Nutrition Service Icon पोषणशास्त्र
अन्नपदार्थांचे त्रिदोषांवरचे परिणाम

Dal
कफ/वात/पित्त या त्रिदोषांवर निरनिराळया अन्नपदार्थांचे वेगवेगळे परिणाम होतात. उदा. दूध, भात इ. पदार्थ कफ वाढवतात. तूरडाळ, चहा इ. पदार्थ पित्त वाढवतात . हरबरा, भाजके शेंगदाणे इ. वात वाढवतात. खरे म्हणजे लोकांमध्ये या कल्पना प्रचलित आहेत आणि त्यांचा अनुभवही येतो. उदा. बेसन खाल्ल्यावर पोटात वायू होतो, तसेच विष्ठा कडक होते.

शीत, उष्ण, इ. परिणाम

Red Masala काही पदार्थ शरीराला ‘थंड’ पडतात तर काही ‘गरम’ असा समज आहे. मात्र पदार्थाच्या प्रत्यक्ष तापमानाशी याचा संबंध नाही. ज्या अन्नपदार्थांमुळे शरीरात गरमपणा, घाम, जळजळ, तहान इ. परिणाम दिसतात त्यांना ‘उष्ण’ (गरम) म्हणतात. मसालेदार तिखट पदार्थानंतर हा अनुभव बहुतेकांना येतो. याउलट धने, कोथिंबीर वगैरे पदार्थ ‘थंड’ असतात. या कल्पनांचा आपण प्रत्यक्ष अनुभव नेहमी घेतो.

रस

Ayurvedic Juice आयुर्वेदानुसार अन्नपदार्थात विविध रस असतात. इथे रस म्हणजे ‘चव’ या अर्थाने पाहिले पाहिजे. मधुर, कडू, तिखट, खारट, तुरट, आंबट असे 6 विविध रस असतात. प्रत्येक रसाचा वेगळा परिणाम होतो.

मधुर, आंबट, तुरट पदार्थ सर्वसाधारणपणे पोषक असतात. त्याने बळ, वजन इ. वाढते.

तिखट,खारट पदार्थांनी वजन वाढत नाही पण विशिष्ट परिणाम होतात. उदा. तिखटाने नाक वाहते, घाम येतो, इ.

कडू पदार्थांनी ‘औषधी’ परिणाम होतात, पण जास्त घेतले तर विषारी परिणाम होतात.

तुरट पदार्थांनी कोरडेपणा, आक्रसणे इ. परिणाम जाणवतात. उदा. दंतमंजनांमध्ये तुरट पदार्थ असतो. त्यामुळे दात-हिरडया आवळल्याप्रमाणे व स्वच्छ-कोरडया झाल्यासारखे वाटते.

गुरू-लघु

Groundnut अन्नपदार्थ पचायला जड (गुरू) किंवा हलके (लघु) असतात. मांस, म्हशीचे दूध, डाळी इ. पचायला जड असतात; याउलट लाह्या, मूग, ताक, शेळीचे दूध इ. हलके असतात. या पध्दतीने विचार करून अन्नपदार्थाचे जेवणातले प्रमाण ठरवायला पाहिजे. लहान मुलांना आणि वृध्दांना पचायला हलके पदार्थ द्यावेत तारुण्यात जड पदार्थही पचू शकतात. तसेच रात्रीच्या जेवणात हलके (लघु) पदार्थ असावेत.

स्निग्ध आणि रूक्ष

Ghee ही तपासणी सोपी आहे. खालीलपैकी एक पध्दत वापरता येईल.
अन्नपदार्थ कोरडे (रूक्ष) किंवा ओले-तेलकट (स्निग्ध) असतात. शरीरावर त्यांचा तसा परिणाम होतो. उदा. भाजलेले शेंगदाणे रूक्ष असतात त्यामुळे पचनसंस्था बिघडते आणि बध्दकोष्ठ होण्याची शक्यता वाढते. बेसनपीठही रूक्ष असते. याउलट कांदा, लसूण, फळे, भाज्या, तेल, तूप इ. स्निग्ध असतात. रूक्ष पदार्थांनी तहान लागते.

निरनिराळया अन्नपदार्थांचे असे विविध गुणधर्म सोबतच्या तक्त्यात दिले आहेत. आहार-जेवण निवडताना प्रकृती लक्षात घेऊन अन्नपदार्थ निवडले पाहिजेत.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.