/tantrika tantra icon चेतासंस्थेचे आजार (मज्जासंस्था) मानसिक आरोग्य आणि आजार
धनुर्वात

धनु म्हणजे धनुष्य आणि धनुर्वात म्हणजे आकडीमध्ये धनुष्यासारखा बाक येणे. हा आजार विशिष्ट जीवाणूंमुळे होतो. या जीवाणूंच्या विषामुळे चेतासंस्थेवर परिणाम होऊन झटके येतात. लसटोचणीचा प्रसार व्हायच्या आधी या रोगाने असंख्य बळी जात. यात अगदी नवजात बालकापासून प्रौढांपर्यंत सर्वांना धोका होता. आता मात्र प्रतिबंधक लसटोचणीच्या प्रसारामुळे धनुर्वाताचे प्रमाण नगण्य झाले आहे.

रोग कसा होतो

धनुर्वाताचे जीवाणू मातीमध्ये सगळीकडे असतात. प्राण्यांच्या व मनुष्याच्या विष्ठेमधून ते मातीत येतात. (म्हणूनच कापलेल्या नाळेवर शेण लावणे चूक आहे.) हे जंतू अन्न पाण्याबरोबर पोटात गेले तर काही होत नाही, पण जखमेत गेल्यास धनुर्वात होऊ शकतो. जखमांमध्ये धनुर्वाताचे जंतू मिसळण्याचा धोका नेहमीच असतो. पण प्रत्येक जखमेतून धनुर्वात होतोच असे नाही. त्या व्यक्तीमध्ये विशिष्ट प्रतिकारशक्ती नसेल आणि जखमेत पू तयार करणारे जंतू असतील तर मात्र धनुर्वात होण्याची शक्यता असते. जखमेतले ‘पू’ जनक जंतू जखमेतला प्राणवायू वापरतात. अशा प्राणवायूविरहित जखमेत धनुर्वात जंतू वेगाने वाढतात आणि धनुर्वाताचे विष निर्माण करतात. हे विष रक्तात मिसळून चेतासंस्थेपर्यंत जाते. त्यामुळे स्नायुगटांना झटके येतात. यालाच आपण धनुर्वात म्हणतो.

धनुर्वाताची जखम कोठल्याही प्रकारची असू शकते. अगदी वर्ष सहा महिन्यापूर्वी मोडलेला ते रस्त्यावरच्या वाहन अपघातापर्यंतची कोठलीही जखम धनुर्वाताला निमित्त होऊ शकते.

लक्षणे व चिन्हे

Tetanus धनुर्वाताची सुरुवात बहुधा जखमेच्या भागातील स्नायू जडावण्यापासून होते. त्यानंतर जबडा जड होणे, दातखीळ बसणे, इतर स्नायूंमध्ये जडपणा, झटके पसरणे, श्वसनाचे स्नायू आखडून श्वसन बंद पडणे, इत्यादी परिणाम होतात. यामुळे मृत्यूही येऊ शकतो.

नवजात अर्भकास धनुर्वात झाल्यास मूल विचित्र हसल्यासारखे दिसते. (चेह-याचे स्नायू आखडल्याने), मूल अंगावरचे दूध ओढत नाही, झटके येतात, श्वसन थांबते व मृत्यूही येतो. हा धनुर्वात दूषित नाळेमुळे होतो.

उपचार

ताबडतोब रुग्णालयात न्या. रुग्णालयात पेनिसिलीन, धनुर्वातविरोधी औषधे, झटके थांबवणारी औषधे व प्राणवायू, इत्यादी उपचार करतात. योग्य उपचाराने रुग्ण वाचू शकतो.

प्रतिबंधक उपाय
  • प्रत्येक जखम स्वच्छ ठेवा, दूषित जखम रोज हैड्रोजन द्रावाने धुवून घ्या.
  • प्रत्येक गरोदर स्त्रीस प्रतिबंधक टी.टी. लसीचे दोन डोस मिळाले पाहिजेत.
  • प्रत्येक व्यक्तीस टी.टी.चे दोन डोस व दर पाच वर्षानी एक बूस्टर डोस द्या.
  • जखमेच्या वेळी टी.टी. दिले तरी त्याचा उपयोग महिन्याभरानेच होतो; लगेच नाही.
पिसाळी

(पिसाळलेले कुत्रे चावल्यावर होणारा आजार)
हा आजार एक प्रकारच्या विषाणूमुळे होतो. हे विषाणू सुळे असलेल्या प्राण्यांमध्ये (म्हणजे कुत्री, कोल्हे, मांजरे, लांडगे, इ.) असाच रोग निर्माण करतात. जंगलातल्या या रोगाचा प्रसार भटक्या कुत्र्यांमार्फत मनुष्यवस्तीत होत असतो. हा आजार एकदा झाल्यावर यातून जगणे अशक्य असते. म्हणूनच कुत्रे चावल्यावर लोकांना एक विलक्षण भीती वाटत असते. पिसाळी रोग झालेल्या कुत्र्या किंवा प्राण्यामार्फतच माणसाला हा आजार होऊ शकतो. म्हणूनच कुत्रे चावल्याच्या घटना खूप घडत असल्या तरी त्यातल्या एखाद्यालाच खरा धोका असतो.

दरवर्षी भारतात कुत्रे चावण्याच्या लाखो घटना होतात. यापैकी सुमारे 50 हजार जण मरण पावतात. हे दु:खद सत्य आहे.

रोग कसा होतो

कोणत्याही जखमेवर विषाणूयुक्त लाळ सांडली की लागण होते. त्वचेवर जखम असल्यास विषाणू प्रवेश करू शकत नाहीत. या आजाराचे विषाणू चेतातंतूतून पसरतात. पिसाळी रोग झालेल्या कुत्र्याच्या (किंवा प्राण्यांच्या) लाळेमध्ये हे विषाणू असतात. लाळेमध्ये विषाणू उतरल्यावर साधारणपणे दहा दिवसांत तो प्राणी मरतो. कुत्रा चावल्यानंतर हे विषाणू जखमेत पसरतात. त्यानंतर चेतातंतूंवर हल्ला करून त्यामार्फत ते मेंदूत प्रवेश करतात. (रक्तावाटे ते पसरत नाहीत). मेंदूत प्रवेश केल्यानंतर मेंदूला हळूहळू सूज येते व मेंदू निकामी होतो. हळूहळू रुग्ण अंथरुणाला खिळतो. साधी पाणी पिण्याची क्रियाही खूप वेदनादायक होते.

पिसाळी झालेल्या रुग्णाच्या लाळेत, अश्रूत आणि लघवीत हे विषाणू मोठया संख्येने असतात. तरीही आतापर्यंत रुग्णापासून जवळच्या माणसाला किंवा डॉक्टर -नर्सला पिसाळीची लागण झाल्याची एकही घटना झालेली नाही. भारतात दरवर्षी पिसाळी रोगाने 25000-50000 मृत्यू होतात, तरीही अशी घटना झालेली नाही हे विशेष आहे.

चावल्याच्या ठिकाणी स्नायूंमध्ये विषाणू संख्येने वाढत जातात. चेतातंतूतून द्रव पदार्थाबरोबर ते कण्यातल्या चेतारज्जूमध्ये प्रवेश करतात. या जागीपण ते थोडा दाह निर्माण करतात. या दाहामुळे विषाणू जिथून निघाले त्या जागी विचित्र संवेदना होते व बधिरता येते. यानंतर चेतारज्जूतून ते संख्येने वाढत जातात आणि पेशीपेशींमार्फत ते पसरत जातात. शिवाय ते मेंदूजलातही उतरतात. तिथून मेंदूमध्ये सर्वत्र पसरायला त्यांना सोपे होते. यानंतर मेंदूतून ते चेतातंतूद्वारा लाळ-पिंडात उतरतात. तोपर्यंत त्या व्यक्तीला पिसाळीने पूर्ण ग्रासलेले असते.

अशा रितीने दुस-याच्या लाळेतून माणसाच्या जखमेत, तिथून मेंदू, तिथून माणसाची लाळ असे एक जीवनचक्र हे विषाणू पूर्ण करतात. मात्र माणसात त्यांचा एक प्रकारे शेवट होतो.

माणसापासून ते इतर प्राण्यांना किंवा माणसांना फारसे बाधू शकत नाहीत. स्वत:ची संख्या वाढवणे ही प्रत्येक जीवाची निसर्ग प्रवृत्ती असते. माणसात हे विषाणू संख्येने वाढतात पण पुढचा रस्ता त्यांना बंद असतो. मात्र प्राण्यांमध्ये त्यांचा प्रवास व वंश चालूच राहतो.

या चार घटकांचा विचार करून जखम साधी की वाईट हे ठरवता येईल.

चाव्याचे मेंदूपासून अंतर

Polio Campaign हे विषाणू चेतातंतूमार्फत पसरतात म्हणून मेंदूपासून चावण्याच्या जखमेचे जेवढे अंतर तेवढा वेळ हे विषाणू रोग निर्माण करायला घेतात. चेह-यावरच्या जखमांतून हे जंतू काही दिवसांतच मेंदूत शिरतात. मात्र हातावरच्या जखमांपासून त्याहून अधिक वेळ लागतो; तर पायावरच्या जखमांतून मेंदूपर्यंत जायला सर्वात अधिक वेळ (कधी कधी वर्षभर) लागतो. एकदा मेंदूत पोहोचल्यावर विषाणू लवकरच लाळपिंडात उतरतात. त्यामुळे या आजाराच्या उपचारात कुत्रे चावल्याच्या जखमेचे मेंदूपासूनचे अंतर ही फार महत्त्वाची गोष्ट आहे.

जखमेची खोली

खरचटण्याची किंवा ओरखडयाची जखम देखील विषाणू प्रवेशासाठी पुरेशी असते. मात्र जखम जेवढी खोल व मोठी, तेवढे जास्त चेतातंतू विषाणूंना उपलब्ध होतात.

चेतातंतूंचे जाळे

एखाद्या भागात चेतातंतूंचे जाळे जसे जास्त असेल त्या प्रमाणात विषाणूंना जास्त चेतातंतू मिळतात. हात व चेहरा यावर चेतातंतूंचे जाळे जास्त असते, म्हणून तेथल्या जखमा अधिक धोकादायक असतात.

चावणारा प्राणी

रोग किती लवकर येणार हे चावणा-या प्राण्यावरही अवलंबून असते. कुत्र्यापेक्षा कोल्हे, तरस, लांडगे यांच्यापासून रोग लवकर होतो. म्हणून या प्राण्यांपासून जखमा झाल्या तर लसटोचणी आवश्यक ठरते.

कुत्रा/प्राणी चावल्यापासून साधारणपणे 1-2 महिन्यांत माणसाला हा आजार दिसू लागतो. पण कधीकधी आठवडयातच तर कधी 7 वर्षे पण लागू शकतात. मात्र पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतलेल्या सगळयांनाच हा आजार होत नाही. फक्त काही जणांनाच होतो.

लक्षणे व निदान
सुरुवातीची लक्षणे
  • चावल्याच्या जागी वेदना
  • चावल्याच्या जागी व भागात मुंग्या येणे, विचित्र संवेदना होणे.
  • डोकेदुखी
  • ताप
  • चावल्याच्या जागचे स्नायू थोडे ताठरणे
2-3 दिवसांनंतरची लक्षणे
  • गोंधळणे, गुंगी, पाण्याची प्रचंड भीती
  • आक्रमक, हिंसक वागणे. चावण्याची व थुंकण्याची इच्छा
  • थंडी, आवाज, प्रकाश यामुळेदेखील घसा आखडतो.
  • घसा आखडणे, घशाचे स्नायू निर्जीव – निकामी होणे, भास, अतिनिद्रा, बेशुध्दी
  • मधून मधून रुग्ण सावध राहतो पण थोडा वेळच.

लक्षणे सुरू झाल्यापासून काही दिवसातच पूर्ण आजार दिसू लागतो. एका आठवडयात मृत्यू येतो.

रोगनिदान

घसा, लाळ यातून नमुने घेऊन विषाणूंसाठी तपासणी केली जाते.

कुत्रा चावल्यावर प्रथमोपचार
  • जखम साबणाच्या कोमट पाण्याने स्वच्छ धुऊन काढावी. साबणाच्या पाण्याने हे जंतू लगेच मरतात. हा प्रथमोपचार सर्वात महत्त्वाचा आहे आणि तो ताबडतोब केलाच पाहिजे. स्पिरिट (70%) किंवा आयोडीन वापरून जखमा धुतल्या तरी विषाणू मरतात. जखम खोल असेल तर नुसत्या वरवरच्या धुण्याने भागत नाही. पिचकारी किंवा रबरी नळीद्वारे साबण-पाणी वापरून जखम स्वच्छ करावी.
  • ही जखम शिवू नये. कारण सुईच्या जखमांनी जंतूंना आणखी वाव दिल्यासारखे होते. नुसती पट्टी करावी. पुढील उपचारांसाठी आरोग्य केंद्रातच पाठवावे.
  • पिसाळलेले कुत्रे साधारणपणे 10 दिवसांत मरते. शक्य असेल तर 10 दिवस पर्यंत कुत्र्याचे निरीक्षण करावे. पण ते आणखी कोणाला चावू नये म्हणून कोंडून ठेवणे आवश्यक आहे.
  • कुत्रे पिसाळलेले नसले, पाळीव असले किंवा पिसाळू नये म्हणून त्याला इंजेक्शन दिलेले असल्यास इंजेक्शन घेण्याची गरज नाही.
  • कुत्र्याबद्दल खात्री नसेल तर सर्व इंजेक्शने द्यावीत. (याचे प्रमाण व संख्या जखमेची जागा, खोली यांवर अवलंबून असते.)
  • कुत्र्याला मारून टाकलेले असेल किंवा कोल्हा, लांडगा यांपैकी काही चावले असेल तर काही खात्री देता येत नाही, अशा वेळी सगळी इंजेक्शने द्यावी लागतात.

इंजेक्शनचा परिणाम सहा महिनेपर्यंतच राहतो. सहा महिन्यांनी पुन्हा प्रसंग आल्यास पुन्हा इंजेक्शने द्यावी लागतात.

जखम किती घातक

गट 1 (सौम्य धोका) – साध्या कातडीवर चाटणे, खरचटणे पण रक्त न येणे, पिसाळलेल्या जनावराचे दूध न उकळता प्यायले जाणे, इ. हे गट 1 मध्येच धरतात.

गट 2 (मध्यम धोका) – कापल्याच्या जखमेवर कुत्र्याने चाटणे किंवा लाळ पडणे, दातामुळे रक्ताळणे-खरचटणे, दोन इंचापेक्षा कमी लांबीच्या जखमा (चेहरा, हात, बोटे, मान, डोके सोडून)

गट 3 (जास्त धोका)
– डोके, चेहरा, मान, हाताचा पंजा/बोटे यावरच्या सर्व जखमा (रक्त आलेल्या जखमा), शरीरावर कोठेही दोन इंचापेक्षा लांब जखम, जंगली जनावरांचे चावे. याला धोका सर्वात जास्त असतो.

नव्या लसींबद्दल माहिती

पिसाळीचे उपचार आता नव्या चांगल्या लसींमुळे बदलले आहेत. या लसी अधिक परिणामकारक आहेतच पण त्यातले मृत विषाणू असल्याने त्यापासून मेंदूज्वराचा धोका शून्य असतो.

मानवी पेशी, व्हेरोवॅब, आणि बदकाच्या गर्भापासून केलेली अशा या तीन प्रकारच्या लसी आहेत. यात मृत विषाणू वापरलेले असतात.

तीन नव्या लसी बाजारात मिळतात. मानवी पेशीपासून केलेली लस चांगलीच महाग आहे. कोंबडीच्या गर्भपेशींपासून केलेली लस त्यामानाने स्वस्त आहे. व्हेरो प्रकारची लस जवळपास याच किमतीस मिळते. डोस खालीलप्रमाणे.

चावल्यानंतरचा उपचार

जखमेचा प्रथमोपचार केला नसल्यास आधी जखम साबणपाण्याने स्वच्छ धुतली जाते. साबणपाण्यानंतर प्रोव्हीडोन आयोडीन किंवा 70% स्पिरीटने जखम धुवावी. जखमेच्या आतपर्यंत औषधी द्रव्ये पोचणे आवश्यक आहे.

यानंतर पिसाळी विषाणू विरुध्द ऍटीसिरम त्या जागी टोचावे लागते. यामुळे जागच्या जागी विषाणू मरतात. या उपचाराने विषाणूंची संख्या खूप कमी होते. हे ऍंटीसिरम उरल्यास स्नायूंमध्ये इंजेक्शन स्वरुपात देऊन टाकतात. म्हणजे ते रक्तात शिरून जखमेच्या जागी आतपर्यंत पोचू शकते.

या प्रथमोपचाराने पिसाळीचा धोका 50% पासून 5% पर्यंत म्हणजे दहापट कमी होतो.

एकदा विषाणू चेतातंतूत शिरले की त्यावर हे ऍंटीसिरम काम करू शकत नाही. विषाणू रक्तात उघडे आहेत तोपर्यंतच याचा उपयोग असतो.

यानंतर पिसाळीची लस टोचली जाते.

हल्ली सर्व शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये पिसाळीची आधुनिक लस उपलब्ध आहे. ही लस आतापर्यंत स्नायूंमध्ये टोचली जात असे. आता 0.2 मि.ली (एक मिलीचा पाचवा हिस्सा) दंडाच्या कातडीत टोचला की पुरते. याप्रमाणे इंजेक्शनची एक कुपी पाच जणांसाठी वापरता येते. यामुळे खर्च खूप वाचतो.

एक पूर्ण लसीकरण व्हायला 5 इंजेक्शने दिली जातात. 1 मिलीचे इंजेक्शन दंडावर/कमरेवर. 0,3,7,14,30 या दिवसांना एकेक इंजेक्शन याप्रमाणे (0 म्हणजे चावल्याचा किंवा पहिल्या इंजेक्शनचा दिवस).

हे लसीकरण पुढे प्रतिबंधक तर आतासाठी उपचार म्हणून उपयोगी असते. याच्यापासून ताबडतोब प्रतिकारशक्ती निर्माण होते आणि मेंदूत विषाणू पोचायच्या आधी ती विषाणूंचा सामना करते. याचा परिणाम सहा महिने टिकतो.

हे इंजेक्शन ढुंगणावर कधीही द्यायचे नसते. ते दंडावर दिले जाते. लहान मुलांना मात्र मांडीच्या बाहेरच्या भागात दिले जाते.

पाळीव कुत्रा चावल्यास सहसा पिसाळीचा धोका नसतो. 10 दिवस कुत्र्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. मात्र कुत्रे पिसाळल्याची शंका असल्यास लस टोचून घ्यावी.

या आजारात ‘लस टोचणी’ हीच मुख्य उपचार पध्दत म्हणून वापरली जाते. लसटोचणीमुळे शरीरात प्रतिकारशक्ती तयार होते. (ही प्रतिकारशक्ती सहा महिने टिकते.) या रोगाचे विषाणू फक्त मज्जातंतूंमार्फत मेंदूपर्यंत पोचतात व तिथपर्यंत पोचायला त्यांना वेळ लागतो. लसीमुळे विषाणुंविरुध्द प्रतिघटक व पेशी तयार होऊन आजाराचे विषाणू मेंदूत पोचायच्या आधी त्यांच्यावर उपाय होतो. या रोगाचे विषाणू रक्तामार्फत पसरणारे असते तर या लसटोचणीचा काही एक उपयोग झाला नसता.

कधीकधी असे घडते, की पिसाळलेला कुत्रा दुभत्या जनावरांना चावतो व या जनावरांचे दूध वापरावे किंवा नाही याबद्दल शंका येते. हे विषाणू दुधात फारसे उतरत नाहीत आणि दूध उकळल्यावर पूर्णपणे नष्ट होतात. तसेच आतडयातून ते शरीरात शिरू शकत नाहीत, पण जनावरांच्या लाळेत उतरतात. जनावर पिसाळल्याची शंका असल्यास निरीक्षण करून ते जिवंत ठेवायचे की नाही, याचा निर्णय घ्यावा लागेल. शंका नसेल तर दूध वापरावयास हरकत नाही.

प्रतिबंधक उपाय
  • ज्यांना कुत्रा चावण्याची शक्यता जास्त असते अशा लोकांनी (उदा. पोस्टमन, श्वानपथकात काम करणारे, गावातील कोतवाल, इ.) दर सहा महिन्यांनी लस टोचून घेतल्यास धोका टळू शकतो. ही लस मानवी पेशींपासून तयार केलेली असलेली चांगली.
  • चावायच्या आधी प्रतिबंधक डोस म्हणून : 0,7,21 व्या दिवशी एकेक इंजेक्शन वावडे असल्यास वा गरोदरपणात देऊ नये.
  • या रोगाचा प्रसार मुख्यतः कुत्र्यामार्फत होतो. भटकी कुत्री नष्ट करणे व पाळीव कुत्र्यांना लस टोचून घेणे हेच खरे यावरचे उपाय आहेत. पण आपल्या देशात भटकी कुत्री नष्ट करण्याचे प्रमाण शहरात, तसेच खेडयांतही फारच अल्प आहे.

पिसाळीची सर्व 5 इंजेक्शने घेणे आवश्यक आहे

काहीजण सरळ पाचही इंजेक्शने ठरल्याप्रमाणे घेऊन टाकतात. मात्र त्याला काही पर्याय आहेत ते असे.

कुत्र्याला गेल्या 6 महिन्यात इंजेक्शने दिली असल्यास या व्यक्तीला धोका नाही असे समजावे, आणि इंजेक्शन द्यायची गरज नाही. कुत्र्यास पूर्वी इंजेक्शन दिले नसल्यास पुढील कार्यवाही केली जाते.

पहिल्या दिवशी (म्हणजे शून्य दिवशी) प्रथम इंजेक्शन आणि ऍंटीसिरम द्यावे. कुत्रा पिसाळलेला/खराब असल्यास किंवा कुत्रा आपणहून चावला असल्यास पूर्ण 5 डोस द्यावेत.

एकच इंजेक्शन दिले असल्यास कुत्र्याचे निरीक्षणावर पुढील सर्व इंजेक्शन अवलंबून असतात.

कुत्रा 7/8/9/10 या कोणत्याही दिवशी खराब/पिसाळलेला संशयास्पद वाटला तर त्या दिवशी 2रा डोस द्यावा. नंतर ठरल्याप्रमाणे पुढचे डोस पूर्ण करावेत.

कुत्र्यांमधला पिसाळी आजार

कुत्र्यांमध्ये व इतर प्राण्यांमध्ये पिसाळी दोन प्रकारची असते. एका प्रकारात कुत्रे चावत सुटते, ओरडते व सारखे अस्वस्थ आणि आक्रमक बनते. म्हणजेच ते ‘पिसाळलेले’ दिसते. दुस-या प्रकारात ते अत्यंत शांतपणे कोठेतरी पडून राहते व मरून जाते. कुत्र्याला किंवा प्राण्याला झालेला रोग ‘पिसाळी’ आहे की नाही? याची खात्री करण्यासाठी मृत प्राण्यातला मेंदू काढून त्याची सूक्ष्मदर्शक यंत्राखाली तपासणी करावी लागते.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.