पुरुषप्रजनन संस्था

पुरुष नसबंदी

पुरुष नसबंदी ही एक झटपट शस्त्रक्रिया अहे. स्त्री नसबंदीपेक्षा ती फारच सोपी आणि सुरक्षित आहे. या शस्त्रेक्रियेनंतर तासाभरात घरी जाता येते. या शस्त्रक्रियेत दोन्ही बाजूच्या वीर्यनलिका एका बिंदुवर कापून बांधल्या जातात. अंडकोशाच्या वरच्या भागात लहान छेद घेऊन ही नस बाहेर काढली जाते. शस्त्रक्रियेनंतर दोन-तीन महिने निरोध वापरावा लागतो. कारण वीर्यकोशात साठवलेल्या शुक्रपेशी पूर्णपणे बाहेर पडेपर्यंत दोन-तीन महिने जातात. शस्त्रक्रियेनंतर् 2-3 वेळा वीर्यपतन झाल्यावर शुक्रपेशी कमी होतात हेही लक्षात घ्यावे, त्यानंतर निरोसध्य नसला तरी चालेल. ही काळजी घेतली नाही तर गर्भधारणा होऊ शकते.

या अत्यंत सोप्या व निर्धोक शस्त्रक्रियेचा पुन्हा प्रसार होणे आवश्यक आहे. पुरुषी अहंकारापोटी व ‘अशक्तपणा येतो’ हे खोटे कारण सांगून पुरुष टाळाटाळ करतात व स्त्रियांवर शस्त्रक्रिया करून घेण्याची जबाबदारी टाकतात. असा कोणताही अशक्तपणा येत नाही.

पुन्हा प्रजननासाठी आवश्यक वाटल्यास कापून अलग केलेल्या नसा शस्त्रक्रियेने परत जुळवता येतात- त्यात 50 टक्के यशाची शक्यता असते.

पुरुष वंध्यत्व

स्त्री-पुरुष जोडप्यास संतती न होण्यामागे अंगभूत दोषांचे प्रमाण स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये 50-50 टक्के असू शकते.  आतापर्यंत वंध्यत्वासाठी स्त्रीलाच  जबाबदार धरून तिच्यावर अन्याय केला जात असे,  उपासतापास, देवधर्म आणि इतर मारा होत असे.  मात्र काही वेळा दोष पुरुषांमध्ये देखील असतो.  तीन दिवसाच्या कालावधीत मैथुन क्रिया टाळून पुरुषाची वीर्य तपासणी करणे हा एकदम प्राथमिक पायरी आहे.  जर वीर्यामध्ये शुक्रपेशी कमी असतील किंवा नसतीलच किंवा त्यांची हालचाल कमी होत असेल तर मुख्य उपचार पुरुषावरच करावे लागतील. हे लक्षात घेतले पाहिजे की पुरुषाच्या वीर्यातील शुक्रपेशींना खूप प्रवास आणि प्रयास करून स्त्री शरीरातील स्त्रीबीजापर्यंत पोहोचावे लागते यासाठी पुरुष-शुक्रपेशी आणि त्यांची हालचाल चांगली होत असणे आवश्यक आहे.  यासाठीच्या उपचारांमध्ये ऍलोपथी आयुर्वेद किंवा होमिओपॅथीचा परिणाम न साधला केल्यास शुक्रपेशी निवडून त्याला स्त्रीबीजात  टोचून नवीन जीवनिर्मिती करण्यासाठी आता आपले शास्त्र प्रगत झाले आहे.  याला आयव्हीएफ असे म्हणतात. याबद्दल अधिक चर्चा वंध्यत्व या प्रकरणात केली आहे.

 शुक्रपेशी कमी असतील किंवा पुरुष हालचाली करणाऱ्या नसतील तर त्याची अनेक कारणे असू शकतात यासाठी तपासणी करावी लागते सामान्यपणे स्थूलत्व धूम्रपान व्यायामाचा अभाव ताणतणाव यामुळे पेशींची संख्या कमी होऊ शकते तसेच काही शारीरिक दोष पण असू शकतात उदाहरणार्थ पुरुष बिजांडे विकसित असणे किंवा त्यांच्याभोवती रक्तवाहिन्यांचे जादा जाळे असल्यामुळे तो भाग गरम राहणे असे काही असू शकते यासाठी बायोप्सी म्हणजे पुरुष विजांडाचा छोटासा छेद घेऊन तो भाग तपासला जातो आणि निदान केले जाते परंतु शेवटी याबाबत त्या जोडप्याने आणि कुटुंबाने संयम दाखवून समंजसपणे ज्याचा कुणाचा उपाय करणे आवश्यक असेल ते सहनशीलतेने सहनशील त्यांनी केले पाहिजे हे महत्त्वाचे आहे  

बीजांडास पीळ पडणे-बीजांड चेंगरणे

बीजांडाच्या रक्तवाहिन्या व चेतातंतू यांचा एक गठ्ठा (बंडल) असतो. याच्या टोकाला खाली बीज़ांड असते. जर या रक्तवाहिन्यांना पीळ पडला तर रक्तप्रवाह थांबतो व वेदना सुरू होतात. या वेदना कधीकधी पोटदुखीसारख्या असतात. म्हणून तीव्र पोटदुखी असताना बीजांडाची तपासणी करणे आवश्यक असते. या वेदना भयंकर असतात. वेळ न दवडता ताबडतोब शस्त्रक्रिया करून पीळ उलगडला नाही तर त्या बाजूचे बीजांड निर्जीव होते. उशीर झाल्यास ते काढून टाकण्याशिवाय उपाय उरत नाही. अशा रुग्णाला ताबडतोब रुग्णालयात पाठवले पाहिजे.

कधीकधी अपघाताने किंवा मार लागल्याने बीजांड चेचले जाते. याची वेदना भयंकर असते आणि वेदनेमुळे मृत्यूही येऊ शकतो. या बाबतीतही ताबडतोब तज्ज्ञांकडे पाठवणे आवश्यक असते.

लघवीचे छिद्र बारीक असणे

हा बहुधा जन्मजात दोष असतो. यात मूत्रनलिकेत काही दोष नसतो पण बाहेरचे लघवीचे छिद्र खूप बारीक असते. त्यामुळे लघवी हळूहळू व थेंबथेंब होते. काही मुलांच्या बाबतीत लघवी शिश्न मुंडाबरोबर साठून त्वचेला फुगार येतो. कधीकधी लघवीचे छिद्र खूप बारीक असते किंवा जंतुसंसर्गामुळेही बारीक होऊ शकते. त्यामुळे लघवी करण्यास खूप वेळ लागतो. लघवीची धार लांब न पडता जवळ किंवा पायात पडते. हळूहळू किंवा थेंब थेंब लघवी होते.

याचा उपचार शस्त्रक्रियेने करतात. लघवीचे छिद्र लहान होण्याचे आणखी एक कारण म्हणजे शिश्नाच्या बोंडापुढील त्वचा चिकट असणे. हेही जन्मजात असते किंवा जंतुसंसर्गाने होते. यात शिश्नाच्या बोंडापुढील त्वचा मागे सरकत नाही. लघवी करताना या त्वचेत लघवी साठून फुगा येतो व हळूहळू व थेंबथेंब लघवी होते. शस्त्रक्रिया करून हे छिद्र मोठे करणे किंवा त्वचेचा काही भाग काढून टाकणे हाच यावरचा उपाय आहे. मुस्लिम समाजात सुंता करण्याची पध्दत आहे. सुंता म्हणजे शिश्नावरच्या त्वचेचा काही भाग कापून काढून टाकणे.

शस्त्रक्रिया करायच्या आधी छिद्र मोठे होण्यासाठी खालील उपाय करून पहा.

  • खोबरेल तेल (किंवा तीळ तेल) कोमट करून ते शिश्नाच्या टोकाला हलके चोळावे. यानंतर त्वचा थोडी मागे सारण्याचा प्रयत्न करावा. असे दिवसातून चार-पाच वेळा करावे. याप्रमाणे सात-आठ दिवस केल्यावर काही मुलांच्या बाबतीत छिद्र लघवीपुरते मोठे होऊ शकते. याने उपयोग होतच नसेल तर ताबडतोब डॉक्टरकडे नेणे आवश्यक आहे.
  • लघवीचे छिद्र बारीक असेल तर आणखी एक धोका संभवतो. लैंगिक संबंधात एकदा मागे गेलेली त्वचा पूर्वीप्रमाणे पुढे न येता मागेच अडकू शकते. ही त्वचा मागे न गेल्याने व ती वाट मुळात बारीक असल्याने पुढचा भाग सुजतो. यामुळे त्वचा पुढे येणे आणखीनच अवघड बनते. अशा वेळी ताबडतोब शस्त्रक्रिया करावी लागेल.
बीजांड अंडकोशात न उतरणे

बीजांडे गर्भावस्थेत पोटात असतात व जन्माच्या आधी काही आठवडे अंडकोशात उतरतात. कधी कधी ही प्रक्रिया मध्येच थांबते. बीजांड (एक किंवा दोन्ही) जांघेत किंवा पोटातच राहतात. इथले शरीराचे तपमान बीजांडाला मारक असते. हे लक्षात आल्यास लवकर डॉक्टरला दाखवले पाहिजे. शाळेच्या आरोग्यतपासणीतही ही तपासणी व्हायला पाहिजे. वेळीच शस्त्रक्रिया करुन बीजांड अंडकोशात न आणल्यास त्या बाजूचे बीजांड निष्क्रिय होते.

पुरुष जननसंस्थेची तपासणी 

शिश्न व लघवीचे छिद्र
  • शिश्नाच्या बोंडावरची त्वचा मागे करून पहावी. ब-याच जणांच्या बोंडावर पांढरट-करडा चिकट थर (स्मेग्मा) आढळतो. हा थर निदान आठवड्यात एकदा आंघोळीच्या वेळी स्वच्छ करून काढला पाहिजे. रोज स्वच्छता केल्यास हा थर राहात नाही. हा थर कायम राहिल्यास तिथे कर्करोग होण्याची शक्यता असते.
  • मुस्लिम व ज्यू समाजात सुनता करण्याची पद्धत असल्याने, हा चिकटा जमतच नाही, त्यामुळे या समाजात शिश्न-कर्करोगाची शक्यता कमी असते.  
  • शिश्नावरील कातडी स्वच्छ असणे आवश्यक आहे. ब-याच वेळा खरूज, नायटा, इत्यादी आजार शिश्नावर आढळतात. काही लिंगसांसर्गिक आजार शिश्नावर उघड दिसतात. शिश्नावरच्या पुढच्या आवरणावर जखम किंवा व्रण (दुखणारे किंवा न दुखणारे), लघवीच्या छिद्रावाटे पू, या सर्व लिंगसांसर्गिक रोगांच्या खुणा समजाव्यात.
  • मधुमेह असेल तर ब-याच वेळा शिश्नाचा पुढचा भाग सुजलेला व अस्वच्छ दिसतो.
  • उतारवयात या जागी कर्करोगाचा व्रण (जखम) किंवा छोटी गाठ असू शकते. न दुखणारा, न बरा होणारा व्रण असू शकतो. हा कर्करोग किंवा सिफिलिस हा लिंगसांसर्गिक आजार असू शकतो हे लक्षात ठेवा व डॉक्टरकडे पाठवा.
अंडकोश

वृषण व बीजांड-त्वचेचे रोग (खरूज, नायटा) हे या जागेतही होऊ शकतात. ओलसर, घामट, कोंदट परिस्थितीमुळे या ठिकाणी खरूज नायटा फार लवकर होतात.

अंडकोशांच्या किंवा वृषणाच्या दोन्ही बाजूंना एकएक याप्रमाणे बीजांडे (किंवा अंडगोल) असतात. वृषणाच्या नेहमीच्या आकारापेक्षा मोठा आकार आढळला तर पाणी किंवा पू झाला असल्याची शक्यता असते. तसेच हत्तीरोगाच्या प्रदेशात बीजांडे या रोगाने सुजून मोठी होतात.

पुरुषांच्या शुक्रपेशी आणणा-या वीर्यनलिका हाताला लागू शकतात. बीजांडकोश हाताच्या चिमटीत धरल्यावर ही नलिका चाबकाच्या बारीक वादीप्रमाणे कडक असल्यामुळे सटकते. पुरुष नसबंदी करताना दोन्ही बाजूंना ह्या नळया मध्ये कापून बांधतात. कापलेली टोके काही दिवसांनी गाठीसारखी टणक होतात.

जांघेतल्या गाठी

जांघेतल्या रसग्रंथी निरोगी अवस्थेत सहसा जाणवत नाहीत. मांडीवर, पायावर कोठेही जखम, पू, गळू असेल तर त्या सुजून दुखतात, तेव्हा आजा-याला व तपासणा-याला दोघांनाही जाणवतात. असे अवधान असेल तर मांडीवर, पायावर काही जंतुदोष असल्यास तपासावे. जखम/जंतुदोष नसेल तर जननेंद्रियाची तपासणी करावी लागेल. लिंगसांसर्गिक रोगात (स्त्री व पुरुष) या गाठी सुजून येतात. लिंगसांसर्गिक रोगाच्या काही प्रकारांत त्या दुखतात तर काही प्रकारांत फुटून पू येतो.