गोवर हा मुख्यत: लहान मुलांमध्ये आढळणारा सांसर्गिक (विषाणू) आजार आहे. यात आधी सर्दी, खोकला, ताप आणि मग अंगावर पुरळ उठतात. निरोगी आणि धडधाकट मुलांना याचा विशेष त्रास होत नाही. कुपोषणामुळे आपल्या देशात गोवराचे अनेक दुष्परिणाम होतात आणि मृत्यूही होतात. म्हणूनच मुलांच्या महत्त्वाच्या 6 सांसर्गिक आजारांत गोवराचा समावेश केलेला आहे. (हे 6 आजार म्हणजे घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, क्षयरोग, पोलिओ आणि गोवर.) सुदैवाने गोवराविरुध्द परिणामकारक प्रतिबंधक लस उपलब्ध आहे.
पूर्वी गोवर साधारणपणे दर दोन-तीन वर्षांनी साथीच्या स्वरुपात येत असे. आता गोवर लसीमुळे साथी कमी झाल्या आहेत. आपल्या देशात गोवर मुलाच्या पहिल्या दोन-तीन वर्षे वयातच येऊन जातो, पण तो उशिराही येऊ शकतो. गोवर एकदा येऊन गेला, की जवळजवळ आयुष्यभर टिकणारी प्रतिकारशक्ती (गोवराविरुध्द) देऊन जातो. म्हणून त्या व्यक्तीला परत गोवर होत नाही. मात्र एखाद्या व्यक्तीला गोवर झालेला नसेल तर आयुष्यात कधीही तो येऊ शकतो. गोवर उशिराच्या वयात येणे जास्त त्रासदायक असते.
काही पालक मुलाला पूर्वी एकदा गोवर होऊनही (पूर्ण लक्षणांसहित) काही मुलांना पुन्हा ‘गोवर’ निघाला असे सांगतात. बहुधा हे आजार गोवरसदृश इतर विषाणूंमुळे असतात.
गोवर हा रोग एका विषाणूमुळे होतो. हा विषाणू मानवी शरीराच्या बाहेर आपल्यासारख्या उष्ण वातावरणात फार काळ तग धरू शकत नाही. पण थंड वातावरणात तो बराच काळ राहू शकतो. म्हणून हिवाळयात हा आजार जास्त आढळतो. गोवराचा रुग्ण पुरळ यायच्या चार-पाच दिवस आधी आणि नंतर इतरांना संसर्ग देतो. विषाणुप्रवेशानंतर साधारणपणे आठ-दहा दिवसांत गोवराची लक्षणे दिसू लागतात.
गोवराचे विषाणू श्वसनावाटे प्रवेश करतात. ते आधी रसग्रंथी, पांथरी, टॉन्सिल, तोंडाचा अंतर्भाग, श्वासनलिकांचे आतले आवरण, इत्यादी जागी पसरतात. सगळयात जास्त दुष्परिणाम श्वासनलिकांच्या आतल्या भागात होतात. म्हणूनच गोवरामध्ये खोकला येतो. ब-याच वेळा पुढे श्वसनसंस्थेचे आजार होऊ शकतात. त्वचेवर उठणारे पुरळ हे सूक्ष्म केशवाहिन्यांना येणा-या सुजेमुळे उठतात. कुपोषित मुलांमध्ये या सर्व दुष्परिणामांची तीव्रता वाढते. बालकाला आधीचा क्षयरोग असेल तर तो जोर धरतो. या आजाराने कुपोषणाची तीव्रता वाढते. कधीकधी विषाणूंमुळे मेंदूसूज येते.
गोवर हा मुख्यत – लहान मुलांचा आजार आहे.
शरीरात एकदा विषाणुप्रवेश झाला की 8 ते 12 दिवसांनी लक्षणे दिसतात. यात डोळे लाल होणे, सर्दी, बारीक ताप, खोकला, इत्यादी त्रास जाणवतो.
या काळात मोहरीएवढे लालसर ठिपके तोंडात गालाच्या अंतर्भागावर दिसतात. हे ठिपके म्हणजे गोवराची हमखास आढळणारी खूण आहे. पण एक-दोन दिवसांत हे ठिपके जातात. त्यामुळे रोगनिदानासाठी यावर अवलंबून राहता येत नाही. ठिपके दिसले तर मात्र गोवर आहे हे निश्चित होते.
गोवरानंतर जिवाणूसंसर्गाचे आजार होण्याची प्रवृत्ती होते. त्यामुळे न्यूमोनिया, कान दुखणे, सुजणे, फुटणे, क्षयरोग उफाळून येणे, इत्यादी त्रास होतो.
गोवराच्या विषाणूंमुळे मेंदूला सूज येऊन मूल दगावू शकते. गोवराचा मुख्य दुष्परिणाम म्हणजे कुपोषण आणि न्यूमोनिया. न्यूमोनियामुळे मूल दगावू शकते.
या विषाणूंविरुध्द कोठलीही मारक औषधे नसल्याने केवळ ताप कमी करण्यासाठीच औषधे द्यावीत, यासाठी पॅमाल चांगले.
न्यूमोनिया झाल्यास (उदा. दम लागणे, जास्त ताप, इ.) कोझाल, मॉक्स यांपैकी औषध चालू करून तज्ज्ञाकडे पाठवावे. न्यूमोनिया, कुपोषण, इत्यादी त्रास असल्यास फार काळजी घ्यावी लागते.
बाळाला भुकेप्रमाणे खायला देत राहावे. काही मुलांची भूक मंदावते. अशा मुलांच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देऊन कुपोषण टाळावे लागते.
आर्सेनिकम,बेलाडोना, ब्रायोनिया, चामोमिला, ड्रॉसेरा, फेरम फॉस मर्क्युरी सॉल, पल्सेटिला, -हस टॉक्स, सिलिशिया, स्ट्रॅमोनियम, सल्फर
गोवराविरुध्द सर्वात चांगला उपाय म्हणजे प्रतिबंधक लस. ही लस शासकीय आरोग्यसेवेतूनही मिळते. बाळाच्या शरीरात आईकडून आलेली प्रतिकारशक्ती सहा महिनेपर्यंत असते. म्हणून ही लस पहिल्या सहा महिन्यांनंतर 15 व्या महिन्यांत बाळाला द्यावी. याचे इंजेक्शन असते. लस टोचल्यावर 6 ते 10 दिवसांत थोडा ताप, अंगावर लाली, किंवा पुरळ येतात. हे सर्व एक-दोन दिवसच टिकते.
लसटोचणीनंतर आठवडयाभरात प्रतिकारशक्ती निर्माण होते. कधीकधी एखादा झटका येण्याची शक्यता असते; पण बहुतेक मुलांना काहीही त्रास होत नाही. ही लस अर्धवट मारलेल्या विषाणूंची बनलेली असते. म्हणून शीतकपाटात ठेवल्याशिवाय लस टिकत नाही हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. या लसीमुळे कायमची प्रतिकारशक्ती निर्माण होते.
एम.एम.आर. नावाच्या लसीत गोवर, जर्मन गोवर व गालगुंड या तीन आजारांविरुध्द लस एकत्र मिळते.
गोवरप्रतिबंधक लस वापरून गोवर टाळणे हे फार महत्त्वाचे आहे. असंख्य मुलांचे आजारपण, मृत्यू यामुळे टाळता येतील.
गोवरासारखेच दिसणारे काही सौम्य आजार आढळतात. गोवराची लस दिली असली तरी हे आजार होण्याची शक्यता शिल्लक राहते. अशा वेळी आपल्याला लसीबद्दल शंका घेणे साहजिक आहे.
गोवर-लस दिली असली तरी काही थोडया लोकांना गोवरच्या साथीत विषाणूंचा संसर्ग होतो. यामुळे गोवरासारखाच सौम्य आजार होऊ शकतो.
हा गोवरासारखाच पण अगदी सौम्य आजार असतो, म्हणून याला ‘लहान गोवर’ असेही म्हणता येईल. हा आजार विषाणूंमुळेच होतो. मुख्यत: मुलांनाच (5 ते 9 वर्षे) होतो. अंगावर पुरळ उठायच्या आधी एक आठवडा आणि नंतर एक आठवडयापर्यंत इतरांना याचा संसर्ग होऊ शकतो. एकदा संसर्ग झाला की पूर्ण प्रतिकारशक्ती येत असल्याने हा आजार पुन्हा होऊ शकत नाही.
विषाणुप्रवेशानंतर सुमारे दोन-तीन आठवडयांनी याची लक्षणे उमटतात. सहसा एक-दोन दिवस किरकोळ सर्दीताप होऊन पुरळ येतात. मात्र कधीकधी पुरळ येतच नाहीत. पुरळ आले तर ते बहुधा चेहरा, छाती, पोट, इत्यादी भागांवर येतात. चेहे-यावर पुरळ असणे हे निदानाच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे. हे पुरळ रंगाने लालसर असतात. ते एक-दोन दिवसांतच पूर्णपणे जातात.
याबरोबर गळयात अवधाण येते. हे अवधाण आठवडाभर आधी येऊ शकते. पुरळ गेल्यावर हे अवधाण दोन-तीन आठवडे टिकू शकते. गळयामागच्या आणि कानामागच्या रसग्रंथीही यामुळे सुजतात. कधीकधी सांधेदुखी, नसांना सूज, इत्यादी त्रासही जाणवतो. पण बहुधा हा आजार आपोआप जातो व विशेष त्रास होत नाही. गरोदरपणात मात्र याचे घातक परिणाम होतात.
गरोदरपणात जर जर्मन गोवर हा आजार झाला तर विषाणू गर्भात शिरून अनेक प्रकारचे दुष्परिणाम होतात. जन्मजात मोतीबिंदू, काचबिंदू, हृदयाचे दोष, मूकबधिरता, नेत्रपटलाचे आजार,रक्तस्रावाची प्रवृत्ती, मतिमंदत्व, अस्थिसंस्थेचे दोष, चेतासंस्थेचे दोष, इत्यादी अनेक दुष्परिणाम होतात. म्हणून जर्मन गोवर हा आजार टाळणे फार महत्त्वाचे आहे. गर्भारपणात सुरुवातीस हा आजार झालाच तर डॉक्टर गर्भपाताचा सल्लाही देतात, कारण याचे गर्भावर गंभीर दुष्परिणाम दिसतात.
हा आजार टाळण्यासाठी लस उपलब्ध आहे, पण ती अजून सार्वजनिक आरोग्यसेवेत समाविष्ट केलेली नाही. एम.एम.आर. नावाच्या लसीत या रोगाविरुध्दची लसही असते. एकदा लस दिल्यावर कायमची प्रतिकारशक्ती येते. पण लस महाग असते. (एक डोस 45 ते 50 रू.)