बालकांचे आरोग्य

तापाचे झटके

काही मुलांना तापाबरोबर झटके येतात, डोळे फिरवणे, मुठी आवळणे,आकडी येणे अशी लक्षणे दिसतात’.  याला घाबरून जाऊ नका.

 मुलाला ताबडतोब कोमट पाण्याने पुसून ताप उतरवल्यास झटके थांबतात. तसेच मुलास काही इजा होणार नाही अशा सुरक्षित ठिकाणी ठेवा, त्याच्या तोंडात चमचा किंवा कापडाचा बोळा‌ ठेवा, म्हणजे त्याची जीभ दातात चावली जाणार नाही. त्याचे कपडे काढून त्यास मोकळे करा, शुद्धीवर आल्यावर परसिटमोल (गोळी किंवा औषधही) द्यावे. मात्र तापाचे कारण काय आहे, हे निश्चित करून उपचार करणे आवश्यक आहे.

ताप (लहान मुलांसाठी) (तक्ता (Table) पहा)

तापाचे झटके येण्याचा वयोगट हा सामान्यतःसहा महिने ते पाच वर्षापर्यंत असतो. या पलीकडील वयातील बाळाला ताप व झटका दिसल्यास इतर कारणांचा विचार करावा लागतो.

साध्या तापातील झटका : वैशिष्ट्ये

  • ताप अचानक चढल्यास झटक्याची शक्यता जास्त असते.
  • कुटुंबात असा झटका येण्याचा इतिहास मिळतो
  • ताप उतरल्यावर झटका थाबतो.  त्यानंतर थोडा वेळ सुस्ती राहू शकते.
  • सहसा पंधरा मिनिटाच्या आत हा झटका थाबतो .
  • झटका थांबल्यावर बाळ पूर्ववत होते.

बाळाला तापात झटका येतो असे लक्षात आले, तर तापाचे औषध नेहेमी घरात ठेवावे. तसेच आजकाल एक नाकात मारण्याचा एक औषधी  स्प्रे मिळतो, तोदेखील घरात ठेवावा, जेणेकरून झटका आल्याबरोबर घरातच तो थांबवू शकता आणि गंभीर धोका टाळता येतो.

  • अशा मुलांपैकी साधारण 10 % मुलांमध्ये पुढील आयुष्यात फिटचा आजार दिसून येतो.उर्वरीत मुलांमध्ये पुढे काही त्रास होत नही.
  • क्वचित प्रमाणात झटका लांबतो , किंवा परत परत सुरु राहतो.

 अशावेळी बाळाला  लगेच हॉस्पिटल मध्ये  घेऊन जावे.

जुलाब-अतिसार

जुलाब-हगवण-अतिसार हा मुलांचा नंबर एकचा शत्रू आहे. लहान मुलांच्या मृत्यूच्या कारणांमध्ये जुलाब-अतिसार या आजारांचे सगळयात वर नाव येते. जुलाब-अतिसारांमुळे मृत्यू होतातच, पण वाचलेल्या मुलांच्या आरोग्यावर त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात. (कुपोषण, वाढ खुंटणे, इ.)

सर्वसाधारणपणे चांगले पोषण आणि स्वच्छ पाणीपुरवठा या दोन गोष्टींमुळे समाजातले जुलाब-अतिसाराचे प्रमाण खूपच कमी होईल. तसे गेल्या दशकभरात दिसून आले आहे.

अतिसाराच्या आजारांमध्ये योग्य उपाययोजना केली तर कुपोषणासारखे परिणाम आणि मृत्यू मोठया प्रमाणावर टाळता येतील. जुलाब, अतिसार पूर्ण टाळता नाही आले तरी त्यामुळे होणारा शोष टाळता येतो हे निश्चित. कुपोषणही अटळ नाही. अतिसाराची कारणे नीट समजावून घेऊन योग्य उपाययोजना गावपातळीवरही करता येते. गेल्या काही वर्षात यामुळे या आजाराने फार मृत्यू होत नाहीत.

जुलाब व अतिसाराची कारणे

जुलाब, अतिसाराची कारणे दोन प्रकारची असतात. एक प्रकार म्हणजे निरनिराळया जंतूंमुळे होणारे जुलाब व अतिसार. जीव-जंतुदोषांमुळे होणा-या जुलाबांमध्ये जिवाणू, विषाणू, अमीबा, जिआर्डिया हे सूक्ष्म जीव येतात. जंतांमुळे पण कधीकधी जुलाब होतात, पण जंत हे सूक्ष्मजंतू या प्रकारात येत नाहीत.

दुसरा गट म्हणजे जंतुदोषाशिवाय इतर कारणांचा गट. जंतुदोषाशिवाय इतर कारणेही असतात हे समजून घेणे आवश्यक आहे. जुलाब म्हणजे जंतुदोष असेलच असे नाही.

जुलाबाच्या या इतर कारणांमध्ये वावडे, दात येताना होणारे जुलाब, शरीरात इतर ठिकाणी असणा-या आजारांमुळे पचनसंस्थेवर होणारे परिणाम (उदा. श्वसनसंस्थेच्या जंतुदोषामुळे होणारे जुलाब), अपचन, विषबाधा, इत्यादी येतात. मुलांच्या इतर संस्थांच्या निरनिराळया आजारांत (उदा. मलेरिया, न्यूमोनिया) कधीकधी जुलाब होतात, ही गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे. मुलांना दात येताना होणारे जुलाब नेमके कशामुळे होतात हे नीट कळलेले नाही. काही औषधांमुळे सुद्धा जुलाब होतात. उदाहरणार्थ जंतू विरोधी औषधे (म्हणजेच अँटिबायोटिक्स ). अँटिबायोटिक्सच्या वापरामुळे आतड्यातले उपयुक्त जंतूही मरतात आणि त्यामुळे पचनशक्ती बिघडून जुलाब होऊ शकतात. म्हणून गरज नसताना अँटिबायोटिक्स वापरू नयेत.

सर्वसाधारणपणे ‘इतर’ कारणांमुळे होणारे जुलाब आपोआप आणि लवकर थांबतात. त्यासाठी वेगळे काही करण्याचे बहुधा कारण नसते. विषाणु-अतिसारही आपोआप थांबतो, पण यासाठी तीन ते पाच दिवस लागू शकतात.

जिवाणूंमुळे हगवण-अतिसार असेल तर जंतुविरोधी औषधे द्यावी लागतात. काही वेळा जिवाणू-हगवणही आपोआप बंद होते. ‘शिगेला’ या जिवाणूंमुळे हगवण झाल्यास रक्तही पडते. अशा वेळेस मात्र जंतुविरोधी औषध द्यावे लागते. जिवाणू हगवण आणि जंतांमुळे होणारी हगवण विशिष्ट औषधांनी एक-दोन दिवसांतच थांबते. पण म्हणून अतिसार होणा-या सरसकट सर्व मुलांना जंतुविरोधी औषधे देणे योग्य नाही. एकूण अतिसारांपैकी सुमारे पन्नास टक्के अतिसार विषाणूंमुळे होतात. विषाणूंवर कोठलेही विशिष्ट औषध चालत नाही.

रोगप्रक्रिया

अतिसार-जुलाब हे शब्द इथे एकाच अर्थाने वापरले आहेत. हगवण हा शब्दही अशाच अर्थाने वापरला जातो. या आजारांमध्ये ब-याच वेळा उलटया होतात.

या सर्व आजारांमध्ये पचनसंस्थेतले द्रवपदार्थ शोषले न जाता , उलट पचनसंस्थेत वाजवीपेक्षा अधिक स्त्राव पाझरून ते  तोंडावाटे (उलटी) किंवा जुलाबावाटे बाहेर पडतात.

जंतुदोषांपैकी काही जिवाणू आतडयाच्या अंतर्भागातील आवरणावर हल्ला चढवतात यामुळे आवरणाचा दाह होतो. दाहामुळे आतील आवरणावर जखमा होतात किंवा  ठिकठिकाणी आवरण गळून पडते आणि रक्तस्राव होतो. यामुळेच हगवणीत रक्त दिसते. . कधी कधी तापही येतो . शेंब पडते ती आवरण सुजून त्यातून चिकट स्त्राव बाहेर पडल्यामुळे. अतिसारामुळे बाळाची पचनशक्ती आणि भूक कमी होते. यामुळे कुपोषणाला चालना मिळते.

शोष

हगवणीच्या रोगप्रक्रियेतला अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शोष. शरीरातून जुलाब-उलटयांद्वारे पाणी आणि क्षार बाहेर जाऊन शरीरात कोरडेपणा व शोष निर्माण होतो . असंख्य लहान मुले या कारणानेच दगावतात. शोष पडल्याने शरीरातील पेशी कोरडया पडतात. शोष पडल्याने रक्ताभिसरण मंदावते कारण रक्तातील पाणी कमी होऊन रक्ताचा पातळपणा कमी होतो. रक्तातील पाणी कमी झाल्याने शरीरातील अनेक संस्थांच्या कामकाजावर त्याचा परिणाम होतो. यामुळे रक्ताभिसरणसंस्थेत फिरवण्यासाठी आवश्यक असलेले रक्ताचे माप कमी पडते. आहे तेवढया रक्ताने कामकाज चालवण्यासाठी हृदय वेगाने काम करते. यामुळे नाडी वेगाने चालते. पण फार वेळ अशी स्थिती राहिल्यास प्रमाणाबाहेर शोष पडून मेंदूला रक्तपुरवठा पुरेनासा होतो. यामुळे बेशुध्दी व त्यानंतर मृत्यू येतो.

मूत्रपिंडातून मूत्र तयार होण्याचे काम मंदावते व कालांतराने बंद पडते. यामुळे मूत्रपिंडे बिघडू शकतात.

लक्षणे
  • त्वचा कोरडी शुष्क होते (त्यामुळे चिमटीतून सोडलेली त्वचेची सुरकुती-घडी बराच काळ तशीच राहते).
  • जीभ कोरडी दिसते, तहान लागते.
  • डोळे/टाळू खोल जातात.
  • जुलाब उलटया थांबवण्यापेक्षा हा ‘शोष’ थांबवणे महत्त्वाचे असते. यासाठी पहिल्यापासून द्रवपदार्थ पुरवणे आवश्यक असते. शरीरातल्या सर्वसाधारण द्रवपदार्थात क्षारांचे काही प्रमाण असते. हे सर्व लक्षात घेऊन आपण देऊ त्या पदार्थात क्षारांचे काही प्रमाण ठेवले पाहिजे. म्हणूनच जीवनजलामध्ये मीठ, सोडा यांचे अंश असतात. जीवनजलातील साखरेचा अंश पोषणासाठी तर उपयोगी असतोच. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे नुसत्या मीठ-पाण्यापेक्षा साखर-मीठ-पाणी तोंडाने दिल्यास पचनसंस्थेत द्रवपदार्थाचे चांगले शोषण होते. वेळीच शोष थांबवल्यास पुढचे अनेक दुष्परिणाम टळतात.
  • जुलाबांमुळे पोटातले अन्नपदार्थही वाया जातात. काही काळ तरी पचन-शोषणाची शक्ती क्षीण होते .त्यामुळे कुपोषणाच्या दुष्टचक्राला चालना मिळू शकते.
उपचार

अतिसाराच्या तक्त्यात मुख्य प्रकार नमूद केले आहेत. रोगनिदान होणे फार महत्त्वाचे आहे. सरसकट काहीतरी उपचार करणे बरोबर नाही.

जुलाब आणि इंजेक्शने
  • इंजेक्शने ब-याच वेळा अनावश्यक व कधीकधी घातकही असतात हे लक्षात ठेवा.
  • रक्त पडत असल्यास आणि तोंडाने दिलेल्या औषधाने काहीही फरक न पडल्यास जंतुविरोधी इंजेक्शने द्यावी लागतात. (ती तज्ज्ञानेच द्यावीत).
उपचाराची मार्गदर्शक तत्त्वे
  • योग्य रोगनिदान करा आणि आजाराप्रमाणेच उपचार करा.
  • शोष नसला तरी लगोलग जीवनजल चालू करा. आधीच फार शोष पडला असल्यास, मूल अत्यवस्थ असल्यास लगेच  डॉक्टरकडे नेणे आवश्यक. कधीकधी शिरेतून सलाईन देण्याची वेळ येते.
  • हगवणीत रक्त, शेंब, कळ, घाण वास, ताप यांपैकी काहीही असल्यास सोबत जंतुविरोधी औषधे द्यावीत. हे नसल्यास फक्त जीवनजल चालू करा.
  • अपचन, वावडे, इत्यादी कारणे असल्यास पचनसंस्थेतून तो पदार्थ बाहेर जाईपर्यंत जुलाब होत राहतात. अपचनात मूल सहसा इतर अन्नपदार्थ घेत नाही.
  • पोषण चालू ठेवा : अपवाद (अपचन, वावडे) वगळता मुलांचे खाणेपिणे थांबवू नका. मूल अंगावर पीत असल्यास ते अजिबात थांबवू नका. वरचे चालू असल्यास हलके अन्न, दूध चालूच ठेवा, नाहीतर मूल कुपोषणाच्या संकटात सापडेल.
  • सतत जुलाब होऊन आतड्याचे आतले अस्तर झिजते आणि त्यातून झिंक हे मूलद्रव्य कमी होते , त्यामुळे पुन्हा पुन्हा अतिसाराचा आजार होण्याची शक्यता वाढते. म्हणून कोणत्याही प्रकारच्या अतिसारामध्ये झिंक चे औषध चौदा दिवस देणे आवश्यक असते.
जीवनजल – जलसंजीवनी – घरगुती सलाईन

जीवनजलाचे महत्त्च समजण्याच्या पूर्वी अतिसाराच्या आजारात असंख्य मुले दगावत असत. डॉक्टर उपलब्ध असल्यास शिरेतून सलाईन (मिठाचे निर्जंतुक पाणी) द्यावे लागत असे. जीवनजलाचा वापर व्यापक प्रमाणावर व्हायला लागल्यापासून असंख्य मृत्यू टळलेले आहेत. जीवनजल म्हणजे शरीरातून बाहेर पडणा-या द्रवपदार्थाची भरपाई करण्यासाठी तोंडाने दिलेले सलाईन होय.

लोकपरंपरेनुसार शहाळयाचे पाणी, भाताची पेज, इत्यादी गोष्टी दिल्या जातात. शहाळयाचे पाणी (असेल तर), लिंबूसरबत, ताक, भाताची पेज (मीठ घातलेली), पातळ पाणीदार चहा-कॉफी ही सर्व पेये या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहेत.

जीवनजलाचा जास्त अभ्यास झाल्यानंतर त्याचे घटक परस्परप्रमाण ठरलेले आहेत

बालकांसाठी कमी ऑस्मोलॅरिटीचे ओआरएस (Low Osmolar ORS) – संरचना

अतिसारामुळे होणाऱ्या निर्जलीकरणाच्या उपचारासाठी WHO आणि UNICEF यांनी कमी ऑस्मोलॅरिटीचे ओआरएस (Low Osmolar ORS) सुचवले आहे. हे जुन्या ओआरएसपेक्षा अधिक परिणामकारक असून यामुळे शौचाचे प्रमाण, उलट्या आणि सलाईनची गरज कमी होते.

लिटर स्वच्छ पाण्यातील संरचना

घटकप्रमाण (ग्रॅम/लिटर)mmol/L
सोडियम क्लोराईड (NaCl)2.6 gसोडियम – 75
ग्लुकोज (अनहायड्रस)13.5 gग्लुकोज – 75
पोटॅशियम क्लोराईड (KCl)1.5 gपोटॅशियम – 20
ट्रायसोडियम सिट्रेट डायहायड्रेट2.9 gसिट्रेट – 10
महत्त्वाची वैशिष्ट्ये
  • एकूण ऑस्मोलॅरिटी: 245 mOsm/L
  • सोडियम: 75 mmol/L
  • ग्लुकोज: 75 mmol/L
  • पोटॅशियम: 20 mmol/L
  • क्लोराईड: 65 mmol/L
  • सिट्रेट: 10 mmol/L
प्रत्येक घटकाचे कार्य
  • ग्लुकोज: आतड्यातील सोडियम-ग्लुकोज सहवाहनामुळे पाणी शोषले जाण्यास मदत करते.
  • सोडियम: अतिसारामुळे गमावलेले सोडियम भरून काढते व पाण्याचे शोषण वाढवते.
  • पोटॅशियम: शौचामुळे कमी झालेले पोटॅशियम भरून काढते.
  • सिट्रेट: शरीरातील आम्लता (metabolic acidosis) कमी करण्यास मदत करते.
  • क्लोराईड: इलेक्ट्रोलाइट संतुलन राखते.
उपयोग

कमी ऑस्मोलॅरिटीचे ओआरएस बालकांमधील आणि सर्व वयोगटातील अतिसारामुळे होणारे निर्जलीकरण उपचारासाठी वापरले जाते.

जीवनजल देताना पुढील सूचना लक्षात ठेवा
  • उलटया होत असल्या तरी जीवनजल थोडेथोडे देत राहा, उलटी थांबवण्यासाठी जीवनजल थोडेसे उपयोगी पडते.
  • जीवनजल तयार करताना शक्यतोवर स्वच्छ-शुध्द (किंवा उकळून थंड केलेले) पाणी वापरा.
  • जीवनजल तयार करताना फक्त चार-सहा तास पुरेल इतकेच करून ठेवा. कारण त्यातल्या साखरेमुळे जंतूंची वाढ होण्याची शक्यता असते. एका वेळेस साधारणपणे अर्धा लिटर इतकेच जीवनजल तयार करून ठेवावे.
  • जीवनजल देताना चमच्या-चमच्याने थांबून-थांबून पाजत राहावे, म्हणजे दिलेले जीवनजल पचनसंस्थेत चांगले शोषले जाईल. एकदम जास्त पाजल्यास उलटी होण्याची शक्यता असते.
  • एक ते -दोन वर्षाच्या मुलांना 24 तासांत सुमारे एक लिटर जीवनजल पुरते. पण जुलाब होतच राहिल्यास प्रत्येक जुलाबागणिक सुमारे 100 मि.ली. जादा जीवनजल हिशेबात धरावे.
  • जीवनजल तयार करण्यासाठी तयार पाकीट (पावडर) मिळते. पण जीवनजल घरी करता येते. नुसते साखर-मीठ- पाणी चालते हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. जुलाब सुरू झाल्याझाल्या जीवनजल तयार करून देत राहावे.
  • शोष झालेले मूल चिडचिडे, रडके होते , लघवीचे प्रमाण कमी होते व शोषाच्या इतर खाणाखुणा (त्वचेवर कोरडेपणा, सुरकुती, डोळे खोल, टाळू खोल, जीभ, ओठ कोरडे, इ.) दिसतात. ही लक्षणे नाहीशी होईपर्यंत जीवनजल हळूहळू देत राहावे.
  • मूल अगदी अत्यवस्थ असेल तर ताबडतोब डॉक्टरकडे पाठवणे आवश्यक आहे. अशा वेळी सलाईन शिरेतून देण्याची आवश्यकता असते.. मुलांमध्ये शीर (नीला ) सापडणे मोठया माणसांच्या मानाने अवघड असते,. मात्र गावात लगेच जीवनजल सुरू केल्यास सहसा सलाईनची गरज भासत नाही. सलाईन दिल्यास ते अगदी हळूहळू ( तासात 30 मि.ली. या प्रमाणात) द्यावे लागते. सलाईन जास्त दिले गेल्यास किंवा त्यातून जंतूंचा शिरकाव झाल्यास मृत्यू येण्याचा संभव असतो. म्हणून जीवनजल हाच सुरक्षित व परिणामकारक उपाय आहे हे लक्षात ठेवा.