blood institute diseases icon रक्तसंस्थेचे आजार रक्ताभिसरण संस्थेचे आजार
रक्तगट

रक्ताचे चार प्रमुख गट आहेत. (ए, बी, एबी आणि ओ) हे गट रक्तात असलेल्या विशिष्ट घटकांप्रमाणे केलेले आहेत. या ए, बी घटकांशिवाय ‘आर-एच’ नावाचा एक घटकही सुमारे 85 टक्के व्यक्तींत असतो. अशा व्यक्तींच्या रक्तगटाला + (पॉझिटिव्ह) म्हणतात. ज्या व्यक्तींत हा घटक नसतो त्याला – (निगेटिव्ह) म्हणतात. मराठीत धन (+) व ऋण (-) असे शब्द वापरता येतील.

एखाद्याचे रक्त चालणे किंवा न चालणे म्हणजे काय हे आता समजावून घेऊ या. रक्तात एखादा पदार्थ गेला की त्यावर प्रथिनांच्या कणांचा हल्ला होतो हे आपण शिकलो आहोत. या न्यायाने A गटाच्या व्यक्तीस B गटाचे रक्त दिल्यास B पदार्थावर हल्ला होईल. कारण निसर्गतः A गटाच्या व्यक्तीत B घटक सापडत नाही. सुरुवातीस हे काही प्रमाणात खपून जाते. नंतर मात्र अशी चूक झाल्यास वरीलप्रमाणे मोठा घोटाळा होतो. हे आपण पुढच्या विवेचनात पाहणार आहोत.

म्हणून सर्वसाधारणपणे रक्त द्यायचे झाल्यास त्याच एका गटाचे रक्त चालते. उदा. ए + (पॉझिटिव्ह) व्यक्तीला रक्त द्यायचे असल्यास ए + लागते. B+ve व्यक्तीला B+ve रक्त चालते. दुसरे रक्त दिल्यास रक्तात गाठी होऊन मृत्यू येऊ शकतो.

ओ – रक्तात कोठलाच घटक नसतो. त्यामुळे हे रक्त कोणालाही दिले तर चालते.

व्यक्ती कोणत्या गटाचे रक्त चालते
A+ A+ve किंवा O+ve किंवा O-ve
B+ B+ve किंवा O+ve किंवा O-ve
AB+ A, B, AB O+ve किंवा O-ve
O+ O+ O-ve
O-  O- फक्त O-ve

व्यक्ती कोणाचे चालतेे
A- A-ve किंवा O-ve
B- B-ve किंवा O-ve
AB- AB- किंवा O-ve

‘एबी पॉझिटिव्ह’ या व्यक्तीला कोणाचेही रक्त चालते.

हे दोन अपवाद सोडल्यास सर्वसाधारणपणे विशिष्ट गटाचे रक्तच द्यावे लागते. काही गटांचे रक्त (उदा. ए-) दुर्मिळ असते.

पूर्ण रक्त गरज

शस्त्रक्रिया, रक्तस्राव याप्रसंगी पूर्ण रक्त दिले जाते. मात्र हल्ली पूर्ण रक्त क्वचितच द्यावे लागते.

केवळ लाल रक्तपेशी (पॅकड् रेड ब्लड सेल)

रक्तपांढरीत रक्त देण्याची गरज असेल तर हे वापरतात. यात द्रवपदार्थ नसतो. तो आधीच वेगळा काढलेला असतो. तो इतर रुग्णांना उपयोगी असतो. केवळ रक्तपेशी दिल्याने हृदयावर जादा दाब येत नाही हा फायदा असतो.

रक्तकणिका (प्लेटलेट)

काही आजारांमध्ये रक्तस्रावाची प्रवृत्ती वाढते. डेंगू ताप, बाळंतपणातला रक्तस्राव, इ. साठी केवळ रक्तकणिका वापरल्या जातात. यामुळे दोन-तीन तासात रक्तस्रावाची प्रवृत्ती दुरुस्त होते. अर्थात यासाठी एक पॅक पुरत नाही, गरजेप्रमाणे जादा द्यावे लागतात.

ताजा रक्तद्रव (प्लाझ्मा)

याची गरज काही विशिष्ट आजारांमध्ये असते.

आर-एच गट व गर्भनाश

आर-एच रक्तगटाचे एक विशेष महत्त्व आहे.

आई आर एच (-) आणि पिता आर.एच (+ve) असेल तर २०% बाळे ही आईच्या गटाची असतील व ८०% बाळांचा गट हा वडिलांसारखा असेल.

आई व बाळाचा गट एक असेल तर बाळाला धोका नसतो. पण जर आई व बाळाचा रक्तगट विरुध्द असतील म्हणजे बाळ आर.एच (+ve) असेल तर पहिल्या बाळंतपणात सूक्ष्म प्रमाणात आई व बाळाचे रक्त एकमेकांत मिसळते. यामुळे आईच्या रक्तात आर एच घटका विरुध्द प्रतिघटके तयार होतात.

पुढच्या बाळंतपणातही जर बाळ विरुध्द गटाचे असेल तर ही प्रतिघटके बाळाला गर्भातच त्रास देतात. हा गर्भ पोटातच मरुन जाण्याची शक्यता असते. पूर्ण वाढ होऊन जन्म झाला तर पहिल्या काही तासांत गंभीर कावीळ होऊ शकते. तसेच बाळाचा रक्तनाश होण्याचाही धोका असतो. म्हणून गर्भारपणात आईचा रक्तगट तपासणे महत्त्वाचे असते. जर आई आर एच (-) असेल तर बाळाच्या जन्मानंतर लगेच बाळाचा रक्तगट तपासणी करतात. जर बाळ आर.एच (+ve) असेल तर पुढील बाळाला त्रास होऊ नये म्हणून पहिल्या 24 तासात आईला ‘ऍन्टी डी’ चे इंजेक्शन द्यावे लागते. हे इंजेक्शन खूपच महाग असते. (सुमारे 1500 ते 1600रु.) व सध्यातरी सरकारी इस्पितळात मिळत नाही. पण जर आईच्या रक्तात आर एच रक्ताविरुध्द प्रतिज्घटके तयार झाली तर प्रत्येक आर.एच (+ve) बाळाला गंभीर धोका होऊ शकतो.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.