रक्तदान व रक्त भरणे हे शब्द आपण ऐकलेले असतात. प्रौढ व्यक्तीच्या शरीरात सुमारे पाच लिटर रक्त असते. आपल्या आयुष्यात काही वेळा रक्त भरण्याची गरज लागू शकते.
रक्तदान हे या दृष्टीने खरेच जीवदान आहे.
रक्तदान करणारी व्यक्ती निरोगी असणे आवश्यक आहे. यासाठी रक्तद्रव्याचे प्रमाण निदान 10 ग्रॅम च्या वर असावे. तसेच गेल्या सहा महिन्यांत कावीळ किंवा विषमज्वर झालेला नसावा. एड्स व सांसर्गिक आजार नाही याची खात्री करावी लागते. मात्र तरीही एड्सचा धोका पूर्णपणे टळत नाही. यानंतर अशा व्यक्तीचे सुमारे 250 मि.ली. रक्त काढून घेतले जाते. लगेच गरज नसेल तर ते 4 सेंटीग्रेड तपमानात थंड ठेवले जाते. गरज पडेल तेव्हा हे रक्त शरीराच्या तपमानाच्या जवळ आणून योग्य गटाच्या व्यक्तीला देण्यात येते.
रक्तदानाबद्दल लोकांच्या मनात फार भीती आहे. पण ही भीती पूर्णपणे अनाठायी आहे. शरीरातल्या एकूण रक्ताच्या फक्त पाच टक्के रक्त काढले जाते. शस्त्रक्रियेच्या वेळी बरेच नातेवाईक रक्तदानास घाबरतात. अपरिचित व्यक्तीकडून रक्तदानातून काही सांसर्गिक आजार पसरण्याची शक्यता असते. (कावीळ, एड्स, इ.) या धोक्यामुळे आता व्यावसायिक रक्तदात्यांकडून रक्त घेतले जात नाही. आता रक्तदान शिबिरातून रक्त गोळा केले जाते.
रक्तदानानंतर त्यातले काही रक्त घटक वेगळे केले जातात. काही रुग्णांना पूर्ण रक्त देण्याऐवजी विशिष्ट घटक द्यावे लागतात. याला इंग्रजीत कंपोनंटस् असे नाव आहे. पुढीलप्रमाणे घटक वेगळे केले जातात. – तांबडया रक्तपेशी, ग्रॅन्युलोसाईट (पांढ-या पेशी), प्लाझ्मा, प्लेटलेट्स (रक्तकणिका)
बाहेरून रक्त देण्याचे काही धोकेही असतात.
चुकीच्या गटाचे रक्त भरले गेले तर रक्त गोठण्याची क्रिया चालू होऊन मृत्यू येण्याची शक्यता असते. अशा रुग्णाला सुरुवातीस थोडे रक्त गेल्यानंतर लगेच थंडी वाजणे, अस्वस्थता, मळमळ, उलटी, इत्यादी त्रास होतो. त्यानंतर छाती, कंबर यांत वेदना चालू होते. नाडी आणि श्वसनाचा वेग वाढतो. रक्तदाब कमी कमी होत जातो आणि रुग्ण दगावण्याची शक्यता असते. रुग्ण वाचला तर काही वेळाने कावीळ होते. लघवीत लालसरपणा उतरतो (रक्तद्रव्य). कदाचित मूत्रपिंडाचे कामकाज बंद पडू शकते. लवकर निदान झाले तर धोका टाळणे शक्य असते.
अनेक सांसर्गिक आजारांचा (एड्स, कावीळ) थोडा का होईना धोका असल्याने नातेवाईक, मित्रमंडळी यांचेच रक्त देणे केव्हाही चांगले.
एड्स या गंभीर आजाराच्या धोक्यामुळे रक्ताची एड्स विषयक तपासणी करणे अनिवार्य ठरले आहे. यासाठी एलिझा तपासणी करतात. तपासणीचा खर्चही येतो, त्यामुळे रक्त देणे खर्चीक झाले आहे. पण या गोष्टीला सध्या तरी पर्याय नाही. याचबरोबर कावीळ (हेपाटायटिस बी) यासाठीही तपासणी केली जाते. रक्तदानानंतर हे दोन ‘आजार नाहीत’ असा निष्कर्ष निघाला तरच त्या व्यक्तीचे रक्त वापरासाठी स्वीकारले जाते. एक धोरण म्हणून त्या व्यक्तीस सदर निर्णय सांगितला जात नाही. असे करणे धोक्याचे असले तरी रक्तदान यंत्रणेने मुद्दाम असा निर्णय घेतला आहे. नाहीतर एड्स चाचणी घेणा-यांची गर्दी झाली असती. तसेच यामुळे एड्सबद्दल तपासणी होते म्हणून काही रक्तदाते मागेही राहिले असते.