blood institute diseases icon रक्तसंस्थेचे आजार रक्ताभिसरण संस्थेचे आजार
रक्तसंस्थेचे आजार
रक्तपांढरी (ऍनिमिया)

anemia रक्तपांढरी म्हणजे रक्तद्रव्याचे प्रमाण कमी होण्याला आपण दिलेले एक सोयीचे नाव आहे. किंवा ‘रक्ताची प्राणवायू वाहून नेण्याची क्षमता घटणे म्हणजे रक्तपांढरी’.

रक्तपांढरी हा आजार आपल्या देशातला एक प्रमुख आजार आहे. तो इतक्या प्रमाणात आढळतो, की ब-याच लोकांना याची ‘सवय’ होते. इतर काही आजार असल्याशिवाय तक्रार करावी असे वाटत नाही. रक्तपांढरी जास्त प्रमाणात असेल तरच औषधोपचाराचा विचार केला जातो. रक्तपांढरी हा इतका सामान्य रोग असला तरी त्यासाठी लोकभाषेत कोठलेही नाव प्रचलित नाही. रक्तक्षय हा तयार केलेला संस्कृत शब्द आहे. रक्तक्षय हे नाव ‘क्षय’ या घटकामुळे गैरसमज करून देणारे आहे. सर्वसाधारणपणे ग्रामीण जनतेत, विशेषतः स्त्रियांमध्ये, याचे प्रमाण 50-70 टक्के आढळते. पाच वर्षापेक्षा लहान मुलांमध्येही तेवढेच प्रमाण आहे. हा जास्त करून गरिबीचा आणि कुपोषणाचा आजार आहे. पण हा आजार आपल्या देशात श्रीमंतांनाही होतो.

रक्तपांढरी म्हणजे काय?

आपल्या रक्तात हिमोग्लोबीन – हे लाल रक्तद्रव्य असते आपल्या रक्तात रक्तद्रव्याचे प्रमाण दर 100 मिली. मध्ये सुमारे 15 ग्रॅम इतके (तक्ता पाहा) असायला पाहिजे. हे रक्तद्रव्य तांबडया पेशींमध्ये भरलेले असते. या तांबडया पेशी हाडांच्या पोकळयांमध्ये तयार होतात. रक्तपेशी सुमारे 120 दिवस रक्तात राहतात. त्यानंतर पांथरीमध्ये त्या ‘मोडीत’ निघतात. त्यातून निघालेल्या रक्तद्रव्याचे विघटन होऊन प्रथिने, लोह, इत्यादी घटक वेगवेगळे होतात. काही भाग परत वापरण्यासारखा नसतो, तो लघवीवाटे व मळावाटे बाहेर टाकला जातो. हा बाहेर टाकला जाणारा पदार्थ पिवळा असतो. म्हणूनच लघवी व मळ पिवळसर असतात. काविळीचा पिवळा रंगही याच द्रव्याचा असतो. उरलेल्या घटकांपैकी लोह व प्रथिने परत नवीन रक्तपेशी करण्यासाठी वापरले जातात.

रक्तपांढरीची कारणे

रक्तपांढरीत रक्तातील रक्तद्रव्याचे एकूण प्रमाण कमी असते. रक्तपांढरीचे दोन मुख्य प्रकार आहेत. (अ) रक्तपेशींची संख्या व प्रमाण कमी असणे किंवा (ब) पेशीतल्या रक्तद्रव्याचे प्रमाणच कमी असणे हेच जास्त महत्त्वाचे कारण आहे.

रक्तद्रव्याचे प्रमाण : ग्रॅम 100 मिली. ( तक्ता (Table) पहा)

होमिओपथी निवड

आर्सेनिकम, बेलाडोना, कल्केरिया फॉस, फेरम फॉस, हेपार सल्फ, लॅकेसिस, नेट्रम मूर, नक्स व्होमिका, फॉस्फोरस, पल्सेटिला, सेपिया, सिलिशिया, सल्फर

(अ) रक्तपेशींची संख्या कमी असणे

प्रत्येक मिली. रक्तामध्ये तांबडया रक्तपेशींची संख्या सुमारे 50 लाख असते.

या पेशींची निर्मिती कमी वेगाने आणि विघटनाचे प्रमाण त्यापेक्षा जास्त असेल तर एकूण पेशींची संख्या कमी होते. यामुळे रक्तपेशींची ‘टंचाई’ तयार होते.

  • रक्तस्रावामुळेही रक्तपेशींची संख्या कमी होऊ शकते. मासिक पाळी, बाळंतपणातील रक्तस्राव, आतडयातून रक्त शोषणा-या हुककृमी, इत्यादी कारणांमुळे रक्तपेशींची संख्या कमी होऊन रक्तपांढरी होऊ शकते.
  • शरीरात कोठेही दीर्घकाळ जंतुदोष राहणे, पू-गळू, क्षयरोग, विषमज्वर, इत्यादी आजारांत रक्तपांढरी होते. या आजारात रक्ताचा जास्त प्रमाणात नाश होतो.
  • कर्करोगातही रक्तपांढरी होण्याची शक्यता असते. विशेषतः कर्करोग पसरण्याच्या पायरीवर तर रक्तपांढरी असतेच.
  • हिवतापात वेळीच उपचार झाला नाही तर तांबडया पेशींची संख्या कमी होऊन निस्तेजपणा येतो.

अशी विविध कारणे असल्यामुळे रक्तपांढरीमागचे कारण ओळखून त्यावर उपचार होणे आवश्यक आहे.

(ब) रक्तद्रव्य कमी असणे

रक्तद्रव्य तयार करण्यासाठी लोह, प्रथिने आणि ‘ब’ जीवनसत्त्व हे प्रमुख घटक लागतात. यातील कोठलाही घटक कमी पडला तर रक्तद्रव्य पुरेसे तयार होत नाही. यामुळे प्रत्येक तांबडया पेशीत रक्तद्रव्य कमी प्रमाणात आढळते. या घटकांचा अन्नातून पुरेसा पुरवठा न होणे, हे रक्तपांढरीचे सर्वात महत्त्वाचे कारण आहे.

लोह कमी पडणे

लोह म्हणजे लोखंड. हिरव्या पालेभाज्या, कोंडयासहित धान्य, कडधान्ये, प्राण्यांचे मांस, यकृत यांत विशेष लोह असते. पण स्वयंपाकात लोखंडाची भांडी (तवा, कढई, उलथने, लोखंडी चाकू) वापरतात, त्यापासून काही प्रमाणावर लोहाचा पुरवठा होतो. शरीरात जुन्या रक्तपेशी मोडल्यानंतर निघणारे लोह परत वापरले जाते. म्हणूनच सहसा लोहाची कमतरता होऊ नये. भारतीय शाकाहारी जेवणात लोहाचे प्रमाण कमी असते. त्यातच काही शाकाहारी घटकांमुळे आहे त्या लोहाचे पचन शोषण नीट होत नाही. उदा. कोबी, चहा, इ. पदार्थांनी आहारातले लोह वाया जाते. म्हणून जेवणानंतर अर्धातास चहा घेऊ नये.

आणखी एक म्हणजे सतत, वारंवार रक्तस्राव असेल तर लोहाचा पुरवठा कमी पडतो. (उदा. मासिक पाळीतून होणारा रक्तस्राव, मूळव्याध किंवा हुककृमींमुळे होणारी रक्तातील घट). हुककृमी (आकडेकृमी) या आतडयाच्या आतील आवरणाला जळवांप्रमाणे चिकटून राहतात व रक्त पीत राहतात. दीर्घकाळ हुककृमी राहिल्या तर त्यामुळे रक्तपांढरी होण्याची शक्यता असते. या कारणांमुळे स्त्रिया आणि मुलांमध्ये रक्तपांढरीचे प्रमाण जास्त असते.

प्रथिने

कोठल्याही पेशी तयार होण्यासाठी मुख्य वस्तू म्हणून प्रथिनांची गरज असते. प्रथिने म्हणजे शरीराच्या बांधणीतल्या दगड-विटा आणि चुना-सिमेंट असतात. तांबडया रक्तपेशींच्या निर्मितीसाठीही प्रथिने लागतात. कुपोषणात रक्तपांढरी हा एक सामान्य घटक असतो. सर्वांगसूज (कुपोषण) झालेल्या मुलांमध्ये रक्तपांढरी हमखास आढळते.

‘ब’ जीवनसत्त्व

‘ब’ जीवनसत्त्वांपैकी एक घटक – फोलिक ऍसिड – भाजीपाल्यात आढळणारा आहे. हिरव्या भाज्यांचे प्रमाण आहारात पुरेसे नसेल तर रक्तद्रव्यांची निर्मिती कमी प्रमाणात होते.

लक्षणे व रोगनिदान

आपल्या शरीरात एकूण सुमारे 5 ग्रॅम लोह असते. यातले बहुतेक लोह रक्तद्रव्यात असते.

रक्तद्रव्यात लोह असते ते प्रत्येक पेशीतल्या ऊर्जावापर प्रक्रियांमध्ये लागते. त्यामुळे लोहकमतरता ही दुहेरी नुकसान करते.

निरोगी अवस्थेतले रक्तद्रव्याचे प्रमाण आणि रक्तपांढरीतले रक्तद्रव्याचे प्रमाण यांचा तक्ता आधीच दिला आहे.

रक्तद्रव्याची कमतरता हळूहळू अनेक महिने तयार होत राहिली तर शरीर त्याला सरावते. यामुळे सहसा याची लक्षणे जाणवत नाहीत. थोडा थकवा जाणवतो. तरी औषधोपचार लागावा इतका त्रास जाणवत नाही. वरवर निरोगी दिसणा-या ब-याच स्त्रियांच्या बाबतीत रक्तद्रव्य 8 ते 10 इतक्या कमी प्रमाणात आढळते.

रक्तद्रव्याचे प्रमाण आठच्याही खाली गेले तर मात्र बहुधा लक्षणे जाणवतात. निस्तेजपणा, (फिकटपणा) थकवा, दम लागणे ही सुरुवातीची लक्षणे असतात. रक्तद्रव्याचे प्रमाण फार कमी असेल तर छातीत धडधडणे, पायावर सूज, सतत आजार, जंतुदोष होत राहणे, इत्यादी त्रास जाणवतो.

मात्र हीच कमतरता अचानक तयार झाली (उदा. रक्तस्राव, तीव्र जंतुदोष, इ.) तर त्रास जाणवतो. हिवतापानंतर येणारा थकवा याच कारणामुळे येतो.

माती खाण्याची इच्छा हे लक्षण स्त्रियांना जाणवते. काही मुले माती खातात हे उघड लक्षण असते.

  • नखे फिकट, चपटी, ठिसूळ होतात.
  • जीभ मऊ गुळगुळीत दिसते कारण त्यावरची लव नष्ट होते.
  • केस निस्तेज, फिकट होतात, ते लवकर गळतात.

निरोगी अवस्थेत डोळयांच्या पापण्यांच्या आतील लालसरपणा व नखांचा लालसरपणा सहज लक्षात येतो. याउलट रक्तपांढरी असेल तर नखे व डोळयातील आवरण निस्तेज, पांढुरके, फिकट दिसतात. या आजारात जिभेचा लालसरपणा जाऊन तीही फिकट, गुळगुळीत दिसते.

रक्तद्रव्यासाठी रक्ततपासणी

बोटातून किंवा नीलेतून रक्तनमुना घेऊन त्यातील रक्तद्रव्याचे प्रमाण तपासता येते. याच्या पध्दती अनेक आहेत. प्रत्येक पध्दतीत येणा-या उत्तरांमध्ये थोडा थोडा फरक असतो.

  • टीपकागदावर ठिपका – रक्तद्रव्याचे प्रमाण तपासण्याची ही एक सोपी पध्दत आहे. विशिष्ट टीपकागदावर रक्ताचा ठिपका घेऊन त्याच्या तांबडेपणाची, ठरावीक लाल रंगाच्या ठिपक्याबरोबर तुलना करतात. यावरून रक्तपांढरी आहे की नाही एवढे कळेल.
  • – साली पध्दत – सालीची पध्दत ही सर्वत्र प्रमाण मानलेली पध्दत आहे. एका नलिकेत खुणेपर्यंत रक्ताचा थेंब घेतात. यात विशिष्ट शक्तीचे हैड्रोक्लोरिक आम्ल मिसळतात. यानंतर येणारा रंग विशिष्ट काचेच्या रंगाशी जुळेल इतका पातळ केला जातो. जेव्हा दोन्ही रंग सारखे होतील तेव्हाची रक्ताच्या द्रावणांची पातळी पाहून रक्तद्रव्य मोजता येते.
  • मोरचूद पध्दत – मोरचूदाचा संपृक्त द्राव तयार करा. यासाठी ग्लासमध्ये अर्धे पाणी घ्या. त्यात मोरचूद टाकून ढवळा. जास्त मोरचूद टाकत राहा. जेव्हा मोरचूद विरघळण्याचे थांबेल तेव्हा हा द्राव ‘संपृक्त’ द्राव होतो. आता यात तपासणीसाठी रक्ताचा थेंब टाका. थेंब तरंगल्यास रक्तद्रव्य हलके म्हणजे 8 ग्रॅमपेक्षा कमी असेल. त्यापेक्षा जास्त रक्तद्रव्य भरलेला थेंब बुडतो व तळाशी जातो. या पध्दतीने अनेक व्यक्तींचे रक्तप्रमाण तपासता येते. ही सोपी पध्दत आहे. मात्र रक्ताचे प्रमाण 8 ग्रॅमपेक्षा कमी की जास्त आहे एवढेच याने कळते. नेमके रक्तप्रमाण काढण्यासाठी सालीची पध्दतच वापरावी लागते.
  • कोलोरीमीटर -हल्ली यासाठी इलेक्ट्रॉनिक यंत्र वापरले जाते.
  • याचबरोबर काही वेळा तांबडया रक्तपेशीची संख्या, प्रकार, इत्यादींची परीक्षा करून काही अनुमाने काढता येतात.
उपचार
  • रक्तद्रव्याचे प्रमाण सहा ग्रॅमपेक्षा खाली असेल तर, विशेषतः लगेच बाळंतपण शस्त्रक्रिया किंवा इतर आजार असल्यास शिरेतून ताजे रक्त भरणे हाच तात्कालिक उपाय असतो.
  • तोंडाने रोज दोन लोहगोळया (फेरस गोळया) सहा महिने पर्यंत घ्याव्यात. यातच जीवनसत्त्वपण असते. या उपचाराने हळूहळू रक्तप्रमाण सुधारते.
प्रतिबंधक उपाय

prevention measures सकस आहार, हिरव्या पालेभाज्या, अळीव, गूळ, नाचणी, स्वयंपाकात लोखंडी वस्तूंचा वापर यातून रक्तपांढरी टळू शकते. जेवणात लिंबू वापरल्याने लोह चांगले पचते.

शरीरात इतर काही आजार, कृमी असल्यास त्यावर उपचार होणे आवश्यक आहे.

गर्भवती किंवा अंगावर पाजणा-या मातांना शासकीय आरोग्य केंद्रातर्फे फेरसच्या 100 गोळया रोज एक याप्रमाणे दिल्या जातात. खरे म्हणजे 200 गोळया देण्याची गरज असते. नेहमीच्या आहाराला पूरक म्हणून या गोळयांचा चांगला उपयोग होतो.

पाच वर्षाखालील मुलांसाठी फेरसच्या निम्म्या शक्तीच्या गोळया किंवा पातळ औषध मिळते. तेही 100 दिवस घ्यायचे असते.

टॉनिके

रक्तपांढरीचे व इतर जीवनसत्त्वांच्या अभावाचे आपल्या देशात प्रचंड प्रमाण आहे. हे पाहून अनेक कंपन्यांनी टॉनिकच्या बाटल्यांचा औषधाच्या बाजारपेठेत पूर आणला आहे. ही टॉनिके महाग आणि त्यामानाने कमी उपयोगी असतात. त्यांतल्या कित्येकांत पुरेशी औषधेही नसतात. चांगली चव आणि डॉक्टर मंडळींचा पाठिंबा या बळावर टॉनिकांच्या व्यापारात कंपन्यांनी प्रचंड नफा मिळवला आहे. फेरस गोळया याच योग्य आणि वाजवी आहेत. इतर टॉनिके, द्रवरूप औषधांचा विशेष उपयोग नसतो.

सिकलसेल ऍनिमिया

हा आजार आनुवंशिक आहे. भारतातील आदिवासी पट्टयामध्ये हा आजार आढळतो.

या आजारात लाल रक्तपेशींमधील हिमोग्लोबिन सदोष असते. त्याला हिमोग्लोबिन एस म्हणतात. यात रक्तपेशी कडक बनून वाकडया तिकडया होतात. त्यामुळे त्यांच्या गुठळया बनून त्या रक्तवाहिन्यांमध्ये अडकतात व या कडक झालेल्या रक्तपेशी ऑक्सिजन वहनाचे कामही नीट करु शकत नाहीत. त्यामुळे सिकलसेल ऍनिमिया असलेल्या व्यक्तींमध्ये रक्ताभिसरणाच्या अडचणी तयार होतात.

लक्षणे

याची लक्षणे रक्तप्रवाह अडखळल्यामुळे येतात. वेगवेगळया अवयवात वेदना, रक्तपांढरी, हातपाय आखडणे, पोट, छाती आवळल्याप्रमाणे वाटणे, सांध्याजवळ वेदना होणे ही साधारण लक्षणे असतात.

पांथरीसूज हे चिन्ह असते. 1 ते 10 वयोगटात सुमारे 10% मुले या आजाराने मरण पावतात. प्रतिकारशक्ती कमी झाल्याने वारंवार संसर्ग – ताप येतात. न्यूमोनिया होण्याची शक्यता वाढते.

या रक्तदोषाचा दुष्परिणाम शरीरातल्या सर्व अवयव संस्थांवर होतो. हा आजार महाराष्ट्रातल्या आदिवासी समाजात बराच आहे.

रक्तपांढरीच्या सर्व लक्षणांबरोबरच सिकल ऍनिमियाची काही विशेष तीव्र लक्षणे अचानक येऊ शकतात. उदा. तीव्र पोटदुखी, वारंवार पाणथरी सुजणे व दुखणे, पाणथरीचे काम बंद पडल्याने जंतुदोष होणे, इ.

सिकल ऍनिमिया असलेल्या व्यक्ती 40 ते 50 वर्षापर्यंत जगतात. बालमृत्यू व मातामृत्यूंचे प्रमाण यात जास्त आहे. सिकल ऍनिमिया असणा-या व्यक्तींना सहसा मलेरिया होत नाही.

उपचार

हा आजार दुरुस्त होत नाही पण औषधांवर संशोधन सुरु आहे.

वेदनाशामक औषधे, जंतु संसर्गावर उपचार आणि रक्त भरणे हे उपचाराचे तीन प्रमुख घटक आहेत. याचबरोबर वेळोवेळी द्रवपदार्थांची कमतरता भरून काढावी लागते.

संभाव्य संसर्गासाठी वेळीच लसीकरण करणे हाही एक महत्त्वाचा प्रतिबंधक उपाय आहे.

आयुर्वेद आणि रक्तपांढरी

नेहमीच्या रक्तपांढरीवर लोहपुरवठा करणे हा मुख्य उपाय आहे. प्राथमिक आरोग्यकेंद्रातर्फे मोफत मिळणा-या फेरस गोळया (लोह गोळया) या मुळात अगदी स्वस्त असतात. त्या मानाने आयुर्वेदिक उपचार महागच पडतात. नवायस चूर्ण किंवा गैरिक तूप यातून लोह पुरवठा होऊ शकतो. नवायस चूर्ण जास्त महाग आहे. नवायस कल्प तयार मिळतो. याची अर्धा ते दीड ग्रॅम मात्रा दिवसातून दोन वेळा याप्रमाणे दीड ते तीन महिने द्यावी. याऐवजी गैरिक द्यायचे असल्यास ते तेलावर किंवा तुपावर परतून भरून ठेवावे व त्याची मुगाएवढी गोळी रोज द्यावी. धात्री लोहाची गोळी त्यामानाने स्वस्त पडते. या गोळीबरोबर मध व त्रिफळाचूर्ण प्रत्येकी अर्धा चमचा द्यावे, म्हणजे शौचास साफ व्हायला मदत होते.

या लोहपुरवठयाबरोबर (मग ते फेरस असो की आयुर्वेदिक नवायस गैरिक असो) स्नेहन करणे आयुर्वेदाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. स्नेहनासाठी 15-20 मि.ली. तूप (गाईचे किंवा म्हशीचे) किंवा 25-30 मि.ली खाद्य तेल (शेंगदाणा, तीळ, खोबरे यांपैकी कोणतेही) जेवणानंतर घेण्यास सांगावे. यानंतर गरम पाणी किंवा चहा घेतल्यास तेलकटपणाची चव निघून जाते. याप्रमाणे सात दिवस करावे. नंतर आठवडा वगळून परत सात दिवस सेवन करावे.

थॅलॅसिमिया

हा आनुवंशिक आजार आहे. यात हिमोग्लोबिन तयार होण्याचे प्रमाण खूपच संथ होते. तीव्र रक्तपांढरी बरोबरच पाणथरी सुजते व मोठी होते. हा आजार बरा होत नाही. उपचार म्हणजे वारंवार रक्त भरण्याची गरज लागते.

थॅलॅसिमिया मेजर, मिडियम व मायनर असे तीन उपप्रकार आहेत. हा आजार रक्तद्रव्यातल्या एका जनुकीय दोषांमुळे होतो.थॅलॅसिमिया असलेले मूल जन्मल्यानंतर दोन महिन्यांतच अगदी आजारी दिसते. त्याच्या शरीरात रक्तद्रव्य कमी असते. यामुळे बाळाची वाढ होत नाही, बाळाला भूक लागत नाही, मधून मधून ताप, संसर्ग होत राहतात. चेहरा थोडासा कपाळाला फुगीर दिसतो. मुलाची पांथरी आणि यकृत वाढल्यामुळे पोट पुढे येते. पण तरीही मूल जगते आणि मोठे होते. शरीरात लोहाचा साठा वाढत असतो (कारण रक्तपेशी सतत मोडल्या जातात) या व्यक्तींना इतर अनेक आजार होत राहतात.

या आजाराचे निदान रक्ततपासणीनेच होऊ शकते.

या व्यक्तींना रक्त भरावे लागते. याचबरोबर आणखी काही औषधे द्यावी लागतात. अशा व्यक्तींच्या शहरांमध्ये संघटना असतात आणि सेवा देणे त्यामुळे शक्य होते.

हा आजार आनुवंशिक असतो आणि म्हणूनच विवाह-संतती याबद्दल सल्लामसलत लागते. असा आजार असलेले मूल होऊ नये म्हणून काही लग्ने टाळावी लागतात.

हिमोफिलिया

हा आनुवंशिक आजार आहे. या आजारात रक्त गोठवण्यासाठी आवश्यक असलेला फॅक्टर 8 (आठ) घटक नसतो.

या आजाराच्या स्त्रिया वाहक आहेत. पण आजार मात्र पुरुषांमध्येच निर्माण होतो.

यातला मुख्य दोष म्हणजे रक्त न गोठल्यामुळे रक्तस्रावाची प्रवृत्ती तयार होते, यामुळे छोटया जखमेतूनही खूप काळ रक्तस्त्राव सुरु रहातो. तसेच आतल्या आतही रक्तस्त्राव होऊन सांध्यात, पोटात रक्त साकळते.

उपचार

आता फॅक्टर 8 इंजेक्शनच्या स्वरुपात मिळतो. ते वेळोवेळी देत रहावे लागते. हा आजार कायमचा बरा होत नाही.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.