मानसिक आरोग्य आणि मनोविकार

मांत्रिक आणि भगत

मनोविकारांचे प्रमाण आणि उपचारांच्या सोयी कमी यामुळे भारतात अजूनही मांत्रिक आणि भगत बुवा– यांची शिलके आहेत, ग्रामीण भागात तर जास्तच. तसेही २०-३० वर्षांपूर्वी फार चांगले उपचार नसल्याने या आजारांना उपचार नाहीत असाच समज होता. त्यासाठी दैवावर आणि देवावर भरोसा हा एकच मार्ग होता. म्हणूनच मांत्रिक भगतांचीसोय ही एक मोठीच गोष्ट होती. वास्तविक आता तर सगळे बदलायला हवे. तरीही त्यांच्याकडे मनोविकारांसाठी लोक अजून का जात आहेत?

पहिला मुद्दा म्हणजे मनोविकारांबद्दलची शास्त्रीय माहिती अथवा जाणीवच कमी आहे. हे आजार आजार म्हणून फारसे ओळखले जात नाहीत त्यामुळे त्यावर औषधोपचार असतात हे मनातच येत नाही.

दुसरा मुद्दा म्हणजे अशा प्रकारांना भूत पिशाच्च किंवा दैवी प्रकोप वगैरे कारणे पूर्वीपासून चिकटली आहेत. त्याचा पगडा अजून आहे. त्यामुळे सुशिक्षित तसेच अशिक्षित दोघेही अशा आजारांसाठी भगत मांत्रिकांचा आधार घेतात.

तिसरा मुद्दा म्हणजे काही ठिकाणी वैद्यकीय सेवाच नाहीत किंवा खूप लांब आहेत. त्यामुळे जवळ जी सोय असेल तीच वापरली जाते. शारीरिक औषधोपचारांनी असल्या त्रासावर उपाय चालत नाही. त्यासाठी औषधेच द्यावी लागतात.

मनोविकार एक प्रकारचे लांछन किंवा कमीपणा समजले गेल्याने ते झाकून ठेवणे किंवा इतरांपासून लपवून ठेवणे याकडेच अनेक कुटुंबांचा कल असतो. कारण यामुळे सामाजिक संबंध, शिक्षण, लग्न इ. मध्ये अडचणी येऊ शकतात. या एकूण लपवण्याच्या प्रवृत्तीमुळे वैद्यकीय उपचारांपेक्षा मांत्रिक किंवा धार्मिक लोकांकडे लोकांचा कल राहतो.

आणखी एक मुद्दा म्हणजे मनोविकार हे देव देवतांशी जोडले गेल्याने त्याला उगीचच एक धार्मिक अंग आलेले आहे. त्यामुळे बरेच संत-महंत गुरु, बुवा वगैरे मंडळींकडे लोक जातात आणि ते थातूर मातूर सल्लेही देतात. काही सामान्य मनोविकारात याचा उपयोग झाला पण गंभीर मनोविकारांना त्याचा काही उपयोग नसतो. धार्मिक गुरूंनी यासाठी योग्य सल्ला देण्याची गरज आहे परंतु उलट लोकांना नादी लावण्यासाठी मनोविकार बरे पडतात. धार्मिक उपचारांमुळे मनोविकारांचा शिक्का बसत नाही हेही एक आकर्षण असते.

भगत-मांत्रिक या पारंपरिक वर्गाने या सामाजिक गरजेचा फायदा घेऊन आपले अज्ञान मुळं आणि कधीकधी हानीकारक प्रकार चालूच ठेवले आहेत. महाराष्ट्रात यासाठी जादूटोणा विरोधी कायदा काही संस्थांनी विधानसभेपर्यंत मांडला आहे. त्यावर धार्मिक गटांचे आक्षेप असल्याने असा कायदा पारीत होऊ शकलेला नाही.

काही मनोविकार हे इतर शारीरिक आजारांप्रमाणेच भासतात. उदा. झटके येणे, फेफरे, दातखील बसणे इ. डॉक्टरही सहजपणे याबद्दल नीट सांगत नाहीत. त्यामुळे मांत्रिक- भगतांकडे जाण्याचा कल असतो.

एकूणच आरोग्य कार्यकर्त्यांनी मनोविकारग्रस्त रुग्णांना आणि कुटुंबांना अशा प्रकारापासून कौशल्याने दूर करायला पाहिजे आणि योग्य उपचारांकडे वळवायला पाहिजे.

भगत मांत्रिक अनेक प्रकारचे असतात.

धार्मिक गुरु आणि संत महंत हे तत्वज्ञान, धर्मोपदेश, श्रद्धा वगैरे गोष्टी मनोविकारांशी मिसळून सल्ले देत असतात. अनेक टी.व्ही. चॅनेल्सवर त्यांचे कार्यक्रम चालतात व फोनवर प्रश्‍नोत्तरेही होतात. मंत्र, जप, काही झाडपाले आणि कधीकधी योगोपचारांचा सल्ला देऊन वेळ मारून नेली जाते. कधीकधी यात काही कर्मकांड, विधी, शांती, यज्ञ वगैरे देखील सांगितले जातात. यातून बरे वाटल्याचे कुणी सांगितले तर तेच परत परत ऐकवले जाते. मात्र ज्यांना गुण नाही आला त्यांच्यापुढे काहीच दाखवले जात नाही. या पद्धतीने प्रचार वाढत राहतो.

आदिवासी समाजामध्ये भगत (म्हणजे देवाचा भक्त) हे तग धरून आहेत. शारीरिक आजारांसाठी देखील लोक कालपर्यंत त्यांचा उपचार घेत होते. खरे म्हणजे मनोविकारांमध्ये भगतांचे उपचार अगदी ठरलेले असतात. भूत पिशाच्य पळवण्याची करणी, कोंबडे-बकरे कापणे, अन्न किंवा कपडे देणे, मारझोड वगैरेपैकी आलटून पालटून प्रयोग होत राहतात. आमच्या माहितीत एका कुटुंबाने चार वर्षे भगतामागून भगत बदलून पाहिले आणि शंभरावर कोंबड्या कापल्या. यात त्यांचा सहजपणे लाखभर रु. खर्च झाला पण आजार काही बरा झाला नाही. शेवटी डॉक्टरकडेच इलाज झाला. यात पैसे तर गेलेच पण वेळही गेला आणि कामाचे नुकसानही झाले. काही भगत तर रुग्णाचे हाल करतात. वाळीत टाकण्याचा सल्ला देतात तर कधीकधी बलात्कार सारखे गुन्हेही करतात.

भविष्य सांगणारे ज्योतिषी हे यातलाच एक सौम्य प्रकार आहे. काही ठोकताळ्यांवर आधारलेले सल्ले ही मंडळी देतात. मनोविकारांशी ग्रह-तार्‍यांचा संबंध जोडून देतात आणि खर्चिक उपायही सांगतात. निरनिराळे मौल्यवान खडे, शांती, दान-दक्षिणा वगैरे गोष्टींचा मनोविकारांवर प्रत्यक्ष उपाय काहीच होऊ शकत नाही.

मांत्रिक भगत वगैरे प्रकारांबद्दल कार्यकर्त्यांनी घ्यायची भूमिका

आपल्या समाजातल्या अंधश्रद्धा आणि भोंदू बाबांची परंपरा संपवणे शक्य नाही कारण त्यात धर्माचीही सरमिसळ केली जाते. खरे सांगायचे तर धर्म हे जीवनाचे अध्यात्मिक तत्वज्ञान असते. देवदेवतांशी त्याचा संबंध असायला नको. मात्र आपण धर्माच्या तत्वज्ञानापेक्षा आणि खर्‍या मुल्यांपेक्षा जादू टोणे आणि कर्मकांड यालाच शरण जातो. ही परिस्थिती लगेच बदलणार नसली तरी वैज्ञानिक शहाणपणाने मनोभूमिका हळूहळू बदलत जातील हे निश्‍चित.

आपण काय काय करू शकतो – तर

मनोविकारग्रस्त व्यक्तींवर योग्य उपचारांचा उपयोग कसा होतो हे दाखवणारे उदाहरण लोकांसमोर ठेवले पाहिजे. अर्थातच यासाठी त्या त्या कुटुंबाचा खाजगीपणा व प्रतिष्ठा जपण्याची काळजी घेऊनच. उपचाराने योग्य बदल होतो व माणूस बरा होतो हे दिसल्यावर हळूहळू लोक त्या मार्गाला वळतीलच यात शंका नाही.

काही जिल्ह्यांमध्ये अंधश्रद्धाविरोधी कार्यकर्ते किंवा गट असतात. अशा लोकांची मदत घेऊन भगत-मांत्रिक, जादूटोणा, बुवाबाजी याबद्दल कार्यक्रम घेतले पाहिजे. काही कार्यकर्ते यात प्रत्यक्ष सामील न होता आडून पण काम करू शकतात. हे ज्या त्या कार्यकर्त्याने ठरवायचे आहे.

मांत्रिक-भगतांशी लढणे एक वेळ सोपे पण भाविक बुवाबाजीशी सामना करणे कठीण. अशा लोकांना राजकीय तसेच कायदेशीर पाठबळ असते. समाजात वजन आणि भगतांची गर्दी असते. त्यांच्याविरुद्ध बोललेले लोकांना आवडत नाही व भावना दुखावल्याचा आरोप होतो. जोपर्यंत धार्मिक नेते गंभीर मनोविकारांनी ग्रस्त लोकांची दिशाभूल करत नाहीत आणि वैद्यकीय उपचारांचा सल्ला देतात तोपर्यंत आपण वेगळे काही करण्याची गरज नाही मात्र त्यांच्या सल्ल्याने उपचार व्हायच्या ऐवजी दुसरेच उपाय चालू आहेत असे दिसते तर त्या कुटुंबाशी बोलून हस्तक्षेप करायला पाहिजे. हे काम कौशल्याचे आहे आणि समुपदेशनाचे आहे. फार आक्रमक न होता हळूवारपणे हा गुंता सोडवावा लागेल.

ज्योतिषी वगैरे मंडळी त्या मानाने निरुपद्रवी असतात. याबद्दल सुसंगत तर्कविचार सांगणे आणि मनोभूमिका बदलणे हाच उपाय आहे. नोकरी-धंदा, कोर्टकेस वगैरे बाबतीत भले ज्योतिषी सल्ला देवोत पण मनोविकारांच्या बाबतीत मात्र आपण त्या कुटुंबाला भेटून सत्य स्थिती सांगून योग्य उपचारांकडे वळवले पाहिजे.

अशा बाबींमध्ये आपण हस्तक्षेप किती आणि कसा करायचा हे त्या त्या कार्यकर्त्याच्या प्रकृतीवर आणि  कौशल्यावर अवलंबून आहे. आक्रमण नेहमीच उपयोगी पडते असे नाही. तसेच सामोपचारही दर वेळेस यशस्वी होत नाहीत. तरीही मनोविकारांचे हे क्षेत्र तर्कसंगत व वैज्ञानिक जाणीवांचे असल्यामुळे प्रबोधन हाच खरा त्यावरचा पक्का उपाय आहे. काही गोष्टी आपल्याला परहस्ते (परस्पर) करून घेता येतात तर काही बाबतीत स्वत: हस्तक्षेप करायला लागतो. अकबर आणि बिरबलाची एक गोष्ट प्रसिद्ध आहे. जमिनीवर मारलेली रेघ तिला स्पर्श न करता लहा करून दाखव असे अकबराने बिरबलाला सांगितले. त्यावर बिरबलाने त्या शेजारी लांब रेघ ओढून पहिली रेघ लहान केली, हात न लावता. सामाजिक प्रबोधनातही ही भूमिका जास्त उपयोगी पडू शकेल.