मानसिक आरोग्य आणि मनोविकार

आपली भूमिका आणि जबाबदारी

आपल्या सामाजिक व आरोग्यसेवांच्या एकूण टंचाईच्या पार्श्‍वभूमीवर कार्यकर्ते म्हणून आपण काय काय करू शकतो याचे आकलन व्हायला पाहिजे. आपण मुख्यत: जाणीव-जागृती, मनोविकार शोधन, मनोविकार ग्रस्तांना डॉक्टरांकडे पाठवणे, पाठपुरावा आणि सामाजिक साहाय्य करणे, आजारी व्यक्ती बरी होत असताना हळूहळू पुनर्वसन करणे आणि एकूणच त्या कुटुंबाला मित्र म्हणून सहाय्य करणे एवढी कामे तर निश्‍चित करू शकतो.पण यातील प्रत्येकच काम आपण प्रत्येक जण करू शकू असे नाही. काही जणांना ही कामे छान येतात तर काहींमध्ये ती कमी पडतात. याउलट काही कार्यकर्ते दुसरी काही कामे चांगली करतात. म्हणूनच एकेकटा कार्यकर्ता असण्यापेक्षा ४-५ जणांचा एक गट असणे केव्हाही चांगले. शिवाय प्रशिक्षणाने आणि अनुभवाने आपल्या कौशल्यामध्ये आणि ज्ञानामध्ये सतत भर पडत जाते. त्यामुळे आज न येणारे काम उद्या आपल्याला जमू शकते. आपण नेट धरला तर त्यातील जटील गोष्टीही आपण हळूहळू करू शकतो. उदा. मनोविकाराचा प्रकार ओळखणे हे कार्यकर्त्यांचे प्राथमिक काम नाही पण समज आणि अनुभव वाढल्याने हे काम पण आपण करू शकतो. सध्या आपण गंभीर मनोविकारांसाठीच काम करणार असलो तरी देखील सामान्य मनोविकारांची देखील माहिती आपल्याला होऊ शकते. त्यामुळे एकूणच आपल्यामध्ये प्रगल्भता येत जाईल. शेवटी याचा फायदा त्या कुटुंबालाच नाही तर आपल्याही जीवनात हळूहळू होत जातो.

जाणीव जागृती

वेळोवेळी मानसिक आरोग्य आणि आजार यांच्याबद्दल आपल्या परिसरात छोटे मोठे कार्यक्रम आयोजित करा. यासाठी भित्तीपत्रके, पलटतक्ते वगैरेंचा वापर करा.

मनोविकारांच्या लक्षणांबद्दल विशेष माहिती द्या.

इतर आरोग्य कार्यकर्ते म्हणजे आशा, अंगणवाडी सेविका, साहायक परिचारिका, पुरुष आरोग्य कर्मचारी वगैरे मंडळींपर्यंत ही माहिती पोचवा. त्यांच्याशी चर्चा करा आणि मदत मिळवण्याचा प्रयत्न करा. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत, ग्राम आरोग्य समिती, महिला गट, रुग्ण कल्याण समिती, शाळेतील शिक्षक, सरकारी संस्था यापैकी जिथे जिथे संधी मिळेल तिथे तिथे या विषयाबद्दल बोलत रहा. मनोविकार हा जणू कलंक आहे हा गैरसमज हळूहळू काढून टाकण्याचा प्रयत्न करा. उपचाराने हे आजार बरे होऊ शकतात हे त्यांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न करा.

मनोविकार दुरुस्त होणे ही त्या त्या कुटुंबात एक मोठी गोष्ट आहे. यामुळे कुटुंबाचे आरोग्य सुधारते. घरची आर्थिक परिस्थिती सुधारते आणि सुखशांती मिळते म्हणून हा मुळात सामाजिक विकासाचाच मुद्दा आहे.

प्रत्येक गावात-वस्तीत स्वयंसेवक तयार करण्याचा प्रयत्न करा कारण प्रत्येक गावात तुम्ही सदैव थांबू शकत नाही. हे स्वयंसेवक तिथल्या कुटुंबांना थोडाफार आधार देऊ शकतील.

दरवर्षी १० ऑक्टोबरला मानसिक आरोग्यदिन असतो. हा दिवस तुमच्या परिसरात काही ठिकाणी साजरा करा. या निमित्ताने तुम्हाला इतरांशी या विषयाबद्दल चर्चा करता येईल. तुमच्या इतर सहकार्‍यांशी मानसिक आरोग्याच्या कामाबद्दल संपर्क आणि संवाद ठेवा.

आपल्या परिसरातल्या मनोविकारग्रस्तांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची वर्षातून २-३ वेळा तरी एकत्र बैठक घ्या. एखाद्या सभेच्या ठिकाणी जमणे जास्त चांगले. तेवढीच त्यांची करमणूकही होईल.

जेव्हा शक्य होईल तेव्हा मानसिक आरोग्याबद्दलचे संशोधन, सर्व्हेक्षण, चिंतन-मनन चालू ठेवा. यामुळे या कामात तुम्हाला एक दृष्टी मिळेल आणि उत्साह वाढेल. आपले काम लोढणे होणार नाही तर आनंदाचे होईल असा प्रयत्न ठेवा.

निदान उपचार आणि पाठपुरावा

आपल्या परिसरात मनोविकारांचे निदान व उपचार शिबीर दरवर्षी ठेवा. यामुळे आतापर्यंत उपचार न घेतलेल्या किंवा निदान न झालेल्या मंडळींना चालना मिळेल व जवळ सोय झाल्यामुळे अधिक लोक फायदा घेऊ शकतील.

मनोविकारग्रस्त व्यक्तींच्या कुटुंबांची दर महिन्याला विचारपूस करा, भेट घ्या आणि अडचणी असतील तर त्याचे निराकरण करा.

लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला व उपचार घेण्यासाठी घरातील मंडळींना प्रवृत्त करा. मनोविकारग्रस्त व्यक्ती स्वत: येत नसेल तर तिला डॉक्टरांकडे घेऊन जावे लागेल.

शक्यतो मनोविकारग्रस्ताला सरकारी रुग्णालयात घेऊन जा. तिथे इलाज होत नसेल तर योग्य अधिकार्‍यांशी संपर्क साधून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. अगदीच शक्य झाले नाही तर खाजगी डॉक्टरांकडे जायला हरकत नाही पण त्याआधी खर्चाची तजवीज करा.

दरमहा कुटुंबाशी गाठभेट करून उपचार चालू आहेत की नाही याची खात्री करा.

उपचारांबरोबरच रुग्णाची इतर काळजी (उदा. स्वच्छता) आणि योग्य खाणे पिणे याबद्दल खात्री करा.

कुटुंबामध्ये बोलताना उपचारांनी रुग्ण बरा होऊ शकतो यावर नेहमीच भर द्या, इतर लोक बरे झाल्याची उदाहरणे द्या.

मनोविकारग्रस्त व्यक्तीच्या मानवी गरजा व हक्क बरेच वेळा तोडले जातात. या दृष्टीने त्यांना सहृदयतेने वागवले जाते की नाही याचा अंदाजही घ्या. अडचणी दिसल्यास निराकरण करण्याचा प्रयत्न करा. मारहाण, बांधून घालणे, जेवण नाकारणे, ज्यादा कष्ट करून घेणे किंवा क्वचित लैंगिक अत्याचार असे प्रकार घडू शकतात हे मनात ठेवून अंदाज घेत राहा.

शासकीय रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचार्‍यांशी चांगले संबंध ठेवून आपले काम सोपे करा. शक्यतो भांडण्यापेक्षा संवादातून प्रश्‍न सोडवा. डॉक्टरांचे सहकार्य तर अगदीच आवश्यक आहे आणि बहुतेक डॉक्टर्स हे करतीलच.

डॉक्टर कर्मचार्‍यांशी कधी संघर्ष उद्भवलाच तर शक्यतो वादविवाद त्या मुद्याभोवतीच ठेवा. व्यक्तीद्वेष किंवा एखाद्या व्यक्तीला शरण जाणे हे दोन्ही मार्ग टाळले पाहिजेत.

पुनर्वसन

कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज घ्या. अशा आजारांमुळे आर्थिक अडचणी निर्माण होतात. शिवाय त्या व्यक्तीचे उत्पन्नही थांबलेले असल्याची शक्यता असते.

मनोविकारग्रस्त व्यक्तींनी ३-४ महिन्यात आपल्या कुटुंबाच्या सामान्य कामकाजात हातभार लावल्यास इतर गोष्टी सुरळीत होतात. याला कदाचित थोडा अधिक वेळ लागू शकतो. उपचारांनी सुधारणा झाल्यावर लवकर मार्ग निघू शकतो.

कधीकधी त्या व्यक्तीला आपले नेहमीचे काम करण्यात काही कमतरता किंवा हतबलता आलेली असते. उदा. फेफर्‍यांचे उपचार चालू असताना जोखमीची कामे टाळायला पाहिजे. अशा लोकांना थोडी हलकी कामे व देखरेख लागते.

काही जणांना व्यवसाय प्रशिक्षणाची गरज लागू शकते. यासाठी आय.टी.आय. सारख्या संस्थांची किंवा तिथल्या शिक्षकांची मदत घ्यावी.

एखादे कुटुंब गरीब असेल तर त्यांना योग्य त्या सरकारी सवलती (उदा. पिवळे रेशनकार्ड, मनरेगा रोजगार इ.) मिळवून देण्याचा प्रयत्न करा. याने परिस्थिती थोडी सोपी होईल.