श्वासनलिकेची सुरुवात स्वरयंत्रापासून होते. यातून झाडाच्या फांद्यांप्रमाणे क्रमाक्रमाने लहान लहान उपनलिका निघून श्वासनलिकांचे एक जाळे तयार होते.
श्वासनलिकादाह म्हणजे कोणत्या तरी कारणाने श्वासनलिकेच्या अंतर्भागातील आवरणाला सूज येणे. श्वासनलिकादाहाची पुढीलप्रमाणे अनेक कारणे असू शकतात. जंतुदोष, जंतखोकला, धूम्रपान, प्रदूषित वातावरण,वावडे, इ. जिवाणूंप्रमाणे विषाणूही श्वासनलिकादाह निर्माण करु शकतात.
या आजारात आधी कोरडा खोकला येतो. नंतर नंतर थोडे बेडके पडतात. विशेषतः छातीच्या मधोमध थोडे थोडे दुखते. जंतुदोष असल्यास ताप येतो.
विषाणुदोषाचा आजार बहुधा आपोआप थांबतो. जिवाणूदोष अमोक्सीसिलिन किंवा कॉट्रिमोक्षझोल च्या गोळयांनी बहुधा थांबतो.
कोरडा खोकला म्हणजे ज्याबरोबर खाकरा, बेडका, कफ पडत नाही असा खोकला.
कोडीनयुक्त खोकल्याचे औषध किंवा गोळी मिळते. हे औषध वयाप्रमाणे अर्धा किंवा एक चमचा दिवसातून दोन-तीन वेळा घेतल्याने कोरडा खोकला तात्पुरता थांबतो.
अडुळसा पानांचा काढा कोरडया खोकल्यासाठी फार उपयुक्त आहे. काढा तयार करून दिवसातून 3-4 वेळा द्यावा. आयुर्वेदिक औषधांच्या यादीमध्ये इतरही औषधे आहेत त्यांचा वापर करता येईल. अडुळसायुक्त औषधेही (सिरप किंवा अवलेह म्हणजे चाटण) मिळतात.
दुकानातील खोकल्यावरची औषधे हा एक गोंधळाचा प्रकार आहे. यातली बरीच औषधे निरुपयोगी व महाग असतात. खोकल्याचे कारण व त्यावर असणा-या औषधांची संख्या मर्यादित आहे. आधी आपण खोकल्यावर परिणाम कसा व कोणत्या औषधांनी होऊ शकतो हे पाहूया. खोकल्यावर तीन प्रकारचे औषधगट काही प्रमाणात उपयोगी आहेत.
गट 1 – घशाची खवखव कमी करणारी औषधे : ज्येष्ठमध, साखर, माल्ट किंवा मधातली औषधे (सिरप), ग्लिसरिन, इ. औषधे घशाचा दाह कमी करतात व खोकला सौम्य करतात. हाच परिणाम खडीसाखर किंवा गूळ चघळल्याने होतो. बाळहिरडा चघळल्यास लाळ सुटून घसा ओला होतो तसेच हिरडा दाह कमी करतो. औषधांच्या दुकानात खोकल्यासाठी आणि घशाची खवखव कमी करण्यासाठी अनेक प्रकारच्या गोळया मिळतात. या गोळयांमध्ये साखर आणि मुख्यत: मेंथॉल असतो. ही सर्व औषधे घशाच्या खोकल्यापुरतीच मर्यादित आहेत.
गट 2 – कफ, बेडका सुटण्यास मदत करणारी औषधे. यातही दोन उपप्रकार आहेत. एक गट आहे श्वासनलिकांमध्ये पाझर वाढवणारा. अडुळसा या प्रकारचे काम करतो. दुसरा गट आहे कफ पातळ करणारा. यात मुख्यत: ब्रोमेक्झीन हे औषध आहे. अडुळशामध्ये ब्रोमेक्झीन हे एक प्रमुख औषध असते. श्वासनलिका दाहामुळे होणा-या खोकल्यासाठी ही औषधे उपयुक्त आहेत. यापैकी अडुळसा तर आपण घरीही लावू व वापरू शकतो. सोडियम पोटॅशियम क्षार ही पाणी सुटावण्याचे काम करतात. म्हणूनच अशा खोकल्यात जास्त मीठ पाणी घेत राहिल्यास उपयोग होतो.
गट 3 – खोकला दाबणारी औषधे- मेंदूतील खोकला-केंद्रावर नियंत्रण वाढवून खोकल्याची क्रिया मंदावणारी ही औषधे आहेत. या औषधांमध्ये कोडीन हे एक प्रमुख औषध आहे. याच गटात इतरही काही औषधे आहेत.
गट 4 – श्वासनलिका सैलावणारी औषधे – ही औषधे उदा. सालमेटोरोल, अमिनोफेलीन. श्वासनलिका रुंदावून बेडका बाहेर काढायला मदत करतो.
जाताजाता – इंग्रजीत कफ म्हणजे खोकला, पण मराठीत कफ हा शब्द ‘बेडका’ या अर्थाने वापरतात.
सर्वसाधारण खोकल्यासाठी सितोपलादी चूर्ण एक-दीड चमचा घ्यावे. कोरडा खोकला असताना हे चूर्ण एक चमचा तुपात घ्यावे. खोकल्याची ढास पुष्कळ असल्यास लवंगादी वटी, खदिरादी वटी (150 मि.ग्रॅ.) तोंडात चघळून चांगला उपयोग होतो.
सर्वसाधारण पुन्हापुन्हा येणा-या खोकल्यासाठी कण्टकारी वनस्पती उपयुक्त आहे. या वनस्पतीपासून तयार केलेला अवलेह किंवा रसापासून तयार केलेले आसव गुणकारी असते. अडुळशापासून केलेली औषधेही उपयुक्त आहेत.
कण्टकारी ही वनस्पती जमिनीबरोबर पसरणारी काटेरी वनस्पती आहे. ती मार्च ते मे या काळात भरपूर येते. जांभळट फुले, पिवळी छोटया वांग्यासारखी फळे ह्यावरून ती ओळखू येते. या वनस्पतीचा रस कमी असल्याने आसवापेक्षा अवलेह किंवा साखर करून ठेवता येते. अवलेह एक-एक चमचा सकाळ-संध्याकाळ 7 ते 10 दिवस वापरावा. आसव दोन चमचे + पाणी दोन चमचे असे सकाळ-संध्याकाळ 3 ते 7 दिवस वापरावे.
खोकल्यासाठी आणखी एक उपचार आहे. बिब्ब्याला खिळा टोचून खिळयाला लागणारे तेल कोमट दुधात मिसळा. असे अर्धा कप दूध दहा दिवस रोज द्यावे.
कोरडा खोकला हा तूप, बाळहिरडा, खडीसाखर, इत्यादी घरगुती उपायांनी आटोक्यात येऊ शकतो.
खडीसाखर किंवा बाळहिरडा चघळत राहिल्याने ठसका ब-याच प्रमाणात कमी होतो. मध + हळद चाटणानेही कोरडा खोकला आटोक्यात येतो.
खोकला (तक्ता (Table) पहा)