निरोगी शरीर आणि आनंदी मन ही आदर्श स्थिती. या आदर्श स्थितीपासून ढळणे म्हणजे आजार. तरीही निरोगीपणा आणि आजार यांच्यामधली सीमारेषा अस्पष्ट आहे. म्हणजे एखाद्याला सांगता येण्यासारखा कसलाच आजार नसला तरी तो पूर्णतः निरोगी आहे असे लगेच म्हणता येत नाही. पांढरे आणि काळे या दोघांमध्ये करडा रंग असतोच. तसेच हे असते.
या निरोगी, आनंदी स्थितीपासून शरीर-मन का ढळते? थोडक्यात, आजारांची कारणे काय? रोगांची प्रत्यक्ष कारणे अनेक प्रकारची आहेत. काही रोगांची निश्चित कारणे अजूनही अज्ञात आहेत. शिवाय प्रत्येक उपचार पध्दतीने आजारांची वेगवेगळी कारणमीमांसा मांडली आहे. (उदा. आयुर्वेदातली ‘त्रिदोष’ पध्दती). आपण या प्रकरणात आधुनिक वैद्यकविज्ञानाप्रमाणे आजारांची कारणपरंपरा पाहू या.
आपण खोल आणि व्यापक विचार केला तर आजारांची कारणे तीन पातळयांवर आहेत असे दिसते. या तीन पातळयांवरची कारणमीमांसा आपण खरुज या उदाहरणाने समजावून घेऊ या.
खरजेचे प्रत्यक्ष जीवशास्त्रीय कारण म्हणजे खरजेच्या किडयाने त्त्वचेत घर करून प्रजा वाढवणे. उपचार करताना आपण बहुधा या जीवशास्त्रीय पातळीवर विचार करतो. म्हणजे खरजेच्या किडयाला आपण मारक औषध वापरतो. अनेक आजारांमध्ये उपचारांच्या बाबतीत डॉक्टर जीवशास्त्रीय पातळीवरच काम करतात. शारीरिक तसेच मानसिक आजारांच्या बाबतीतही वैद्यकशास्त्र जीवशास्त्रीय पातळीवरच उपचार करते.
या खरजेचेच उदाहरण घेऊन आणखी खोलवर कारणे शोधू या. असे लक्षात येईल की अस्वच्छता, अपुरी घरे, इत्यादी संसर्गाला अनुकूल अशा सामाजिक गटांमध्येच खरूज जास्त आढळते. खेडी, झोपडपट्टया हेच खरजेचे आश्रयस्थान आहे. खरजेमागे वैयक्तिक व सामूहिक स्वच्छतेचा अभाव, अज्ञान व आरोग्याला प्रतिकूल चालीरीती (उदा. एकमेकांचे कपडे वापरणे), इत्यादी सामाजिक व सांस्कृतिक पातळीवरची कारणपरंपरा असते. जीवनमान-राहणीमान अनेक आजारांना कारणीभूत ठरते.
पण खरजेसाठी याहीपलीकडे जाऊन पाहणे आवश्यक आहे. स्वच्छतेसाठी पुरेशा पाण्याचा अभाव, निकृष्ट राहणीमान, सोयीस्कर आरोग्य सेवांचा अभाव आणि जगण्याच्या जिकिरीपुढे आरोग्याकडे दुर्लक्ष ही सर्व राजकीय, आर्थिक परिस्थिती हे खरजेमागचे मूळ कारण आहे असे म्हणता येईल.
तीनही पातळयांवर विचार करू या
उपचार करताना आपण जीवशास्त्रीय पातळीवरून, फार तर सामाजिक-सांस्कृतिक पातळीवरच्या कारणांपर्यंत जातो (उदा. खरजेच्या औषधाबरोबर स्वच्छतेचा सल्ला देणे, इ.) पण आर्थिक-राजकीय कारणांवर व्यक्तिशः आपला निरुपाय असतो. असे असले तरी या व्यापक कारणपरंपरेची जाणीव असणे आवश्यक आहे.
या जाणिवेने पाहिल्यास आज आपल्यासमोर दिसणा-या अनेकविध आरोग्यसमस्यांची पाळेमुळे आपल्याला स्पष्ट दिसायला लागतील. बहुतेक सांसर्गिक आजार, व्यवसायजन्य आजार, हृदयविकार, कुपोषण, रस्त्यावरचे अपघात, अनेक प्रकारचे कर्करोग, बाळंतपणातले मातांचे मृत्यू, बालमृत्यू एवढेच काय पण शेतात होणारे सर्पदंश, इत्यादी सर्व आजारांमागे नुसती जीवशास्त्रीय कारणे नसतात. त्यामागे व्यापक आर्थिक, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक कारणपरंपरा आहे हे सहज दिसेल. काही आजारांच्या बाबतीत मात्र फक्त जीवशास्त्रीय कारणेच सापडतील (उदा. सर्दी-पडसे, कोड, काही जन्मजात दोष, इ.) पण बहुतेक आजारांमागे जीवशास्त्रीय घटकांबरोबर व्यापक सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक वास्तवता कारणीभूत असते. या पुस्तकात अनेक ठिकाणी आपण तीनही पातळयांवर विचार करणार आहोत.
मात्र या प्रकरणात तरी आपण मुख्यतः जीवशास्त्रीय कारणमीमांसा तपासणार आहोत. पुढील विवेचनात आपण जीवशास्त्रीय कारणांचा थोडा व्यापक विचार करणार आहोत.