
हृदयविकाराचा झटका हा शब्दप्रयोग आपण अनेक वेळा ऐकला असेल. हृदयविकार हे नाव फार ढोबळ आहे. कारण ‘विकार’ म्हणजे ‘आजार’. हृदयविकाराचा झटका म्हणजे हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणा-या रक्तवाहिन्यांमधून रक्तप्रवाह कमी किंवा बंद होणे यामुळे संबंधित भागातल्या स्नायूंचे पेशीसमूह मरतात. हे अचानक होत असल्याने त्याला ‘झटका’ असा शब्द पडला आहे. हृदयस्नायूचा जास्त भाग निकामी झाला तर हृदयक्रिया बंद पडून रुग्ण दगावण्याची शक्यता असते.
हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणा-या स्वत:च्या रक्तवाहिन्या (रोहिण्या) असतात. त्यांना इंग्रजीत ‘करोनरी’ म्हणतात. हृदयाच्या स्नायूचे दर मिनिटाला सुमारे 70 वेळा आकुंचन-प्रसरण होत असते. हे काम शरीरातल्या इतर कोठल्याही स्नायूपेक्षा जास्त जोरकसपणे, सातत्याने आणि नियमितपणे करावे लागते. हृदयाच्या स्नायूंना रक्तप्रवाहामार्फत प्राणवायू पुरवण्याचे काम काही क्षण जरी बंद पडले तरी हृदय बंद पडू शकते. त्यामुळे हृदयक्रिया दोन-तीन मिनिटे जरी बंद झाली तरी मेंदूचे कामकाज थांबून मृत्यू ओढवू शकतो.
भारतात हृदयाच्या आजारांमध्ये झडपांच्या दोषाखालोखाल याच आजाराचा क्रम लागतो. सुधारलेल्या देशांत तर हृदयविकाराचा झटका हे मृत्यूचे सर्वात महत्त्वाचे कारण आहे. आपल्या देशातील श्रीमंत समाजातही असेच चित्र दिसते. सर्वसाधारणपणे हा आजार चाळिशी – पन्नाशी- साठी या वयोगटांत जास्त प्रमाणात येतो. स्त्रियांमध्ये याचे प्रमाण कमी आहे. स्थूलता, बैठे काम, अतिरक्तदाब, मधुमेह, तंबाखू व धूम्रपानाचे व्यसन असल्यास हा आजार होण्याची शक्यता जास्त असते.
हृदयाला रक्तपुरवठा करणा-या रक्तवाहिन्यांत चरबीचे थर जमतात. यामुळे रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होतात. रक्तपुरवठा कमी झाला, की थोडया श्रमाने देखील हृदयाला प्राणवायू कमी पडायला लागतो. जेव्हा हृदयाला जास्त कामाची गरज लागते त्या वेळी (उदा. व्यायाम, थंडीचे वातावरण, भीती भावना अनावर होणे, इ.) ही कमतरता जाणवू लागते. प्रत्यक्ष हृदयविकाराचा झटका येण्याच्या आधी बरेच दिवस रक्तवाहिन्यांमधील दोष सुरू झालेले असतात. हृदयाचा रक्त पुरवठा खंडित होण्यामागे कारणे असू शकतात.
रक्तपुरवठा काही सेकंद कमी पडला आणि परत चालू झाला तर हृदयाच्या जागी नुसती वेदना जाणवते. ही वेदना अगदी खोल घुसणारी, प्रचंड दाब असल्यासारखी जाणवते. या वेदनेला आपण हृदयवेदना असे म्हणू या. ही अगदी तीव्र कळ असते. या ‘हृदयवेदनेची’ विशिष्ट जागा, स्वरूप यांवरून ती ओळखता येते. या अवस्थेत रुग्णाला योग्य उपचार व विश्रांती मिळाल्यास पुढचे नुकसान थोडे तरी टळू शकते.
रक्तपुरवठा कमी किंवा बंद अशा अवस्थेत जास्त वेळ गेला तर हृदयाच्या संबंधित स्नायूच्या पेशी मरतात. मग ही वेदना दोन तीन दिवस तशीच राहते.
त्याचबरोबर दम लागणे, घाबरे होणे, छातीत धडधडणे, (किंवा नाडीचे ठोके कमी पडणे), खूप घाम, इत्यादी लक्षणे दिसतात.
जर हृदयाच्या स्नायूंचा मोठा भाग निकामी झाला असेल तर हृदयक्रिया बंद पडून मृत्यूही येऊ शकतो. काही वेळा झोपेत किंवा विश्रांतीतही हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
रक्तपुरवठा बंद पडून मृत झालेल्या स्नायूंचे पाच-सहा आठवडयांत एका वेगळया प्रकारच्या चिवट पेशीमध्ये रुपांतर होते. तो भाग जोडपेशींनी भरून येतो. म्हणजे जखम भरून आल्यावर जो पांढरट सांधणारा भाग दिसतो तसा प्रकार होतो. ह्या भागाची स्नायूंप्रमाणे हालचाल होत नाही, पण हृदयात इतर उरलेल्या स्नायूभागांची वाढ होऊन काम चालू राहते.
एकदा हृदयविकाराचा झटका येऊन गेल्यानंतर तो परत येण्याची शक्यता असते.

पहिल्यांदा हृदयविकाराचा हा त्रास होतो तेव्हा ओळखण्यासाठी हृदयवेदनेची जागा व स्वरूप महत्त्वाचे असते.
1. ECG कार्डिओग्राम – ह्या तपासणीमध्ये रुग्णाच्या दोन हात (मनगटे), दोन पाय (घोटे) व छातीवर इलेक्ट्रोडस् जोडतात. हृदयाच्या क्रिया या हृदयात सौम्य स्वरुपात निर्माण होणा-या विद्युतप्रवाहाने चालतात. या क्रियेचा आलेख म्हणजे ECG. हृदयविकाराचा झटका, हृदयाच्या तालबध्दतेत निर्माण झालेले दोष, हृदयाच्या कप्प्यांमध्ये निर्माण झालेले दोष, इ. माहिती या तपासणीत मिळते.
2. स्ट्रेस टेस्ट – यात रुग्णास इलेक्ट्रोडस् लावून एका फिरणा-या पट्टयावर चालवतात व एकीकडे त्याचा ECG घेत असतात. व्यायामामुळे हृदयावर कामाचा बोजा वाढल्यावर स्थिर अवस्थेत न सापडलेले दोष स्ट्रेस टेस्ट मध्ये सापडतात.
3. स्ट्रेस थॅलियम/परफ्यूजन टेस्ट – यात रेडिओऍक्टिव्ह पदार्थ इंजेक्शनद्वारे रक्तात देतात व हृदयामध्ये त्याचे चलनवलन बघतात.
4. ऍंजियोग्राफी – हृदयविकारामध्ये ही तपासणी करतात. हृदयाच्या रक्तवाहिन्या सक्षमतेने काम करतात की नाही हे यात समजते. रक्तवाहिन्या अरुंद झाल्यास हृदयविकाराचा धोका असतो. त्यामुळे एक किंवा अधिक रक्तवाहिन्या तुंबल्या असतील तर त्यानुसार ऍंजिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरीची जरुरी लागते.
हृदयविकाराच्या झटक्यावरचा उपचार रुग्णालयात, तज्ज्ञ डॉक्टरांकडूनच करावा लागतो. रुग्णालयातही असे रुग्ण दगावण्याचे प्रमाणही बरेच असते.

रुग्णालयात ECG, रक्ततपासण्या, करतात. उपचार म्हणून ऑक्सिजन, औषधे, थ्रोम्बोलिसिस (गाठ-विरघळविणारी औषधे), अँजिओप्लास्टी किंवा बायपास इत्यादि उपचार केला जातो. रुग्णालयातून खरी सोडल्यावर सामन्यत: हृद्यकविकरवारील औषधे, रकडब योग्य ठेवणारी औषधे, लिपीड पातळी राखणारी औषधे कायम घेत राहावे लागते.
हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधील अडथळे दूर करण्यासाठी परक्युटेनियस अँजिओप्लास्टी (Percutaneous Coronary Intervention – PCI) ही आधुनिक व प्रभावी उपचारपद्धती आहे. या तंत्रामुळे अनेक रुग्णांना मोठा लाभ झाला आहे. ही प्रक्रिया क्ष-किरण (X-ray) मार्गदर्शनाखाली केली जाते.
या प्रक्रियेत हाताच्या (radial artery) किंवा मांडीच्या (femoral artery) रक्तवाहिनीतून एक बारीक कॅथेटर (नळी) आत घालून तो हृदयाच्या कोरोनरी धमन्यांपर्यंत नेला जातो. नंतर क्ष-किरणात दिसणारा द्रव (contrast dye) सोडून अडथळ्याचे अचूक स्थान निश्चित केले जाते. अडथळा आढळल्यास त्या ठिकाणी छोटा फुगा (balloon) फुगवून अरुंद झालेली रक्तवाहिनी रुंद केली जाते. बहुतेक वेळा त्या ठिकाणी, रक्तवाहिनी पुन्हा अरुंद होऊ नये म्हणून स्टेंट (धातूची जाळी/स्प्रिंग) बसवला जातो . औषधयुक्त स्टेंट (drug-eluting stent) वापरल्यास रक्ताची गाठ होण्याचा धोका कमी होतो.
ही प्रक्रिया प्रामुख्याने हृदयविकाराचा झटका, तीव्र अँजायना किंवा महत्त्वाच्या ब्लॉकेजमध्ये केली जाते. अँजिओप्लास्टीनंतर रुग्णाला साधारण एक दिवस रुग्णालयात राहावे लागते आणि रक्त पातळ ठेवणारी औषधे घ्यावी लागतात. ही पद्धत ओपन हार्ट सर्जरीपेक्षा कमी जोखमीची व जलद पुनर्वसन देणारी आहे.
तथापि, सर्वच रुग्णांसाठी ही पद्धत योग्य नसते. तीनही प्रमुख रक्तवाहिन्यांमध्ये गंभीर अडथळे असल्यास बायपास शस्त्रक्रिया आवश्यक ठरते. अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी यामुळे निदान व उपचार एकाच वेळी होऊ शकतात, ज्यामुळे वेळ व खर्च वाचतो. तरीही रक्तस्राव, स्टेंट थ्रोम्बोसिस किंवा पुन्हा अरुंदता यांसारखे काही धोके संभवतात.
हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अनेक ठिकाणी अडथळे असतील किंवा तीनही प्रमुख रक्तवाहिन्या खराब झाल्या असतील, तर बायपास शस्त्रक्रिया (CABG – Coronary Artery Bypass Grafting) करावी लागते. ही शस्त्रक्रिया म्हणजे अडथळा असलेल्या रक्तवाहिन्यांना पर्यायी मार्ग तयार करून हृदयाला पुरेसा रक्तपुरवठा करणे. गर्दीच्या रस्त्याला वळणरस्ता (बायपास) काढल्याप्रमाणे यामध्ये नवीन रक्तवाहिनी जोडली जाते.
या प्रक्रियेत शरीरातील दुसऱ्या भागातील रक्तवाहिनी—जसे पायातील सॅफेनस वेन (नीला) किंवा छातीतील इंटरनल मॅमरी आर्टरी—घेऊन ती अडथळ्याच्या पुढील भागाला जोडली जाते. त्यामुळे रक्तप्रवाह नव्या मार्गाने सुरळीत चालू राहतो. ही शस्त्रक्रिया करण्यासाठी छातीच्या मधोमध छेद घेऊन हृदयापर्यंत पोहोचावे लागते आणि अनेक वेळा कृत्रिम हृदयपंपाची मदत घेतली जाते.
CABG प्रामुख्याने मल्टिव्हेसल डिसीज, लेफ्ट मेन कोरोनरी आर्टरी ब्लॉकेज किंवा मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये अधिक उपयुक्त ठरते, विशेषतः जेव्हा औषधे किंवा अँजिओप्लास्टी पुरेशी ठरत नाहीत. या शस्त्रक्रियेमुळे छातीत दुखणे कमी होते, जीवनमान सुधारते आणि काही रुग्णांमध्ये आयुष्य वाढण्यास मदत होते.
ही मोठी शस्त्रक्रिया असल्यामुळे रुग्णाला काही दिवस रुग्णालयात राहावे लागते आणि पूर्ण बरे होण्यासाठी काही आठवडे लागू शकतात. संसर्ग, रक्तस्राव किंवा इतर गुंतागुंत यांसारखे काही धोके असू शकतात. कालांतराने जोडलेल्या रक्तवाहिन्यांमध्येही बदल होऊ शकतात, त्यामुळे नियमित तपासणी आवश्यक असते. योग्य निवड आणि काळजी घेतल्यास CABG ही अत्यंत प्रभावी व जीवनरक्षक उपचारपद्धती आहे.
निरोगी आहार विहार, एरोबिक व्यायाम, धूम्रपान आणि ताणतणावापासून दूर राहणे, रक्तदाब आणि रक्तातील साखरेचे नियंत्रण, वजन आटोक्यात ठेवणे या एकत्रित उपायांनी हृदयविकार टाळता येतो. एकदा हृदयवेदना जडली की झटका येऊ नये म्हणून बरीच काळजी घ्यावी लागते. नायट्रोग्लिसरीन हा केवळ प्राथमिक उपचार आहे. पुढचा धोका टाळण्यासाठी योग्य तपासण्या करायला पाहिजेत. अशा रुग्णाने जवळ ही गोळी कायम ठेवली पाहिजे.
योग्य आहार-विहार, तंबाखू, धुम्रपान टाळावे. उचित व्यायाम आणि मानसिक संतुलन याद्वारे हृदयविकार टाळता येतात. तसेच असलेला आजार हळूहळू बरा करता येतो. याबद्दल अगदी थोडक्यात पाहू या. अतिरक्तदाब, रक्तातील वाढलेले मेद (लिपीडस) यावर वेळीच उपचार केले पाहिजेत.
आहारात चरबी/तेल कमीतकमी वापरणे, कमी खाणे हे महत्त्वाचे. प्राणिज चरबी (मांसाहार, अंडे, इ.) वनस्पती तूप, बरीच तेले ही हृदयास हानीकारक असतात. त्यांचा वापर मर्यादित करावा. सोबत चांगली, मध्यम, वाईट तेलांचा एक तक्ता दिला आहे. माफक प्रमाणात मांसाहार चालेल. अतिरेक टाळावा हे चांगले. श्रमाच्या व कष्टाच्या मानाने खाणे योग्य असावे. सर्व जादा अन्न शरीरात चरबीच्या रुपात साठते. भाज्या, फळे यांचा वापर जास्त हवा. यांत चोथा जास्त, ऊर्जा कमी असते. असा आहार जास्त चांगला ठरतो.
| तेलाचे नाव | हृदयासाठी उपयुक्तता | वापर कसा करावा |
| शेंगदाणा तेल | माफक प्रमाणात चांगले | दैनंदिन स्वयंपाकासाठी मर्यादित वापर |
| मोहरीचे तेल | काही प्रमाणात हृदयासाठी हितकारक | फोडणी/भाजीसाठी माफक वापर |
| तिळाचे तेल | चांगले स्निग्धांश, चविष्ट | अधूनमधून वापर योग्य |
| राइस ब्रॅन तेल | हृदयासाठी तुलनेने चांगले | दैनंदिन वापरासाठी पर्याय |
| ऑलिव्ह तेल | हृदयासाठी उपयुक्त | सॅलड, हलका स्वयंपाक, कमी तापमानात |
| सूर्यफूल / सफ्लॉवर तेल | मर्यादित प्रमाणात वापरावे | इतर तेलांबरोबर बदलून वापरणे चांगले |
हृदयविकार होऊ नये म्हणून तेलांचे योग्य मिश्रण किंवा प्रमाण असे : गोडेतेल/सूर्यफुल/करडई/तीळ हे पाच भाग आणि मोहरी किंवा सोयाबीन तेल यांचा एक भाग. ही तेले मिसळण्याची गरज नाही; आलटून पालटून वापरू शकतो. उदा. न्याहरीच्या वेळी मोहरी/करडई/ शिरस किंवा सोया; तर दुपारच्या व रात्रीच्या स्वयंपाकात गोडेतेल/सुर्यफुल/करडई, इत्यादी.
व्यायामाची मूलतत्त्वे वेगळया प्रकरणात आहेत. इथे एवढे सांगणे पुरेल की निदान रोज किमान अर्धा तास वेगाने चालणे हे अशा रुग्णांना आरोग्यासाठी आवश्यक आहे. तसेच एकूण बसण्याचे तास कमी करून घरकाम, खेळ यात निदान तासभर घालवणे महत्वाचे आहे.
आत्यंतिक राग, द्वेष, कुढणे, इ. भावना हृदयाला हानिकारक आहे. निरनिराळया मार्गांनी त्यावर मात करा. योग-आसनांचा आणि श्वसन, प्राणायाम, योगनिद्रा, इत्यादी उपायांचा फार चांगला उपयोग होतो.
डॉ. डीन ऑर्निश (Dean Ornish) यांनी हृदयविकार उलटवण्याचा (reversing heart disease) एक वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध जीवनशैली कार्यक्रम विकसित केला आहे. या पद्धतीचा मुख्य आधार औषधांपेक्षा जीवनशैलीतील सर्वांगीण बदल आहे. यात कमी फॅट असलेला शाकाहारी आहार, नियमित हलका व्यायाम, तणाव नियंत्रण आणि सामाजिक आधार यांचा समावेश असतो.
ऑर्निश आहारात फळे, भाज्या, संपूर्ण धान्ये, कडधान्ये यांना प्राधान्य दिले जाते, तर तेल, साखर आणि प्राणिज पदार्थ टाळले जातात. नियमित चालणे, योग आणि प्राणायाम यामुळे हृदयाची कार्यक्षमता सुधारते. ध्यान, श्वसन तंत्र आणि विश्रांती पद्धती तणाव कमी करतात, जो हृदयविकाराचा महत्त्वाचा घटक आहे.
या कार्यक्रमामुळे रक्तवाहिन्यांतील अडथळे कमी होऊ शकतात, कोलेस्टेरॉल घटते आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो. संशोधनानुसार, योग्य प्रकारे पाळल्यास ही पद्धत हृदयविकाराची प्रगती थांबवू शकते किंवा काही प्रमाणात उलटवू शकते.
ऑर्निश पद्धत केवळ शरीरावरच नव्हे तर मानसिक आणि सामाजिक आरोग्यावरही लक्ष केंद्रित करते. त्यामुळे दीर्घकालीन आरोग्य सुधारण्यासाठी ही एक सुरक्षित, नैसर्गिक आणि प्रभावी पद्धत मानली जाते.