मानसिक आरोग्य आणि मनोविकार

व्यसनाधीनता – एक सामाजिक प्रश्‍न

दारूचे व्यसन हा मानसिक आजारांमधला सर्वात मोठा गहन प्रश्‍न आहे. याशिवाय इतर काही व्यसनेही आहेत. दारूच्या व्यसनामुळे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक हानी होते. मद्य सेवन करणार्‍यांपैकी सुमारे २०% व्यसनाधीन होतात असे आढळले आहे. हे २० टक्केच व्यसनाधीन का होतात यामध्ये जीवशास्त्रीय आणि जनुकीय कारणे असू शकतात. मात्र कोण व्यसनाधीन होईल आणि कोण नाही हे सांगणे शक्य नाही. दारूचे व्यसन मुख्यत: देशी दारू, अवैध दारू किंवा इंग्लिश दारू असे अनेक प्रकारांशी संबंधित आहे. सामान्यपणे सौम्य मद्यार्क असलेले वाईन्स, बिअर इ. व्यसनाधीनतेशी संबंधित नसते. त्यामुळे पुढे तीव्र मद्यार्क असलेल्या दारूचे व्यसन ओढवू शकते. दारू पूर्णपणे टाळणे हा सर्वोत्तम उपाय आहे. दारू पिण्याबद्दल तरुण वयातच चटक लागू शकते आणि मित्र मंडळींचा सामाजिक दबाव किंवा संबंध याला कारणीभूत होतो. कुतूहल म्हणून सुरुवात झाली तरी काही लोकांमध्ये हळूहळू ते व्यसनाच्या पायरीपर्यंत जाते. तरीही दारू पिणारे सर्व लोक व्यसनी आहेत असा ग्रह करणेही चुकीचे आहे. अनेक कुटुंबांमध्ये आणि समाजामध्ये सौम्य मद्यार्क धार्मिक व सांस्कृतिक रिवाजांचा भाग आहे.

दारूच्या व्यसनाचा रस्त्यावरचे अपघात, घरातला हिंसाचार, एकूण गुन्हेगारी, चोर्‍या या सगळ्यांशी संबंध आहे. हे व्यसन अत्यंत पुरातन आहे आणि आजही टिकून आहे.

मद्यार्काचे शारीरिक परिणाम

वैद्यक शास्त्राप्रमाणे कोणतेही द्रव्य अल्प प्रमाणात औषधासारखे व जास्त प्रमाणात विषासारखे परिणाम करते. सौम्य प्रमाणात मद्यार्कामुळे आनंद, उत्तेजन आणि चिंतामुक्त राहण्याचा अनुभव येतो. या परिणामांमुळे दारू हवीहवीशी वाटू शकते. परंतु क्रमश: असा परिणाम साधण्यासाठी लागणारा मद्यार्काची मात्रा हळूहळू वाढत जाते. यामुळे अधिक मद्यार्क घेण्याची इच्छा निर्माण होते. अर्थातच हे केवळ २०% व्यक्तींमध्ये घडू शकते. अशांमध्ये ही सवय मद्यार्काचे सहज सेवन, इच्छा, शारीरिक अवलंबित्व आणि सरते शेवटी व्यसन या चार पायर्‍यांनी जाते. मद्यार्कामुळे होणार्‍या दुष्परिणामात पोटात जळजळ, तोल जाणे, प्रतिसादाचा कालावधी वाढणे म्हणजेच हालचाली हळू होणे हे प्रमुख आहेत. दीर्घ सेवनाने म्हणजे महिनोन् महिने अधिक सेवन केल्यास ब जीवनसत्व अभावाने रक्तपांढरी, चेता तंतूंवर दुष्परिणाम, यकृत सूज आणि बौद्धिक मंदता येते. रक्तामधले त्याचे प्रमाण १ मिली. मध्ये १ मि.ग्रा. इतके झाले तर मद्यार्काचे प्रमाण विषारी अवस्थेत आहे असे समजतात. हेच प्रमाण ३ मि.ग्रा. पर्यत पोचल्यास बेशुद्धी आणि ५ मि.ग्रा. पर्यंत पोचल्यास मृत्यू संभवतो. व्यसनाधीन माणसाने दारू सोडण्याचा प्रयत्न केल्यास मद्यार्कावर अवलंबून असल्याने ते सोडणे कठीण जाते यामुळे मळमळ, उलटी, अशक्तपणा, अस्वस्थता, निद्रानाश होतात. याबरोबर गोंधळलेपण भान कमी होणे, लक्ष कमी होणे, विचित्र आभास होणे, आरडाओरडा, छातीत धडधड,रक्तदाब वाढणे, शरीरात कोरड पडणे आणि बेशुद्धी असे दुष्परिणाम दिसतात. काही व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्याइतके तीव्र परिणाम होतात. यामुळे दारू सोडणे कठीणच जाते. अशी व्यक्ती दारूसाठी घरात मारहाण करणे, इतरांशी खोटे बोलणे, चीज वस्तू विकणे वगैरे गैरप्रकार करायला प्रवृत्त होते. एकूणच त्यामुळे सामाजिक दुष्परिणाम होतात.

व्यसनमुक्ती

दारूचे व्यसन सोडणे अवघड आहे पण अशक्य नाही. यासाठी औषधांची मदत द्यावी लागते पण सामुहीक उपचारांची विशेष गरज असते. दारू सोडण्यासाठी ज्या गोळ्या दिल्या जातात त्या घेत असताना दारू प्यायली गेली तर अत्यंत कष्टदायक व पीडादायक अनुभव येतात. त्यामुळे झटकेही येऊ शकतात. म्हणूनच हा सर्व उपचार तज्ज्ञांच्या देखरेखीखाली झाला पाहिजे. या सर्व व्यसनमुक्ती कार्यक्रमात दारू सोडण्याची इच्छा आणि निश्‍चय या अगदी कळीच्या गोष्टी आहेत. एकेकट्याचे निश्‍चय दुबळे ठरू शकतात म्हणून सामुहिक इच्छा व कृती जास्त उपयोगी ठरतात. यामध्ये योगोपचार, सामुहिक खेळ, योग्य पोषण आणि समुपदेशन व इतर करमणुकीची साधने वापरली जातात. दारू पिण्याची इच्छा होण्याबद्दल मनात काही तरंग येतात ते लवकर ओळखायला शिकावे लागतात आणि त्यावर मात करायला शिकावे लागते.

या दृष्टीने अल्कोहोलिक ऍनानिमस (ए.ए.) हा आधारगट अनेक शहरांमध्ये परिणामकारक ठरला आहे. याच्या सदस्यांना आठवड्यातून दोनदा नियमितपणे एकत्रपणे भेटायला लागते. प्रत्येक व्यसनी व्यक्तीला एका निरोगी व्यक्तीचा आधार संपर्कासाठी दिला जातो. या गटात दारू सोडल्यानंतर परत कधीही तिला न शिवण्याची प्रतिज्ञा पाळावी लागते. या पद्धतीने अनेक लोकांनी आतापर्यंत हे व्यसन सोडून दिलेले आहे.

आरोग्य कार्यकर्ते म्हणून आपले काम शक्य तोवर दारूचे व्यसन रोखणे आणि गरजू व्यक्तींना मानसोपचार करणार्‍या संस्था-व्यक्तींशी संपर्क घडवून आणणे असा आहे. या कामात त्या व्यक्तीचे कुटुंब आणि आजूबाजूचा समाज यांचेही महत्त्वाचे योगदान असते. त्याशिवाय व्यसनमुक्ती अवघड असते. आपल्या प्रकल्पात या व्यसनांची समस्या जरी घेतली नसली तरी काही लोक तुम्हाला मदत मागतील त्यांना योग्य तो सल्ला आपण देऊ शकतो.

सामाजिक पातळीवर दारूबंदीसाठी अनेक प्रकारच्या चळवळी चालतात. काही गावात दारू दुकानबंदी करण्यासाठी महिला एकत्र आलेल्या आहेत. गावातल्या ५०% महिलांनी किंवा ५०% ग्रामपंचायत सदस्यांनी किंवा ग्रामसभेत ५०% उपस्थितांनी किंवा गावातील ५०% मतदारांनी दारू दुकान बंदीची लेखी मागणी केली तर शासनाला तिथले दारूचे दुकान बंद करावे लागते. मात्र ही समस्या प्रत्यक्ष दारूबंदी कायद्याने सुटत नाही असे वारंवार अनुभव आलेले आहेत. दारूबंदीच्या कायद्यामुळे बेकायदा दारूचा धंदा वाढतो, भ्रष्टाचार वाढतो, गुंडगिरी वाढते आणि विषारी दारूचे बळीही जातात. त्यामुळे राज्य किंवा जिल्हा पातळीवर दारूबंदी यशस्वी झालेली नाही. याचबरोबर काही धार्मिक साधुसंतांनीही दारूमुक्तीसाठी सामुहिक प्रतिज्ञेचे कार्यक्रम केलेले आहेत. याचा परिणामही काही काळापुरताच टिकतो असे दिसून आले आहे. या प्रश्‍नावर कायम स्वरुपी उत्तर सापडलेले नाही. समाजातले अनेक लोक व्यक्तिश: कधी ना कधी मद्य सेवनाचा आनंद घेतात त्यामुळे त्याच्यावर बंदी अशी शक्य झालेली नाही.

प्रत्येक व्यसनाची वैद्यकीय सामाजिक टिपणी करणे इथे जागेअभावी शक्य नाही मात्र उल्लेखासाठी तंबाखू, विडी, सिगारेट, गुटखा, गांजा हे काही पारंपरिक पदार्थ तसेच शहरांमधून अफूपासून बनवलेले हेरॉईन आदी पदार्थ व्यसने म्हणून कमीअधिक प्रमाणात आहेत. तंबाखू सिगारेटमुळे प्रत्यक्ष मनोविकार जरी होत नसले तरी एकूणच व्यसने हा स्वत:च एक मनोविकार म्हणून धरले जातात. याचे भान ठेवून आपण स्वत:च्या आणि सामाजिक भूमिकेचे पालन करावे.

वैद्यकीय उपचारांसाठी पाठवणी

सर्व गंभीर मानसिक आजारांमध्ये वैद्यकीय औषधोपचार लागतात. यासाठी अनेक चांगली औषधे उपयोगी आहेत आणि जागतिक आरोग्य संघटनेने मानसिक आजारांवरच्या आवश्यक औषधांची यादीही प्रकाशित केली आहे.

कोणत्या डॉक्टरकडे जावे?

सर्वसामान्य डॉक्टर्स म्हणजे जनरल प्रॅक्टीशनर्स मनोविकारांवर उपचार करायला फारसे धजावत नाहीत कारण आजार ओळखणे आणि त्यावरचे उपचार निवडणे याचे प्रशिक्षण त्यांना फारसे नसते. परंतु पुढे प्रशिक्षण घेऊन हे डॉक्टर देखील मनोविकारांवर उपचार करू शकतील. यातून रुग्ण बरा झाला नाही किंवा आणखी काही समस्या उद्भवल्या तर तज्ज्ञांकडे पाठवावे हे चांगले. मात्र काही आजारांमध्ये तज्ज्ञांचा सल्ला व मदत लागते, यात मुख्यत: ताणतणावामुळे होणारे मानसिक आजार, सदोष व्यक्तीमत्व, व्यसने वगैरे मनोविकार येतात.

जिल्हा किंवा उपजिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ सेवा उपलब्ध असतील तर आपण मनोविकारग्रस्त व्यक्तीला कुटुंबीयांना सोबत घेऊन सल्ला व उपचारांसाठी जाणे बरे पडते. खाजगी मनोविकारतज्ज्ञ हाच पर्याय असेल तर मात्र खर्च, ओळख व त्या डॉक्टरची केवळ प्रसिद्धी न बघता विचार करून निवडायला हरकत नाही. एकदा डॉक्टर निवडल्यानंतर काही काळ तरी डॉक्टर बदलू नये.

रुग्णाला डॉक्टरकडे कसे न्यावे?

बर्‍याच वेळेस मनोविकारग्रस्त व्यक्तीला डॉक्टरकडे नेणे ही एक समस्याच असते. एकतर अनेक रुग्णांना आपण आजारी आहोत हे पटत नसते त्यामुळे उपचार घ्यायला ते तयार नसतात. काही रुग्ण संमती देण्याची परिस्थितीत पण नसतात. रुग्ण आवरत नसेल तर बरोबर २-४ माणसे घेऊन जावे लागतात व वेगळे वाहन पण लागू शकते. त्यामुळे एकूण खर्च व जबाबदारी वाढत जाते. .

रुग्ण उपचारासाठी नेणे शक्य असेल तर केवळ वैद्यकीय माहितीवरून काही डॉक्टर्स सुरुवातीला औषधे कुटुंबीयांच्या हातात देऊ शकतात.संमती व कायद्याच्या दृष्टीने ती थोडी अडचणीची गोष्ट असते पण ती करायला लागते. औषध चालू केल्यानंतर मनोविकाराचे थोडे नियंत्रण झाले की कदाचित रुग्ण स्वत: येईल किंवा उपचारासाठी आणता येईल. शक्य असेल तर काही डॉक्टर्स रुग्णाच्या घरी येऊ शकले तर जास्त चांगले. शहरात हे एक वेळ शक्य आहे पण खेड्यात शक्य होईल असे नाही.

औषधे आणि इतर पाठपुरावा

काही रुग्ण औषध घ्यायला तयार नसतात आणि रोज औषध देणे हे कठीण काम होऊन बसते. अशा वेळी औषध जेवणात मिसळून द्यावे लागते. पदार्थांची चव बदलली तरी काही रुग्णांना संशय येतो. हे औषध कशात मिसळून द्यायचे हे अनुभवाने डॉक्टर चांगले सांगू शकतील. काही औषधे गरम पणाने निरुपयोगी होतात. म्हणून  गरम अन्नात औषध मिसळू नये. थंड झाल्यावरच त्याचा वापर करावा. या अडचणी असतील तर दरमहा इंजेक्शन देणे हा आणखी एक चांगला मार्ग आहे. इंजेक्शनने एकदा नियंत्रण आले की गोळ्या सुरू करता येतात. डॉक्टरांच्या पुनर्भेटीसाठी दरमहा निदान एकदा नेलेले चांगले. निदान सुरुवातीच्या उपचारांच्या काळात ३-६ महिने तरी हा रिवाज पाळावा. उर्वरित काळात निदान ३ महिन्यांनी एकदा डॉक्टर व रुग्णांची भेट घडावी हे चांगले. आपण कार्यकर्त्यांनीही महिन्यातून एक किंवा दोन गृहभेटी कराव्यात म्हणजे प्रगती आपल्याला कळत राहील.

एकूण ६०-७०% रुग्णांमध्ये या औषधांनी त्रास कमी होतो व मनोविकार आटोक्यात येतात. जर आराम पडला नाही तर औषध बदलायला लागते याबद्दल डॉक्टरच ठरवतील पण कुटुंबीयांनी निराश होण्याचे कारण नाही. काहीतरी मार्ग निघू शकतो. आजार लवकर ओळखणे, वेळीच उपचार करणे आणि पाठपुरावा करीत राहणे या गोष्टी नक्की उपयोगी पडतात.

आपण कार्यकर्ते इतरही काही मदत करू शकतो. ती म्हणजे औषधांबद्दल माहिती देणे, दुष्परिणाम झाले तर ओळखणे, इतर काही समस्या असल्यास त्याचे निराकरण करणे हे आपण करू शकू. रुग्णाच्या नंतरच्या पुनर्वसनात देखील आपले काम असतेच. काही वेळा रुग्णांना व कुटुंबीयांना कायद्याची माहिती द्यावी लागते. याबद्दल पुढे आपण शिकणारच आहोत. क्वचित काही रुग्णांना औषधांनी आराम पडला नाही तर शॉक चे उपचार करावे लागतात.  काही रुग्णांना डॉक्टर मनोरुग्णालयात दाखल करण्याबद्दल सुचवतील. ही कायमची व्यवस्था नसेल. तात्पुरती असेल. याने गडबडून जाण्याचे कारण नाही. 

विस्मृतीविकार

रामनाथच्या वडिलांचे वय आता ८० आहे. वयाच्या सत्तरीपर्यंत हा माणूस धडपड्या शेतकरी होता. मात्र त्यानंतर त्यांना विस्मरणाचा त्रास सुरू झाला. जेव्हा ते तालुक्याला माल विकायला जायचे तेव्हा निरनिराळ्या बाबतीत विसरण्याच्या घटना हळूहळू दिसू लागल्या. काही वेळा ते पैसे न घेताच परत यायचे. नंतर नंतर नावेही त्यांना सांगता येईनात. पुढे पुढे एखाद्या घटनेची तारीख किंवा वर्ष सांगणे देखील अवघड झाले. पुढे तर अशी परिस्थिती झाली की त्यांना स्वत:चे नाव, पत्ता देखील धड सांगता येईना. रामनाथने त्यांना घरीच थांबून राहायला सांगितले आणि सर्व प्रवास बंद केला. गेली ४-५ वर्षे म्हातारा कुणालाच ओळखत नाही आणि स्थळकाळाचे भान संपले आहे. त्यांना आता जेवण भरवायला लागते आणि मलमुत्राची सफाई पण करावी लागते. यासाठी घरातल्या २-३ माणसांनी जबाबदारी घेतली आहे. मोठे कुटुंब असल्याने व काही तरणी माणसे असल्याने ही जबाबदारी सहज खपून जाते. मुळात हे कुटुंब खूप धार्मिक असल्याने आणि वयस्कर माणसाबद्दल प्रेम, आदर असल्याने त्या कुटुंबाने ही गोष्ट सहज स्वीकारली आहे. त्याबद्दल कुणीही तक्रार करत नाही. हेच एखाद्या छोट्या कुटुंबात आणि शहरात फार जड गेले असते.

विस्मरणविकाराची ही एक सामान्य कथा आहे. या विकारात हळूहळू काही वर्षात बौद्धिक व भावनिक क्षमता कमी कमी होतात आणि स्मरण पण संपत जाते. नंतर नंतर स्वत:ची सामान्य काळजी, स्वच्छता देखील करणे अशक्य होऊन माणून पूर्ण परावलंबी होतो. योग्य आधार मिळाला नाही तर आयुष्याची वाटच संपते कारण निरनिराळे आजार व्हायला लागतात. म्हातारपणी येणारा हा विस्मरणविकार इंग्रजीत अल्झायमर आजार या नावाने ओळखला जातो. वाढत्या वयोमानामुळे या आजाराचे प्रमाण आता वाढतच चालले आहे.

विस्मरण विकाराची इतरही काही कारणे आहेत. दारूचे व्यसन, मेंदू पक्षाघात, मेंदू ज्वर, तंबाखूचे अतिसेवन वगैरे कारणांमुळे विस्मरण विकार होऊ किंवा वाढू शकतो.