Medicine Law Icon आरोग्य कायदा
अनैसर्गिक मृत्यू

आपल्याकडे अपघातांचे, आत्महत्येचे व खुनांचे प्रमाण पुष्कळच आहे. स्त्रियांमध्ये जळून, बुडून, विष खाऊन मरणा-या स्त्रियांचे प्रमाण खूप आहे. मात्र हा खून आहे की आत्महत्या की अपघात असा प्रश्न नेहमीच पडतो. यामुळे संबंधित नातेवाईकांना यातना सहन कराव्या लागतात.

बुडणे, जळणे, विष खाणे या तीन्ही बाबतींत प्रत्यक्ष वैद्यकीय तपासणीत (पोस्टमॉर्टेम-पोटफाडी) अपघात, खून की आत्महत्या हे कळायला फारसा मार्ग नसतो. इतर पुराव्यानेच (उदा. प्रत्यक्ष साक्षीदार) हे सिध्द करावे लागते. मृत्यू कशाने आला एवढेच काय ते वैद्यकीय तपासणीत कळू शकते. मात्र मारहाणीच्या खुणा दिसत असल्यास खुनाचा संशय येणे साहजिक आहे. नवविवाहित (सात वर्षापर्यंत) स्त्रियांच्या मृत्यूची प्रत्येक घटना खून म्हणून तपासावी अशी कायद्यात तरतूद आहे. शासनाने नोंद केलेल्या स्त्रीसंघटनाही चौकशीत मदत करू शकतात.

रुग्णालयात दाखल केल्यावर 24 तासाच्या आत मृत्यू आल्यास व कारण स्पष्ट नसल्यास मृत्यू संशयास्पद धरावा लागतो.

गळफास देखील खून, आत्महत्या या दोन्ही प्रकारांत असतो. दोरीचे वळ गळयाच्या घाटीच्या खाली असतील तर तो बहुधा खून असतो. माणूस स्वतःचे नाक, तोंड दाबून आत्महत्या करणे शक्य नसते, म्हणून गुदमरून मृत्यू आल्याचे सिध्द झाले आणि दोरीचे, कपडयाचे वळ नसतील तर खुनाची शक्यता जास्त असते. काठया, कु-हाडी वगैरे वस्तूंनी मारहाण झाली असल्यास खून सिध्द करणे त्या मानाने सरळ असते.

मृत्युशय्येवरची शुश्रुषा

काही रुग्णांच्या बाबतीत वाचवण्यासाठी काही करता येणे शक्य नसते अशांना घरीच कशी मदत करता येईल याचा विचार केला पाहिजे. त्या आजारास योग्य आहार, स्वच्छता, किरकोळ तक्रारींवर उपचार (उदा. बध्दकोष्ठासाठी एनिमा) वगैरे गोष्टी करण्यासारख्या असतात. नातेवाईकांना बहुधा परिस्थितीची कल्पना असतेच. आपण यासाठी काही प्रशिक्षण घेतले तर फारच उपयुक्त होईल.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.