पूर्वी ज्याला मज्जासंस्था म्हणत त्याला आता चेतासंस्था असे नाव आहे. मेंदू, चेतारज्जू आणि नसा (म्हणजे चेतातंतूंचे गट्ठे) हा आपल्या शरीरातला अत्यंत नाजूक व गुंतागुंतीचा भाग आहे. शरीरातल्या सर्व क्रियांवर याचे नियंत्रण असते. या संस्थेच्या आजारात शरीराच्या इतर कोठल्या ना कोठल्या तरी भागावर परिणाम होतोच. म्हणून मेंदूचा एखादा भाग आजारी वा बिघडला आहे हे शरीरावरच्या दुष्परिणामांवरून बहुधा ओळखता येते. उदा. मेंदूत रक्तस्राव झाला तर अर्धांगवायू होतो. चेतासंस्थेच्या आजारांत अनेक प्रकार व कारणे आहेत. आपल्याला चेतासंस्थेच्या ब-याच भागांचे हळूहळू ज्ञान होत आहे.
चेतासंस्थेच्या आजारांचे परिणाम निरनिराळया प्रकारचे असतात. एखाद्या विशिष्ट भागावर मुंग्या येणे, झटके, बधिरपणा, शक्ती कमी होणे, लुळेपणा, अनैच्छिक हालचाली, स्नायू ताठ होणे, स्नायू निकामी व लहान होत जाणे, एखाद्या विशिष्ट इंद्रियाचे कामकाज बिघडणे किंवा बंद पडणे (उदा. दृष्टी जाणे, बहिरेपणा, इ.) तोल जाणे, स्मरणशक्ती, विचारशक्ती, बोलणे, इत्यादी मानसिक, बौध्दिक, भावनिक क्रिया मंदावणे किंवा बंद पडणे, इत्यादी अनेक प्रकारचे दुष्परिणाम दिसू शकतात.
या मुख्य परिणामांशिवाय इतर संस्थांच्या आजारात दिसणारी लक्षणे व चिन्हे (उलटया, ताप, बेशुध्दी, इ.) दिसू शकतात. आजाराची सुरुवातीपासूनची वाटचाल आणि दिसणारे परिणाम याचा सांगोपांग विचार करूनच रोगनिदान करण्यात येते. निदानासाठी खास तपासणीचा आधार घ्यावाच लागतो. (उदा. पाठीच्या कण्यातल्या चेतारज्जूच्या भोवतालच्या पोकळीतील पाणी काढून तपासणे, क्ष-किरण चित्र, स्कॅन, इ.) चेतासंस्थेचे आजार हा खास तज्ज्ञांचा विषय आहे. पण निवडक आजारांची सर्वांनाच माहिती असणे आवश्यक आहे.
चक्कर किंवा घेरी येणे हे आपल्या सर्वांच्या पाहण्यात असते. चक्कर येऊन पडल्यानंतर तात्पुरती बेशुध्दीही येऊ शकते. पण ब-याच वेळा आपोआप बरे वाटते.
चक्कर येणे हा शब्द मोघमपणे वारंवार वापरला जात असतो. आधुनिक वैद्यकशास्त्राप्रमाणे त्याचे दोन भेद लक्षात घेणे आवश्यक आहे. ‘चक्कर येणे’ म्हणजे घेरी किंवा गरगरणे. म्हणजे त्या व्यक्तीस स्वतः किंवा आजूबाजूचे जग गरगर फिरत आहे अशी भावना होणे. काही आजारांमध्ये असे गरगरणे किंवा चक्कर येणे एवढयापुरताच त्रास मर्यादित असतो. पण काही आजारांमध्ये मात्र डोळयासमोर अंधारी येणे, उभे असेल तर खाली पडणे, बेशुध्दी इथपर्यंत घटनाक्रम जातो. नुसती गरगरण्याची भावना असेल (केवळ चक्कर) तर अंतर्कर्ण किंवा त्याच्याशी संबंधित मेंदूचा भाग यांचे आजार असतात. प्रवास ‘लागणे’ हा प्रकार यातच येतो. कारण बस किंवा बोट लागण्याचा त्रास हा अंतर्कर्णाच्या संवेदनशीलतेमुळेच निर्माण होतो.
‘चक्कर’पेक्षा वेगळा प्रकार म्हणजे डोळयापुढे अंधारी येऊन खाली पडणे किंवा जागच्या जागी बेशुध्द होणे. याचे मुख्य कारण म्हणजे मेंदूचा रक्तपुरवठा अचानक कमी पडणे. ही घटना अनेक कारणांमुळे घडते.
यापैकी कारणे असतील तर उभी असलेली व्यक्ती खाली पडते. पण खाली पडल्यावर हृदय व मेंदू एकाच पातळीवर येऊन मेंदूचा रक्तप्रवाह लगेच सुधारतो. यामुळे ती व्यक्ती तात्पुरती बेशुध्दी संपून लगेच सावध होते. काहीवेळा अचानक खाली पडलेल्या व्यक्ती काही क्षणानंतर आपोआप सावध कशा होतात हे यातून समजते. अशी व्यक्ती चक्कर येताना खाली पडत असल्यास तिला उभे धरून ठेवणे चुकीचे आहे. कारण यामुळे मेंदूस रक्त पोहोचणार नाही. याऐवजी या व्यक्तीस हलकेच सुरक्षित आडवे होऊ देणे महत्त्वाचे आहे. हा महत्त्वाचा प्रथमोपचार आहे.
पण काही आजारांमध्ये केवळ आडवे झाल्यामुळे रक्तप्रवाह सुधारण्याची फारशी शक्यता नसते. रक्तस्राव, हृदयविकाराचा झटका, शोष (शरीरातले पाणी कमी होणे), मेंदूत रक्तस्राव होऊन किंवा रक्तवाहिनी अरुंद होऊन रक्तप्रवाह थांबणे. या आजारांमध्ये मेंदूचा रक्तपुरवठा कमी राहिल्याने ही स्थिती दीर्घकाळ राहते.
इतर काही आजारांमुळे चक्कर येण्यासारखी भावना दिसते. रक्तपांढरी, खूप ताप, दृष्टिदोष, रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होणे (उपास, मधुमेहात जादा इन्शुलिन दिल्याने किंवा इतर कारणाने), इत्यादींमुळे चक्कर येणे किंवा त्यासारखी भावना होते.
सोबतच्या रोगनिदान तक्त्याचा आणि मार्गदर्शकाचा आधार घेऊन रोगाविषयी अंदाज बांधता येईल. चक्कर येण्यामागची अनेक कारणे डॉक्टरांनीच हाताळणे आवश्यक आहे. म्हणून तात्पुरती मदत केल्यानंतर रुग्णास योग्य ठिकाणी तपासणीसाठी पाठवणे आवश्यक आहे.
यापैकी ‘प्रवास लागणे’, उपवास, अपचन, पोटातील गॅस, उष्माघात ही कारणे असतील तर उपचार तुम्ही स्वतः करू शकाल.
रक्तपांढरी (जास्त प्रमाणात), हृदयविकार, अंतर्कर्णाचे आजार, मेंदूचे आजार, मानसिक आजार, क्षयरोगविरोधी औषधांचा दुष्परिणाम, काचबिंदू, मधुमेह, इत्यादी कारणांसाठी योग्य तज्ज्ञाकडे पाठवणे आवश्यक आहे.
चक्कर आणि अंधारी येणे (तक्ता (Table) पहा)
सोबतचा रोगनिदान मार्गदर्शक वापरताना पुढील काही मुद्दे लक्षात घ्यावेत :
मांडीच्या हाडाचा अस्थिभंग असेल तर वरवर मांडी फार न सुजता आत एक-दोन लिटर रक्तस्राव होऊ शकतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अस्थिभंगाच्या इतर खाणाखुणा (हालचाल न करणे, वेदना, इ.) दिसतील.
छातीतला रक्तस्राव असेल तर दम लागणे, छातीच्या त्या बाजूच्या भागाची श्वसनाबरोबर हालचाल न होणे ह्या खुणा दिसतात. याबरोबरच क्वचित खोकल्यातून रक्तस्राव असेल.
उदरपोकळीतील रक्तस्राव असेल तर पोटात वेदना, दुखरेपणा, कडकपणा जाणवेल, (पोटाचा आकार वाढण्याची अपेक्षा चूक आहे)
गरोदरपण – मग ते दोन-तीन महिन्यांचे का असेना- असेल तर अंतर्गत रक्तस्रावाची शक्यता लक्षात घेतली पाहिजे. हा रक्तस्राव योनिमार्गे दिसेलच असे नाही.