श्वसनसंस्थेचे अनेक प्रकारचे आजार हे नेहमी आढळतात. पचनसंस्थेप्रमाणेच श्वसनसंस्थाही सतत बाहेरचे पदार्थ (हवा, धूळ, इ.) आत घेते. त्यामुळे संसर्गाचे अनेक प्रकारचे आजार श्वसनसंस्थेशी संबंधित आहेत. पचनसंस्थेचे अनेक आजार शुध्द अन्न-पाण्याने टळतात, पण श्वसनसंस्थेच्या बाबतीत हवेतून संसर्ग टाळणे अधिक कठीण आहे (ही आपण कोविद साथीत पाहीले आहे). इथे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी चांगल्या पोषणाची गरज आहे कोंदटपणा व दाटीवाटीमुळे संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढते. हे एक कारण राहणीमानाशी संबंधित आहे. हवाप्रदूषण हा तिसरा महत्त्वाचा घटक आहे. श्वसनसंस्थेच्या अनेक आजारात खोकला येतो. पण खोकला हे केवळ लक्षण आहे हे नजरेआड करून खोकल्याच्या औषधांचा निरुपयोगी मारा केला जातो. श्वसनसंस्थेच्या आजारांबद्दल शिकताना ही गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

श्वसनसंस्था म्हणजे बाहेरून हवा घेऊन ती असंख्य सूक्ष्म फुग्यांमध्ये खेळवण्याची व्यवस्था आहे. या सूक्ष्म फुग्यांच्या आजूबाजूला असलेल्या केशवाहिन्यांच्या जाळयातून रक्तप्रवाह खेळता असतो. हवा आणि रक्तप्रवाह या दोन्हींमध्ये वायूरुपी पदार्थांची देवाणघेवाण यामुळे शक्य होते. या देवाणघेवाणीत रक्तातले काही वायुरूप पदार्थ (कार्बवायू, पाण्याची वाफ व इतर काही पदार्थ) बाहेर टाकले जातात. हवेतून रक्तामध्ये प्राणवायू घेतला जातो. प्राणवायू व कार्बवायूची देवाणघेवाण रक्तातल्या तांबडया पेशींमधील रक्तद्रव्यामुळे (हिमोग्लोबीन) होऊ शकते.
हा प्राणवायू-युक्त म्हणजे ‘शुध्द’ केलेला रक्तप्रवाह हृदयाच्या डाव्या भागात येतो. तेथून तो रोहिण्यांमार्फत सर्व शरीरात पोहोचवला जातो. याचप्रमाणे ‘अशुध्द’ रक्त (म्हणजे प्राणवायू कमी) महानीलेमार्फत हृदयाच्या उजव्या भागात येते. तेथून हे रक्त फुप्फुसांमध्ये पोहोचवले जाते. असे हे चक्र सतत चालते.
श्वसनसंस्थेला हवेचा पुरवठा करण्यासाठी नाकापासून सुरुवात होते. घशात स्वरयंत्रापासून श्वासनलिका सुरू होते. नाक, घसा व स्वरयंत्र यांना बाह्य श्वसनसंस्था असे म्हणतात. त्याखाली श्वासनलिकेपासून फुप्फुसापर्यंत आतली श्वसनसंस्था असते. बाह्य श्वसन संस्थेचे आजार सहसा साधे असतात. तर आतल्या श्वसनसंस्थेचे बहुतेक आजार गंभीर असतात.

छातीत श्वासनलिकेच्या उजवी आणि डावी अशा दोन मुख्य शाखा होतात:. या मुख्य शाखेपासून प्रत्येकी तीन-तीन फांद्या निघतात. या तीन उपशाखा– (वरची, मधली, खालची)– फुप्फुसाच्या वेगवेगळया भागांना हवा पुरवतात. प्रत्येक फुप्फुसाचे याप्रमाणे तीन भाग आहेत (वरचा भाग, मधला भाग, खालचा भाग.) मात्र डाव्या बाजूच्या फुप्फुसाचा मधला भाग फार लहान असतो कारण ती जागा हृदयाने व्यापलेली असते. म्हणून डाव्या फुप्फुसाचे मुख्य वरचा व खालचा असे दोन भाग होतात. सहसा फुप्फुसाच्या आजारांमध्ये यांपैकी एखादाच भाग आजारी होतो. विशेषतः न्यूमोनिया व क्षयरोग हे आजार बहुधा फुप्फुसाच्या एखाद्या भागातच होतात.

फुप्फुसाची एकूण रचना ही एखाद्या झाडासारखी फांद्याफांद्यांची असते; फक्त पानांच्या ऐवजी फुग्यांची कल्पना करा. श्वासनलिकेतून हवा घेतल्यानंतर हे असंख्य सूक्ष्म फुगे (वायुकोश) थोडे फुगतात. हवा सोडून देताना ते लहान होतात. हे सतत लहानमोठे होणे हेच फुप्फुसाचे मुख्य कामकाज आहे. यासाठी श्वासनलिकांचे सर्व जाळे लवचीक असते. हा लवचीकपणा धूम्रपान, प्रदूषण, इत्यादी कारणांमुळे कमी होतो. धूम्रपानामुळे श्वासनलिकांच्या शाखा-उपशाखा आकुंचित व अरूंद होतात, आणि छातीवर दम्यासारखा परिणाम होतो. श्वासनलिकेपासून पुढे फांद्या उपफांद्या असे जाले हॉट जाते. लवचिक दुर्बिण (एंडोस्कोप) घालून या उपफांद्या तपासता येतात आणि शस्त्रक्रिया देखील करता येतात.
श्वासनलिकेच्या शाखा-उपशाखांमध्ये ओलेपणा राहण्यासाठी पाझर होत असतात. निरोगी अवस्थेत हे पाझर थोडे असल्याने जाणवत नाहीत. पण काही कारणांमुळे हे स्राव वाढले तर खाकरा-बेडका या स्वरूपात ते जाणवतात. काही आजारांमध्ये फुप्फुसात दाह निर्माण होऊन आत पाझर वाढतात. ते श्वासनलिकेत येऊन खाकरा-बेडका या स्वरूपात बाहेर पडतात.
एकात एक अशा दोन प्लॅस्टिक बॅगची कल्पना करा. फुप्फुसाच्या भोवती असे पातळ दुपदरी आवरण असते. या दोन थरात पोकळी असते व त्यात थोडासा द्रव (10 मिलि)असतो. त्यात हवा येऊ शकत नाही. छातीच्या पिंज-याची भिंत आणि फुप्फुसे या दोन्हींच्या मध्ये हे दुपदरी आवरण असते. निरोगी अवस्थेत यात ओलेपणा असण्याइतकाच द्रव असतो.
क्षयरोग व इतर ‘पू’ कारक जंतुदोषामुळे यात जादा द्रव जमतो. (छातीत पाणी होणे) त्याचा दाब फुप्फुसाच्या तेवढया भागावर येऊन श्वसनाला अडथळा येतो.
श्वसनाची लयबध्द क्रिया ही मेंदू, चेतासंस्था व श्वसनाचे स्नायू यांच्यामुळे शक्य होते. श्वसनाचे मुख्य स्नायू म्हणजे श्वासपटल (म्हणजे छाती आणि पोट यांच्यामधला घुमटासारखा स्नायु पडदा) आणि बरगडयांचे स्नायू, हे स्नायू इच्छेनुसार हलवता येतात. पण हे स्नायू आपल्याला जाणीव नसते तेव्हा आपोआपही (इच्छेशिवाय) काम करीत असतात. या स्नायूंचे नियंत्रण मूळ मेंदूतील केंद्रे करतात. काही गंभीर आजारांमध्ये या केंद्राचे कामकाज बिघडून श्वसन बंद पडते. यामुळे मृत्यू येऊ शकतो. मेंदूचा रक्तपुरवठा बंद पडणे, सर्पदंश, विषबाधा, इ. यामुळे असे होऊ शकते.

श्वसनसंस्थेच्या या मुख्य रचनेशिवाय आणखी एक भाग म्हणजे सायनस. सायनस म्हणजे नाकाला जोडलेली हाडातली पोकळी. एखाद्या घरात जशा खोल्या असतात तसे नाकाला सायनस असतात. नाकाच्या दोन्ही बाजूंना चार-चार अशा एकूण आठ पोकळया असतात. यात हवा असते. मध्यकर्णातून निघणारी नळीही नाकात उघडते (कानाघ नळी). म्हणूनच सर्दीपडशात सायनसदुखी किंवा कानदुखी होऊ शकते.
सर्दी-पडसे ही अगदी सामान्य तक्रार आहे. सर्व वयाच्या, सर्व प्रकारच्या व्यक्तींना सर्दी होऊ शकते. हवामान बदलताना अनेकांना सर्दी-पडशाचा त्रास होतो.
सर्दी-पडसे एका जातीच्या विषाणूंमुळे (किंवा काही वेळा वावडयामुळे) होते. हे विषाणू एकापासून श्वासावाटे दुस-याकडे सहज पसरतात. एक-दोन दिवसांत त्यालाही सर्दी सुरू होऊ शकते. या विषाणूंविरूध्द थोडीफार प्रतिकारशक्ती तयार झाली तरी ती अल्पजीवी असते म्हणून, त्याच व्यक्तीला पुन्हापुन्हा सर्दी होऊ शकते.
सर्वसाधारणपणे सर्दी एका आठवडयात पूर्णपणे बरी होते.
डोकेदुखीवर ऍस्पिरिन किंवा पॅरासिटामोल घेण्यापलीकडे विशेष उपचाराची गरज पडत नाही.
सीपीएम गोळीने वावडयाची सर्दी कमी व्हायला मदत होते. मात्र या गोळीमुळे गुंगी व झोप येते. पण शरीराला थोडा व्यायाम दिला तरीही नाक आपोआप मोकळे होते.
अजून विषाणूंवर कोणतेही परिणामकारक औषध नसल्याने विषाणूसर्दी ‘बरी’ होण्यासाठी कसलेही औषध नाही. जाहिरातीत अनेक प्रकारच्या गोळया असल्या तरी सर्दी बरी करणारे औषध त्यात नसते. त्यात फक्त डोकेदुखीसाठी ऍस्पिरिन मात्र असते. ‘विक्स’, ‘रबेक्स’ या मलमांमध्ये असलेल्या पाच घटकांपैकी फक्त एक घटक मेंथॉल उपयोगी ठरू शकतो. तोही फक्त चोंदलेले नाक मोकळे करण्यासाठी. बाकी सर्व निरुपयोगी मालमसाला! कसलेही औषध घेतले तरी सर्दी बरी व्हायला आठवडाभर लागू शकतो.
सर्दीचा त्रास वारंवार होत असल्यास कानाघ तज्ज्ञाकडून अंतर्गत तपासणी करून घ्यावी. नाकाच्या अंतर्भागात ‘पॉलिप’ (लहान द्राक्षघडासारखी वाढ) असल्यास वांरंवार सर्दीचा त्रास होतो. हा विकार सूक्ष्म दर्शकातून शस्त्रक्रियेने (एंडोस्कोपी सर्जरी) पूर्ण बरा करता येतो.
सर्दी- पडसे कमी होण्यासाठी लंघन (उपवास) खूपच उपयुक्त आहे. पंखा, धुरळा किंवा इतर काही विशिष्ट कारण माहीत असल्यास ते टाळण्याचा प्रयत्न करावा. काही लोकांना रात्री झोपण्यापूर्वी खूप पाणी पिण्याची सवय असते, यामुळेही सर्दी-पडसे होऊ शकते. थंडी, पावसाळा संपून ऊन तापू लागताना ब-याचजणांना सर्दी होते. ही सर्दी थांबवण्याचा प्रयत्न करू नये; वाहू द्यावी, म्हणजे श्वसनसंस्थेचे इतर भाग (श्वासनळी, फुप्फुसे) निरोगी राहतात. अशी सर्दी औषधांनी दाबण्याचा प्रयत्न केल्यास श्वसनसंस्थेच्या खालच्या भागात स्राव सुरू होतात असा आयुर्वेदाचा अनुभव आहे. म्हणूनच नाकातून सर्दी वाहून जाऊ देणे महत्त्वाचे आहे.
सर्दीवर नागगुटी किंवा त्रिभुवनकिर्ती या औषधांच्या 2-2 गोळया दिवसातून 3 वेळा याप्रमाणे 3 दिवस द्या.
मसालेदार व तिखट पदार्थ खाल्ल्यामुळे श्वसनसंस्थेत पाझर वाढून नाक लवकर मोकळे होते असा अनुभव आहे. या गुणांचा उपयोग करून तिखटाने सर्दीवर थोडा आराम मिळू शकतो.
नायट्रिक ऍसिड, ब्रायोनिया, मर्क्युरी सॉल, नेट्रम मूर, पल्सेटिला, सिलिशिया, ऍलियम सेपा, पेन्थोरम
आर्सेनिकम, बेलाडोना, ब्रायोनिया, हेपार सल्फ, मर्क्युरी सॉल, नेट्रम मूर, नक्स व्होमिका, फॉस्फोरस, पल्सेटिला, -हस टॉक्स, सिलिशिया, सल्फर, थूजा
सतत व वारंवार सर्दीसाठी हा उपाय करुन पाहावा, पान सर्दी नसताना अधेमध्ये हा उपाय करायचा आहे. नाकातून स्राव वाहून जाण्यास मदत व्हावी म्हणून कोमट मीठपाण्याने नाकाच्या अंतर्भागाची स्वच्छता करावी. या क्रियेला जलनेति म्हणतात. यासाठी मीठ मिसळून अश्रूंच्या चवीचे सुमारे अर्धा लिटर कोमट खारट पाणी तयार करावे. हे पाणी आधी ‘चालू’ असलेल्या नाकपुडीतून हळूहळू सोडावे. तोंडाने श्वासोच्छ्वास चालू ठेवावा म्हणजे हे पाणी घशात उतरत नाही. ते आपोआप दुस-या नाकपुडीतून वाहते. यानंतर हाच प्रयोग दुस-या नाकपुडीतून करावा. नाकाचा अंतर्भाग, पोकळया, सायनस पोकळयांची तोंडे या क्रियेने स्वच्छ व मोकळी होतात. यामुळे घाण बाहेर पडायला मदत होते. मिठाचे प्रमाण अश्रूंच्या चवीपेक्षा कमी किंवा जास्त झाले असेल तर या पाण्याने नाक चरचरते. शुध्दीक्रिया झाल्यानंतर एकेक नाकपुडी हलकेच शिंकरून साफ करावी. वाकून उभे राहिल्यावर घशात न जाता पाणी सहज बाहेर पडते.
यानंतर पाठीखाली दोन उशा घेऊन उताणे झोपावे. (डोक्याखाली नाही) या अवस्थेत नाकात गाईच्या किंवा म्हशीच्या पातळ तुपाचे एक-दोन थेंब टाकावेत. मानेच्या अशा अवस्थेत नाकात टाकलेले थेंब घशात उतरत नाहीत. यासाठी वचादि तेल किंवा खोबरेल तेलही चालते. अणुतैल औषधांचे थेंब नाकात टाकण्याने वारंवार होणारा सर्दीचा त्रास आटोक्यात राहतो. वेखंडयुक्त तेलाचे थेंबही यासाठी चांगले. वैद्यकीय दुकानात ते ‘वचादि तेल’ या नावाने मिळते.
सर्दी – पडशाने नंतर आणखीही काही आजार निघू शकतात. ते म्हणजे कानदुखी, सायनसदुखी, घसासूज, श्वासनलिकादाह, इत्यादी. सर्दी-पडशात विषाणुमूळे दाह असल्याने श्वसनमार्गाची प्रतिकारशक्ती थोडी कमी होते. त्यामुळे जंतुदोष होऊ शकतो.
कानाघ नळीतून सर्दी-पडशाचे पाणी कधीकधी कानात ढकलले जाते. यामुळे मध्यकर्णाला सूज येते. यामुळे कान ठणकतो व नंतर कानाचा पडदा फुटू शकतो.
सर्दीमुळे घसासूज व श्वासनलिका दाह झाला असेल तर खोकला हे प्रमुख लक्षण असते.
सायनसदुखीमध्ये कपाळात भुवयांवर, डोळयांच्या खाली जडपणा किंवा ठणका सुरू होतो.
या सर्व इतर त्रासांचे कारण बहुधा जंतुदोष असतो. या तीनही आजारांत कॉट्रिमोक्षझोल , ऍमॉक्सी किंवा टेट्राच्या गोळयांनी आराम पडतो. सायनसदुखी मात्र कधीकधी टिकून राहते. सायनसमधला पू काढून टाकण्यासाठी शुध्दीक्रिया उपयोगी आहे.