आरोग्य कायदा
आपल्याला काय काय करता येईल?
लवकर ओळखा लवकर दखल घ्या
- वर सांगितलेल्या खाणाखुणांवरून लवकरात लवकर हा प्रकार शोधून काढा.
- मुकामार, जखमा यांची थोडी तपशीलवार नोंद करा. या नोंदी थोडया जपून ठेवा, इतरांना सहज दिसायला नको अशा ठेवा. शक्यतो आकृती काढून ठेवा. विशेष शब्दांची नोंद ठेवा (उदा. चाबकाने मारले, भिंतीवर डोके आपटले, इ.) अशा नोंदींवर स्त्रीचे नाव न टाकता काहीतरी खूण नोंद करा.
- वैद्यकीय उपचार करा (मलमपट्टी, वेदनाशामक गोळया, इ.)
- अशा स्त्रीबरोबर सहानुभूतीने वागून एक विश्वास संपादण्याचा प्रयत्न करा. अशी मारहाण सहन करायची नाही; आपणही माणूस आहोत हे तिच्या मनावर ठसवा. विशेष करून पहिला-दुसरा प्रसंग असेल तर ही मनोभूमिका वेळीच निर्माण करायला पाहिजे. पुढचा त्रास त्याने टळू शकतो.
- सामाजिक किंवा कायदेशीर कारवाई करायची असेल तर तिची स्पष्ट संमती घेऊनच करा. तिच्या माहिती/संमतीशिवाय हे करू नका. तिने संमती दिली तरी तिच्या एकूण सुरक्षिततेचा विचार करूनच मग पाऊल टाका.
कारवाईस तिची संमती असल्यास
- मदत करू इच्छिणा-या नातेवाईकांचे पत्ते (असल्यास फोन) नोंदवून ठेवा.
- स्थानिक महिला मंडळाची मदत घ्या. अशा मंडळांना पोलिसी कारवाईचा अनुभव असतो, ते मार्गदर्शन मोलाचे ठरते.
- कारवाई करताना तिला आणखी त्रास होणार नाही याची दक्षता घ्यायला हवी.
कारवाईला ती राजी नसेल तर
- स्वसंरक्षणाचे हे मार्ग/युक्त्या तिला सांगून ठेवा.
- मारहाण व्हायची लक्षणे ओळखून सावध राहायला शिकवा.
- जवळचे नातेवाईक किंवा चांगली शेजारी माणसे यांना कल्पना देऊन ठेवावी.
- मारहाणीच्या वेळी दडायला जागा शोधून ठेवणे बरे (उदा. घरातली एखादी खोली आतून बंद करून घेणे, शेजा-याचे घर, इ.)
- असे दडून राहणे शक्य नसेल तर एखाद्या कोप-यात भिंतीकडे तोंड करून दबून बसणे, हाताने डोक्यावरचा मार झेलणे, जास्तीत जास्त मार पाठीवर घेणे.
- स्वसंरक्षणासाठी स्वत: प्रतिकार करणे पूर्ण कायदेशीर आहे. भले यामुळे त्याला इजा झाली तरी चालेल.
- सुटकेशिवाय मार्ग नाही असे वाटत असेल तर एखादी पिशवी आधीच तयार ठेवणे, त्यात एक दिवसाचे कपडे, लागणा-या वस्तू नातेवाईक-मित्रांचे पत्ते, प्रवासाचे पैसे, एखादा बिस्किटाचा पुडा वगैरे वस्तू भरून ठेवणे.