हृदयविकाराचा झटका, अतिरक्तदाब, इत्यादी आजारांबद्दल आपण ऐकलेले आहे. भारतातही या आजारांचे प्रमाण वाढत आहे. हे आजार बहुधा सुखवस्तू समाजात जास्त असतात. युरोप, अमेरिका तसेच आपल्याकडच्या शहरी सुखवस्तू समाजात हृदयविकार हे मृत्यूचे एक प्रमुख कारण आहे. गरीब वर्गात सांधेहृदय ताप हा आजार जास्त महत्त्वाचा आहे. मात्र आता ग्रामीण भागातही अतिरक्तदाब व मधुमेह या आजारांचे प्रमाण वाढत आहे.
या सर्व आजारांना प्रतिबंध करणे महत्त्वाचे आहे. पण त्यांची पाळे मुळे समाजजीवनात, राहणीमानात आहेत. शरीर श्रमाची कामे, नियमित व्यायाम व साधा आहार (चरबीयुक्त आहार कमी खाणे) या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अशी जीवनपध्दती आपण स्वीकारली तर या आजारांचे प्रमाण कमी होईल. आज आपण आरोग्यशिक्षण करणे व आजार लवकरात लवकर शोधणे एवढे महत्त्वाचे काम करू शकतो. सांधेहृदयताप, अतिरक्तदाब व हृदयविकार या तीन्ही आजारांचे लवकर निदान होणे आवश्यक आहे.
या प्रकरणात या संस्थेच्या काही निवडक आजारांची चर्चा केली आहे. शरीररचना, कार्य, इत्यादी तपशील पहिल्या प्रकरणातच दिला आहे.