रोगांचा इतिहास हा माणसाइतकाच जुना आहे. थंडी आणि उष्णता, जीवजंतू, विषारी पदार्थ, अपघात, उपासमार, वय, कामधंदा या सर्वांचा बरावाईट परिणाम लक्षावधी वर्षे माणसावर होत आलेला आहे. आजारातून सुटण्यासाठी तेव्हापासून माणसाची सतत धडपड चालू आहे. ही धडपड पृथ्वीवर सगळीकडे होत राहिली. निरनिराळया लोकजीवनांत निरनिराळया उपचारपध्दती तयार झाल्या. मंत्रतंत्रापासून ते मेंदूवरच्या अवघड शस्त्रक्रियेपर्यंत आपला प्रवास झाला. ठळक अशी उदाहरणे पाहिली तर आयुर्वेद, सिध्द, होमिओपथी, ऍलोपथी (आधुनिक वैद्यक) अक्युपंक्चर (म्हणजे सुया टोचून उपचार करणे), योगचिकित्सा, निसर्गोपचार, बाराक्षार, संमोहनशास्त्र, युनानी अशी अनेक शास्त्रे आहेत. याशिवाय आदिवासी जमातींमध्ये वेगवेगळया पध्दती आहेतच.
यांतील काही पध्दतींमध्ये औषधे वापरली जात नाहीत. मात्र आयुर्वेद, युनानी, सिध्द, होमिओपथी व आधुनिक वैद्यक (ऍलोपथी) यांमध्ये औषधांचा वापर होतो. आजच्या परिस्थितीत उपचार म्हणजे औषधोपचार असे समीकरणच झाले आहे. या वाढत्या औषधवापरामुळे अनेक प्रश्नही निर्माण झालेले आहेत. औषध कंपन्यांनी आक्रमक तंत्राने औषधांचा जादा वापर डॉक्टरवर्ग व जनतेच्या गळी उतरवला आहे. वैद्यकीय क्षेत्रातला मोठा खर्च औषध विकत घेण्यातच जातो. शिवाय औषधांचे दुष्परिणामही होत असतात. म्हणून औषधांचा योग्य व काटेकोर वापर करण्यासाठी औषधशास्त्राचे पुरेसे ज्ञान औषध देणा-याला हवे. तसेच थोडेफार ज्ञान लोकांपर्यंतसुध्दा गेले पाहिजे.