भारतात मोतीबिंदू, दृष्टीदोष आणि बुबुळाला फूल पडणे ह्या प्रमुख समस्या आहेत. 50 वर्षाच्या वरच्या वयोगटात सुमारे 8% लोकांना मोतीबिंदू असतो. शाळकरी वयातल्या 7% मुलांना काही ना काही दृष्टीदोष असतो. एकूण लोकसंख्येत शंभरात एकाला तरी काही ना काही दृष्टीदोष असतो.
मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि बुबुळ कलम शस्त्रक्रियेची देशात फार मोठी गरज आहे. सुमारे 20 लाख मोतीबिंदू आणि 30 लाख बुबुळ कलम शस्त्रक्रियांची वाट पहात आहेत. छोटया उद्योगधंद्यांचे प्रमाण वाढल्यामुळे डोळयांच्या जखमांचे प्रमाणही वाढले आहे.
मोतीबिंदू म्हणजे डोळयाच्या बाहुलीतले भिंग नेहमीप्रमाणे काचेसारखे पारदर्शक न राहता तांदळाच्या दाण्यासारखे पांढुरके होते. यामुळे प्रकाशकिरण आत शिरायला अडथळा होतो.
मोतीबिंदू सहसा उतारवयात येतो. मधुमेहात तो लवकर वयात येऊ शकतो.
मोतीबिंदू आल्यावर नेहमीची तक्रार म्हणजे अंधुक दिसणे. रात्री गाडी चालवतांना समोरचा लाईट जास्त त्रासदायक होतो. डोळयांसमोर काळे वर्तुळ दिसते. दिवसा (जास्त प्रकाशात) कमी दिसते. पण संध्याकाळी (कमी प्रकाश असतो तेव्हा) दिसण्यात थोडी सुधारणा होते, इत्यादी. एकाऐवजी अनेक प्रतिमा दिसणे हे पण एक लक्षण आहे. मोतीबिंदू किती पिकला आहे यावर तक्रारींचे स्वरूप अवलंबून असते.
मोतीबिंदू लवकरात लवकर शस्त्रक्रिया करून काढून त्याऐवजी डोळयातच कायमचे भिंग बसवले जाते. मात्र औषधाने मोतीबिंदू घालवणे शक्य नाही.
मोतीबिंदू होऊ नये म्हणून जेवणात लसूण भरपूर असावा असे काही अभ्यासकांचे म्हणणे आहे. तसेच आपल्या देशात उन्हामुळे मोतीबिंदू जास्त प्रमाणात व लवकर होतो. उन्हात काम करताना गॉगल लावणे चांगले. डोळयावर सावली येईल अशी टोपी वापरणे हा पण चांगला प्रतिबंधक उपाय आहे. संगणक व टीव्ही च्या किरणांमुळे मोतीबिंदू लवकर होतो. CD स्क्रीनमुळे हा दुष्परिणाम टळतो.
मोतीबिंदूची जुनी शस्त्रक्रिया आता पूर्णपणे बदलली आहे. पूर्वी मोतीबिंदू काढून चष्मा दिला जात होता. आता मोतीबिंदूच्या जागी नवीन कृत्रिम भिंग बसवले जाते. या भिंगाने चष्म्याची गरजच राहिली नाही. या शस्त्रक्रियेच्या दोन पध्दती आहेत.
यात बुबुळाच्या परीघाला छेद घेऊन आतला मोतीबिंदू अख्खा काढतात. या जागी आता नवीन कृत्रिम भिंग बसवतात. या शस्त्रक्रियेत छेद मोठा असल्यामुळे टाके टाकावे लागतात. हे टाके जखम भरायला थोडे दिवस लागतात. ही पध्दत सर्वत्र प्रचलित आहे. विशेष करून सरकारी रुग्णालयात हीच पध्दत आहे. ही पध्दत खाजगी रुग्णालयातही खूप स्वस्त आहे. (अंदाजे खर्च 10000 रु.)
यामध्ये छेद फक्त 3-5 मि.मी.चा असतो. यात एक सूक्ष्म हत्यार फिरवून मोतीबिंदूचा भुगा करतात व तो द्रवरुप करून शोषून घेतात. यामुळे मोतीबिंदू लहान छेदातून काढता येतो. मोकळया जागी कृत्रिम भिंग बसवतात. हे भिंग घडी करून आत सरकवले जाते व आत ते उघडते. या तंत्रामुळे छेद लहान असतो व जखमेला टाके लागत नाहीत. यात आत आणखी नवीन उपकरणे आली असल्याने छेद आणखी थोडा लहान झाला आहे. टाके नसल्यामुळे जखम लवकर भरते. शस्त्रक्रियेनंतर लगेच घरी जाता येते. या शस्त्रक्रियेला जास्त खर्च येतो. (अंदाजे रु.20000)
हे भिंग म्हणजे एक वरदानच आहे. हे उच्च प्रतीच्या प्लास्टिकचे बनवतात. यात अनेक प्रकार आहेत. त्यातल्या आधुनिक प्रकारांमुळे नैसर्गिक भिंगाच्या सारखी लवचीकता आली आहे. यामुळे आता लघुदृष्टी किंवा दीर्घदृष्टीसाठी वापरावा लागणारा चष्मा किंवा कॉन्टॅक्ट लेन्सची गरज राहत नाही. मूळ दृष्टीदोषाचा विचार करून हे कृत्रिम भिंग निवडले जाते.
शस्त्रक्रियेनंतर सुमारे 97-98% लोकांना पूर्णपणे दृष्टीलाभ होतो. मात्र काहींच्या बाबतीत समस्या निर्माण होतात. विशेषत: साध्या टाक्याच्या शस्त्रक्रियेनंतर भिंगाच्या मागच्या बाजूला धुरकटपणा निर्माण होऊ शकतो. याला लेसर उपचार करावे लागतात.
काचबिंदू म्हणजे डोळयातला (नेत्रगोलातला) दाब वाढणे. ज्याप्रमाणे शरीरात रक्तदाब वाढतो त्याप्रमाणे डोळयातील दाब वाढू शकतो. असा दाब प्रमाणाबाहेर वाढला, की डोळा अचानक दुखू लागतो, दृष्टी अधू होते आणि डोळयात लाली येते. तीव्र काचबिंदू आजारात दृष्टी पूर्ण जाते.
डोळयातील दाब थोडयाशा प्रशिक्षणाने बोटाने तपासता येईल. यासाठी डोळा मिटवून वरच्या पापणीवर आपल्या दोन्ही हातांच्या तर्जनीने दाबून डोळयांतील दाबाचा अंदाज घ्यावा. मात्र नक्की निदानासाठी तज्ज्ञाकरवी तपासणी आवश्यक आहे.
काचबिंदू हा गंभीर आजार आहे. तज्ज्ञाकडून त्याचे ताबडतोब उपचार होणे आवश्यक आहे. डोळयातील दाब कमी करण्यासाठी तोंडाने घेण्याचे औषध-गोळया उपलब्ध आहेत. (असेटाझोलामाईड). पण यापैकी काही प्रकारात शस्त्रक्रिया आवश्यक असते.
फूल पडून बुबुळ निकामी झाले तर त्यावर खरा एकच उपाय म्हणजे निरोगी बुबुळ बसवणे. यासाठी जुने रोगट बुबुळ काढून टाकतात व त्या जागी निरोगी (मृत्यूनंतर काढून घेऊन) बुबुळ कलम करतात. ही शस्त्रक्रिया सोपी आहे. पण पुरेसे लोक नेत्रदान करण्यासाठी पुढे यायला हवेत.
आपण नेत्रदानाबद्दल नेत्रपेढीला कळवले, की ते संमतीपत्र भरून घेतात. मृत्यूनंतर नेत्रपेटीला (लगेच) निरोप पाठवला, की मृत व्यक्तीचे डोळे काढून सुरक्षित ठेवतात व पापण्या शिवून टाकतात. यामुळे मृतदेह कुरूप दिसत नाही. मात्र मृत्यूनंतर दोन तासांत हे काम होणे आवश्यक आहे. तोपर्यंत डोळयांवर थंड ओला बोळा ठेवावा. पाळी येईल तसे शस्त्रक्रियेसाठी 2 अंध व्यक्तींना बोलावले जाते. रुग्णाचे आतले नेत्रपटल खराब झाले असेल तर मात्र या शस्त्रक्रियेचा उपयोग होणार नाही. नेत्रदान हे अत्यंत साधे पण महत्त्वाचे मानवतावादी कर्तव्य आहे.