Anatomy Icon शरीरशास्त्र
पुनरुत्पादन

Male Reproductive Diagram वंश पुढे नेण्यासाठी जिवांना जन्म देणे (जनन किंवा पुनरुत्पादन) हे सगळयांच प्राण्यांत आणि वनस्पतींत दिसून येते. वंशवाढीचे प्रकार खूप आहेत. अगदी एकपेशीय जिवांमध्ये त्याच एका पेशीचे दोन भाग होऊन ते वेगवेगळे वाढतात. उत्क्रांतीत जास्त प्रगत पक्षी, मासे, सरपटणारे प्राणी, गाईगुरे, माणूस वगैरेंमध्ये नर-मादी एकत्र आल्याने नवीन जीव तयार होतो. काही प्रजातीत हा जीव अंडयांमध्ये आधी वाढून नंतर बाहेर येतो. सस्तन प्राण्यांमध्ये तो मादीच्या पोटात वाढून जन्माला येतो.

नवीन जीवाची निर्मिती

Female Reproductive Diagram नवीन जीव तयार होण्याची माहिती थोडक्यात अशी. स्त्रीच्या ओटीपोटीत खास बीजपेशी (स्त्रीबीज) तयार करणा-या दोन स्त्रीबीजग्रंथी असतात. मुलगी वयात आल्यानंतर दर महिन्याला स्त्रीबीज तयार होते. कोठल्यातरी एका स्त्रीबीजग्रंथीतून एक स्त्रीबीज पक्व होऊन बाहेर पडून ते गर्भनलिकेत येते. स्त्रीबीज गर्भनलिकेत (बीजनलिकेत) असताना जर पुरुषाशी लैंगिक समागम झाला तर पुरुषबीज स्त्रीबीजाशी जुळून गर्भधारणा होते. याआधी आपण शिकल्याप्रमाणे गर्भपेशींमध्ये निम्मा भाग स्त्रीचा व निम्मा भाग पुरुषाचा असतो. मुलगा होणार की मुलगी होणार हे पुरुषाकडून ‘वाय'(Y) येणार किंवा एक्स (X) यावरच अवलंबून असते. बाकीचे बहुतेक गुणधर्म दोघांकडून येतात. गर्भधारणा झाल्यावर वेगाने पेशींचे विभाजन होते. मासिक पाळी बंद होते. गर्भाशयात गर्भ रुजून वार, नाळ तयार होतात. पुढे हळूहळू गर्भाचा विकास व वाढ होते.

मात्र, स्त्रीबीज गर्भनलिकेत आल्यानंतर एक-दोन दिवसांत पुरुषाकडून शुक्रपेशी मिळाली नाही तर हे स्त्रीबीज मरते. वेळेत गर्भधारणा न झाल्यामुळे गर्भाशयात तयार झालेले आतील मऊ आवरण दहा बारा दिवसानंतर गळून पडते व रक्तस्राव होतो. यालाच आपण मासिक पाळी (मासिक स्राव) म्हणतो. या पाळीनंतर दहा बारा दिवसांनंतर गर्भाशयात परत नवीन आवरण तयार होते, म्हणजेच गर्भधारणेची तयारी होते.

Second Trimester Pregnancy हे चक्र स्त्रीच्या पंधराव्या वर्षापासून 45-50 या वयापर्यंत चालू असते. प्रथम रजोदर्शन (पाळी येणे) होते तेव्हा मुलगी वयात आली किंवा ‘नहाण’ आले असे आपण म्हणतो. 45-50 वयात पाळी थांबली की आपण त्याला ‘पाळी गेली’ असे म्हणतो. यानंतर स्त्रीबीज तयार होत नसल्यामुळे गर्भधारणा होऊ शकत नाही.

पुरुषांच्या अंडकोषात पंधरा-सोळा वर्षे वयानंतर पुरेशा पुरुषबीजपेशी निर्माण होतात. पुरुषाच्या जननसंस्थेतील या शुक्रपेशी आणि काही द्रव मिळून वीर्य तयार होते. स्त्री-पुरुष संबंधाच्या वेळी सुमारे दोन-तीन मि.ली. वीर्य बाहेर फेकले जाते. त्यात लक्षावधी शुक्रपेशी असतात. शुक्रपेशींना सूक्ष्म शेपटयांमुळे ‘हालचाल’ करता येते. ज्या वीर्य पेशींची हालचाल कमी किंवा बंद झालेली असते त्याच्याकडून गर्भधारणा होत नाही. यासाठी वीर्याचा नमुना सूक्ष्मदर्शक यंत्राखाली तपासता येतो.

शरीरातले पाणी

शरीरात निम्म्यापेक्षा अधिक वजन पाण्याचेच असते. सर्व पेशींमध्ये आणि पेशींबाहेर पाणी असते. त्यात काही क्षार व इतर पदार्थही असतात. शरीरातील अनेक क्रियांना पाणी लागते. शरीरातून टाकाऊ पदार्थ बाहेर पडण्यासाठीही पाणी लागते. याची भरपाई करण्यासाठी आपल्याला तहान लागते. पाणी प्यायल्यावर जठर व आतडयातून ते रक्तप्रवाहात शिरते. इथून ते सर्व भागात पोचवले जाते.
शिरेतून दिले जाणारे सलाईन म्हणजे पाणी व ठरावीक प्रमाणात मीठ असते. गरजेप्रमाणे इतरही क्षार व ग्लुकोज साखर सलाईनमध्ये घातलेले असतात, त्यानुसार त्यांची नावे वेगळी असतात.

संप्रेरकग्रंथीसंस्था

Hormone ग्रंथी म्हणजे पेशींच्या गाठी किंवा गड्डे. यांचे काम म्हणजे निरनिराळे रस तयार करणे. ग्रंथींचे दोन प्रकार असतात. एक प्रकार म्हणजे नलिकांतून रस सोडणा-या ग्रंथी. उदा. पाचकरस (लाळ, स्वादूरस, पित्तरस) तयार करणा-या तसेच घाम व तेलकट पदार्थाने कातडी ओलसर ठेवणा-या ग्रंथी. दुसरा प्रकार म्हणजे थेट रक्तात रस सोडणा-या नलिकाविरहित ग्रंथी. या रसाला अंतःस्राव किंवा संप्रेरक (हार्मोन्स) असे म्हणतात. अंतःस्राव तयार करणा-या अशा संप्रेरक ग्रंथी (अंतःस्रावी) गळयात, पोटात, ओटीपोटात, मेंदूच्या खाली वगैरे निरनिराळया ठिकाणी असतात.

या संप्रेरक ग्रंथीतून तयार होणारा रस सरळ रक्तामध्ये जातो. यासाठी ग्रंथींना कोठल्याही प्रकारची वेगळी नळी नसते. याचा एक फायदा असा असतो, की रक्तप्रवाहातले संप्रेरक रसांचे नेमके प्रमाण त्या त्या ग्रंथींना कळते. यामुळे संप्रेरकांची आवश्यक तेवढीच मात्रा रक्तात सोडली जाते. रक्तातील विविध संप्रेरकांचे प्रमाण या व्यवस्थेमुळे अगदी नेमके राहते.

या संप्रेरकांचे निरनिराळे प्रकार आणि कामे असतात. शरीरातील पुरुषत्वाची किंवा स्त्रीत्वाची लक्षणे, रक्तातील साखरेचे प्रमाण, वाढ, उंची, रक्तदाब, मूत्रपिंडाचे कामकाज, चरबीचे प्रमाण, रासायनिक क्रियांचे नियंत्रण वगैरे अनेक महत्त्वाची कामे या रसांवर अवलंबून असतात. या संप्रेरकांचे प्रमाण ठरावीक मर्यादेत असावे लागते. त्यात थोडाही फेरफार झाला तर आरोग्यावर वाईट परिणाम होतात.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.