शरीराच्या गरजेइतका प्राणवायू मिळत नसला तर श्वसनसंस्था व हृदय जास्त काम करून प्राणवायू पुरवण्याची धडपड करतात. यालाच आपण ‘दम लागणे’ म्हणतो. यात श्वास जोरात, वेगाने व खोलवर चालतो व हृदयाची धडधड जाणवते.
दम लागण्याचे निश्चित कारण शोधण्यासाठी तज्ज्ञाकडे पाठवा.
पायावर सूज हे तसे क्वचित आढळणारे लक्षण आहे. या लक्षणांमागे अनेक शरीरसंस्थांचे निरनिराळे आजार असू शकतात. सोबतच्या तक्त्यात व मार्गदर्शकात पाहून आपल्याला त्याचे चांगले निदान करता येईल.
पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सूज एका पायावर आहे, की दोन्ही पायांवर आहे हे लक्षात घ्या. सूज एका पायावर असेल तर बहुधा ‘स्थानिक’ स्वरूपाचे म्हणजे त्या पायाशी संबंधित आजार असतात. सूज दोन्ही पायांवर असेल तर, गर्भाररोग, हृदय, यकृत, मूत्रपिंड यांचे आजार, कुपोषण-रक्तपांढरी, अन्नविषबाधा किंवा हत्तीरोगाची असते. म्हणून दोन्ही बाजूंस सूज असेल तर तज्ज्ञाकडे पाठवणे आवश्यक आहे हे लक्षात घ्या. या सर्व आजारांची थोडीशी माहिती या पुस्तकात प्रकरणाप्रमाणे दिली आहे.
गर्भाररोग म्हणजे गरोदरपणात पायावर सूज येणे, लघवीत प्रथिने येणे, इ. लक्षणचिन्हांनी ओळखला जाणारा आजार. हा आजार गंभीर आहे, म्हणून वेळीच तज्ज्ञाकडे पाठवणे आवश्यक आहे.
सुजलेल्या भागावर दाबून खड्डा पडतो की नाही हे तपासणे हा पुढचा महत्त्वाचा मुद्दा. यासाठी पावलावर किंवा घोटयावर अंगठयाने जोराने दाबून पहा. बोट काढल्यावर खड्डा हळूहळू भरून येत असेल तर ही सूज ‘पाणी जमून’ आलेली आहे हे निश्चित. दोन्ही पायांवरची सूज असेल तर सर्व संबंधित आजारांत बोटाने दाबून खड्डा पडतो. म्हणजेच दोन्ही पायांवरची सूज ही बहुधा ‘पाणी जमून’ येते.
एका पायावरच्या पाणी जमून येण-या (म्हणजेच खड्डा पडणा-या) सुजेमागे प्रथमावस्थेचा हत्तीरोग, जंतुदोष, प्राणिदंश (उदा. सापाचा दंश), वावडे आणि त्या बाजूच्या रक्तप्रवाहात अडथळा (उदा. नीला बंद होणे) ही कारणे असतात. यांतले जंतुदोष, वावडे, हत्तीरोगाची प्रथमावस्था यांवर आपण प्राथमिक उपचार करू शकतो.
एका पायावरची खड्डा न पडणारी (म्हणजे घट्ट) सूज असेल तर तज्ज्ञाकडे पाठवणे आवश्यक आहे.
पायावरच्या सुजेमागे अनेक गंभीर कारणे असतात. तरी जंतुदोष व हत्तीरोगाच्या संसर्गाच्या प्रदेशात ही सर्वात जास्त प्रमाणात आढळणारी कारणे आहेत. त्यावर आपण प्राथमिक उपचार करू शकतो. मात्र रोगनिदान करूनच उपचार करावा.