती अचानक कोसळते. हृदयविकाराचा झटका, तीव्र रक्तस्राव, विजेचा धक्का किंवा भीतीमुळे ही अवस्था निर्माण होऊ शकते. 
  • ॲस्फिक्सिया (Asphyxia) गुदमरणे  – शरीराला पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्यामुळे होणारा मृत्यू. गळफास, बुडणे, गुदमरून जाणे, श्वासनलिकेत अडथळा किंवा विषारी वायू यांमुळे अॅस्फिक्सिया होऊ शकतो. यात श्वास घेण्यास त्रास, निळसरपणा (cyanosis) आणि शेवटी श्वसन बंद होणे दिसते. 

हे तीन मृत्यू-मार्ग न्यायवैद्यकीय तपासणीमध्ये मृत्यूची कारणे आणि परिस्थिती समजून घेण्यासाठी महत्त्वाचे मानले जातात.

अचानक मृत्यू

अचानक मृत्यू (Sudden Death) म्हणजे पूर्वी तुलनेने निरोगी दिसणाऱ्या व्यक्तीचा अल्प कालावधीत अनपेक्षितपणे होणारा मृत्यू. याची कारणे नैसर्गिक आणि अनैसर्गिक अशा दोन गटांत असतात.

१. हृदयविकाराची कारणे :
सर्वात सामान्य कारण म्हणजे हृदयविकार-झटका,  cardiac arrest आणि हृदयाचे इतर गंभीर आजार  यांमुळे अचानक मृत्यू होऊ शकतो. अतीव वेदना झाल्याने हृदय थांबू शकते.

२. मेंदू व चेतासंस्थेची कारणे :
मेंदूतील रक्तस्राव, फेफरे, किंवा रक्तवहिनीचा-फुगार (aneurysm) फुटणे यांमुळे अचानक मृत्यू होऊ शकतो.

३. श्वसनसंस्थेची कारणे :
अस्थमा/दमा अटॅक, न्यूमोनिया, श्वासनलिकेत अडथळा (बी/वस्तु, खाकरा-बेडका, उलटी इत्यादि श्वासमार्गात अडकणे ) किंवा गुदमरल्याने मृत्यू होऊ शकतो. हत्या-खून यात गळा दाबणे/आवळणे, डोक्याभोवती प्लॅस्टिक पिशवी घालणे, बुडणे आदि कारणे घडू शकतात.  

४. पचनसंस्था व इतर नैसर्गिक कारणे :
Acute pancreatitis, जठरातील अल्सर फुटणे, तीव्र रक्तस्राव, रक्तातील साखर अचानक 70 mg  पेक्षा खाली जाणे, केटो-असिडोसीस यांमुळेही अचानक मृत्यू संभवतो. 

इतर कारणामध्ये एलेक्ट्रिक शॉक, उष्माघात, वृद्धत्व, खूप थंड-गोठवणारे तपमान इत्यादि करणे असू शकतात.  

अनैसर्गिक मृत्यू

भारतातील एकूण मृत्यूंपैकी सुमारे 10.3% मृत्यू हे अनैसर्गिक कारणांमुळे  होतात, असा एक अंदाज आहे.  आत्महत्या, अपघाती मृत्यू, रस्ता अपघात मृत्यू, खून/हत्या हे यात येतात.  

स्त्रियांमध्ये जळून, बुडून, विष खाऊन मरणा-या स्त्रियांचे प्रमाण खूप आहे. मात्र प्रत्येकवेळी हा खून आहे की आत्महत्या की अपघात असा प्रश्न नेहमीच पडतो. यामुळे संबंधित नातेवाईकांना यातना सहन कराव्या लागतात. बुडणे, जळणे, विष खाणे या तीन्ही बाबतींत प्रत्यक्ष वैद्यकीय तपासणीत (पोस्टमॉर्टेम) अपघात, खून की आत्महत्या हे कळायला फारसा मार्ग नसतो. इतर पुराव्यानेच (उदा. प्रत्यक्ष साक्षीदार) हे सिध्द करावे लागते. मृत्यू कशाने आला एवढेच काय ते वैद्यकीय तपासणीत कळू शकते. मात्र मारहाणीच्या खुणा दिसत असल्यास खुनाचा संशय येणे साहजिक आहे. नवविवाहित (विवाहानंतर सात वर्षापर्यंत) स्त्रियांच्या मृत्यूची प्रत्येक घटना खून म्हणून तपासावी अशी कायद्यात तरतूद आहे. शासनाने नोंद केलेल्या स्त्रीसंघटनाही चौकशीत मदत करू शकतात.

एखादा रुग्ण रुग्णालयात दाखल केल्यावर 24 तासाच्या आत मृत्यू पावल्यास व कारण स्पष्ट नसल्यास मृत्यू संशयास्पद धरावा लागतो.

गळफास देखील खून, आत्महत्या या दोन्ही प्रकारांत असतो. दोरीचे वळ गळयाच्या घाटीच्या खाली आणि आडवे असल्यास तो बहुधा खून असतो. लोंबकळून गळफास घेतला/दिला असेल तर दोराचे वळ वर & तिरपे दिसतात, गाठीची खूण एक बाजूला दिसते. कोणताही माणूस स्वतःचे नाक, तोंड दाबून आत्महत्या करणे शक्य नसते, म्हणून गुदमरून मृत्यू आल्याचे सिध्द झाले आणि दोरीचे, कपडयाचे वळ नसतील तर खुनाची शक्यता जास्त असते. काठया, कु-हाडी वगैरे वस्तूंनी मारहाण झाली असल्यास खून सिध्द करणे त्या मानाने सरळ असते.

पोलीस पंचनामा (Police Inquest) आणि दंडाधिकारी पंचनामा (Magisterial Inquest)

अकस्मात, संशयास्पद किंवा हिंसक मृत्यू झाल्यास मृत्यूचे कारण शोधण्यासाठी कायद्याने पंचनामा केला जातो. भारतात मुख्यतः दोन प्रकारचे पंचनामे प्रचलित आहेत – पोलीस पंचनामा आणि दंडाधिकारी पंचनामा.

  • पोलीस पंचनामा हा फौजदारी प्रक्रिया संहिता भार. न्याय. संहिता कलम 194 अंतर्गत पोलीस अधिकारी करतात. यात मृतदेहाची पाहणी, जखमा, घटनास्थळ, साक्षीदारांचे जबाब आणि मृत्यूची परिस्थिती यांची नोंद केली जाते. पंचांच्या उपस्थितीत हा अहवाल तयार केला जातो. संशयास्पद मृत्यू, आत्महत्या, अपघात किंवा खून यांसारख्या घटनांमध्ये हा पंचनामा आवश्यक असतो.
  • दंडाधिकारी (मॅजिस्ट्रेट) पंचनामा हा भारतीय न्याय. संहिता कलम 196 अंतर्गत कार्यकारी दंडाधिकारी किंवा न्यायिक दंडाधिकारी करतात. विशेषतः पोलीस कोठडीत मृत्यू, तुरुंगातील मृत्यू, विवाहित स्त्रीचा विवाहानंतर सात वर्षांच्या आत संशयास्पद मृत्यू किंवा सार्वजनिक महत्त्वाच्या घटनांमध्ये हा पंचनामा केला जातो. यात अधिक सखोल चौकशी केली जाते आणि निष्पक्ष तपासावर भर दिला जातो.
हत्या आणि आत्महत्या 

हत्या म्हणजे एका मनुष्याने दुसऱ्या मनुष्याचा मृत्यू घडवून आणणे होय. न्यायवैद्यक आणि कायद्याच्या दृष्टीने हा शब्द मृत्यूच्या प्रकाराचे वर्णन करतो.

भारतीय न्याय संहिता (BNS) मध्ये हत्या संबंधी महत्त्वाची कलमे नमूद केली आहेत. यातच Culpable Homicide’ ची (सदोष मनुष्यवध) व्याख्या आणि  Murder’ म्हणजे खून विशद केले आहेत. BNS 103  कलम यानुसार  खुनासाठी मृत्युदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. BNS 105 हे हत्या/खून न ठरणाऱ्या culpable homicide (सदोष मनुष्यवध) साठी लागू होते.

गुन्हेगारी हत्येमध्ये खून आणि सदोष मनुष्यवध यांचा समावेश होतो. खूनामध्ये मृत्यू घडवण्याचा स्पष्ट हेतू किंवा गंभीर इजा करण्याचा उद्देश असतो. भांडण, सूड, मालमत्तेचा वाद, कौटुंबिक हिंसा किंवा लैंगिक गुन्हे ही त्याची सामान्य कारणे असू शकतात.

न्यायवैद्यकीय तपासणीमध्ये जखमांचे स्वरूप, शस्त्राचा प्रकार, रक्ताचे डाग, घटनास्थळ, मृत्यूची वेळ आणि शवचिकित्सा यांचा अभ्यास करून हत्या आहे की नाही हे ठरवले जाते. धारदार शस्त्राच्या जखमा, गोळीबार, गळा दाबणे, विषबाधा किंवा मारहाण ही सामान्य उदाहरणे आहेत.

काही प्रसंगी स्वसंरक्षणासाठी केलेली हत्या किंवा कायदेशीर कारवाईदरम्यान (फाशीची शिक्षा) झालेला मृत्यू न्याय्य हत्या मानला जाऊ शकतो. न्यायालय अंतिम निर्णय घेत असले तरी वैज्ञानिक पुरावे आणि मेडिकोलीगल अहवाल यांना अत्यंत महत्त्व असते. मृत्युदंड काही देशात बन्द झाला असला तरी भारतात चालू आहे.

आत्महत्या (Suicide / आत्महत्या) म्हणजे एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या कृतीने जाणीवपूर्वक स्वतःचा मृत्यू घडवून आणणे होय. ही वैद्यकीय, सामाजिक, मानसिक आणि कायदेशीर दृष्ट्या गंभीर बाब मानली जाते. नैराश्य (depression), मानसिक आजार, व्यसनाधीनता, कौटुंबिक तणाव, आर्थिक अडचणी,  शेतीत-कर्जबाजारी होणे, दीर्घकालीन आजार, परीक्षेचा ताण किंवा सामाजिक अपमान ही आत्महत्येची सामान्य कारणे असू शकतात. आत्महत्येच्या सामान्य पद्धतींमध्ये गळफास, विषप्राशन, औषधांचे overdose, जाळून घेणे, उंचावरून उडी मारणे, बुडणे किंवा शस्त्रांचा वापर यांचा समावेश होतो. अनेक व्यक्तींमध्ये आत्महत्येपूर्वी निराशा, एकटेपणा, ‘जगण्याचा कंटाळा आला’ अशी विधाने, सामाजिक संपर्क कमी होणे किंवा आत्महत्येचा प्रयत्न यांसारखी चेतावणी चिन्हे दिसू शकतात.

भारतीय न्यायव्यवस्थेत आत्महत्येस प्रवृत्त करणे हा गुन्हा आहे. भारतीय न्याय संहिता कलम 108  नुसार आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या व्यक्तीस शिक्षा होऊ शकते. IPC कलम 309 मध्ये आत्महत्येचा प्रयत्न नमूद होता; तथापि मानसिक आरोग्य कायद्यांनुसार अशा व्यक्तींना शिक्षा करण्याऐवजी उपचार व समुपदेशनाला अधिक महत्त्व दिले जाते.

न्यायवैद्यकीय दृष्टिकोनातून घटनास्थळ तपासणी, चिठी लिहिली असल्यास, जखमांचे स्वरूप, विषतपासणी आणि शवचिकित्सा महत्त्वाची असते. आत्महत्या रोखण्यासाठी मानसिक आरोग्य सेवा, कुटुंबाचा आधार, तणाव व्यवस्थापन आणि योग्य वेळी वैद्यकीय मदत अत्यंत आवश्यक आहे.

मृत्युपूर्व जबाब (Dying Declaration) आणि मृत्युपूर्व निवेदन (Dying Deposition)

मृत्यू होण्यापूर्वी व्यक्तीने आपल्या मृत्यूचे कारण किंवा त्यास कारणीभूत परिस्थितींबाबत दिलेले विधान ‘मृत्युपूर्व जबाब’ (Dying Declaration) म्हणून ओळखले जाते. भारतीय पुरावा अधिनियम कलम 32 नुसार अशा विधानाला न्यायालयात विशेष महत्त्व दिले जाते. हा जबाब मौखिक, लिखित किंवा संकेतांद्वारेही असू शकतो. शक्यतो दंडाधिकाऱ्याने तो नोंदवावा; परंतु तातडीच्या परिस्थितीत डॉक्टर किंवा इतर व्यक्तीही तो नोंदवू शकतात. जबाब देताना संबंधित व्यक्ती शुद्धीवर व मानसिकदृष्ट्या सक्षम असल्याची डॉक्टरांनी खात्री करणे आवश्यक असते.

‘मृत्युपूर्व निवेदन’ (Dying Deposition) हे न्यायाधीश किंवा दंडाधिकाऱ्यासमोर आरोपीच्या उपस्थितीत शपथेवर नोंदवलेले निवेदन असते. यात आरोपीच्या वकिलाला उलटतपासणी (Cross-examination) करण्याचा अधिकार असतो. ही प्रक्रिया अधिक औपचारिक व कायदेशीरदृष्ट्या मजबूत मानली जाते.

मृत्युपूर्व जबाब आणि मृत्युपूर्व निवेदन या दोन्हींचा उद्देश मृत्यूशी संबंधित सत्य परिस्थिती न्यायालयासमोर मांडणे हा आहे. तथापि, मृत्युपूर्व निवेदनाला अधिक पुराव्याचे मूल्य असते कारण ते न्यायालयीन प्रक्रियेनुसार नोंदवले जाते.

मृत्यू प्रमाणपत्र

मृत्यू प्रमाणपत्र हा डॉक्टरांकडून मिळणारा एक महत्त्वाचे वैद्यकीय व कायदेशीर दस्तऐवज आहे. यात मृत व्यक्तीच्या मृत्यूबाबत वस्तुनिष्ठ  माहिती नोंदवली जाणे अपेक्षित आहे. हे प्रमाणपत्र वारसा, विमा, सरकारी नोंदी आणि कायदेशीर प्रक्रियेसाठी आवश्यक असते.

मृत्यू प्रमाणपत्रातील महत्त्वाचे घटक पुढीलप्रमाणे आहेत :

  • मृत व्यक्तीचे पूर्ण नाव, वय, लिंग आणि पत्ता.
  • मृत्यूची तारीख, वेळ आणि ठिकाण.
  • मृत्यूचे तात्काळ कारण (Immediate cause of death).
  • मृत्यूस कारणीभूत असलेला मूळ आजार किंवा परिस्थिती (Underlying cause).
  • इतर सहवर्ती आजार किंवा स्थितींचा उल्लेख.
  • मृत्यू नैसर्गिक, अपघाती, आत्महत्या, हत्या किंवा संशयास्पद आहे का याची नोंद.
  • डॉक्टरांनी रुग्णाला किती काळ उपचार दिले याची माहिती.
  • मृत्यूची खात्री करणाऱ्या डॉक्टरांचे नाव, नोंदणी क्रमांक, स्वाक्षरी व तारीख.
  • आवश्यक असल्यास पोस्टमार्टेम किंवा पोलिसांना कळविण्याची नोंद.

मृत्यू प्रमाणपत्र देताना डॉक्टरांनी सत्य, अचूक व स्पष्ट माहिती लिहिणे अत्यंत आवश्यक असते. चुकीची किंवा अपूर्ण माहिती कायदेशीर अडचणी निर्माण करू शकते.

डॉक्टरांनी मृत्यूचे कारण शक्य तितके अचूक व वैज्ञानिक पद्धतीने लिहावे. ‘हृदय बंद पडणे’ किंवा ‘श्वास बंद होणे’ यांसारखी अस्पष्ट कारणे टाळावीत.

जर मृत्यू संशयास्पद, अपघाती, आत्महत्या, विषबाधा किंवा हिंसाचाराशी संबंधित असेल तर डॉक्टरांनी पोलिसांना माहिती देऊन मेडिको-लीगल केस म्हणून नोंद करावी. अशा परिस्थितीत पोस्टमार्टेम आवश्यक ठरू शकतो.

योग्य मृत्यू प्रमाणनामुळे आरोग्यविषयक आकडेवारी अचूक मिळते, रोगांचे प्रमाण समजते आणि सार्वजनिक आरोग्य नियोजनास मदत होते.