
या आजारात गर्भाशयात सूक्ष्मजंतूंमुळे दाह होऊन ते रक्तात पसरतात व मातेची प्रकृती अचानक गंभीर होते. रक्तदाब कमी होतो, ताप खूप येतो किंवा शरीराचे तापमान नेहमीपेक्षा खाली येऊन शरीर ओलसर, थंड लागते. गर्भाशयावर दाबले असता वेदना होते. गर्भाशयातून येणा-या स्त्रावाला दुर्गंधी येते व योग्यवेळी इलाज न झाल्यास मृत्यू येण्याचा धोका असतो. या आजाराला बाळंतरोग म्हणता येईल. अशा वेळी ताबडतोब रुग्णालयात न्यावे.
स्तनामध्ये पू होणे, गाठी होणे, असह्य वेदना होणे, गळू फुटून जखम राहणे, इत्यादी त्रास ब-याच स्त्रियांना होतो. स्तन वेळोवेळी रिकामे करून हे टाळता येईल. मात्र एकदा गळू झाल्यावर स्तन दाबून दूध बाहेर आणणे अवघड होते. शस्त्रक्रियेने गळू फोडून पू काढणे हाच यावर उपाय आहे.
गर्भपात किंवा ‘अर्धेकच्चे पडणे’ हा शब्द आपण ब-याच वेळा ऐकतो. गर्भधारणा होऊन सात महिने (२० आठवडे) पूर्ण व्हायच्या आत गर्भ पडला तर त्याला गर्भपात म्हणतात. असा गर्भ बाहेर पडताना जिवंत असला तरी काही केल्या जगत नाही. (सात महिने पूर्ण असतील तर मात्र खास उपायांनी मूल जगवता येते.म्हणून सात महिन्यांनंतर गर्भ पडला तर अपु-या दिवसांचे प्रसूती म्हणतात; गर्भपात म्हणत नाहीत.) गर्भपात हा वैद्यकीय शास्त्रानुसार बाळंतपणापेक्षा जास्त जोखमीचा असतो.


गर्भ वारंवार पडत असेल (म्हणजे तीन अथवा अधिक वेळा) तर लिंगसांसर्गिक आजार किंवा गर्भाशयाचे तोंड सैल असणे ही कारणे असू शकतात.
निसर्गतः होणारा गर्भपात अनेक कारणांनी होतो – गर्भ सदोष असणे, मातेला लिंगसांसर्गिक आजार असणे, गर्भपिशवीचे तोंड सैल असणे, जोरदार जुलाब/हगवण होणे, खूप ताप येणे, प्रवासात ओटीपोटात धक्का लागणे, कावीळ होणे, अन्न विषबाधा, लैंगिक संबंधात धक्का लागणे, स्त्री अथवा पुरुष बीजामध्ये काही दोष, भृणाची विकृतीयुक्त वाढ, मातेचे तीव्र कुपोषण, इत्यादी.
1. पोट दुखते व अंगावरून थोडे रक्त किंवा तांबडे पाणी जाणे ही गर्भपाताची सुरुवात असते. वेळीच विश्रांती व उपचार झाल्यास गर्भपात व्हायचा टळून गर्भ पुढे वाढत राहतो. मात्र यासाठी त्वरित रुग्णालयात दाखल केले पाहिजे.
2. अंगावरून जास्त रक्त जाणे व पोटात दुखणे ही दोन्ही लक्षणे असतील तर गर्भपात अटळ असतो. अशा वेळी आतून तपासल्यावर गर्भाशयाचे तोंड उघडून एक बोट आत जाण्याइतकी वाट झालेली असते. अशा वेळी गर्भ लवकर पडून जाणेच हिताचे असते. पोटात दुखणे थांबून, रक्तस्राव थांबला असेल तर गर्भ पडून गेला असण्याची शक्यता असते. आतून तपासणी केल्यावर अशा वेळी गर्भाशय लहान आणि घट्ट लागते.
3. अर्धवट गर्भपात – काही वेळा मात्र गर्भाचा काही भाग आत राहून जातो व रक्तस्रावही चालू राहतो. आतून तपासणी केल्यावर गर्भाशय मऊ व मोठे लागते. कारण आत गर्भाचा भाग व रक्त असते. अशा वेळी रुग्णालयात नेऊन गर्भाशयाचे अस्तर खरवडून (क्युरेटिंग) घेणे हिताचे असते. नाहीतर जंतू शिरून आजाराचा धोका निश्चितच असतो. ही गोष्ट अगदी महत्त्वाची आहे. हा उपाय केल्यावर रक्तस्राव थांबतो. काही वेळा अर्धवट गर्भ आत राहून जंतुदोषाची लागण होते.
4. चौथी अवस्था – सपूर्ण गर्भपात होणे. वेदना थांबतात. रक्तस्त्राव थांबतो आणि गर्भाशयाचे तोंड बंद होते.

आपल्यासारख्या देशात योग्य उपचाराऐवजी अघोरी मार्ग वापरून गर्भ पाडण्याचे अनेक प्रकार होतात. यात नेहमीच धोके असतात. अतिरक्तस्राव, जंतुदोष सिप्टिका, इत्यादी परिणाम होऊन माता मृत्यू घडू शकतात. यासाठी गर्भपाताचा खास कायदा 1972 साली झाला आहे. यातल्या सोयी आपण नंतर पाहू.
गर्भधारणेनंतर वीस आठवड्यांच्या आत गर्भाचा शेवट होणे म्हणजे गर्भपात. वीस आठवड्यानंतर गर्भ बाहेर पडला तरी जगू शकतो. पण त्याआधी मात्र बाहेर जगू शकत नाही.
वैद्यकीय गर्भपाताचा कायदा व्हायच्या आधी अयोग्य गर्भपातांमुळे खूप त्रास व अपमृत्यू होत असत. पुरुषप्रधान व्यवस्थेमुळे स्त्रियांवर अत्याचार तर होतातच. आपल्या देशात विवाहबाह्य संततिला सामाजिक मान्यता नसते. यामुळे चोरून मारून अयोग्य पध्दतीच्या गर्भपाताचा धोका अनेक स्त्रियांना पत्करावा लागत असे. झाडपाल्याची औषधे, गर्भाशयात काडी किंवा इतर पदार्थ घालून गर्भपात करणे पूर्वी सर्रास होते. असे ‘पोटचे पाडणे’ गुप्त ठेवावे लागत असल्याने शारीरिक व मानसिक त्रास सोसावा लागत असे. रक्तस्रावाबरोबर जंतुदोष झाला, की अनेक स्त्रियांना वंध्यत्व, ओटीपोटातले आजार, इत्यादी संकटांना तोंड द्यावे लागत असे. अनेक स्त्रिया यात दगावत असत. गर्भपाताचा कायदा झाला तरी अजूनही असे छुपे गर्भपात होतातच.
या पार्श्वभूमीवर गर्भपाताचा कायदा ही एक मोठीच सुधारणा आहे. तरीही सुरक्षित गर्भपात हा स्त्रीचा सहज अधिकार म्हणून या कायद्याने मान्य केलेला नाही. सहज अधिकार हे तत्त्व सोडून इतर अनेक ‘कारणांवरून’ या कायद्यात गर्भपात मान्य केलेला आहे. मात्र या कायद्यामुळे स्त्रियांसाठी गर्भपात सोपा झालेला आहे. वैद्यकीय गर्भपातासाठी आता कायद्याने पुरुषांच्या संमतीची आवश्यकता नसते. तसेच तज्ज्ञांकडून गर्भपात केल्याने यातला धोका अगदी कमी झाला आहे. सुधारित गर्भपात कायद्याचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे.
(अ) गर्भपाताची वैध कारणे
गर्भपातासाठी खालील कारणे मान्य करण्यात आली आहेत.
स्त्री मानसिक अपंग असल्यास गर्भपातासाठी हे कारण पुरते. मात्र नुकताच सुप्रीम कोर्टाने याविरुध्द निकाल दिला असल्याने याबाबतीत थोडा मतभेद निर्माण झाला आहे.
स्त्री मानसिकदृष्टया अपंग किंवा अज्ञान (तिचे वय अठरा वर्षाखाली असेल) तरच गर्भपातासाठी पालकांची संमती लागते. एरवी तिची स्वतःची संमती पुरते.
स्त्रीगर्भ हे गर्भपाताचे कारण होऊ शकत नाही. असे करणे गुन्हा आहे.
(ब) गर्भपात केंद्र
शासनमान्य केंद्रावरच गर्भपात करता येतो. या ठिकाणी पुरेशी तयारी व उपकरणे, सोयी आहेत हे पाहूनच मान्यता दिली जाते. प्रत्येक हॉस्पिटलला अशी मान्यता असतेच असे नाही. 12 आठवडयांपुढच्या गर्भपातासाठी पोटावर ऐनवेळी शस्त्रक्रिया करण्याची व रक्त देण्याची सोय असल्याशिवाय त्या हॉस्पिटलला मान्यता मिळू शकत नाही. बहुतेक गर्भपात केंद्रांना 12 आठवडयाच्या आतलाच गर्भपात करता येतो.
मान्यताप्राप्त केंद्रावर ‘अधिकृत गर्भपात केंद्रा’ची पाटी असते.
(क) प्रशिक्षित डॉक्टर
गर्भपात करण्यासाठी स्त्रीरोगतज्ज्ञ (M.D किंवाDGO) लागतो. अथवा खास प्रशिक्षित MBBS डॉक्टर चालतो. डॉक्टर प्रशिक्षित असल्याचे शासनाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
12 आठवडयांपर्यंतचा गर्भ असेल तर एक मान्यताप्राप्त डॉक्टर लागतो. 12 ते 20 आठवडयांचा गर्भ असेल तर किमान दोन मान्यताप्राप्त डॉक्टर हजर असावेत.
20 आठवडयांच्या पुढे गर्भपात करायला मान्यता नाही. कारण यानंतर स्त्रीच्या दृष्टीने धोका वाढतो. मात्र याबद्दल काही मुदतवाढ अपेक्षित आहे.
(ड) गर्भपात कसा करतात
आठ आठवडयांच्या आतला गर्भ लहान असतो. हा गर्भ निर्वात पंपाने ओढणे हे एक साधे तंत्र आता वापरतात. यानंतर सहसा क्युरेटिंग लागत नाही. या साध्या तंत्राला एम.व्ही.ए. (मॅन्युअल व्हॅक्युम ऍस्पिरेशन) असे म्हणतात. याला भूल लागत नाही.
बारा आठवडयांच्या आतल्या गर्भपातासाठी खालून म्हणजे योनीमार्गाने छोटी शस्त्रक्रिया असते. यात गर्भाशयात नळी सरकवून निर्वात पंपाने आतला गर्भ ओढून घेतात यानंतर गर्भपिशवी आतून खरवडून काढतात. गर्भाशयाच्या तोंडाशी असणा-या नसांपुरती भूल देऊन हे काम करता येते.
12 ते 20 आठवडयांपर्यंतचा गर्भ सलाईन किंवा विशिष्ट औषध (प्रोस्टा ग्लॅडिन) गर्भाशयात सोडून किंवा प्रत्यक्ष शस्त्रक्रिया करून काढावा लागतो. यात जास्त धोका व त्रास असतो. रुग्णालयात राहावे लागते.
पाळी चुकून 15 दिवसच झाले असतील व गर्भ नको असेल तर ही पध्दत वापरतात. ही बाब गर्भपाताच्या कायद्याच्या कक्षेत येत नाही. यात एक प्लास्टिकची सिरींज वापरतात. नळीमार्फत गर्भाशयात जे काही असेल ते शोषून घेतले जाते व त्यानंतर पाळीचे चक्र नेहमीसारखे होते. म्हणून याला ‘एम. आर.’ किंवा ‘पाळी सुरळीत करणे’ असे म्हणतात. पण पाळी चुकून 15 दिवसांपेक्षा अधिक वेळ झाला असेल तर या पध्दतीचा उपयोग होत नाही.
एम. आर. व दहा-बारा आठवडयांपर्यंतच्या गर्भपातासाठी रुग्णालयात काही तास राहणे पुरते, मात्र त्यानंतरच्या गर्भपातासाठी वेगळी पध्दत असल्याने रुग्णालयात दोन-तीन किंवा अधिक दिवस राहावे लागते.
लैंगिक संबंध आल्यापासून २४ तासात, एकच गोळी घेऊन गर्भसंभव टाळण्याची सोय आता झाली आहे यात स्त्रीसंप्रेरकांचा एक मोठा डोस असतो.
मेडिकल गर्भपात : ७ आठवड्या अगोदरचा गर्भपात गोळ्या/औषध घेऊन करता येतो. मात्र हे औषध स्त्रीरोग तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने घ्यावे. साधारण गोळ्या घेतल्यानंतर ४८ ते ७२ तासात गर्भपात होतो.
गर्भपात टाळण्यासाठी काय करावे : दिवस जाण्या अगोदर पासून डॉक्टरांकडे जाणे. पूर्वी झालेल्या गर्भपाताचे कारण शोधून सापडले तर गर्भपात न होण्यासाठी अगोदर पासून उपाय करता येतात व गर्भपात होण्याची पुनरावृत्ती टाळता येते.
गर्भपात करण्याची गरज ही पूर्वापार आहे. समाजाच्या नीतिविषयक कल्पनांमुळे बरीवाईट किंमत मोजून गर्भपात घडवून आणले जातात. खेडोपाडी गर्भपातासाठी झाडपाल्याचे औषध देणारे असतात. काही वेळा त्यांच्या औषधांचा उपयोग झाला असल्याचे पाहण्यात येते. या गोष्टी सरसकट वाईट म्हणून टाकाऊ ठरवणे किंवा योग्य म्हणून एकदम स्वीकारणे हे दोन्हीही शास्त्रीय नाही. अशा उपायांची तपासणी करून त्यात काय व किती धोका आहे हे संशोधकांनी अभ्यास करूनच ठरवायला पाहिजे. पण असे उपाय करणारे वैदू माहिती द्यायला तयार असतील तर ही औषधे काळाबरोबर नष्ट होणार नाहीत. पण आता आधुनिक वैद्यकीय तंत्र वापरून जवळजवळ निर्धोक गर्भपात करता येतो, हे आपण सांगायला पाहिजे.
गाजराचे बी, कच्ची पपई वगैरे खाल्ल्यास गर्भपात होतो असे अनेक स्त्रिया मानतात. आदिवासी भागात घरी तयार केलेली दारू ही यासाठी वापरली जाते. या सर्व पदार्थांमुळे शरीरात उष्णता वाढून गर्भपात होतो असा समज आहे. मात्र आधुनिक काळात असे प्रयोग करून जिवाशी खेळण्यापेक्षा मान्यताप्राप्त गर्भपात केंद्रात शास्त्रीय उपचार करून घेणे केव्हाही चांगले.