हृदय व रक्ताभिसरण संस्था

हृदय-आजारांसाठी विशेष तपासण्या

इलेक्ट्रोकार्डिओग्राफी

इलेक्ट्रोकार्डिओग्राफी (ECG) ही हृदयाच्या विद्युत क्रियांची नोंद करणारी सोपी व जलद तपासणी आहे. या तपासणीमध्ये छाती, हात व पायांवर इलेक्ट्रोड लावून हृदयाच्या ठोक्यांचा वेग, लय आणि प्रवाह पाहिला जातो. ECG द्वारे हृदयविकाराचा झटका (heart attack), अनियमित ठोके (arrhythmia), conduction defects आणि इलेक्ट्रोलाइट असंतुलन यांचे निदान करता येते. ST-segment बदल, T-wave बदल आणि Q-wave यामुळे महत्त्वाची माहिती मिळते. ही तपासणी वेदनारहित, स्वस्त आणि सर्वत्र उपलब्ध असल्यामुळे प्राथमिक स्तरावर हृदयविकार ओळखण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते.

स्ट्रेस टेस्ट (Stress Test)

स्ट्रेस टेस्ट (Stress Test) ही हृदयाच्या कार्यक्षमता व रक्तपुरवठ्याचे मूल्यांकन करण्यासाठी केली जाणारी महत्त्वाची तपासणी आहे. या चाचणीत रुग्णाला ट्रेडमिलवर चालायला किंवा धावायला लावले जाते, ज्यामुळे हृदयावर ताण (stress) येतो आणि त्या वेळी हृदयाची प्रतिक्रिया तपासली जाते. ही तपासणी प्रामुख्याने कोरोनरी धमनी रोग ओळखण्यासाठी उपयोगी ठरते.

स्ट्रेस टेस्ट दरम्यान ईसीजी (ECG), रक्तदाब आणि हृदयाचे ठोके सतत नोंदवले जातात. जर व्यायाम करताना छातीत दुखणे, श्वास लागणे, चक्कर येणे किंवा ईसीजीमध्ये बदल दिसले, तर हृदयाला पुरेसा रक्तपुरवठा होत नसल्याचे संकेत मिळू शकतात. काही रुग्णांना व्यायाम शक्य नसल्यास औषधांच्या मदतीने “फार्माकोलॉजिकल स्ट्रेस टेस्ट” केली जाते.

ही चाचणी सुरक्षित असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली केली जाते. तपासणीपूर्वी हलका आहार घ्यावा, सैल कपडे परिधान करावेत आणि काही औषधांबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. स्ट्रेस टेस्टमुळे हृदयविकाराचे लवकर निदान होऊन योग्य उपचार नियोजन करता येते.

छातीचा एक्स-रे (Chest X-ray)

हा कार्डिओलॉजीमध्ये एक प्राथमिक आणि उपयुक्त तपास आहे. यामुळे हृदयाचा आकार (cardiomegaly), फुफ्फुसातील द्रव साठा (pulmonary edema) आणि रक्ताभिसरणातील बदल ओळखता येतात.

हृदय अपयश (heart failure) मध्ये फुफ्फुसात सूज, Kerley B lines आणि pleural effusion दिसू शकतात. तसेच काही जन्मजात हृदयविकारांमध्ये हृदयाची विशिष्ट आकारातील बदल (cardiac silhouette) दिसतात.

ही तपासणी स्वस्त, जलद आणि सर्वत्र उपलब्ध असल्यामुळे प्राथमिक निदानासाठी उपयुक्त ठरते. तथापि, अचूक निदानासाठी ECG व इकोकार्डिओग्राफीसोबत तिचा उपयोग केला जातो.

हृदयासाठी बायो-मार्कर्स

हृदयविकार झटक्यासाठी साठी महत्त्वाचे मार्कर्स म्हणजे Troponin I/T, CK-MB आणि Myoglobin. यापैकी Troponin हा सर्वात संवेदनशील व विशिष्ट मार्कर असून हृदयविकाराचा झटका (myocardial infarction) ओळखण्यासाठी उपयोगी आहे. (सामान्यपणे ट्रॉपोनिन 14 पेक्षा कमी पातळीवर असते,) या तपासण्यांमुळे आजाराचे लवकर निदान, तीव्रता व उपचाराचा परिणाम समजण्यास मदत होते. त्यामुळे ECG आणि इकोसोबत याचे महत्त्व खूप आहे.

सीटी अँजिओग्राफी (CT Angiography)

ही हृदय व रक्तवाहिन्यांची सविस्तर तपासणी करणारी आधुनिक इमेजिंग पद्धत आहे. यात कॉन्ट्रास्ट डाई देऊन सीटी स्कॅनद्वारे रक्तवाहिन्यांचे स्पष्ट चित्र मिळते. ही तपासणी विशेषतः कोरोनरी आर्टरीतील ब्लॉकेज (coronary artery disease), अ‍ॅन्युरिझम आणि रक्तवाहिन्यांच्या अरुंदतेचे निदान करण्यासाठी उपयोगी आहे. सीटी अँजिओग्राफी नॉन-इनवेसिव्ह, जलद आणि अचूक असल्यामुळे अनेक वेळा पारंपरिक अँजिओग्राफीपूर्वी केली जाते. त्यामुळे योग्य निदान व उपचार नियोजनासाठी ती अत्यंत महत्त्वाची ठरते.

इकोकार्डिओग्राफी (Echocardiography)

इकोकार्डिओग्राफी (Echocardiography) ही हृदयाच्या तपासणीची एक सुरक्षित, वेदनारहित आणि महत्त्वाची पद्धत आहे. या तपासणीमध्ये ध्वनीतरंगांचा (अल्ट्रासाऊंड) उपयोग करून हृदयाची रचना आणि कार्य पाहिले जाते. एक्स-रेप्रमाणे किरणोत्सर्ग (radiation) नसल्यामुळे ही पद्धत पूर्णपणे सुरक्षित मानली जाते.

इकोकार्डिओग्राफीद्वारे हृदयाच्या कप्प्यांचा आकार, भिंतींची जाडी, झडपांचे (valves) कार्य, रक्तप्रवाह आणि पंपिंग क्षमता (ejection fraction) यांचे अचूक मूल्यांकन करता येते. यामुळे की झडपांचे म्हणजे वाल्वचे आजार, हृदयाची सूज, जन्मजात दोष (congenital defects), तसेच हृदयविकाराचा झटका झाल्यानंतरची स्थिती समजण्यास मदत होते.

हृदयविकार (Heart Failure) निदानासाठी इकोकार्डिओग्राफी अत्यंत महत्त्वाची आहे. विशेषतः खालील निकष (criteria) विचारात घेतले जातात:

  • Ejection Fraction (EF): 40% पेक्षा कमी असल्यास systolic heart failure सूचित होते.
  • Diastolic dysfunction: हृदय सैल होण्याची क्षमता कमी झाल्यास diastolic heart failure संभवते.
  • Left ventricular enlargement: डाव्या कप्प्याचा आकार वाढलेला असणे.
  • Wall motion abnormalities: हृदयाच्या भिंतींच्या हालचालीत बिघाड.
  • Valve abnormalities: झडपांमध्ये गळती (regurgitation) किंवा अरुंदता (stenosis).
  • Increased filling pressures: हृदयातील दाब वाढलेला असणे.

ही तपासणी साधारणतः छातीवर जेल लावून ‘ट्रान्सड्युसर’ नावाच्या उपकरणाने केली जाते, ज्याला ट्रान्सथोरॅसिक इको (TTE) म्हणतात. काही विशेष परिस्थितीत अन्ननलिकेमार्गे (Transesophageal Echo – TEE) अधिक स्पष्ट प्रतिमा मिळवण्यासाठी तपासणी केली जाते.

इकोकार्डिओग्राफी ही जलद, सोपी आणि अत्यंत उपयुक्त तपासणी असून डॉक्टरांना योग्य निदान आणि उपचार ठरविण्यास मोठी मदत करते. त्यामुळे हृदयाच्या आजारांचा संशय असल्यास ही तपासणी वेळेवर करणे आवश्यक आहे.