कान-नाक-घसा

बाह्यकर्णाचे आजार

बाह्यकर्णाच्या त्वचेवर पुळी होणे आणि कान चिडणे

कानाच्या त्वचेवर ठिकठिकाणी पुळया होऊन पू येणे याला कान चिडणे असे म्हणतात. हे लहान वयात विशेषकरून आढळते. अस्वच्छ सुईने कान टोचल्यावर ब-याच मुलांना हा त्रास होतो.

कधीकधी पुळी बाह्यकर्णाच्या आतल्या अरुंद भागात होते. अशा वेळी ती बाहेरून सहज तपासणीत दिसत नाही. अशा वेळी कान दुखतो व पुळी फुटल्यावर पू येतो. असा पू आल्यावर कानात पुळी असण्याची शंका येणे साहजिक आहे. अशा वेळी कानातला पू स्वच्छ फडक्याने किंवा कापसाने टिपून घ्यावा. यानंतर कानाची तपासणी करावी. ब-याच वेळा पुळीचे तोंड स्पष्ट दिसते. लहान मुलांच्या कानाची दिशा प्रौढांपेक्षा सरळ असते. म्हणून मुलांच्या कानाची पाळी मागे ओढून प्रकाशझोत टाकल्यावर पडदा स्पष्ट दिसतो. फुटलेली पुळी नसल्यास ‘पू’ पडद्यामागून म्हणजे मध्यकर्णातून येत असला पाहिजे.

एका साध्या दुर्बिणीने ही तपासणी करता येते. या तपासणीत कानाच्या पडद्याला भोक आहे किंवा नाही याची खात्री करता येईल.

उपचार

बाह्यकर्णात पुळी असल्यास किंवा कान चिडला असल्यास कानात जंतुनाशक थेंब (दिवसातून तीन-चार वेळा) टाकावेत. याबरोबर पोटातून (1) अम्पोक्सिन आणि (2) ऍस्पिरिन या गोळया दिल्यास चार-पाच दिवसांत आराम पडेल. लहान मूल असेल तर ऍस्पिरिन ऐवजी पॅमॉल द्यावे.

कान चिडलेला असल्यास वरील उपचाराबरोबरच रोज कोमट पाण्याने धुऊन, कोरडा करून जंतुनाशक मलम लावावे.

होमिओपथी निवड

कल्केरिया कार्ब, हेपार सल्फ, मर्क्युरी सॉल, पल्सेटिला, सिलिशिया, सल्फर

मध्यकर्णाचे आजार

मध्यकर्णाचा मुख्य आजार म्हणजे कमीजास्त मुदतीची कानदुखी व कानसूज. हा आजार पुष्कळ आढळतो.

आकस्मिक कान सुजणे – कारणे

मध्यकर्णसूज हा आजार बहुतेकदा कान-नाक-घसा नळीतून (कानाघ नळी) येणा-या दूषित स्त्रावामुळे होतो. सर्दीपडसे किंवा घसादुखी यानंतर दोन-चार दिवसांनी कान दुखायला लागणे हे या आजाराचे नेहमीचे चित्र आहे. (मात्र दर वेळेस सर्दीपडशानंतर कान सुजतोच असे नाही). लहान वयात कानाघ नळी जास्त सरळ व कमी लांबीची असते. त्यामुळे मुलांमध्ये हे आजार जास्त प्रमाणात येतात. मध्यकर्णाचा जंतुदोष बहुधा ‘पू’ निर्माण करणा-या जंतूंमुळे होतो. सुरुवातीस कान गच्च होणे, जड होणे, मंद दुखणे, त्यानंतर ठणकणे, पडदा फुटून पू येणे व ठणका बंद होणे या क्रमाने हा आजार चालतो.

लक्षणे

काही वेळा ठणका लागून पडदा फुटण्याची पाळी न येता आपोआपही हा आजार थांबतो. कान फुटल्यावर चार-पाच दिवस पू वाहून कान कोरडा होतो. यानंतर कानाचा पडदा पूर्वीसारखा भरून येईपर्यंत 2-3 आठवडे त्या कानाने कमी ऐकू येते. लवकर बरा न झाल्यास कानात सूज व पू कायम राहतात. याने कान खराब होतो. लहान बालकांमध्ये या आजारात ताप, उलटया व कधीकधी जुलाब होतात. कान दुखल्याने मूल कानाकडे हात नेते.

उपचार

काही वेळा कानदुखी ही विषाणूंमुळे येते. पण ती वेगळी ओळखता येत नाही, म्हणून

  • 5 दिवस  अम्पोक्सिन गोळया द्याव्यात.
  • ऍस्पिरिन किंवा पॅमाल द्या.
  • दिवसातून 3 वेळा कानात जंतुनाशक थेंब टाका.
  • कोरडया स्वच्छ कापसाने कापसाच्या वातीनेकानातला पू दर दोन-तीन तासांनी टिपून घेण्यास नातेवाईकांना शिकवा. कापसाचा बोळा ठेवून तो भिजला की काढून नवा बसवणे हा सोपा मार्ग आहे.
  • चार-पाच दिवसांत पाणी/पू येणे न थांबल्यास किंवा दुखणे कायम राहिल्यास किंवा मेंदूसुजेची चिन्हे दिसल्यास ताबडतोब तज्ज्ञाकडे पाठवा.
होमिओपथी निवड

आर्सेनिकम, बेलाडोना,चामोमिला, फेरम फॉस, हेपार सल्फ, लॅकेसिस, मर्क्युरी सॉल, नेट्रम मूर, पल्सेटिला, सिलिशिया, सल्फर

कानाची जुनाट सूज

काही जणांच्या बाबतीत फुटलेला कान पूर्णपणे बरा न होता परत परत कानदुखी-सूज येत राहते. यामुळे कानाचा पडदा पूर्वीसारखा भरून येत नाही. पडद्याचे भोक कायम राहते. हा कान कायमचा अधू होतो. यातही एक वाईट प्रकार म्हणजे मध्यकर्णाच्या मागे वरच्या बाजूला हाडाच्या पोकळीत सूज-गाठ कायम राहते. यातून हळूहळू मेंदूपर्यंत जखम-सूज वाढत जाते. घाण वास (खराब झालेल्या तुपासारखा आम्बट) येत राहतो. या प्रकारात मेंदूसूज होण्याचा मोठा धोका असतो.

म्हणूनच कान फुटल्यावर दोन आठवडयांत पूर्ण बरा झाला नाही तर तज्ज्ञाकडे पाठवणे आवश्यक आहे. तसेच आकस्मिक कानसूज झाल्यावर उलट्या होऊ लागलियास, डोळे फिरवल्यास, चेहरा तिरपा झाला आहे, चक्कर येऊ लागल्यास , त्वरित डॉक्‍टरांकडे न्या.. उपचार मध्येच सोडल्यास कानातला जंतुदोष टिकून जास्त नुकसान होण्याचा धोका असतो.

  • हाडसूज दीर्घकाळ चालणा-या मध्यकर्णाच्या सुजेचा आणखी एक दुष्परिणाम म्हणजे कानाच्या मागे असलेल्या हाडाच्या टेंगळामध्ये सूज पसरणे. या टेंगळावर दुखरेपणा आणि वेदना आढळल्यास जंतुविरोधी औषधांनी जोरकस उपचार करावे लागतात. मात्र तरीही आजार न थांबल्यास शस्त्रक्रिया करून त्यातला पू काढून टाकावा लागतो.
  • बहिरेपणा: मध्यकर्णाचा दाह व पू दीर्घकाळ चालल्यानंतर कानाचा पडदा व हाडांची ध्वनिवाहक साखळी यांत बिघाड होऊन बहिरेपणा येतो. अशा वेळी शस्त्रक्रिया करून पडदा व हाडांची साखळी यांची दुरुस्ती (शरीरातील इतर ठिकाणचे भाग वापरून) करावी लागते
  • ध्वनिशंखदाह: मध्यकर्णाच्या जुनाट आजारानंतर अंतर्कर्णापर्यंत सूज जाऊन ध्वनिकोष, शंख, इत्यादी नाजूक भागांचे नुकसान होते. यामुळे त्या कानापुरता बहिरेपणा येऊ शकतो. या बाबतीत काहीही उपाय करता येत नाही. अशावेळी मध्यकर्णाची शस्त्रक्रियाही निरुपयोगी ठरते; कारण ध्वनिसंदेशवहनाचे कामच बंद पडते.
कानाचा पडदा फाटणे

कानाचा पडदा अचानक फटण्याची दोन प्रमुख करणे म्हणजे तीव्र मोठा आवाज (उड डिजे, फटाका ) किंवा कानावर मारहाण. काही पालक मुलांना किंवा नवरे स्त्रियाना मारहाण करतात, त्यात कानावर फटका बसला तर पडदा फाटू  शकतो, त्याने  खूप वेदना होतात आणि त्या कानाला ऐकू येईनासे होते. डिजे किंवा स्फोटक आवाज ही आणखी एक कारण आहे. 80 डेसीबल च्या वरचा ध्वनि हानिकारक असतो. अश्यावेळी कानात काहीही औषध टाकू नये, कान दुखल्यास तोंडाने क्रोसिन गोळ्या द्याव्या. महिनाभरात बरा होतो.ध्वनिप्रदूषणामुळे येणारी बधिरता

ध्वनिप्रदूषणामुळे बधिरता येऊ शकते. मोठा आवाज थोडाकाळ जरी टिकला तरी त्यामुळे नुकसान होते. तसेच मध्यम ध्वनिप्रदूषण सतत असले तरी कानाचे नुकसान होऊ शकते. आपल्या शहरांमध्ये विविध प्रकारचे ध्वनिप्रदूषण आणि गोंगाट वाढत असल्याने बधिरतेचा धोकाही वाढत आहे. आवाजाची तीव्रता आणि कालावधी, जेवढी जास्त तेवढे नुकसान जास्त.

मोठया आवाजाने किंवा गोंगाटाने ध्वनिशंखातल्या पेशी खराब होतात. आधी शंखाच्या सुरुवातीच्या टोकाकडील पेशी खराब होतात. या ध्वनीपेशी परत निर्माण होऊ शकत नाहीत. या पेशी खराब झाल्याने वरचे स्वर टिपेचे स्वर आधी ऐकू येत नाहीत. नंतर नंतर खालचे (म्हणजे खर्जाचे) स्वरही ऐकू येत नाहीत.

काही वेळा हे नुकसान तात्पुरते असते व 2/3 दिवसांत भरून येते. संशोधनानुसार असे दिसते की ऍंटी-ऑक्सिडंट (गंजरोधक) उपचारांमुळे हे नुकसान लवकर भरून येते आणि कायमचे नुकसान टळते. कांदा, लसूण, फळे, ऍस्पिरिन, इ. पदार्थात हे गंजरोधक गुणधर्म असतात.

ध्वनिप्रदूषणाने नेमके कोणते नुकसान झाले आहे हे ऑडिओमेट्री (श्रवणमापन) तपासणीतच कळू शकते.

काही उदाहरणे व अभ्यास
  • ट्रॅक्टर चालवणा-या शेतक-यांना अशा प्रकारची कर्णबधिरता येते असे आढळले आहे.
  • अवजड कारखान्यात यंत्रसामग्रीचा मोठा आवाज होतो. तेथे हळूहळू सर्व कामगारांना काही प्रमाणात कर्णबधिरता होते असे आढळले आहे.
  • कापड गिरण्यांमध्येही कामगारांना कर्णबधिरता होते असे आढळले आहे.
  • एका अभ्यासात वाहतुक पोलिसांपैकी 76% पोलिसांना कर्णबधिरता आढळून आली.
  • खाण कामगारांपैकी 12 % कामगारांना कर्णबधिरता आढळली.
  • निरनिराळया अनेक उद्योगधंद्यात आवाजाचे प्रमाण खूप असते तिथे हा धोका असतोच (छपाई, बांधकाम, लाकूड मिल, लेथ मशिन, इ.)
  • भारतीय कामगार विमा संरक्षण कायद्यानुसार 1948 पासून कर्णबधिरता हा एक औद्योगिक आजार मानला गेला आहे. पण यासाठी भरपाई मिळायला 1996 साल उजाडायला लागले. अजूनही अशा केसेस कमीच आहेत.

ध्वनिगोंगाटापासून संरक्षण तीन युक्त्या:  (आवाज कमी करा, आवाज लांब ठेवा, बोळे घाला.)

गोंगाट-आवाजाचे प्रमाण कमी व्हावे म्हणून विविध प्रकारचे प्रयत्न करणे आवश्यक आहे.

  • भोंगे, हॉर्न, लाऊडस्पीकर हे सर्व गोंगाट निर्माण करतात. यांचा वापर कमीत कमी करणे हा एक मुख्य प्रयत्न असायला पाहिजे. कारखानदारीत गोंगाट कमी करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न व सुधारणा कराव्या लागतात. पण तरीही गोंगाट निर्माण होतोच.
  • आवाजापासून लांब राहणे हाही एक उपाय आहे.
  • कानातून शिरणारा आवाज कमी करण्यासाठी तीन प्रकारची साधने संरक्षक म्हणून उपयोगी आहेत. कानाचे मफ, कानासाठी बूच, कापसाचे बोळे, बोटाने कान बंद करणे (तात्पुरते). ही साधने आपण सहज वापरू शकतो.
ध्वनिप्रदूषणाने बधिरता : लक्षणे व चिन्हे

ध्वनिप्रदूषणामुळे होणा-या नुकसानीचा अंदाज सहजपणे येत नाही. वेदना नसते त्यामुळे कमी ऐकू येणे हा एकमेव निकष असतो. यासाठी खालील खुणा लक्षात ठेवा.

  • मोबाईल किंवा टेलिफोनवरचे बोलणे न ऐकू येणे.
  • टी.व्ही. किंवा रेडिओचा आवाज मोठा करून ऐकण्याची सवय.
  • इतर लोक आपल्याशी बोलताना ओरडून किंवा रागावून बोलतात असे वाटणे.
  • कानात गुणगुण/सूक्ष्म ध्वनी एकू येत राहणे.
इतर लक्षणे
  • लक्ष लागणे/ एकाग्रता न होणे
  • त्रागा करणे किंवा चिडखोरपणा वाढणे, थकवा
  • डोकेदुखी
  • निद्रानाश
आवाजाचा थर्मामीटर

आवाजाची तीव्रता मोजण्याचे युनिट म्हणजे डेसिबल. आपण नाना प्रकारचे आवाज रोज ऐकत असतो. त्यातले काही साधे- सौम्य असतात तर काही भयंकर मोठे. काही आवाजांची आपल्याला सवयच होऊन जाते. मात्र 85 डेसिबल वरचे आवाज हानिकारक असतात.