Anatomy Icon शरीरशास्त्र
शरीरशास्त्र
प्रास्ताविक

आरोग्य आणि आजार समजावून घ्यायचे असतील तर शरीराची माहिती पाहिजे. रोगनिदानात आजार नेमका कोठे आहे आणि त्या आजाराचे स्वरुप काय हे समजणे महत्त्वाचे असते. वैद्यकीय शिक्षणक्रमात शरीररचना आणि शरीरक्रियाविज्ञान खूप तपशीलवार शिकवले जाते. वैद्यकीय उपचार पध्दतीत हे पायाभूत ज्ञान मानले जाते. मात्र आपण इथे थोडक्यात माहिती घेणार आहोत.

या प्रकरणात शरीराची पेशींपासून रचना, निरनिराळया संस्था आणि अवयव यांची एकत्रित माहिती दिली आहे. पुढे पुढे आवश्यक तेवढा तपशील प्रत्येक संस्थेबरोबर दिला आहे. त्या त्या आजारासाठी आवश्यक तेथे शरीराबद्दल अधिक माहिती दिली आहे.

रस
रस व रसग्रंथी

रक्ताप्रमाणे आणखीही एक प्रवाही पदार्थ शरीरात असतो. त्याला (लिंफ) ‘रस’ असे म्हणतात. हा एक प्रकारचा पातळ पांढरट द्रव (प्रथिने, चरबीयुक्त) असून तो वाहून नेण्यासाठी रसवाहिन्या असतात. या नलिकांवर जागोजागी गाठी (रसग्रंथी) असतात. या गाठींतून ‘गाळून’ हा रस पुढे नीलेतील अशुध्द रक्तामध्ये मिसळतो. या रसाचे काम म्हणजे रोगजंतू पकडून गाठीमध्ये अडवून ठेवणे व त्यांचा ‘बंदोबस्त’ करणे. या गाठी जेव्हा सुजतात तेव्हा त्याला आपण ‘अवधाण’आले असे म्हणतो. उदा. पायावर जखम झाली तर जांघेतल्या गाठी सुजतात. हातावर जखम असेल तर काखेतल्या गाठी सुजतात. टॉन्सिल्स यादेखील अशाच ग्रंथी आहेत. त्यांचे मुख्य काम घशातले जंतू पकडणे आहे. टॉन्सिल्स काढून टाकल्यावर हे संरक्षण आपण काढून टाकतो. म्हणूनच विनाकारण टॉन्सिल्स काढणे चांगले नाही. या रसग्रंथीमध्ये एक प्रकारच्या पांढ-या पेशी तयार होतात.

Lymphatic
Awakening Space

हत्तीरोगामध्ये या रसवाहक नलिका बंद होतात. त्यामुळे हत्तीरोग झालेल्या अवयवांमधून प्रथिने, चरबी, इत्यादी गोळा करून आणण्याचे काम बंद होते. त्यामुळे हे पदार्थ जागोजाग साठतात व हत्तीरोगाची सूज येते.

निरनिराळया कर्करोगात या गाठी सुजतात व कडक होतात. ही शरीरात कॅन्सर पसरल्याची खूण असते.

रक्त

Blood Cells शरीरात निरनिराळया पदार्थांची ने-आण करणे हे रक्तामार्फत होते हे आपण पाहिले. रक्ताची आणखीही काही कामे आहेत. शरीरात आलेल्या रोगजंतूंचा प्रतिकार करणे, शरीराचे तापमान सर्वत्र समान व कायम राखणे वगैरे. शरीरातील रक्ताचे काम इतके महत्त्वाचे आहे, की अपघातात जास्त रक्तस्राव झाला तर मृत्यू येऊ शकतो. रक्तदानाबद्दलही आपण ऐकले आहे.

रक्तातला बराच भाग पाण्याचा असतो. याशिवाय रक्तामध्ये तीन प्रकारच्या पेशी व प्रथिने असतात. तसेच ने-आण होणा-या काही पदार्थाचे ठरावीक प्रमाण असते. उदा. प्राणवायू, कार्बवायू, युरीया, साखर वगैरे. रक्तातल्या तांबडया पेशी आणि पांढ-या पेशी वेगवेगळी कामे करतात. तांबडया पेशींमध्ये लोहयुक्त हिमोग्लोबिन (रक्तद्रव्य) असते ते प्राणवायू व कार्बवायू वाहून नेण्याचे काम करते. या रक्तद्रव्याचे प्रमाण दर 100 मि.ली. मध्ये सुमारे 15 ग्रॅम इतके असावे. ते जर कमी असेल तर रक्ताची प्राणवायू नेण्याची क्षमता दुबळी होते. आपल्या देशामध्ये कुपोषणामुळे रक्तद्रव्याचे हे प्रमाण फार कमी आढळते.

पांढ-या पेशींचे काम म्हणजे रोगजंतूंचा प्रतिकार करणे. यातही पाच प्रकार असतात. रोगजंतू पकडणे, नष्ट करणे, रोगजंतूंबद्दल माहिती घेऊन प्रतिकारशक्ती तयार करणे, जखम झाल्यास भरुन काढणे, रक्तस्राव थांबवणे अशी अनेक कामे पांढ-या पेशी करतात.

आपल्या शरीरातील पोकळ हाडे (उदा. हातापायातली हाडे) व प्लीहा या रक्तपेशी तयार होण्याच्या जागा आहेत. बाकीचे घटक यकृत, पांथरी व इतर काही रसग्रंथी यांमध्ये तयार होतात.

रक्ताच्या तपासणीत मुख्यतः रक्तद्रव्यांचे प्रमाण आणि पेशींचे प्रमाण तपासले जाते.

प्रौढांच्या शरीरात एकूण रक्त सुमारे पाच लिटर असते. रक्तदान करताना यातले सुमारे 250 मि.लि. रक्त काढून घेतात आणि ते लवकर भरून येते.

त्वचा

शरीरावरची त्वचा ही संरक्षणासाठी फारच आवश्यक आहे. जखम झाली की त्यावर जंतूंचा हल्ला होऊन पू होतो हे आपण अनुभवतो. त्वचा नसती तर सर्व शरीरावरच असे जंतूंचे हल्ले झाले असते. त्वचेचे दोन मुख्य थर असतात. शिवाय त्यात केस, घामाच्या ग्रंथी, चेतातंतूंची टोके, इत्यादी असतात. नखे हा पण त्वचेचाच एक प्रकार आहे. पण नखांना संवेदना नसतात.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.