कर्करोग
कर्करोग का होतो?
प्रास्ताविक
कर्करोगाबद्दल भरपूर संशोधन झाले असले तरी कर्करोगाची कारणे पुरेशी कळलेली नाहीत. साध्या पेशींमधून कर्कपेशी तयार होतात. पेशीकेंद्राच्या गुणसूत्रबदलांमुळे असे होते हे नक्की. आता हे बदल का घडतात याबद्दल काही थोडी माहिती कळली आहे, ती पुढीलप्रमाणे :
- निसर्गत: आपल्या शरीरात नेहमीच थोडया कर्कपेशी सतत तयार होत असतात. त्यातील ब-याच कर्कपेशी आपोआप नष्ट होतात. मात्र काही शिल्लक राहतात.
- काही रासायनिक पदार्थांशी संबंध येणे : उदा. रंगात वापरले जाणारे काही रासायनिक पदार्थ, डांबरापासून बनवलेली काही रसायने, काजळी (उदा. कारखान्यांच्या धुराडयांची काजळी), ऍसबेस्टॉस (ज्याचे पत्रे बनवले जातात), पेट्रोलियम ज्वलनानंतर तयार झालेले वायू, सिगरेट-विडीमधील निकोटिन, इत्यादी.
- किरणोत्सर्गी पदार्थ : म्हणजे अणुविभाजनानंतर तयार होणारे ऊर्जाभारित किरण. यामुळे पेशीकेंद्रात निश्चित बदल होतो. अणुभट्टया व अणुविभाजन प्रक्रिया वापरणा-या अनेक कारखान्यांच्या आजूबाजूच्या लोकांना व कामगारांना विशिष्ट प्रकारचे कर्करोग जास्त प्रमाणात होतात हे दिसून आलेले आहे. जपानमध्ये अणुबाँब टाकल्यानंतर लक्षावधी लोकांना व त्यांच्या पुढच्या पिढयांना अनेक प्रकारचे कर्करोग झाले हे याचे सर्वात मोठे व भयानक उदाहरण आहे. अणुभट्टीची राख ही किरणोत्सर्गी म्हणून कर्करोगाला कारण ठरते.
- एखाद्या जागी सतत घर्षण : त्वचेवर एखाद्या ठिकाणी सतत घर्षण किंवा अन्य त्रास (उदा. उष्णता) होत असल्यास काही जणांना त्या ठिकाणी कर्करोग होतो असे आढळले आहे. उदा. काहीजणांना कमरेवरच्या धोतराच्या रेघेवर कर्करोग झाल्याचे आढळून आले आहे. पण हे केवळ त्वचेपुरतेच मर्यादित आहे.
- अधिक बाळंतपणे झालेल्या स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या तोंडाचा कर्करोग जास्त प्रमाणात आढळतो असे दिसते. वारंवार बाळंतपणे होऊन झालेल्या जखमांबरोबरच अस्वच्छता हे ही एक कारण यासाठी जबाबदार धरण्यात येते. पॅपिलोमा विषाणूंशी याचा संबंध आता निश्चित झाला आहे.
- भारतामध्ये तंबाखू-चुन्याची गोळी तोंडात ठेवण्याची पध्दत खूप मोठया प्रमाणावर आहे. या विशिष्ट जागी कर्करोगाची बाधा होण्याची शक्यता मोठया प्रमाणावर असते, असे आता शास्त्रीयदृष्टया सिध्द झालेले आहे.
- तिखट पदार्थ खाण्याचे जास्त प्रमाण असलेल्या भागात जठराच्या कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे असे दिसते, पण याबद्दल अजून निश्चिती होणे आवश्यक आहे.
- व्यसने : दारू व तंबाखू यांचा कर्करोगाशी संबंध आहे. दारूमुळे यकृताचा कर्करोग होण्याची शक्यता असते. याहीपेक्षा धूम्रपान आणि फुप्फुसाचा कर्करोग यांतला संबंध अधिक पक्का आहे. या दृष्टीने धूम्रपान हे अधिक घातक व्यसन आहे असे म्हणता येईल.
- गुटखा खाण्यामुळे तोंडाचा कर्करोग आढळतो.
- अनेक विषाणूंचा कर्करोगाशी संबंध सिध्द होत आहे. (उदा. गर्भाशय कर्करोग)
- एका बुरशीमुळे शेंगदाणे खवट होतात. ही बुरशी कर्करोगजनक आहे. (अफ्लाटॉक्सीन)
- एच. पायलोरी हा जंतू जठरव्रणास कारणीभूत असतो. या जंतूमुळे जठराचा कर्करोग होऊ शकतो. एच. पायलोरी हा जीवाणू कर्करोगजनक आहे असे दिसून आले आहे.
- एचआयव्ही आणि एड्सग्रस्त व्यक्तींना काही प्रकारचे कर्करोग होतात असे दिसून आले आहे.
व्यवसायजन्य कर्करोग
- विशिष्ट रासायनिक प्रक्रिया उद्योगात किंवा किरणोत्सर्गी प्रक्रिया वापरणा-या जागी कामगारांना (किंवा शेजारच्या आजूबाजूच्या लोकांना) कर्करोग होण्याची शक्यता असते.
- श्वासावाटे ऍसबेस्टॉसचे कण जाऊन फुप्फुसाच्या कर्करोगाची बाधा होते असे ठामपणे सिध्द झालेले आहे.
- धुराडयांवर चढून ते साफ करण्याचे काम करणा-या कामगारांच्या संबंधित त्वचेवर (विशेषतः वृषण-अंडकोषावर) कर्करोग झाल्याची अनेक उदाहरणे पूर्वी झाली आहेत.
- रंगाच्या कारखान्यात वापरली जाणारी विशिष्ट द्रव्ये शरीरात जाऊन लघवीवाटे टाकली जातात, पण त्याबरोबर मूत्राशयाचा कर्करोग होण्याची शक्यता असते.
- किरणोत्सर्गी पदार्थाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना तर कर्करोग होण्याची फारच मोठी शक्यता असते. अणुभट्टया व किरणोत्सर्गी पदार्थ वापरणा-या कारखान्याच्या परिसरातील लोकांमध्ये अनेक प्रकारचे कर्करोग – विशेषतः रक्ताचे कर्करोग – जास्त प्रमाणात आढळले आहेत. आतल्या कामगारांना यापासून निश्चित जास्त धोका आहे. जपानमध्ये अणुबाँबनंतर अनेक लोकांना कर्करोग झाला.
- रशियातील चेर्नोबिल अणुभट्टीच्या स्फोटानंतर अशी मोठी शक्यता निर्माण झाली. या स्फोटानंतर आजूबाजूच्या कित्येक किलोमीटर परिसरात किरणोत्सर्ग होऊन तिथले अन्नपदार्थ देखील किरणोत्सर्गी झाले. हे अन्न खाल्ले तरी त्यापासून कर्करोग होईल अशी शक्यता होती. किरणोत्सर्ग हे कर्करोगाचे सिध्द झालेले अगदी निश्चित कारण आहे. क्ष-किरणांमुळे देखील कर्करोग होऊ शकतो. क्ष किरणांबद्दल पूर्वी फार माहिती नव्हती तेव्हा क्ष-किरणाचा वापर करणा-या डॉक्टरांना व कर्मचा-यांना कर्करोग झाल्याचे आढळले, पण सुरक्षा व काळजी घेतल्यास असा धोका नगण्य आहे.