संप्रेरक संस्था / हारमोन्स

आयोडीन कमतरता

गलग्रंथीतून थॉयरॉक्झिन संप्रेरके निर्माण होण्यासाठी आयोडीन लागते. आयोडीन हे द्रव्य समुद्राच्या पाण्यात, समुद्री अन्नात (मासे, वनस्पती) व भूगर्भातल्या पाण्यात (थोडे प्रमाण) आढळते. डोंगरी भागात व समुद्रापासून जास्त आत असलेल्या भू भागात आयोडीनचे प्रमाण फारच कमी असते. आयोडीनची कमतरता असलेल्या अशा प्रदेशातील लोकांना गलगंड (गलग्रंथीची वाढ) होतात. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात आयोडीन कमतरता आढळते.

गलगंड असलेल्या मातांना होणारी मुले बौध्दिक व शारीरिक वाढीत कमी पडतात हे एक कायमचे नुकसान असते. अशा बाळांमध्ये चेहरा सुजलेला, निस्तेजपणा, जाड, मोठी जीभ, पोट मोठे, बेंबीजवळ फुगवटा,(हार्निया, अंतर्गळ), कोरडी त्वचा, इत्यादी खाणाखुणा दिसतात. बाळाच्या वाढीचे/ विकासाचे टप्पे लांबणे, खाणेपिणे कमी असणे, मलावरोध, रडण्याचा वेगळाच आवाज ह्या महत्त्वाच्या खुणा आहेत. वेळीच ओळखून तज्ज्ञाकडे पाठवणे फार महत्त्वाचे असते. योग्य वेळी उपचार झाला तर निदान पुढचे नुकसान टळू शकते.

गलगंडग्रस्त प्रदेशांत मुलांमध्ये अशा प्रकारचे आजार मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. यासाठी त्या प्रदेशात अशा आजारांची शक्यता मनामध्ये बाळगूनच मुलांकडे पाहिले पाहिजे. अन्यथा सहजपणे हे निदान होणार नाही

आयोडीन कमतरता: गर्भावरचे परिणाम

आयोडीनच्या अभावामुळे गर्भावस्थेत दुष्परिणाम होऊन गर्भपात, अपु-या दिवसांचे बाळंतपण, उपजत मृत्यू, इ. धोके होऊ शकतात. यातून वाचलेल्या गर्भावर गर्भावस्थेतच अनिष्ट परिणाम होऊन मेंदूची अपुरी वाढ किंवा थॉयरॉईड कमतरतेचे अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत आयोडीन कमतरता झाली तर बहुधा मेंदूवर परिणाम होतो. यातून मूक बधिरता, मतिमंदत्व, नीट चालता न येणे, हातापायांची अचल-ताठरता (स्पास्टिक), इ. लक्षणे दिसतात. गरोदरपणाच्या दुस-या तिमाहीत आयोडीन कमतरता झाली तर शारीरिक वाढ खुंटणे, जननसंस्थेचा विकास अपुरा होणे, सूज, मतिमंदत्व, इ. लक्षणे दिसतात. दोन्ही प्रकार आयोडीनच्या कमतरतेमुळेच होतात. हे विकार आयोडीन पुरवठयामुळे टळू शकतात.

आयोडीनयुक्त मीठ पुरवठा

भारतातील बहुतेक प्रांतात आयोडीनयुक्त मीठ पुरवणे हे सक्तीचे आहे. महाराष्ट्रात ही व्यवस्था अंशतः होती. हे पुस्तक लिहीत असताना महाराष्ट्रात इतर साध्या मिठास बंदी घातलेली आहे. काही जणांच्या मते शास्त्रीयदृष्टया व व्यावहारिकदृष्टया साधे मीठ चालू ठेवणे आवश्यक आहे. केरळ व गोवा हे सागरी प्रदेश आयोडीनयुक्त मिठाची इतकी गरज नसल्याने या कायद्यातून मुक्त आहेत.

अन्न शिजवताना मीठ टाकले तर त्या मिठातून 30-70% आयोडीन नष्ट होते. म्हणून मीठ आहारात नंतर मिसळणे एक प्रकारे चांगले ठरते. हल्ली दुकानात मिळणारे पॅकबंद मीठ आयोडीनयुक्त असते. इतर सुटे मीठ आयोडीनयुक्त नसते. सुटया मिठातून आयोडीन महिन्याभरात उडून जाते. दुकानातून आयोडीनयुक्त मीठ आणले तरी घरी काही काळजी घ्यावी लागते. एकतर ते सुटे करून न ठेवता बंद डब्यात किंवा झाकलेले असावे. मातीच्या मडक्यात हे मीठ ठेवल्यास त्यातले आयोडीन खूप कमी होते, म्हणून मिठासाठी मडके वापरू नये.

पराथायरॉईड ग्रंथी आणि तिची भूमिका

पराथायरॉईड ग्रंथी (Parathyroid Glands) या थायरॉईड ग्रंथीच्या मागील बाजूस असलेल्या चार लहान अंतःस्रावी ग्रंथी आहेत. आकाराने त्या तांदळाच्या दाण्याएवढ्या असल्या तरी शरीरातील कॅल्शियम आणि फॉस्फेटचे संतुलन राखण्यात त्यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका असते.

या ग्रंथी पराथायरॉईड हार्मोन (PTH) तयार करतात. रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण कमी झाल्यास PTH चे स्रवण वाढते. हा हार्मोन तीन प्रमुख अवयवांवर कार्य करतो:

  • हाडे: हाडांमधून कॅल्शियम रक्तात सोडण्यास मदत करतो. 
  • मूत्रपिंडे: कॅल्शियमचे मूत्रातून होणारे उत्सर्जन कमी करतो आणि फॉस्फेटचे उत्सर्जन वाढवतो. 
  • आतडे: व्हिटॅमिन D सक्रिय करून अन्नातील कॅल्शियमचे शोषण वाढवतो. 

यामुळे रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण सामान्य राहते. कॅल्शियम हे स्नायूंचे आकुंचन, मज्जातंतूंचे कार्य, हृदयाचे ठोके आणि रक्त गोठण्याची प्रक्रिया यांसाठी आवश्यक असते.

पराथायरॉईड विकार

हायपरपॅराथायरॉईडिझम (Hyperparathyroidism) मध्ये PTH जास्त प्रमाणात तयार होतो. यामुळे रक्तातील कॅल्शियम वाढतो. हाडे कमकुवत होणे, मूत्रपिंडातील खडे, पोटदुखी, बद्धकोष्ठता, थकवा आणि मानसिक गोंधळ अशी लक्षणे दिसू शकतात.

हायपोपॅराथायरॉईडिझम (Hypoparathyroidism) मध्ये PTH कमी तयार होतो. त्यामुळे रक्तातील कॅल्शियम कमी होतो. हातपायांत मुंग्या येणे, स्नायूंचे आकडीसारखे आकुंचन (Tetany), झटके आणि हृदयाच्या ठोक्यांमध्ये बिघाड होऊ शकतो.